[हुबळी ते दावणगेरे (दावणगिरी)(कर्नाटक)] एकूण कापलेले अंतर १५२ किमी
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 4
रात्रीच्या पुरेश्या विश्रांतीमुळे आज पाहते लवकर जाग आली, कालची मरगळ आज पूर्ण झटकली गेली होती. आणि अशीच उर्जा पुढचे काही दिवस तरी टिकवावी लागणार होती. तर आणि तरच हि महत्वाकांक्षी मोहीम पूर्णत्वास जाईल याची खुणगाठ मनाशी बांधून आमची सकाळची लगबग सुरु झाली.
रात्री ज्या पद्धतीने गरम पाणी मिळविले होते त्याच पद्धतीने सकाळी सगळी मंडळी गाढ झोपेत असताना आम्ही त्या कुलर (ज्यात एका बाजूने गरम पाणी हि मिळत होते) मधून बाटल्या भरुन एक-एकाने गरम पाण्याने अंघोळी उरकल्या 😊
काल रात्री मराठी बोलणाऱ्या मुलाने आम्हाला सायकली त्याच्या हॉटेल मध्ये लावायला परवानगी दिली होती त्याला जागे करून आमच्या सायकली ताब्यात घेतल्या.
लगबगीने आमचे सामान सायकलवर लादून सव्वा पाच च्या सुमारास हुबळी चा निरोप घेतला. काल रात्री झोपण्यापुर्वी आजचा प्लॅन ठरवलेला नव्हता तेंव्हा हुबळीतून बाहेर पडता पडता आज कुठपर्यंत मजल मारायची याबद्दल चर्चा करू लागलो.
आजही रस्ता चढाईचा असणार असे गृहीत धरून आपण रानेबेन्नुर येथे थांबू असा निर्णय घेतला तसे हे अंतर जास्त नव्हते तेंव्हा आज आरामात राईड करू आणि लवकर पोचून थोडा आराम करू असे ठरले.
एव्हाना आम्ही शहराच्या बाहेर पडून मुख्य हायवेपर्यंत पोचलो होतो. कालपासून सकाळी खूप थंड वातावरण आणि दुपारी कडक उन या विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत होते. आजही पहाटे थंड वातावरण होते.
आज पश्चिमेकडे चांदोबा अजूनही आकाशात तग धरून होता. शहरातल्या उंचावरल्या झगमगत्या दिव्यांतही त्याने आपले ठळक अस्तित्व टिकून ठेवले होते. हायवे वरून वेगात जाणारे भले मोठ-मोठाले ट्रक आता लवकरच या हायवेवर गर्दी वाढणार याची ग्वाही देत होते. आम्ही हळू-हळू सर्व्हिस रोड वरून मुख्य हायवेवर चढुन आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला निरोप द्यायला थांबलेला चंदोबा आता हळूहळू दूर टीमटीमनाऱ्या दिव्यात गायब होऊ लागला होता. जणू काही तो फक्त आम्हाला निरोप द्यायलाच थांबला होता.
सकाळच्या थंड हवेत सावध पवित्रा घेत आम्ही हेलकावे खाणारा हायवे पार करत होतो. काही अंतर कापून झाले असेल नसेल तोच वरूर येथील रोड च्या बाजूला उंच मनोरा जो लाईट हाऊस सारखा वाटत होता. हे काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा मनात धरून आम्ही लागतच्या परिसरात प्रवेश केला. तिथे निर्माणाधीन मोठे जैन मंदिर होते तिथे श्री भगवान पार्श्वनाथ तीर्थकर यांची ६१ फुटी मूर्ती तसेच इतर ९ तीर्थकरांच्या भव्य मूर्त्या मन वेधून घेत होत्या. याच परिसरात हा उंच मनोरा होता. तिथे आम्ही फोटो घेऊन पुढे कूच करण्याचे ठरवले.
