माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी सायकल प्रवास) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – पूर्वतयारी

१८०० कि.मी. चा सायकल प्रवास

अनुक्रमणिका [INDEX]

१ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी सायकल प्रवास) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – पूर्वतयारी
२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पहिला
३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दूसरा
४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तिसरा
५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – चौथा
६.माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पाचवा
७. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सहावा
८. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सातवा
९ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – आठवा
१०. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – नववा
११. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दहावा
१२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – अकरावा
१३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – बारावा
१४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तेरावा
१५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – परतीचा प्रवास
१६. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE TIPS- खास सायकलस्वारांसाठी

माझे मनोगत

बऱ्याच जणांना लॉकडाऊन च्या काळात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला आणि थोडी मोकळीक मिळाली की चालणे, ट्रेकिंग यात लोक रस घेऊ लागले त्या पैकी मी हि एक होतो. तथापि मला गाडी चालवता येत नसल्याने मला चालायची सवय आणी आवडही होतीच.
डोंगर द-यांत फिरताना एक दिवस सहज विचार आला की आता सायकलिंग करू. दुसऱ्या दिवशी सायकल घेतली आणि जी सायकल शी गट्टी जमली ती दिवसेनदिवस अधिक घट्ट बनत गेली. ५० किमी, ७० किमी मग १०० किमी इतक्या पल्ल्याच्या सायकल सफारी करू लागलो आणि मग वेध लागले ते लांब पल्ल्यांच्या राईड चे मग मी एका साईड ने पंढरपूर सायकल वारी केली, नंतर ची वारी दोन्ही बाजूनी म्हणजे जाताना आणि येतानाही सायकलवर प्रवास केला.
आत्मविश्वास वाढल्यावर, जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा मी १०० ते १५० किमी च्या राईड करत राहिलो. मध्यंतरी माझ्या गावाकडे पुणे ते शेवगाव असा २०० किमी चा प्रवास ही केला होता.
पुणे ते रामेश्वरम ते कन्याकुमारी या स्वप्नवत सफारीचा अनुभव शब्दांत मांडणे माझ्यासारख्या नवख्या लेखकास खूप कठीण होते. मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आमचे अनुभव शब्दरूपात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.
या सर्व प्रवासाला जेव्हडा वेळ लागला नाही त्यापेक्षा जास्त वेळ हे शब्दपुष्प गुंफायला लागला यासाठी श्री सुयोग शहा व त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय व मित्रपरिवार, सायकलस्वार परिवार या सर्वांचा जाणत्या अजाणत्या स्वरुपात या सायकल तसेच शब्दसफारी साठी मदत लाभली आहे त्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे!

