[डोब्बास्पेट (कर्नाटक) ते कृष्णागिरी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४५ किमी
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 7
थकत चाललेले शरीर आणि काल हुकलेले ५० किलोमीटर या धर्तीवर आम्ही आज लवकर प्रवासाला सुरुवात करू म्हाणालो परंतु सकाळी उठायला उशीर झाला आणि आम्ही तब्बल साडेसहा वाजता आमचा प्रवास सुरु केला त्यात सुरुरवातीचे पाच किलोमीटर हळू-हळू सायकल चालवत गेलो.
आज आम्ही आमचे पूर्ण ध्यान अंतर कव्हर करण्यावर केंद्रित केले होते, कारण आज जर आम्ही आमचे किमान १३० किमी चे ध्येय साधू शकलो नाही तर मग पूर्ण वेळापत्रक कोलमडन्याची भीती आम्हाला होती.
आज ढगाळ वातावरण होते, तेंव्हा आम्ही आता थेट बंगलोर मध्ये नाश्ता करू असे ठरवून सुसाट निघालो. इतक्या दिवसात आज कुठे सपाट रस्ता मिळाला होता. आज आम्ही फोटो काढण्याचे किंवा कुठे रोड सोडून काही न्याहाळन्याचे टाळून अंतर कमी करण्यावर भर दिला होता.
ढगाळ वातावरण असल्याने सूर्य उगवल्याची फक्त पुसटशी जाणीव झाली पण नेहमीसारखी लाल रंगाची धुळवड खेळत तो आला नव्हता जणू त्यालाही आज आम्हाला आमचे लक्ष सायकलिंग वर केंद्रित करू द्यायचे होते.
साडे आठ पर्यंत ४५ किमी पर्यंत अंतर कापून आम्ही बंगलोर शहरात प्रवेश केला होता. सुरुवातीला आम्हाला एका सायकलिस्ट ने बायपास ने जाण्याचा सल्ला दिला परंतु आम्ही आज सकाळी एव्हडी मेहनत शहरातून जाण्यासाठी घेतली होती. आम्ही आमच्या ठरल्याप्रमाणे सायकली शहरात घुसवल्या.
कसे जायचे? कोणत्या वाटेने जायचे? या विचारविमर्शात काळी वेळ खर्च झाला मग आम्ही आज बेंगलुरू पॅलेस बघून जाऊ असे ठरवून आम्ही शहराच्या गर्दीत घुसलो.
साडे नऊ च्या आसपास झाले असतील तेंव्हा आम्ही वाटेत Raithana Aramane नामक हॉटेल मध्ये नाश्ता केला. अनेकांनी इथे आमच्याशी सवांद साधला, आमचे कौतुक केले, आम्हाला पुढे कसे जायचे ते ही सांगितले आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी काही जणांनी तर आमचा नाश्ता संपण्याची वाट पाहत होते.
गुगलबाबा चा आधार घेऊन आम्ही सरळ समोरच्या गर्दीरुपी महासागरात आमच्या सायकलरुपी होड्या हाकल्या. वर्दळ खूप असली तरीही नियोजनबद्ध होती. कोणत्याही सिग्नलवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे पुण्यात होतो तसा जाम इथे निदान या हमरस्त्यावर तरी आम्हाला दिसला नाही.
बेंगलुरू शहरात वाहतुकीचे खूपच चांगले नियोजन केले आहे यात शंका नाही. तिथे रिक्षांसाठी वेगळी बंद-लेन असल्याने प्रवाश्यांची चढ उतार मुख्य रस्त्यावर होत नाही. शिवाय मला तिथे आपल्या पुण्यासारखा उतावळेपण ही दिसला नाही. आम्ही मुद्दाम सिग्नलला थांबून वाहनचालकांचे निरीक्षण करत होतो. सिग्नल सुटायच्या तीन चार सेकंद आधी होर्न वाजवून गाड्यांच्या मुठी फिरवणारे जास्त लोक दिसत नव्हते आणी जे दिसत होते ते ही पुणेकरच असावेत 🙂.
आम्ही दर सिग्नलला थांबत होतो तेंव्हा तिथे थांबलेले लोक आम्हाला पुढे जा म्हणून खुणावत होते तरीही आम्ही पुढे जात नाही हे पाहून बाजूच्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला सांगितले कि तुम्ही इथे थांबून ट्राफिकला मदत नाही तर अडथळा करत आहात तुम्ही कृपया मोकळा रस्ता आहे तोपर्यंत पुढे निघून जा!