आता हळू हळू पूर्वेचे क्षितीज लालसर रंग धरू लागले होते. अंधाराचे साम्राज्य खालसा होत प्रकाशाचे राज्य लवकरच स्थपीत होणार याचे संकेत पूर्वेचे उजळलेले क्षितीज देत होते. आज दाट धुके नव्हते त्यामुळे पहाटेच्या मंद उजेडात हि लांबच्या लांब सरळ रस्ता समोर दिसत होता. तुरळक वाहतूक आम्हाला दाद देत पुढे जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकलेली (काढणी झालेली) मक्याची शेती सुरुवातीला मला समजली नाही मला वाटले कि हे ज्वारीचेच शेतं आहेत.
एव्हाना रोड आणि सायकलशी माझी खूप छान गट्टी जमली होती. हळू-हळू आम्ही एकरूप होऊ लागलो होतो, एकांतात या मैफिलीचा पूर्ण आनंद घेता यावा म्हणून मी मुद्दामहून सुयोग सर आणि माझ्यात अंतर पडू दिले… आता जणू आमची सुरेल मैफिल सजली होती, सायकल तिच्या मंजुळ स्वरांत सुरेल भूपाळी गात होती साथीला मंद-मंद वारा सुकेल्या मक्याच्या शेतातून सळसळून साथ देत होता, सायकलच्या टायरखालून उडणारे छोटे-छोटे खडे जणू सुंदर नृत्याविष्कार सादर करत होते. मंत्रमुग्ध बाभळी आपल्या फांद्या डोलावून आपली सर्वोच्च दाद देत होत्या. दुसऱ्या बाजूची गर्भार ज्वारीची शेती अजूनही हलक्या धुक्याशी बिलगून का होईना या मैफिलीत सामील असल्याची ग्वाही देत होती. दूरवरच्या गावातील टीमटीमनारे दिवे अस्ताला जाण्यापूर्वी आपले कडवे गाऊन जाण्याची घाई करत होते. अजूनही सूर्याने आपले दर्शन दिले नव्हते जणू तो हि क्षणभर क्षितिजाआड थबकला होता. मैफिलीच्या उत्तरार्धात एखाद्या कसलेल्या गझल गायकाने आपल्या गझलेचा मक्ता (शेवटचा शेर) असा काही परिणामकारक पेश करावा कि संपूर्ण मैफिलीला रोमांच फुटावा अगदी तसेच एकसुरेल सुरांचा नजराणा सादर करत लयबद्ध पक्ष्यांनी आमच्या समोर किलबिलाटांची अशी काही रचना सादर केली कि,चराचरात रोमांच उभा रहावा. मैफिलीत अचानक खूप मोठ्या कलाकाराचा प्रवेश व्हावा आणि रसिकांना दुग्धशर्करा योग यावा तसे सुर्याने शहारलेल्या गर्द झाडीआडून आपल्या पहिल्या सोनेरी किरणांची चौफेर उधळण करत या मखमली मैफिलीवर कळस चढवला.
काही मंतरलेल्या क्षणांनंतर गर्द झाडी संपून समोर विस्तीर्ण मैदान लागले येथे पवनचक्क्यांचे जणू जाळेच विणले होते त्यातून अगदी गाळून सूर्यकिरणे आमच्यापर्यंत पोचत होती. आईने भल्या सकाळी अंगणात काम करताना तिच्या लेकरांना शेकोटी पेटवून द्यावी तसे मैदानातील ज्वारीची कोवळी कणसे घोळक्याने त्या सोनेरी शेकोटीची ऊब घेत डोलत होती.
मला वाटते अश्या सुंदर मैफिलीचा हिस्सा काही जणांनाच होता येत असावे, कारण उपरोक्त लिहलेले विचार उस्त्फुर्तरित्या मन:पटलावर उमटवित सभोवतालच्या निर्जीव भावविश्वात भाव ओतत त्याच्याशी एकरूप होऊन त्यांच्यातलाच एक होऊन प्रत्यक्ष चेतन जग आणि स्वनिर्मित आभासी भावविश्व याचा जागृत धागा होऊन हे रसग्रहण करणे कदाचित सर्वांच शक्य होत नसावे. या बाबतीत मी नशीबवान असावा कारण अश्या कित्येक मैफिलींची अनुभूती मी एकल सायकल प्रवासात घेत आलो आहे.
