माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पहिला

[पुणे ते मलखेड (कराड)] एकूण कापलेले अंतर १७५ किमी.

अनुक्रमणिका [INDEX]

१ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी सायकल प्रवास) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – पूर्वतयारी
२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पहिला
३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दूसरा
४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तिसरा
५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – चौथा
६.माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पाचवा
७. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सहावा
८. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सातवा
९ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – आठवा
१०. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – नववा
११. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दहावा
१२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – अकरावा
१३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – बारावा
१४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तेरावा
१५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – परतीचा प्रवास
१६. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE TIPS- खास सायकलस्वारांसाठी

PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 1

PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या दीर्घ प्रवासाच्या आदल्या रात्री काही केल्या झोप येत नव्हती, कधी एक अनामिक धडधड तर कधी-कधी रोमांचित काटा अंगावर उभा रहात होता. थोडीशी झोप लागते न लागते तोच अलार्म साडे-तीन वाजल्याचे बोंबलू लागला, मग लगेच उठून अंघोळ उरकून मित्राच्या सोसायटी मध्ये जायचे होते, तिथून आम्हला निरोप दिला जाणार होता.
नेहमी राईडला निघताना घरच्या इतर सदस्यांना न कळता, त्यांची झोप न मोडता निघत असे आज मात्र मला निरोप द्यायला सर्व जागे झाले होते. निघताना त्या मंद अंधारात हि बायकोच्या डोळ्यातली काळजी माझे पाय जड करत होती. एव्हाना सुयोग सरांचा फोन आला कि या लवकर ते निघायला तयार आहेत.
आमच्या गल्लीतल्या श्रीगणेशाला प्रणाम करून PUNE TO KANYAKUMARI या दीर्घ प्रवासाचे पहिले पायडल फिरवले. लगेजमुळे नेहमीपेक्षा आज सायकल चालवायला वेगळी वाटत होती. तिच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ तर लागणार होताच तेंव्हा सुरुवातीला अगदी सावध पवित्रा घेत मी सुयोग सरांची सोसायटी गाठली. तिथे त्यांच्या घरचे व आमचे कॉमन मित्र श्री. रवी सर हे निरोपाच्या तयारीनिशी माझी वाट पाहत होते. आता जास्त उशीर न करता त्यांनी आम्हला शुभेच्छा देऊन आमच्या या महत्वाकांक्षी प्रवासास हिरवा झेंडा दाखवला.
ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो ते शेवटी सत्यरुपात उतरले होते आणि आम्ही कन्याकुमारीच्या दिशेने कूच केले होते. का कुणास ठाऊक पण आज मनावर एक अनामिक दडपण जाणवत होते. एक अनामिक हुरहूर प्रवासाच्या रोमांच्यावर हावी होत होती. मागे पडणारा रस्त्यावरील दिवा जणू मिनमिनत आम्हला निरोप देत होता.
थोड्या वेळाने कोल्हापूरला निघालेले श्री. चंद्रमोहन मुरकुटे हे त्यांच्या मित्रासोबत आम्हाला भेटले व तिथून पुढे ते आमच्यासोबत तो पूर्ण दिवस थोड्या फार फरकाने सोबत होते.
नेहमीप्रमाणे आज लवकर परत यायची घाई नव्हती. त्यामुळे आम्ही निवांतपणे आमच्या सायकलशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत नवले ब्रिज ते बोगदा हा चढ चढत होतो.
PUNE TO KANYAKUMARI प्रवासाबद्दल एकमेकांशी पुढच्या योजना आखत आम्ही काही किलोमीटर अंतर कापले रोडवर आता वाहतूक हि वाढलेली होती, लोकांच्या सकाळच्या कामाच्या लगबगीत आम्ही अजून काही किलोमीटर अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होतो.

PUNE TO KANYAKUMARI
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासादरम्यान सूर्योदय