मग आम्ही कुठेही न थांबता सरळ बेंगलुरू पॅलेसचा जो रस्ता धरला तो आम्ही थांबलो ते एक खूपच सुंदर मंदिर पाहून. हे मराम्मादेवी चे मंदिर असून इथे दसरा सणाला मोठा महोत्सव साजरा केला जातो. अशी खूप मंदिरे पुढे पूर्ण तमिळनाडूमध्ये आम्हाला दिसून आली.
अजून बरेच अंतर पार करायचे आहे या विचाराने आम्ही मराम्मादेवीचे बाहेरून दर्शन घेऊन पुढे निघालो. जेव्हढे निरीक्षण या शहराचे करता येईल तेव्हडे आम्ही करत पुढे जात होतो.
पॅलेसच्या आसपास बरीच मोकळी जागा या गर्दीतही संवरक्षित व खूपच चांगल्या पद्धतीने जपली आहे. तिथल्या तळ्यातले पाणी ही स्वच्छ होते.
पॅलेसच्या जवळ गेल्यावर आम्हाला एके ठिकाणी खूप मोठी नारळाची थप्पी लावलेली दिसली तेंव्हा आम्ही तिथे नारळ पाणी पिऊन मग आपण पॅलेसच्या परिसरात जाऊ या विचाराने आम्ही तिथे नारळपाणी पिलो. तिथले लोक सरळ नारळाला तोंड लाऊन पाणी पीत होते ते पाहून आम्हाला नारळपाणी पिण्याची एक नवी पद्धत कळली आणि पुढे आपण असेच पाणी पिऊ म्हणत आम्ही मिश्कीली करत पॅलेसच्या परिसरात प्रवेस केला.
तिथे गेटवर सायकली लाऊन आम्हाला चालत पॅलेसपर्यंत जायचे होते. गेटवर युपी व बीहार चे काही कर्मचारी होते त्यांना आमच्या सायकलवर लक्ष ठेवण्याची आम्ही विनंती केली आणी पॅलेसकडे निघालो मोठा परिसर आहे. त्या परिसरात मोठमोठाली विस्तीर्ण वटवृक्ष आहेत. प्रथमदर्शनी शाहू पॅलेस ची आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
थोडे चालून गेलो की, गर्दीने वेढलेला भव्य पॅलेस समोर येतो. प्रवेश खिडकीवर प्रत्येकी रु. २४०/- रुपये भरून तिकीट घेऊन महालात प्रवेश दिला जातो.
आत गेल्यावर आपल्याला मोफत ऑडीओ गाईड (हेडफोन सह मोबाईल फोन) दिला जातो ज्याद्वारे तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथला क्रमांक दाबला की त्याची सर्व माहिती तुम्हाला ऑडीओ गाईड मार्फत दिली जाते.
आत ठिकठीकाणी सी सी टीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणी आत फोटो आणि व्हिडीओ घेण्यास सक्त मनाई असल्याने आम्ही तिथे फोटो व व्हिडीओ घेऊ शकलो नाही.
पहिल्याच नजरेस त्या महालाची भव्यता जाणवते, महाल जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसत होता. प्रत्येक दालन व त्यातील वस्तू अगदी शाहू पॅलेस प्रमाणेच जतन केलेले आहे. भव्य सभागृह, त्या काळातील तसेच आधुनिक काळातीलही या वास्तूशी निगडीत इतर वस्तूंची रेलचेल इथे आहे. इथेच एक मोठा पूल टेबल व त्याच्याशी निगडीत इतर वस्तू इथे ठेवलेल्या आहेत.
काही वेळेत आम्ही महाल पाहून बाहेर पडलो व बाहेरील दालनात तुम्हाला फोटो व व्हिडीओ काढण्याची मुभा आहे तेव्हा आम्ही महालासमोर मग भरपूर फोटो काढले व पुढील प्रवासाच्या ओढीने लगबगीने बाहेर आलो.