प्रवासाची पूर्वतयारी

कधी कधी आपल्या आयुष्यात काही विलक्षण गोष्टी अचानक आपल्या हातून पार पडतात की ज्याचे तुम्ही फक्त स्वप्नच पाहत असता. अश्याच एका स्वप्नपूर्ती ची नांदी माझा मित्र श्री. सुयोग शहा यांच्याशी एका सायकल राईड दरम्यान झाली.
एकदा का सायकलस्वार म्हणून तुम्ही बाळसे धरू लागता, तुम्हाला मोठया, लांब पल्ल्यांच्या मोहिमांचे खास आकर्षण वाढत जाते. आताशा आम्ही ही दर आठवड्याला शतकी कधी कधी दिड शतकी सफरी करू लागलो होतो. दरम्यान दोन वेळा पंढरीची वारी ही घडली होती आणि या तयार झालेल्या मातीत पुणे ते कन्याकुमारी या स्वप्नवत सायकल सफरीची बिजे केव्हा रोवली गेली ते आम्हालाही कळले नाही.
एक दिवस सहज बोलून गेलेली गोष्ट केवळ “आपण पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करू शकतो” या एका आत्मविश्वासाने ठरून टाकली.
झाले! लगेच प्लॅन ही ठरवून टाकला, आपापल्या कार्यालयात सुट्टीसाठी आर्जव करून सुट्टी मिळाली की डिसेंबर मध्ये जाऊ असे ठरले, दोघांच्याही कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच परतीचे रेल्वे तिकीटही काढून ठेवले.
आमच्या लहानपणी दिवाळी जवळ आली की आम्ही हुरळून जायचो आणि नवे कपडे, फटाके यांचे स्वप्ने रंगवायचो अगदी तशीच आमची अवस्था झाली होती, आम्हीं राईडची स्वप्ने रंगवत काय तयारी करू आणि काय नको असे झाले होते.
लगेज साठी सायकलसाठीची बॅग (पॅनियर) आणि इतर गोष्टींच्या खरेदीचा सपाटा लावला. या सफरीची आम्ही जोरदार तयारी केली होती. सायकल सफर करताना कमीत कमी समान बाळगणे या मुलमंत्रास तिलांजली लाऊन आम्ही ब्रश पासून ते चार- चार ट्यूब पर्यंत सर्व समान सोबत नेण्यासाठी गोळा करत होतो.
कन्याकुमारीसाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे समुद्रकिनाऱ्याने तर दुसरा म्हणजे हायवे ने, आमची पहिलीच लांब पल्ल्याची मोहीम असल्याने आणि आम्हीं दोघेच असल्याने आम्ही हायवेचा मार्ग निश्चित केला, शिवाय आमच्या राईडचा उद्देश “रस्ते सुरक्षा” हा होता व सायकलला काही प्रोब्लेम झालाच तर तो सोडवणे या मार्गाने सोपे जाणार होते.
मध्यंतरी ठरले कि कन्याकुमारीला हायवे ने जातोय तर काही शे किलोमीटर जास्त करून आपण रामेश्वरमला ही जाऊ अन तिथून पुढे कन्याकुमारीला जाऊ असे ठरले, आणि अगोदर ठरलेल्या कार्यक्रमात बदल केला.
दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत चा पूर्ण आराखडा तयार केला. प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात बराच वेळ आम्ही घालवला. परतीच्या प्रवास चे वगळता कसलेही आरक्षण केले नाही. प्रत्यक्ष राईड च्या वेळी पुढचे निर्णय घेऊ असे ठरवले.

आम्ही तयार केलेला प्रवास आराखडा

या स्वप्नवत प्रवासासाठी आम्ही स्पेशल जर्सी डिजाईन करून प्रिंट करून घेतले, तसेच “रस्ते सुरक्षा” अभियानातर्गत “प्रत्येक जीव महत्वाचा” या आमच्या ब्रीद वाक्यास अनुसरून घोषवाक्ये तयार करून त्याचे मराठी, इंग्रजी, कन्नड तसेच तामिळ भाषेत फलक हि प्रिंट करून घेतले.
“निलांजन आर्ट” हे धायरी पुणे परिसरातील मोठे स्टोर आहे जिथे हव्या तश्या उत्कृष्ट जर्शी डिजाईन करून अतिशय वाजवी दारात मिळतात.
दरम्यान च्या काळात दर आठवड्याला १०० ते १५० किमी च्या राईड्स करत राहिलो, परंतु तरीही आम्हाला दोघांनाही सतत दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस १०० पेक्षा जास्त किमीच्या राईडचा अनुभव नव्हता त्यामुळे आम्हाला सतत १३ दिवस रोज १०० ते १७० किमी पर्यंत राईड करण्याचे आव्हान पेलायचे होते.
जसा जसा प्रत्यक्ष राईड चा दिवस जवळ येत गेला तसा तसा तयारीला जोर आला आणि नेमके निघण्याच्या दोन दिवस आगोदर माझ्या सायकलचे पुढील डीरेल्हर (गियर) ची केबल तुटली ती दुरुस्त करून घेता-घेता निघायला एकच दिवस राहिला होता, त्यात पुन्हा मित्राच्या सायकल चे मागचे डिस्क ब्रेक निकामी झाले निघायच्या आदल्या दिवशी त्यांचीही सायकल कशीबशी दुरुस्त करून घेतली.
निघायच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा मागोवा घेतला, सामानाची चेकलिस्ट बनवून त्याप्रमाणे सर्व सामान त्यात मुख्यत्वे सायकलशी निगडीत सामान जसे कि, ट्यूब, पंक्चर कीट इत्यादी तसेच वयक्तिक सामान व्यवस्थित बांधून सायकलवर व्यवस्थित लादून ठेवले हे सर्व करताना रात्रीचा एक वाजून गेला होता.

इतके सामान आम्सोही सोबत घेतले होते