[संकेश्वर ते हुबळी (कर्नाटक)] एकूण कापलेले अंतर १५५ किमी
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 3
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE च्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठूनही आम्हाला सायकल वर सामान लादेपर्यंत जो उशीर व्हायचा तो झाला होताच. पाहुण्यांचा निरोप घेऊन निघतां-निघतां सकाळचे साडेपाच वाजून गेले होते. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच महत्वाचा होता कारण आम्ही या अगोदर कधीही सलग तीन दिवस किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस १०० किमी पेक्षा जास्त अंतर सायकल चालवली नव्हती. त्यामुळे आमच्या शारीरिक क्षमतेची आज नवी परीक्षा होती. तेंव्हा विशेष काळजी घेत आम्ही भल्या पाहटे संकेश्वर च्या गल्लीतून शहराबाहेर पडत होतो तेव्हा मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरुड पुतळा पाहून आपसूकच सायकलचे ब्रेक ओढले गेले महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही पुढील प्रवासासाठी सायकली हायवेकडे वळवल्या.
गेले दोन दिवस जितका चढ चढावा लागला होता आज तितका चढाईचा रस्ता नसावा असा कयास लाऊन आम्ही प्रवासास सुरवात केली होती खरी परंतु मुख्य रोडवर आल्यावर जाणवले कि आज हि चढाईची लढाई करावी लागणार आहे.
सकाळी सकाळी चढ उतरणीचा खेळ सुरु झाला होता त्यामुळे घरून निघाल्यावर जाणवणारी थंडी गायब होऊन कपाळावरून घामाचे ओघळ खाली उतरायले लागले होते. कधी दुहेरी तर कधी एकेरी रस्त्यावरून आम्ही एक एक किलोमीटर कमी करत होतो.
आता चांगले उजाडले होते, लवकरच आमच्या डाव्या बाजूने सूर्यदेव त्यांची आजची राईड सुरु करणार होते आमचे मात्र फक्त काही किलोमीटरच अंतर कापून झाले होते. एका उंच ठिकाणी थांबुन आजचे सूर्यदेवाचे रूप कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज आम्ही वेळच्या मागे पडलो आहोत त्याची जाणीव होऊन आम्ही लागलीच पुढे निघालो.
समोर लांबपर्यंत चढाईचा रस्ता दिसत होता तो चढून गेलो कि उतार मिळेल या आशेने आम्ही तो चढ चढलो आणि समोरचे दृश्य पाहून सायकल बाजूला घेतली समोर घटप्रभा नदी वरील हिडकल धरण प्रकल्पाचे पाणी रोड च्या दोन्ही बाजूने सकाळी सकाळी कोकराने मेंढीच्या कुशीत उबेसाठी शिरावे त्याप्रमाणे डोंगरांच्या कुशीत शिरून उब शेकत होते.
क्षितिजावरून काहीसे वर आलेल्या सूर्याचे लाल प्रतिबिंब त्या पाण्यावर दूरपर्यंत पसरले होते, छोट्या छोट्या लाटा जणू त्याची लाली त्या पाण्यात मिसळून पाण्याला लाली आणत होते. या लाल रंगांच्या धुळवडीत थव्याने विहंग करणारे पक्षी लालबुंद पैठणीच्या काठावरली सुंदर नक्षी वाटत होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला हा रंगोत्सव साजरा होताना डाव्या बाजूला दुरर्पर्यंत पाणी पसरलेले होते तथपी त्या बाजुला पुलाचे काम चालू असल्याने तिकड्चे दृश्य व्यवस्थित न्याहळता येत नव्हते.
समोर पुन्हा एक मोठी चढाई दिसत होती, तेंव्हा येथून मन हालत नसले तरीही पायांना आता घाई झाली होती. तेंव्हा आम्ही तिथून काढता पाय घेतला आणी भरभर पुलाचा रस्ता संपवून समोरील चढाईच्या रोडवर आमच्या सायकली हाकल्या. सकाळच्या थंड वातावरणातच जास्तीत जास्त अंतर पार करायचे हि आमची योजना काही पूर्णत्वास जाताना दिसत नव्हती.
चढाईचा रस्ता त्यात बाजूच्या पुलाचे काम चालू असल्याने एकेरी बाजूने सर्व वाहतूक त्यामुळे खूपच सावधपणे हा चढाईचा लांब रस्ता पार करून माथ्यावर आल्यावर पाण्यासाठी ब्रेक घेणे क्रमप्राप्त होते. तिथे किनार पट्टीने कन्याकुमारीला निघालेले वाघ बंधूंची भेट झाली. एकमेकांना शुभेच्छा देऊन आम्ही आपापल्या मार्गाने पुढे निघालो.
