[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 12
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासात आता अंतर थोडे राहिले होते, जेमतेम अडीचशे किलोमीटर अंतर राहिले आहे आणि आजच्या दिवशी तर फक्त १३० किलोमीटर अंतर पार करून थूथूकुडी या मिठागारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावी आमचा मुक्काम होता. आता कन्याकुमारी पर्यंत याशिवाय दुसरे मोठे शहर हि नव्हते.
आज १२५ ते १३० किलोमीटरचा पल्ला असल्याने आम्ही नेहमीप्रमाणे घाई न करता आरामात आवरून रामनाथपुरम सोडण्याचा निर्णय घेतला. जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास आम्ही आमचा प्रवास सुरू केला शहरातील रस्ता खूपच खराब होता तेंव्हा दुसऱ्या रोडने शहराच्या बाहेर पडून आम्ही मेन रोडवर प्रवेश करावा का? असा विचार करत अत्यंत खराब रस्ता पार करत होतो.
खराब रस्ता आणि कोणत्या रस्त्याने बाहेर पडायचे याचा संभ्रम या सर्वांचा ताळमेळ घालत आम्ही पुढे पुढे जात होतो. एका टप्प्यावर आम्ही गुगलबाबाचा आसरा घेऊन पर्यायी रस्ता त्याच्या मदतीने निवडून त्याच्या मार्गदर्शनाने पुढे निघालो.
शहराच्या बाहेर पडायचा रस्ता म्हणजे अगदी गावकुसाबाहेरच्या पांदीच्या रस्त्यासारखा होता अर्थात रस्ता डांबरी होता परंतु दोन्ही बाजूंनी वेड्या बाभळींनी अक्षरशः वेढा घातलेला हा रस्ता आम्ही सावधानपूर्वक पार करत होतो. रस्त्याच्या एका बाजूने घरे तर दुसऱ्या बाजूला छोटेखानी तळे होते.
आता हळू-हळू आजूबाजूच्या शहरातील मिणमिणते दिवे अंधुक होत परिसर उजाडत होता. आता आम्ही इथून पुढचा प्रवास समुद्रकिनाऱ्याजवळून करणार होतो आणि याची जाणीव आम्हाला भल्या सकाळीही होत होती सकाळच्या त्या थंड हवेतही आम्हाला घाम आल्याची जाणीव होत होती. रस्ता अरुंद असला तरीही वर्दळ मात्र खूपच कमी होती अगदी खेडेगावातल्या मुख्य रस्त्यावरून गावापर्यंत जाण्याचा जसा एकेरी रोड असतो तसा हा रोड दोन्ही बाजूंनी गर्द वेड्या बाभळींनी वेढलेला कधी-कधी आम्हाला तर सायकल पंचर होण्याचाही धोका वाटत होता.
थोड्याच वेळात सूर्योदय होणार होता परिसर गर्द झाडींनी वेढल्यामुळे आणि रस्ता आजूबाजूचे निरीक्षण करीत जाण्यासारखा नसल्याने आम्ही आमचे लक्ष रोडवर केंद्रित करूनच प्रवास करत होतो. या रस्त्याने बाभळीचे बन नाहीतर पामची झाडे याशिवाय दुसरे काही दिसत नव्हते.
थोड्या वेळाने रस्त्याच्या डाव्या बाजूने सूर्यदेवाने दर्शन देऊन आमची खुशाली विचारली आम्ही हि थोडे थांबून आज फार कमी अंतर कापले भेटीपूर्वी याची जाणीव त्याला करून देत पुढे निघालो.
हळू हळू रस्त्यावर वर्दळ वाढत होती आता दाट बाभळीच्या जाळ्या जाऊन कधी दलदलवजा तलाव आणि त्यात बुडालेली शेतं तर कधी भाताचे खाचरे हि दिसत होती.
आठ वाजून गेले तरीही आम्हाला नाश्ता करण्यासाठी कुठे हॉटेल मिळेना वाटेत छोटी छोटी गावे लागत तिथे बस थांब्याजवळ टपरीवजा हॉटेल होते परंतू तिथे चहा शिवाय दुसरे काही मिळेना. शेवटी आम्ही पुन्हा एकदा सकाळी सात वाजता प्रमाणे दूध बिस्कीट खावून पुढे निघालो.
सकाळपासून आम्ही दोघेही एकमेकांना काही बोललो नाही पण .. आम्हा दोघांनाही आज सायकलवर बसायला त्रास होत होता. इतके दिवस आम्ही कटाक्षाने सर्व काळजी घेऊनही आज कसा काय त्रास सुरु झाला आणि तोही दोघांनाही एकदम याचे काही उत्तर आम्हाला कळेना.