आमच्या सायकली ही आम्ही गेटसमोर उघड्यावर लावल्या होत्या तेव्हा लवकरात लवकर आम्ही मेन गेटवर पोचलो. तेथील कर्मचार्यांनीही आमच्याबरोबर फोटो घेतले आज आमच्यासोबत फोटो घेण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढले होते. विचारपूस करणारे लोक आश्चर्याने तोंडात बोट घालत होते.
आम्हाला आज अजूनही किमान ८० किलोमीटर चा पल्ला तरी गाठायचाच होता. तेंव्हा आम्ही लगेच गुगलबाबाच्या मदतीने होसूर शहराचा रस्ता धरला, अगदी मध्य बेंगलुरू मधून तेथील प्रसिद्ध क्रिकेट मैदानापासून (चिन्नास्वामी मैदान) पुढे इलेक्ट्रोनिक सिटी कडे कूच केले.
हळू-हळू आम्ही शहराबाहेर पडू लागलो होतो. लोक आमची विचारपूस करणे फोटो काढणे चालूच ठेवले होते आम्हाला तर आता आम्ही सेलेब्रिटी वाटू लागलो होतो. या हर्ष-उल्हासात आमचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. थोडे अंतर पुढे गेल्यावर आमच्या कानावर पलीकडून सर्व्हिस रोडवरून मोठ्याने आवाज आला “हे पुणेकर पुढे थांबा मी आलोच” आम्ही थोडे पुढे जाऊन थांबलो या अनोळखी शहरात अस्सल मराठीत आरोळी आली म्हणजे थांबणे क्रमप्राप्त होते. थोड्या वेळात ज्यांनी आवाज दिला ते आमच्याजवळ आले आणि विचारू लागले पुण्यात कुठे राहता? कधी निघालात? कुठे चाललात? गप्पा रंगल्या त्यात मग चहापाणी झाले ते गृहस्थ सांगलीचे आहेत त्यांनी सांगितले की इथे इलेक्ट्रोनिक सिटी फेज एक आणि दोन या रोड च्या दोन्ही बाजूला आहेत फेज एक मध्ये खूप मराठीलोक आहेत. ते ही आणि आम्ही हि घाईत असल्याने आम्ही त्यांचा लवकर निरोप घेतला आणि बेंगलुरू शहरास राम राम ठोकून कर्नाटक सोडून तामिळनाडूच्या दिशेने निघालो.
अगदी होसूर शहर येईपर्यंत म्हणजे तामिळनाडूत अधिकृत प्रवेश करेपर्यंत रोड च्या दोन्ही दिशेला अधून मधून लागणाऱ्या नारळी सुपारी च्या बागा सोडल्या तर फक्त उपनगरे वसलेली आहेत. मिळेल तिथे आम्ही नारळपाणी पीत आगेकूच चालू ठेवली.
उशीर झाला तरीही आज कृष्णगिरीला पोचायचेच या इराद्याने आम्ही दिवस मावळला तरीही प्रवास चालू ठेवला. कृष्णगिरी जवळ आल्यावर आम्ही हॉटेल शोधायला सुरुवात केली परंतू आम्हाला काही हॉटेल लवकर मिळेना. एका लॉज मध्ये शेवटी तिसऱ्या मजल्यावर आम्हाला रूम मिळाली आम्ही सायकल उचलून जिन्याने तिसऱ्या मजल्यापर्यंत घेऊन गेलो. अंघोळी होईपर्यंत नऊ वाजत आले होते. साडे नऊ नंतर जेवण मिळणार नाही असे कळल्यावर आम्ही लवकर जेवायला शेजारच्या श्री जया विलास रेस्टोरंट मध्ये जेवण घेण्यासाठी गेलो. आज दिवसभर नारळ पाणी व इतर गोष्टी खात आमचा दिवस गेला होता तेंव्हा आता आम्हाला पूर्ण जेवण हवे होते आणि संयोगाने त्या हॉटेल मध्ये आम्हाला छान गरम गरम चपात्या व भाजी मिळाली बऱ्याच दिवसानंतर आपल्या जेवणाच्या जवळचे जेवण मिळाल्याचा आनंद काही औरच होता.
उशीर झाला होता परंतु आम्हाला आम्हे काही कपडे धुणे गरजेचे होते तेंव्हा आम्ही लवकर ही धुलाई आवरली व टेरेस वर कपडे वाळायला टाकून आम्ही झोपी गेलो.