थोडा सपाट रस्ता मिळताच आम्ही सायकल चा वेग वाढवला आणि काही अंतर पार केले. एव्हाना नऊ वाजत आले होतो आणि आमच्या योजनेप्रमाणे पन्नास किलोमीटर नंतर नाश्ता करण्याचा संकेत पाळण्यासाठी आम्ही लवकरात लवकर बेळगाव गाठण्यासाठी प्रयत्न करू लागलो. आज आमच्यापैकी कुणालाही पायात पेटके (क्रॅम्प) येऊ नये म्हणून आम्ही विशेष काळजी घेत होतो. परंतु न संपणारा चढाईचा रोड डोकेदुखी ठरत होती.
साडेनऊ च्या आसपास आम्ही बेळगाव हायवे च्या मार्गाने ओलांडले होते परंतु आम्हाला आसपास नाश्ता करण्यासाठी हॉटेल मिळत नव्हते तेंव्हा एका ठिकाणी महामार्गाच्या विरुद्ध बाजूला एक शेडवजा हॉटेल होते खूप भूक लागली होती तेंव्हा इथेच नाश्ता घेऊ असे ठरले. सुरुवातीला एक प्लेट घेऊन पाहू मग पुढचे पुढे बघू असे ठरले परंतु नाश्त्यात मिळालेल्या इडल्या खूपच मऊ व चवदार होत्या तेंव्हा आम्ही इथे मग पोटभर इडली सांबर, चटणी खाल्ली आमच्या प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी आम्हला खऱ्या अर्थाने दक्षिण भारतीय पदार्थाची चव चाखायला मिळत होती. अजून काही दिवस तरी या पदार्थांचा आम्ही आनंद घेणार होतो.
थोडे पुढे आलो कि रस्त्याच्या डाव्या बाजूला खूपच भव्य वास्तू नजरेस पडते ती वास्तू म्हणजे कर्नाटक राज्याचे बंगलोर नंतर चे दुसरे विधान सौध (विधानभवन) होय जिथे हिवाळी अधिवेशन होत असते. प्रशस्त जागेत स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या विधान भवनासमोर मोठी बाग फुलवलेली आहे. थोडा वेळ तिथेही घालवून आम्ही पुढे निघालो.
अजून थोडेसे पुढे गेलो कि एके ठिकाणी निर्माणाधीन जैन मंदिरासमोर मोठी जैन मूर्ती रोडवरून दिसत होती तेव्हा आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. तिथे श्री १०८ बालाचार्य सिद्धसेन सागर महाराज यांचे दर्शन घेऊन त्याच्या पूज्य हस्ते प्रसाद घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
अपेक्षाकृत रस्ता न मिळाल्यामुळे की काय परंतु आज अंतर अजिबात उरकत नव्हते शरीर हळूहळू उत्तर द्यायला लागले होते. एका पाठोपाठ एक चढाईचा रस्ता पार करताना आम्ही हैराण होऊ लागलो होतो. हळूहळू ऊनही चटकायला लागले होते जसा जसा वेळ जात होता ऊन जास्त आणि अंतर कमी कापले जात होते. एक वेळ तर शंका वाटत होती की आजचे अपेक्षित अंतर (१५० किलोमीटर) पार होते की नाही.
पुढे एका नाक्यावर आमची व सकाळी भेटलेले श्री वाघ सर यांची भेट झाली व सुयोग सर, वाघ सर आणि मी असे तिघांनी मिळून रस्ते सुरक्षा बाबतचे फलक झळकावत थांबलो होतो आणि या वेळी आम्ही परवानगी हि घेतली होती परंतु थोड्या वेळातच काही लोकांनी आम्हाला नाक्यावर थांबू नका असे सांगून तिथून जायला सांगितले आणि आम्हाला थोडक्यातच आमची मोहीम आवरती घ्यावी लागली.
गेल्या दोन दिवसांपेक्षा उन्हाचे चटके आज जास्त जाणवत होते जसे जसे आम्ही दक्षिणेकडे जात होतो तसे तसे उन्हाचे चटके दुपारी अगदी मराठवाड्यातल्या उन्हाळ्यासारखे जाणवत होते. निर्जलीकरणाचा धोका आमच्यासाठी खूप मोठा होता आणि असे झाल्यास पुढचा प्रवास आमच्यासाठी खूपच जिकरीचा होणार होता.
म्हणून PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासाचे आम्ही अगदी छोटे छोटे टप्पे करून तेच टार्गेट करून हळूहळू एक एक टप्पा पार करत होतो.
कित्तूर येईपर्यंत सूर्या अगदी माथ्यावर येऊन कला होता भयंकर गर्मी आणि ऊन जाणवत होते त्यात सायकल चालवणे म्हणजे खूपच जिकरीचे वाटत होते. घामाच्या धारात न्हात आम्ही रस्ता पार करत होतो. कित्तूरला पोहोचल्यावर तिथे चौकात कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मोठा पुतळा उभा आहे. ब्रिटिश राजवटी विरुद्ध आवाज उठवणाऱ्या त्या पहिल्या संस्थानिक होत.
