[मलखेड (कराड) ते संकेश्वर (कर्नाटक)] एकूण कापलेले अंतर ११९ किमी.
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 2
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासातील पहिल्या दिवशीच ठरलेल्या अंतरापेक्षा जास्त अंतर कापल्याने आज तसे ही कमी अंतर कापायचे होते त्यामुळे सकाळी लवकर जाग येऊनही आम्ही जरा उशिरानेच तयारीला लागलो. कालच्या प्रवासाचा थकवा हि अजिबात जाणवत नव्हता. आम्ही आरामात सहा, सव्वा सहाच्या दरम्यान राईड ला सुरुवात केली. आम्हाला आधीच कल्पना दिल्याप्रमाणे रोड ची कामे सुरु असल्याने आम्हाला अत्यंत सावधगिरीने रोड च्या एका बाजूने जावे लागत होते. हवेत हवाहवासा गारवा होता. उजाडायला सुरुवात झाली होती तरीही समोरचा रस्ता आणि परिसर धुक्याने व्यापलेला होता. रोडच्या दोन्ही बाजूने भरगच्च उसाच्या शेतातून धुके झिरपत सोनेरी रंग धारण करायला लागले होते. या थंड वातावरणात आमच्या सायकली भराभर रस्ता कापत दौडत होत्या. आता पक्ष्यांच्या किलबिलाटात पूर्वेच्या क्षितिजावर लालबुंद सूर्याचे दर्शन घडू लागले होते.
रंगमंचावरचा पडदा उठावा आणि मंचावर दोन्ही बाजूनी धुराचे फवारे सोडून प्रेक्षकांच्या पहिल्याच भेटीसाठी कलाकारांनी ठुमकत प्रवेश करावा तसे या सकाळच्या हिरव्यागार मंचावर धुक्यामधून निसर्गाचे वेगवेगळे कलाकार आमच्या भेटीला येत होते. समोरचा धुक्यात हरवलेला रस्ता जणू आमच्यासाठी रेड कार्पेट होता तर दूरवरची नारळीची रांग जणू आमच्यावर कोवळ्या किरणांची धार ओतत होती आणि हीच किरणे प्राशन करून बांधावरली दवबिंदूची मखमली शाल आम्ही जसे जसे पुढे जाऊ तस तशी तिची चमक बदलत जात होती.
या स्वर्गीय मैफिलीत लीन होऊन जितके रसग्रहण करता येईल तितके करत आम्ही जोशात सायकली पिटाळत होतो. सूर्यदेवाने आता आपला प्रवास सुरु केला होता. धुक्याचे सावट आता बऱ्याच अंशी कमी झाले असले तरीही दूर शेतात अजूनही ते गर्द झाडीला बिलगून त्याचे अस्तित्व टीकवण्याची केविलवाणी धडपड करत होते.
या सुंदर सकाळची न्याहारी उरकेपर्यंत आम्ही कोल्हापूर गाठले होते, दरम्यान टोल नाक्यावर आम्ही आमचे “रस्ते सुरक्षा फलक” दर्शवून आमची सामाजिक जबाबदारी हि निभावली. निसर्गसौंदर्याच्या न्याहारीने आजच्या पुरती मनाची भूक भागली असली तरी आता पोटात कावळ्यांनी बंड केले होते आणि ते शामाविण्यासाठी एखादे चांगले हॉटेल आम्ही शोधत मार्क्रमण करत होतो. लवकरच एका हॉटेल मध्ये आम्ही सकाळचा नाश्ता उरकून घेतला.
एकतर आज अंतर कमी म्हणून सकाळी उशिरा सुरुवात केलेली त्यात आज आम्हाला श्री क्षेत्र स्तवनिधी येथे हि जायचे होते. त्यामुळे आज लवकर मुक्कामी पोहचण्याचे आमचे मनसुबे केव्हाच उधळले होते.
वेळेच्या कमतरतेमुळे महालक्ष्मी मातेचे वेशीवरूनच दर्शन घेऊन आम्ही कागल च्या दिशेने निघालो होतो. कागल सोडून आम्ही आता लवकरच परराज्यात म्हणजे कर्नाटकात प्रवेश करणार होतो. एव्हाना दुपारचा एक वाजायला आला होता आणि सकाळच्या कोवळ्या थंडीने आता रखरखत्या उन्हात झाले होते.