या अमृततुल्य अनुभूतीनंतर मी इतका फ्रेश झालो कि कालचा थकवा कुठचा कुठे पाळला. इथेच सुयोग सर हि थांबले होते आम्ही इथे बराच वेळ फोटो, व्हिडीओ काढले परंतु इथे अधिक वेळ घालवणे इष्ट नाही म्हणून आम्ही पुढे निघालो.
हळू-हळू थंडी चे सावट कमी होऊन, चढाईच्या रस्त्यावर कपाळावरून घाम यायला लागला. आम्ही लाईट व इतर अंधारात कामी येणारे साधने काढून ठेवले.
रस्त्याच्या दुतर्फा काढणी झालेली मक्याची वाळलेली शेती तर कधी अचानक कोवळी कणसे असणारी ज्वारी चे शेतं अधून मधून लागणारे कपाशीचे रान अगदी नगर पासून गावी निघालो कि काय असे वाटावे असे वातावरण.
विस्तीर्ण रस्यावर फार काही वाहतूक नव्हती सकाळी सकाळी पन्नास – साठ किलोमीटर अंतर पार करू आणि मग न्याहारी घेऊ असा विचार करून आम्ही पुढे निघालो.
सभोवतालचे वातावरण आणि परिसर अगदी मी माझ्या गावी जाताना जसे आहे तसेच इथे होते त्यामुळे आपण कुठे अनोळखी परिसरात आलो आहोत याचे अनामिक दडपण अजिबात जाणवत नव्हते. आज अगदी बेबाक पक्ष्याने मुक्त विहार करावा तसे आम्ही मुक्तपने सायकलिंगचा आनंद घेत होतो.
सकाळी शेजारच्या सर्व्हिस रोडने शाळेत जाणारे विद्यार्थी कधी ओरडून तर कधी हात हालऊन आम्हाला दाद देत होते. तर कधी हायवेवर दुचाकीवरून जाणारे लोक हात दाखून तरी कधी सायकल सोबत त्यांचा वेग कमी करून आम्हाला आमची खुशाली विचारत आम्हाला शुभेच्छा देत जात होते.
जसे जसे अंतर वाढत गेले तसे तसे विस्फारणाऱ्या नजरा आणि आमच्यासाठी कौतुकाचे शब्द वाढत गेले. मागच्या दोन तीन दिवसही अधून-मधून आम्हाला असे कौतुक करणारे लोक भेटत होतेच.
ठरल्याप्रमाणे ४५ ते ५० किलोमीटर च्या आसपास आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबणार होतो, आणि साडे आठ च्या सुमारास आम्ही तेव्ह्डे अंतर पार केले होते समोर बांकापुर टोल नाका आला होता तेंव्हा इथे आपले रस्ते सुरक्षा अभियानाचे फलक दाखऊन थोडा वेळ प्रबोधन करू आन्ही पुढे नाश्ता करू असा विचार करून आम्ही टोल नाक्यावर पोचलो.
तेव्हड्यात तिथे धावाधाव सुरु झाली, आम्ही सायकली बाजूला लाऊन गर्दी जमतेय तिकडे काय झाले हे पाहण्यासाठी धाव घेतली तेंव्हा कळले कि, गोव्याची एक गाडी सरळ टोल नाक्यासमोर बांधलेल्या उंचवट्यावर जोरात नुकतीच आढळली होती. मला काही समजेपर्यंत सुयोग सर थेट गाडीचा दरवाजा उचकाऊन जखमींना बाहेर काढण्यात मदत करताना दिसले. रक्तांनी माखलेली माणसे पाहून मला गरगरायला लागले. एव्हाना टोल जवळील पोलीस कर्मचारी ही तिथे आले होते. त्यांनी आम्हां सर्वांना तिथून दूर जायला सांगितले. आता आम्ही तिथे रस्ते सुरक्षा फलक दाखवण्याचा आमचा बेत रद्द करून पुढे जाण्याचे ठरवले.