काही वेळ असाच गेला, दिवस हळू-हळू माथ्यावर येत होता आम्ही रोडवर दुध आणि फळे त्यात हि केळी आणि नारळच भेटत होते ते आम्ही खात पुढे जात होतो.
कधी आम्ही समुद्र किनाऱ्यापासून दूर जात होतो तर कधी जवळून जात होतो. आम्ही किनाऱ्यापासून थोडे दूर जाताच हिरवीगार भाताचे खाचरे दिसायचे मागे भाताबरोबर नारळाचे झाडे दिसायची त्या ऐवजी आता पामची झाडे जास्त दिसू लागली.
या पट्ट्यातही एकाच ठिकाणी आम्ही भात लावणी चाललेली, हिरवी कोवळी भाताची रोपे, भरलेला भात, तर भात काढणी हि चालू असलेली पाहिली ती आमच्या कॅमेऱ्यात टिपून आम्ही पुढे जात होतो.
त्रास वाढत चालला होता, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जात होतो. साधारणतः मी सायकल चालवताना सतत माझी बसण्याची पद्धत बदलत असतो वेगवेगळ्या स्थितीत बसत सायकल चालवत असलो तरी आता हळू-हळू वेदना वाढत जात होत्या आणि कमाल म्हणजे दोघांचीही स्थिती समान बदलत होती.
कित्येक वेळा मी मला निसर्गाच्या सोबतीने एकरूप करून एका आभासी तंद्रीरुपी घ्यानसाधनेत घेऊन गेलो की मी सगळे विसरून राईडचा सर्वोच्च आनंद घेऊन सारे शारीरिक श्रम घालवत असतो किंवा त्याला विसरत असतो म्हणा पन आज वेदना मला त्या स्थितीत काही केल्या जाऊ देत नव्हत्या.
थूथुकुडी अजून दूर होते परंतू आतापासूनच आसपास मिठागरे आम्हाल दिसू लागले. थूथुकुडी हे मिठाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध का आहे ते आम्हाला कळू लागले होते. आम्ही राईड प्लान करत असताना कळाले होते की इकडे पूर येऊन गेला आहे. या पुराच्या खुणा जागोजागी आता अम्हाला दिसत होत्या. कुठे कुठे जमीन खांदून – खांदून गेली तर कुठे अर्धा रस्ता वाहून गेलेला होता. जागोजागी रस्त्याच्या कडेने मोठाले खड्डे पडलेले होतो.
दोघांच्याही वेदना वाढत जात होत्या बराच वेळ आम्ही उभे राहून सायकल चालवत होतो तीन -तीन, चार – चार किलोमीटर चे टप्पे करून पुढे चालत होतो. विजयासाठी शेवटच्या काही धावा सहजरीत्या करायच्या असताना अचानक शतकविरास जोराचा क्रांप यावा आणी त्याला एकेरी धाव घेणे हि कठीण होऊन जावे अशी आमची गत झाली होती. चूक कुठे झाली हे समजायला तयार नाही.
आम्ही दुपारचे जेवण घेतले नव्हतेच, सकाळीही आम्हाला पूर्ण नाश्ता मिळाला नव्हता तथापि आम्ही नारळपाणी व फळे वेळोवेळी घेत होतो.
आरामासाठी आम्ही थांबलो की परत सायकलवर बसायचे म्हटले की अंगावर काटा येऊ लागला होता दर थांब्याला आम्ही एकमेकांना आधार देत चला थोडेच राहिले आणि स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध वचन “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” याची आठवण करून पुन्हा तयार होत असू.
दरम्यान आम्हाला एके ठिकाणी मोठे मंदिर दिसले आपसूकच आम्ही तिकडे वळलो. हे भव्य मंदिर (Sri Pethanaachi Amman Temple) या मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. खूप शांत आणि सकारात्मक वातावरण होते. परिसरातून बरेच भाविक तिथे येत असावेत काही इतर राज्यातील भाविकही तिथे आलेले होते.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासात आता जस जसे आम्ही थूथुकुडी कडे जात होतो तस तसे मिठागरांची संख्या वाढत होती आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दूरपर्यंत मिठागरे दिसत होती.