त्या चौकात आम्ही काही फळे आणि ज्यूस घेऊन लागलीच पुढच्या प्रवासाला निघालो कारण आता वेळ खूप झाला होता आणि प्रवास अजून खूप होता.
थोडे पुढे आल्यानंतर आम्हाला तिथे एक गव्हर्मेंट आयबी म्हणजे इन्स्पेक्शन बंगलो होता. जिथे जाऊन आम्ही सोबत आणलेली फळे आणि सकाळी जैन मुनींनी दिलेला प्रसाद गव्हर्मेंट आयबीच्या आवारात बसून खाल्ला.
परंतु अजूनही ६० ते ६५ किमी चे अंतर बाकी होते तेंव्हा लवकरात लवकर पुढील प्रवासास सुरुवात करण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता.
दोन दिवसापूर्वी रेड कार्पेट वाटणारा रस्ता आज मात्र अजस्त्र अजगराने आपली घट्ट मगरमिठी सावजाभोवती आवळावी तसा भासत होता.
कोल्हापूरच्याही आधीपासून सुरु झालेली तुरे फुटलेल्या उसाची शेती इथपर्यंत दिसत होती. स्वतःला रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरवळीच्या हवाली करून काहीसा निरस झालेला प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करत होतो.
हळूहळू सूर्य अस्ताकडे कलायला लागला होता, हवेतली गर्मी काहीशी कमी झाल्याने आम्ही काही अंतर भरभर उरकून घेतले.
जसे जसे वातावरण थंड होत जात होते आमचे पेडल फिरवण्याचा वेग वाढत होता. लवकरच धारवाड नजरेच्या टप्प्यात आले आणि आता हुबळी फार दूर नाही म्हणत आम्ही राहिलेले थोडे अंतर अजून कमी केले. आज आम्ही दुपारी जेवणासाठी न थांबता केळी आणि चिवड्यावर दुपार भागवली होती.
थोड्या वेळातच सूर्य पश्चिम क्षितिजावर विसावणार होता आणि आम्ही अजूनही सायकल चालवत हायवे ने जात होतो रोडच्या बाजूलाच आम्हाला राहण्यासाठी हॉटेल मिळेल असे आम्हाला वाटले होते परंतु शोधमोहीम घेत आम्ही हुबळी ओलांडायला लागलो होतो, तेंव्हा आता परत थोडे मागे फिरून हुबळी शहरात प्रवेश केला परंतु तिथेही आम्हाला आसरा मिळेना.
राहण्यासाठी रूम/ हॉटेल शोधत असताना आम्ही जाऊन पोचलो ते श्री सिद्धारूढ स्वामी मठासमोर, तिथे नुकताच मोठा उत्सव होऊन गेला होता परंतु अजूनही मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई केलेली होतआणि भक्तगणांची लांबच्या लांब रांग दर्शनासाठी प्रतीक्षेत होती. तेव्हा दुरून दर्शन घेत आम्ही जुन्या बसस्थानकाकडे निघालो कारण अम्हाला तसे स्थानिकाकडून कळले कि तिकडे तुम्हाला नक्की हॉटेल मिळेल.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE प्रवासादरम्यान इथून पुढे हि आम्हाला रोज मुक्कामाचे ठिकाण शोधण्यासाठी अशी धावाधाव करावी लागणार याची जाणीव आम्हाला झाली.
बरीच शोधाशोध केल्यानंतर आम्हाला एक लॉज मिळाला तेथेच आम्हाला एक हंपी येथील सायकलस्वार श्री जोशी भेटले आणि त्यांनीही या लॉज वर शिक्कामोर्तब केले. या लॉज वर आम्हाला गरमपाणी मिळणार नव्हते तेंव्हा तिथे आम्हाला एक मराठी बोलणारा त्याच लॉज/ हॉटेल मध्ये काम करणारा तरुण भेटला त्याच्या मदतीने आम्ही पिण्याच्या गरम व गार पाणी येणाऱ्या मशीन मधून काही गरम पाण्याच्या बाटल्या घेऊन आंघोळी उरकल्या.
आज मला खूप थकल्यासारखे वाटत होते, त्यामुळे मला लवकरात लवकर विश्रांती घ्यायची होती. आम्ही लवकर समोरच्याच हॉटेल मध्ये जाऊन डोसा खाऊन लवकर बेडवर पडलो.
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासात उद्याचा काय प्लान करायचा यावरही मी उद्याचे उद्या पाहून म्हणून बेडवर पडताच झोपी गेलो.