थोडे पुढे गेल्यावर आम्हाला रोड च्या बाजूला चांगले हॉटेल दिसले आम्ही तिथेच नाश्ता घेतला काल रात्री आम्ही फक्त डोसा खाल्ला होता त्यामुळे आम्ही आज सकाळी मजबूत नाश्ता केला. सकाळी नाक्यावर झालेल्या अपघाताचा नाही म्हणाले तरी मनात कुठेतरी हुरहूर लागून राहिली होती. त्या सगळ्यांना वेळेत उपचार मिळाले असतील ना?, कुणी जास्त गंभीर जखमी नसेल ना? असे नाना प्रश्न कितीही केले तरी वारंवार मनात घोळत होते. काही किलोमीटर असेच गेले. हळू-हळू मनस्थिती पूर्वपदावर येत गेली आणि मी पुन्हा सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन पुढे चाल करू लागलो.
जवळपास दहा वाजत आले होते आम्ही बऱ्यापैकी अंतर कापले होते. अजूनही सायकलिंग साठी आदर्श वातावरण होते. थोड्या अंतरावर वरदा नदीवरील पूल आला तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो. पुलाच्या दोन्ही बाजूला नदीपात्रात बऱ्यापैकी पाणी होते. पुलाच्या डाव्या बाजूला समांतर अजून एक पूल आहे व दरम्यान च्या जागेत नदीपात्रात जनावरांना पाणी पिण्यासाठी व तसेच बायकांना धुनी धुण्यासाठीची जागा होती. सकाळचे सोनेरी असलेले कोवळे उन आता चांदीच्या चाकाकीने त्या नदीच्या पाण्यात आपले अस्तित्व ठळकपणे दर्शवित होते.
माझे बालपण ही नदीकिनारी असणाऱ्या गावात गेल्यामुळे हे दृश्य माझ्या मनाच्या खूप जवळचे होते. या दिवसात आम्ही अश्या नदीकिनारी बोरी झोडीत (बोरे गोळा करत) जनावरे चारायला जात असू, कोणत्याही क्षणी एकमेकीना खेटत म्हशींची झुंबड या पाण्यात प्रवेश करून नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबत बसतील आणि त्यांचा गुराखी काठावरल्या चिंचेखाली दुपारची बिनधास्तपाने ताणून देईल. तर लगबगीने शेतात जायचे असल्याने बायका घरची धुनी थप-थप करीत गुळगुळीत खडकावर धुवायला सुरुवात करतील असे वाटत होते.
आज आमची रस्ता, शरीर आणि पर्यायाने मन हि परीक्षा घेईल असे वाटत होते परंतु आज घडले उलटेच आज कालच्या पेक्षा खूप फ्रेश वाटत होते. थोड्या थोड्या वेळाने पाणी, नारळपाणी, ज्यूस असे मिळेल तसे आम्ही घेत होतोच.
तिथला परिसर, शेती, आणि तिथली लोक वेशभूषा सोडली तर अगदी माझ्या गावची वाटत होती. अगदी बैलं, कासरा, वेसण, मुंगसे तसे च्या तसेच. काही किलोमीटर हे चित्र असेच होते. सर्व्हिस रोड हायवे पासून कुठे कुंपण घालून तर कुठे चर खादून वेगळा केल्याने स्थानिक लोकांनी उत्तम सर्व्हिस रोड वर जागोजागी मक्याचे खळे केले होते. कुठे मक्याचे दाणे वाळवायला पूर्ण रोडवर टाकले होते. आम्ही आमचा मोर्चा लगेच तिकडे वळवला त्यांचाशी चर्चा केली. त्या परिसरात बऱ्यापैकी मका पिकत होती मजेशीर गोष्ट म्हंजे ज्या रोड वर आत्ताच मक्याचे खळे केले आहे त्याच लागत लगेच नुकतीच मक्याची पेरणी केलेली होती.