दूधगंगा नदीवरील पूल ओलांडून अधिकृतरित्या कर्नाटकात प्रवेश करताना जणू सायकल च्या भावना उचंबळत होत्या. इतके दिवस पित्याच्या घरी हुंदडणाऱ्या लाडक्या लेकीने नववधू होऊन नवीन स्वप्ने मनात घेऊन नवीन उंबरा ओलांडताना तिच्यात जो भावनांचा कल्लोळ माजलेला असेल अगदी तीच भावना जणू माझी सायकल व्यक्त करत होती. उद्याच्या नवीन स्वप्नांची नांदी आणि कालच्या घरच्या आठवणींची हुरहूर दोन्ही भावनांचे मिश्रण दाबत भांबावलेल्या नववधूने वेंधळ्याप्रमाणे वागावे तशी सायकल रस्त्याच्या कडेच्या मातीवरून वेडीवाकडी चालू लागली होती.
आम्ही अधिकृतरित्या कर्नाटक राज्यात प्रवेश केला असला तरीही अजूनही महाराष्ट्रात असल्याचा भास होत होता. दुकानवरील मराठ फलक, मराठी बोलणारी माणसे मात्र रस्त्यावरील फलक सांगत होते की आम्ही आता दुसऱ्या राज्यात पोचलो आहोत.
कर्नाटक राज्यात प्रवेश केल्यावर तिथल्या पहिल्याच टोल नाक्यावर आम्ही आमचे मिशन “रस्ते सुरक्षा” या बाबत चे कन्नड मधील फलक झळकावत थांबलो असता आम्हाला तिथे थांबण्यास मज्जाव करण्यात आला व तुम्ही तुमचे अभियान दुसरीकडे राबाबावे टोल नाक्यावर थांबता येत नाही असे सांगळण्यात आले. आधीच उशीर झालेला तेंव्हा आम्ही आमचा गाशा गुंढाळून पुढील प्रवासाला सुरुवात केली.
संपूर्ण रास्ता चढाईचाच होता परंतु पहिले दोन दिन दिवस आपल्याला चढाईचा रस्ता लागेल असे गृहीत धरून आम्ही आमची मोहीम आखली होती. परंतु रस्ता सतत चढाईचाच असेल असे आम्हाला वाटले नव्हते.
भर दुपारी निपाणी गावचा चढ आमची परीक्षा घेऊ लागला होता. त्यात प्रतिकूल वारे हि आमच्या कष्टात भर घालत होते, तेव्हा निर्जलीकरण (डीहायड्रेशन) होऊ नये म्हणून आम्ही द्रवपदार्थ व पाणी भरपूर प्रमाणात घेत होतो.
त्यात बऱ्याच ठिकाणी रस्ता खूपच खराब होता कधी कधी तर अगदी मोकळ्या खडीवरून सायकल चलवावी लागत होती त्यात आमच्या सायकली या छोट्या टायर च्या असल्याने प्रयत्नांची शर्थ करत आम्ही वाट काढत होतो.
आज भर दुपारचे उन्हे डोक्यावर घेऊन आम्ही श्री क्षेत्र स्तवनिधी या पुरातन जैन दिगंबर मंदिर परिसरात पोचलो आणि भव्य प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला.
प्रशस्त चौकोनी आकारातील हे मंदिर वर-वर पाहता आधुनिक वाटत असले तरी जेंव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला तेंव्हा मात्र या मंदिराची रचना पुरातन आहे याची जाणीव झाली.
मंदिराच्या समोरिल मनमोहक स्तंभ माझे लक्ष वेधून घेत होता. भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्रपाल ब्रम्हदेवांचे यथावकाश दर्शन घेऊन आम्ही भक्तिमय होऊन काही काळ तिथे घालवला.
एव्हाना आम्हाला निघेपर्यंत तीन वाजून गेले होते, येथे आमची आजच्या मुक्कामाची आणि जेवणाचीही सोय होती परंतु आम्ही आज संकेश्वर येथे आमचे स्नेही डॉ. पोतदार सर यांच्या घरी मुक्काम करण्याचे निश्चित करून प्रसाद / जेवण येथेच घेतले.
संकेश्वर अजून १३ ते १८ किमी राहिले होते आणि त्यात बरीच चढाईही असल्याने आता चार वाजेपर्यंत आपण संकेश्वर मध्ये पोचणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले होते. निदान पाच वाजेपर्यंत तरी पोचूया विचाराने आम्ही चाल सुरू केली.
ऊर्जा राखून ठेवून चढ चढणे जरा जिकरीचे जात होते. कोणत्याही एका दिवशी एका प्रवासाच्या टप्प्यासाठी आपले सगळे प्रयत्न (ऊर्जा) लावायची नाही याची सक्त ताकीद आम्ही स्वतःला दिली होती तिचे पालन करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. त्यामुळे सहाजिकच आमचा वेग कमी होत होता.