एका पठारवजा प्रदेशात तर पुराने थैमान घातल्याचे दिसत होते तेथील पूर्ण रस्ताच वाहून गेला होता आणि सध्या तात्पुरता माती ओढून केलेल्या एकेरी रात्यावरून पोलिसांच्या मदतीने एकेरी वाहतून चालू होती. संपूर्ण परिसर वाहून गेलेला होता शिवाय तो प्रदेश हि खोलगट भाग नव्हता अगदी दूरपर्यंत सपाट प्रदेशात किती पाणी आणि किती वेगाने वाहले असेल याची याची कल्पनाही करवत नव्हती. दूरपर्यंत पुराच्या पाण्याने झोपलेल्या बाभळीवर कित्येक संसाराची लक्तरे टांगताना पाहून मान विषन्न होत होते.
आता हिरवागार प्रदेश जाऊन एखाद्या बर्फाळ प्रदेशात आल्याप्रमाणे जिथपर्यंत नजर जाईल तिथेपर्यंत पांढरेशुभ्र मिठागरे (मिठाची शेतं) दिसत होते. काही मोठ मोठ्या वाफ्यांत पाणी तर काही वाफ्यांत अर्धवट मीठ तयार झालेले तर कुठे पूर्ण वाफे मिठात बदलले दिसत होते.
थूथुकुडी शहर जवळ आल्याची जाणीव झाली आणि आजचा कष्टप्रद प्रवास आता तरी संपेल अशी आशा आम्हाला होती परंतू शहरात प्रवेश केला आणि जाणीव झाली कि आपली आजची परीक्षा संपली नाही. शहरातील रस्ता अत्यंत खराब होता. रोडवर पाणी, खड्डे, वाळू, रेती, दगड यांची भरमार होती कुठे कुठे तर आम्ही पायी चालणे पसंत केले.
शहराच्या सुरुवातीलाच आम्हाला हॉटेल मिळेल असे वाटले होते परंतू शोधत शोधत शहराच्या मध्यभागात आल्यावर काही लॉज होते परुंतू सायकल लावायला जागा नव्हती. शेवटी वैतागून आम्ही एक लॉज अगदी नाईलाजास्तव फायनल केला. आम्हाला कसेही करून आजचा दिवस संपवायचा होता. बाकी काश्याचाच विचार न करता आम्ही फक्त सायकल लावायला जागा पाहिली आणि लॉज बुक करून टाकला. रूम बद्दल न लिहलेलेच बरे असो..
पहिले आम्ही फ्रेश झालो रणभूमीची काय दुर्दशा झाली आहे याचा अंदाज घेऊ लागलो 😆 काही झाले तरी उद्याची लढाई जिंकायचीच आहे याचा निर्धार करून आम्ही पहिले मेडिकल गाठून काही गुगलबाबाची तर काही मेडिकल वाल्याची मदत घेऊन आराम वाटेल असे मलम घेऊन मग पोटोबा साठी चांगले शाकाहारी हॉटेल शोधू लागलो मिळालेल्या माहितीनुसार आम्ही हॉटेल वृंदावन (Hotel Birunthavan) येथे जेवण घेतले. जेवण ठीकठाक होते परंतू एक मात्र नक्की कि दक्षिण भारतात तिथले पदार्थच चवदार लागतात.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासात बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की, तिथले लोक खासकरून तमिलनाडू मधील हॉटेल मध्ये जेवण संपायच्या आगोदरच बिल हातात ठेवत असे बऱ्याच वेळा जेवणानंतर घेतलेला चहा, दुधाचे पैसे हाताने लिहून बिलात समाविष्ट करत पण मग बिल देण्याची घाई का करत होते ते काही कळले नाही. शिवाय बऱ्याच हॉटेल मध्ये वेटर स्वतः हून टीप द्या म्हणून आग्रह करत असत.
लॉज पासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर वर तिथला प्रसिद्ध बीच असतानाही आम्ही उद्यासाठी तयार होण्यासाठी आत्ता आराम करणे पसंत केले.
एकंदर एव्हड्या दिवसांच्या प्रवासामधला आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात कठीण दिवस होता. उड्या काय होईल याची तमा आम्ही करत नव्हतो. जे होईल ते होईल कन्याकुमारीत गेल्यावर पाहू पण आता कोणत्याही परीस्थित आम्ही माघार घेणार नव्हतो.
आज खूप थकलो हि होतो, तेंव्हा अंग टाकताच आम्ही निद्रेच्या अधीन झालो.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE या प्रवासात आता फक्त एक दिवस बाकी राहिला होता आजचा कठीण दिवस संपला होता आणि आता उड्या काहीही झाले तरी उड्या कन्याकुमारी गाठायचीच हा निर्धार आम्ही केला होता