भाषेच्या अडचणीमुळे तेथील शेतकऱ्यांशी मुक्त सवांद साधता आला नाही परंतु एव्हडे कळले कि हि मका रवा करण्यासाठी वापरतात आणि त्याचा इथे उपमा जास्त प्रमाणात करतात तेंव्हा आम्ही सकाळी खाल्लेल्या उपम्याची चव वेगळी का लागत होती याचे कोडे हि उलगडले.
आम्ही परत फिरलो तेव्हा मला एका शेतात दोन शेतकरी मका कोळपीत (कोळपणे म्हणजे खुरपणी करण्यापेक्षा छोट्या औताने (वखराने) पिकातील तन काढणे होय) असताना दिसले
बऱ्याच दिवसांनी कोळपी पाहून मी टुणकन सायकल वरून उडी मारली आणि त्या शेतात घुसलो. त्या दोन शेतकऱ्यांश संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कन्नड सोडून इतर कुठलीच भाषा येत नसल्याने पुन्हा हातवारे करूनच सवांद साधला त्यांचासोबत कोळप्याचे एक मोडण (शेताच्या एका बांधापासून दुसऱ्या बांधापर्यंत घेऊन जाणे) आणण्याची माझी इच्छा होती परन्तु त्या दोघातील एकाने माझ्याकडे पैशाची मागणी केली तेंव्हा मी लगेच तिथून काढता पाय घेतला. प्रत्येक गावात काही अश्या विभूती असतातच ज्यांना फक्त संध्याकाळच्या गुत्त्याच्या सोयीसाठी पैसे हवे असतात त्यासाठी ते दुसऱ्यांच्या शेतात काम करतात त्यांना कुणाकडून तरी रात्री च्या सोयीसाठी पैसे हवे असतात त्या महान विभूतीपैकी हे असावेत असा विचार करून मी लगेच शेतातून बाहेर पडलो आही सायकलघेऊन निघालो बरेच दूर जाईपर्यंत ते त्यांच्या भाषेत मोठ्याने काहीतरी बोलत होते ते काय म्हणत आहेत यात मला यत्किंचितही रस नव्हता. नक्कीच ते शेतकरी नसावेत कारण हाडाचा शेतकरी त्याच्या शेतात ढेकळे तुडवीत येणाऱ्या आगंतुकाकडून कधीही पैश्याची मागणी करणार नाही.
आणखी तासभर सायकल चालवून आम्ही रानेबेन्नुर शहराजवळ आलो दुपारचा एक वाजला आहे आणि काही वेळातच आपण शहरात आसू तेंव्हा रानेबेन्नुर मध्ये मुक्काम करायचा कि पुढे जायचे याचा विचार करण्यसाठी हायवेपासून शहराकडे जायला जिथून फाटा फुटतो तिथे थांबायचे ठरले आणि आम्ही हायवे सोडून सर्विस रोड वर आलो थांबण्याच्या ठिकानापासून काही मीटर अंतरावर असताना मला अचानक मोठा प्लॉट करडई च्या पिकाचा दिसला. आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप ज्वारीची पिके दिसली परंतु कुठेही त्या पिकामध्ये करडई चे पाटे (सहा सात किंवा ठराविक लाईन ज्वारी ची पेरणी करून मध्येच तीन लाईन (तिफन) करडई ची पेरणी करणे म्हणजे पाटा घालणे होय) जसे आमच्या बीड जिल्ह्यातले शेतकरी करायचे तसे दिसले नव्हते.