चढाई संपून मध्यावर आलो तेंव्हा सूर्य चांगलाच कललेला होता. हवेतली गरमी कमी होऊन वाहणारा गार वारा आमच्या घामाच्या ओघळांवर थंड फुंकर घालत होता. दूरपर्यंत पसरलेली पोटऱ्यात (कणीस बाहेर पडण्याच्या अगोदार ची स्थिति) आलेली ज्वारीची पिके, दुरवरून गुरांना हाकारण्याचा आवाज, किलबिलत लयबद्ध उडणारी पाखरे यांच्या मंदियाळीत माझी तंद्री मला केव्हाच माझ्या गावच्या बालपणीच्या शिवारात घेऊन गेला होती. “आता ईथेच मुक्काम करायचा का?” या मित्राच्या वाक्याने मी भानावर आलो आणि आम्ही पुढे निघालो.
मला शेती, खेडेगाव आणि तेथील जीवन यात विशेष रस असल्याने आणि सायकल प्रवास या गोष्टी न्याहळण्यास पूरक असल्याने मी वाटेत आलेली छोटी छोटी खेडी, तेथील घरांची रचना, कच्च्या-पक्क्या घरांची स्थिति तिथलीही ग्रामीण जीवनाची व्याख्या काही वेगळी नाही हे दर्शवीत होते. तिथल्या सामाजिक जीवनातील दरी न्याहाळत त्याची नाळ आपल्याही जीवनाशी जोडलेली आहे या जाणिवेने तिथली बारीक सारिक गोष्ट मनात जपत पुढे जात होतो.
पाच वाजून गेल्यावर आम्ही मुख्य रस्त्यावरून संकेश्वर च्या दिशेने कूच केले. थोड्या वेळातच कच्च्या रस्त्यावरून आम्ही गावात प्रवेश केला. तोपर्यंत डॉ. श्री. पोतदार सरांच्या घरून एक दोन वेळ फोन येऊन गेला होता की तुम्ही काधिपर्यंत पोचणार आहात आणि घरी कसे यायचे याची हि कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती.
गावातील मुख्य चौकातच बस स्थानक आहे तिथे आम्ही मित्राच्या सायकल चे तुटलेले स्टँड बदलून घेतले. स्थानिक लोकानी आपुलकीने चौकशी करून चहा तरी घ्या असा आग्रह धरला. तिथे चहा घेऊन आम्ही डॉ. श्री. पोतदार सरांच्या घराकडे गेलो. थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या घरी पोचलो.
आम्ही घरी पोचल्याचा खरा आनंद त्यांना झाला होता. त्यांच्या बोलण्यातून आणि उत्साहातून जाणवत होते. जणू की त्यांचीच मुले घरी परतल्याचा भास त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांचे बोलके डोळे सांगत होते. त्यांच्या आमच्या प्रति या व्यवहाराने आमच्यातला जो थोडा संकोच होता तो केव्हाच पळाला होता आणि आम्हाला हे घर आमचेच वाटू लागण्यात त्या माऊलीचाच हात होता यात शंका नाही.
आपली पिले घरी आल्यावर मातेने काय करू न काय करू नको या भावनेने हे करू का तुम्हाला? ते करू का तुम्हाला? म्हणून आनंदाने गोष्टी भराभर गोळा कराव्या तश्या भावनेने ती माऊली आमच्यासाठी करताना पाहून आपल्या घरच्या एक सदस्याच्यासोबत काम करणारे त्यांच्यासाठी एकदम अनोळखी असलेल्या दोघांप्रती इतके कमालीचे सच्चे वागणे कसे असू शकते याचा सुखद धक्का आम्हाला बसला होता. दहा मिनिटांच्या सांभाषणातच आम्ही घरचे सदस्य होऊन गेलो होतो.
आपल्या पिलांच्या कर्तुत्वाच्या गोष्टी कौतुकाने सांगताना त्यांच्या विरहाच्या वेदना डोळ्यांच्या कडांत साठवताना त्या माऊलीचे दर्शन मला माझ्या आईच्या कुशीत कधी घेऊन गेले ते कळलेही नाही.
पुढे यथावकाश घरच्या सर्व सदस्यांची ओळख त्यांच्याशी गप्पा हि रंगल्या परंतु सकाळी लवकर निघायचे असल्याने तिथले घरचे जेवण भूक नसतानाही येथेच्छ जेवन घेऊन आम्ही अंथरुणावर पडताच निद्रेच्या आधीन झालो.
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आज आम्ही पार केला होता.