एव्हाना सूर्यनारायणाने आपले दर्शन या नारायणास दिले होते. नीरेच्या पाण्यावर सकाळच्या सूर्याचे प्रतिबिंब तरळत होते, त्याच्या लालीने पाण्यावर लाल छटांचे जाळे जणू सकाळच्या पाण्यावरून उठणाऱ्या वाफेस कैद करण्यासाठी विणले होते. ते सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. डोळ्यांनी मनास असे असंख्य मनमोहक क्षण अजून अनुभवायचे आहेत याचे भान करून देताच आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो.
छोटे छोटे ब्रेक घेत आमचा प्रवास सुरू होता. खंबाटकी घाट चढून गेल्यावर नाश्ता करू असे ठरले. या अगोदर आम्ही खंबाटकी घाट चढण्याचा सराव केला होता, परंतु आज सायकल वर सामान लादून चढाई करायची होती. शिवाय फक्त एव्हडाच घाट चढायचा आणि नंतर आपल्यला काही घाट चढायचा नाही या विचाराने आम्ही घाटपायथ्याला पाणी भरून घेतले आणि चढाई सुरु केली. समोर घाट रस्ता सुस्त अजगराप्रमाणे डोंगराला विळखा घालून बसलाय असा भासत होता. त्यावर हळू हळू चालणा-या गाड्यांची लांबच लांब रांग त्याची सुस्त चाल दर्शवित होती. आम्ही रस्त्याच्या एका बाजूने आमची चढाई सुरु केली.
काही वळणे चढुन गेल्यावर वाहतूक अजूनच संथ झाली होती, आम्ही त्यांना एका बाजुने पार करत जात होतो. आमची सायकल आज सज्ज होऊन युद्धावर चाललेल्या घोड्या प्रमाणे भासत होती. एरव्ही मोकळेपणाने वाऱ्याशी खिदळणारी सायकल आज मोहिमेवर चाललेल्या घोडदळाच्या आश्वासक चालीने चालत होती. घाटरस्त्यावर संथ वाहनांच्या रांगा जणू युद्धसज्ज सैनिकांची तुकडी वाटत होते, तर बाजूने त्यांना पार करत जाणारे आम्ही जणू त्यांच्यात नवा जोश भरणारे सेनापती होतो.
अर्ध्यापेक्षा जास्त घाट चढून गेल्यावर, जिथे वाहतूक खूपच संथ झाली होती तिथे बाजूला जागा पाहुन आम्ही आमच्या या प्रवासाचे ब्रीद “रस्ते सुरक्षा” च्या निमित्ताने काही फलक बनवले होते ते फडकावत जाणाऱ्या वाहनांना रस्ते सुरक्षेबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या या प्रयत्नास खूप वाहन चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याने आम्हाला हुरूप येऊन आम्ही पुढे येणा-या टोल नाक्यावर पुन्हा हे फलक घेऊन थांबायचा निर्णय घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली.
घाटात बराच वेळ गेल्याने आम्ही लगबगीने मग पुढील अंतर कापून नाश्ता करण्यासाठी घाट उतरून थांबलो. एव्हाना ६० पेक्षा जास्त अंतर कापून झाले असले तरीही अजून बरीच मजल मारायची बाकी होती. तेंव्हा लवकर नाश्ता उरकून, तिथे ओळख झालेल्या पत्रकारास PUNE TO KANYAKUMARI या प्रवासाबाबत मुलाखत देऊन, (अर्थाथ ती मुलाखत आम्हाला कुठे प्रदर्शित झालेली दिसली नाही😂) आम्ही पुढील प्रवास सुरु केला.

PUNE TO KANYAKUMARI
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासादरम्यान घाटात आम्ही केलेले रस्ते सुरक्षा बाबतचे कार्य

आता हळू हळू सूर्य माथ्यावर येऊ लागला होता. अजून खूप लांबचा प्रवास बाकी आहे तेंव्हा आपली उर्जा शेवटपर्यंत टिकून ठेऊन मार्गक्रमण करण्याची आमची योजना होती. आणि त्या योजनेवर टिकून आम्ही किलोमीटर मागे किलोमीटर ची आश्वासक चाल करत चाललो होतो.
साताऱ्याजवळच्या टोल नाक्यावर पुन्हा आम्ही रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत फलक प्रदर्शित करून वाहन चालकांना जागरूक करत काही वेळ घालवला. मिळणाऱ्या कमालीच्या सकारात्मक प्रतिसादाने आम्हाला चांगलाच हुरूप आला होता. लोक गाड्यातून आमचे फोटो काढत, हात दाखवून आम्हाला आमच्या कार्याची पावती देत होते. या सकारात्मक उर्जेचा उपयोग करून आम्ही सातारा गाठले.
साताऱ्यात जेवण/फराळ (मला त्या दिवशी उपवास होता) आम्ही पुन्हा पुढील प्रवासास लागलो. आता भर दुपार झाल्याने आम्ही जास्त पाणी पीत मजल दर मजल करत PUNE TO KANYAKUMARI या प्रवासाचे छोटे छोटे टप्पे करत अजून २५ ते ३० किमी ची मजल मारून मग एके ठिकाणी दुध/लस्सी घेतली आणि आता राहिलेला प्रवास लवकरात लवकर संपवून मुक्कामाचे ठिकाण शोधायचे होते.
आज रोडवर जरा जास्तच गर्दी होती, शिवाय ठिकठिकाणी रोडचे काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणाहून जाताना आम्हाला विशेष काळजी घेत जावे लागत होते. गर्दीतून वाट काढत -काढत आम्ही जरा उशिरानेच कराड शहरात पोचलो. कराड मध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी मुक्कामासाठी चौकशी केली परंतु आम्हाला सायकल ठेवायला सुरक्षित जागा मिळत नव्हती मग शेवटी शहराबाहेर लॉज बघू म्हणून शहर सोडून थोडे पुढे जाण्याचे ठरवले.
काही किलोमीटर सायकल चालवत पुढे गेलो तरी काही लॉज मिळेना तेंव्हा अजून काही वाड्या पार करून गेल्यावर शेवटी आम्हाल एक लॉज (समर्थ लॉज) मिळाला जिथे आम्हाला सायकल लावायला चांगली जागा मिळाली शिवाय आम्हाला संध्याकाळी गरम पाणी हि मिळाले.
सुयोग सरांनी त्यांचे संध्याकाळचे जेवण रूममध्येच मागवून घेतले, मला उपवास असल्याने मी असेच सटर-फटर खाऊन आजच्या PUNE TO KANYAKUMARI या प्रवासाचा लेखाजोखा मांडत कधी झोपी गेलो ते कळले नाही.


PUNE TO KANYAKUMARI या प्रवासातील आज आम्ही १७५ किमी पेक्षा जास्त अंतर कापले होतो. ठरवलेल्या अंतरापेक्षा काही किलोमीटर जास्त अंतर आज आम्ही पार केल्याने उद्या काहीसा दिलासा आम्हाला मिळणार होता.

PUNE TO KANYAKUMARI
PUNE TO KANYAKUMARI या प्रवासादरम्यानच्या वाटेतले मनोहारी दृश्य