मी काही क्षण तिथे थांबलो, कुठे गडद केशरी तर कुठे पिवळ्या धमक फुलांनी अवघे शेत बहरून गेले होते. वीस पंचवीस वर्षानंतर अचानक बालपणीचा मित्र भेटावा आणि त्याचाशी झालेली छोटी मोठी भांडणे विसरून त्याला घट्ट मिठी मारावी तशी स्वतःला या पक्व झालालेया काटेरी शेतात घेऊन जाऊन पंचवीस वर्षापूर्वी करडई चे खळे करतना बोचलेल्या काट्यांना त्यांची खुशाली विचारावी. दहावी-अकरावीला असेल तेंव्हा च्या उन्हाळ्यात मी, माझे दोन चुलते व माझा एक वर्गमित्र मिळून आम्ही बऱ्याच शेतातल्या करडई बडवल्या होत्या (काटेरी करडई च्या पक्व वाळलेल्या रोपातून करडई च्या बिया बाजूला करणे – खळे करणे). ज्वारीच्या पिकातील पाट्याने पेरलेल्या करडई चे पिक काढून त्याच्या चार पेंढ्याचे चौकोनी आकारात रचून ठेवत असत त्याला “पेटे” म्हणत ते चांगले वाळले कि माग त्याचे खळे करत त्यासाठी शेतातील माती व्यवस्थित बाजूला सारून चौकोनी आकाराची जागा तयार करावी लागे मग त्यात दूरच्या विहिरीवरून पाणी आणून त्याने ती चौकोनी जागा भिजवून त्यात इतर खळ्यावरील भुसा पसरवून खळे तयार करावे लागे. मग या ठिकाणी ते काटेरी पेटे एका विशिष्ट पद्धतीने उचलून आणून ठेवावे लागे. करडई चे रोप पूर्ण (पाने फुले फळे) काटेरी असते त्यामुळे पेटे उचलताना बारदाण्याचे पोते अंगावर घेऊन ज्या काठीने बडवून त्या पेत्यातून करडई चे दाणे बाजुले केले जात त्या काढीला दोर बांधून ती काढी त्या पेट्याखाली घालून दोर वरून घेऊन तो पेटा काटे न टोचता खांद्यावर उचलून खळयापर्यंत आणावा लागे, मला सवय होईपर्यंत कित्येक वेळा डोक्यात, खांद्यावर आणि हातात ही कित्येत काटे बोचत असत. आताच्या बेगडी सुखाच्या क्षणांपेक्षा त्या भळभळत्या जखमा कितीतरी सच्च्या होत्या आणि म्हणूनच मला त्या आजही अनमोल आहेत. काही क्षण तिथेच रेंगाळत मी सुयोग सर थांबले तिथे उड्डाणपूलाच्या सावलीला येऊन थांबलो.
आज थकल्याची भावना होत नव्हती, आपण अजून ४० ते ५० किमी अंतर सहज कापू शकतो आज फ्रेश वाटत आहेत तर अंतर कमी करून घेऊ उद्या शरीराने साथ नाही दिली तर किमान थोडा आराम करण्याची संधि तरी मिळेल या विचाराने आम्ही राणेबेंनोरला न जाता आमच्या सायकली सरळ हायवेवर चढवल्या आणि पुढचे ठिकाण दावणगेरे शहर गाठण्यासाठी कूच केले.
आता आम्ही आमचे सर्व लक्ष अंतर कमी करण्यावर केले आणि जिथे थोडा सपाट किंवा उताराचा रस्ता मिळेल तिथून सुसाट जात लवकरात लवकर दावणगेरे येथे पोचुन आराम करू या हेतूने आम्ही भरभर अंतर कमी करत होतो.
अगदी कमी पाण्यावर येणारी ज्वारी ते भरपूर पाणी लागणा-या नारळाच्या बागा या दोन्ही हि गोष्टी आम्हाला रस्त्याच्या कडेने नजरेस पडत होत्या.
दुपारचे जेंवण असेही होत नव्हतेच, पण आज भर दुपारी चांगलीच भूक लागली होती तेंव्हा आम्ही सकाळी सोबत घेतलेली कुकीज तिथेच रोडवर उन्हात बसून संपवली.
चार वाजत आले होते अंतर हि फार काही राहिले नव्हते परंतु आता दोघांनाही खूप जोरची भुक लागली होती. आता इतर सटर फटर खाण्यापेक्षा आम्हाला पूर्ण जेवणाची इच्छा होती कारण काल हुबळी मध्येही आम्ही रात्रीच्या जेवणात फक्त डोसा खाल्ला होता.
चांगल्या हॉटेल ची शोधाशोध सुरू झाली परंतु हायवेवर हॉटेल काही मिळेना, एव्हाना आम्ही तुंगभद्रा नदी पार केली होती आणि दावणगेरे शहर हि आता जवळ आले होते तेंव्हा हायवेवर हॉटेल नाही मिळाले तर थेट मुक्कामच्या ठिकाणीच जेवण घेऊ असे ठरले. काही अंतर असेच कापल्यावर अधून मधून ढाबे दिसू लागले आता अश्या एखाद्या ढाब्यावर मस्त पंजाबी जेवण जेऊ असा भाबडा आग्रह करून आम्ही एक ढाब्यावर थांबून जेवण घेतले परंतु आमची घोर निराशा झाली. पंजाबी जेवण फक्त नावालाच होते. यापुढे इथले दाक्षिणात्यच जेवण घ्यायचे ठरवून आम्ही खट्टू होऊन तिथून निघालो. इथे जेवण्यापेक्षा तसेही शहर जवळ आले होते तिथे जाऊन जेवण घेतले असते तर बरे झाले असते अशी आमची अवस्था झाली होती.
आम्ही लवकरच दावणगेरे शहराच्या वेशीपासी येऊन पोचलो होतो. आता शोधाशोध सुरू झाली ती मुक्कामाच्या ठिकाणाची, आम्हाला अपेक्षा होती की हायवे च्या जवळच लॉज / हॉटेल मिळेल परंतु आम्हाला काही जवळ हॉटेल मिळेना. शोध घेत-घेत आम्ही शहरात आत जात होतो. नुकताच नाताळाचा सण होऊन गेला होता तसेच दत्तजयंती हि असल्याने त्यामुळे ठिकठिकाणी रोषणाई केलेली होती समृद्ध शहर दिवळीसारखे उजाळलेले होते. आम्ही हॉटेल शोधत पुढे जात होतो. एक चौकात दत्तमंदिर खूप छान पद्धतीने सजवले होते तेंव्हा आम्ही जवळच असलेल्या लॉज फायनल करून शहराच्या मध्यभागात थांबलो. तिथे स्थानिकाकडून माहिती घेतली की, इथला प्रसिद्ध डोसा कुठे मिळेल? त्यांनी सांगितलेले ठिकाण आमच्या लॉज पासून जेमतेम दीड किलोमिटर अंतरावर होते तेंव्हा आम्ही तिथे जायचे ठरवले.
यथावकाश आंघोळ उरकून आम्ही दावणगेरे (दावणगिरी) चा प्रसिद्ध डोसा खाण्यासाठी दीड किलोमीटर दूर असणाऱ्या कोत्तूरेश्वर बटर डोसा हॉटेल (Kottureshwara Butter Dosa Hotel) या हॉटेल मध्ये दावणगेरे बेने डोसा (दावणगिरी बटर डोसा) आणि स्पंज डोसा यावर मस्त ताव मारला. जास्त भूक नसतानाही डोसा अतिशय स्वादिष्ट असल्याने आम्ही भरपेट खाल्ला. तिथे मिळणारी नारळाची चटणी विशेषकरून मला भावली.
डोसा खाऊन झाल्यावर मघाशी चौकात आम्ही दत्त मंदिर पाहिले होते तिथे दर्शन करण्यासाठी जायचे ठरले. ज्या हॉटेल मध्ये आम्ही डोसा खाल्ला होता त्याच चौकात श्री गणेशाचे सुंदर मंदिर होते. आम्ही प्रथम तिथे दर्शन घेतले आणि मग दत्त मंदिराकडे दावणगेरे च्या झगमगत्या गल्ली बोळातून दत्तमंदिरात पोचलो दर्शन घेऊन आम्ही थेट आराम करण्यासाठी रूमवर पोचलो.
आज आम्ही जोश जोश मध्ये दीडशे किलोमीटर ची राईड आणि सह ते आठ किमीची पायपीट केली होती.