[कृष्णागिरी ते नामाक्कल (तामिळनाडू) ] एकूण कापलेले अंतर १६२ किमी
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 8
काल उशिरा झोपूनही सकाळी आम्ही लवकर उठलो इथून पुढे आम्हाला रोज किमान १६० किमी अंतर पार करावे लागणार होते तेव्हाच आम्ही आमच्या योजनेप्रमाणे रामेश्वरमला पोचणार होतो. आता आम्हाला या दिनचर्येची सवय झाल्यासारखी झाली होती. पायाची तक्रार कमी झाली होती परंतु तरीही पायांची विशेष काळजी घेत होतो.
सकाळी लवकर आवरून आम्ही आज पाच वाजण्यापूर्वीच आमचा प्रवास सुरु केला. परंतू आज वातावरण एकदम बदलले होते. सर्व परिसर दाट धुक्यात गुडूप झालेला होता. समोर काही फुटांपलीकडे दिसत नव्हते. परंतू आता आम्ही मुख्य हायवे वर आलो होतो आमच्याजवळच्या सर्व लाईट लावून पुढे निघलो होतो.
कुठे-कुठे रस्त्याचे काम चालू असल्याने एकाच बाजूने दोन्ही बाजूंची रहदारी त्या दाट धुक्यात सुरु होती. समोरच्या वाहनांचा सरळ डोळ्यावर धुक्यातून येणाऱ्या प्रकाशझोतामुळे समोर रस्ता कसा आहे हे कळत नव्हते. आणि समोरचे वाहन किती दूर आहे याचा ही अंदाज येत नव्हता. कुठे-कुठे अचानक खराब रस्ता आल्यावर सायकल हेलकावे खात होती. अश्या परिस्थितीत एकदम हळू-हळू जात तर कधी-कधी थोडे थांबून रस्ता निवांत झाल्यावर निघत होतो.
काही अंतर असेच पार केल्यावर धुके कमी नाही झाले परंतु चांगले उजाडल्यामुळे जरा दृश्यमानता वाढल्याने आम्ही आमचा वेग वाढवला. दोन्ही बाजूंचा परिसर धुक्यात हरवला होता. क्षितिजासमांतर किंवा त्यापेक्षा उंच नारळाची झाडे फक्त दिसत होते. आता मोठ्या मोठ्या इमारती जाऊन छोटी छोटी टुमदार घरे रोड शेजारच्या गावी दिसत होती तर कधी कधी मोठ मोठे माळरान ही या धुक्यातून डोकावून आम्हाला जणू शुभेच्छा देत होते.
जसे जसे वातावरण निवळत होते आजूबाजूचा प्रदेश उजळत होता. धुक्याचे लोट लांब जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावलेले होते. त्या झाडांच्या पलीकडे हिरवीगार शेती तर कधी मोठमोठाल्या दगडांच्या टेकड्या.
इकडे गेल्या काही दिवसापासून आम्हला एक गोष्ट रोज जाणवत होती ती महणजे इकडे रोड पहाटे मंदिरातील लाउड स्पीकरवर देवाचे गाणी वाजवत असतात एक गाव संपले की थोड्या वेळाने हळू हळू मोठा होत जाणारा भक्तिमय गाण्यांचा आवाज आता गाव जवळ आल्याचे सांगत असायचा.
इतके धुके असले तरीही आम्ही साडेसात पर्यंत जवळ जवळ ५० किलोमीटर अंतर पार केले होते तेंव्हा ठरल्याप्रमाणे नाश्ता करण्याचे ठरवले आणि आम्ही रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या अन्नपूर्णा हॉटेल मध्ये नाश्ता केला.
सायकल चालवण्यास आदर्श वातावरण असल्याने आम्ही लवकरात लवकर जेव्हडे होईल तेव्हडे अंतर कापण्याचा निर्धार करून रोडवर सायकल चढवल्या.
एव्हाना सूर्य बराच वर आला होता तरीही तो या दाट धुके आणि ढगांमुळे जाणवत नव्हता आणि अजूनही सकाळचे सात वाजल्याचा भास होत होता.
आज रस्ता ही खूप चढाईचा नव्हता उलट आम्हाला एक दोन वेळा चांगला चार पाच किलोमीटर चा उतरणीचा रस्ता लागला होता. मागच्या काही दिवसातला आजचा रस्ता आणि वातावरण आमच्यासाठी अनुकूल होते. नऊ वाजेपर्यंत आम्ही बऱ्यापैकी अंतर कापले होते आम्हाला आज रस्त्याला खूप लोक पायी जाताना दिसत होते. तेंव्हा आम्ही पाणी ब्रेक घेऊ आणी या लोकांशी ही संवाद साधू असे ठरवून आम्ही एका ठिकाणी थांबलो जिथे या लोकांपैकी काही लोक विश्रांतीसाठी थांबले होते.
त्यांचाशी बोलून कळले की हे लोक हैदराबाद वरून आले होते आणि ते शबरीमाला (केरळ) कडे चालले होते. जवळ जवळ १२०० किलोमीटर अंतर हे लोक पार करणार होते. त्यातील काही लोक चांगले मराठी बोलत होते. त्यांना पुढील प्रवासाला शुभेच्छा देऊन आम्ही पुढे निघालो.
वाटेत बऱ्याच ठिकाणी आम्हाला जंगलातून हि जावे लागले. दोन्ही बाजूंनी संरक्षित जंगल, रोडच्या कडेला असलेल्या झाडांवर माकडे उड्या मारत कधी कधी तर वाटायचे की हे माकडे जर अचानक रोडवर आले तर जोरात जाणारे वाहने त्यांच्यासाठी धोक्याची ठरतील परंतु ते रोडवर येत नव्हते. काही लोक त्यांना खायला ही देत होते. आम्ही तिथे न थांबता उताराचा रस्ता वेगाने पार करणे पसंत केले.
वातावरण चांगले असल्याने आम्ही वेळोवेळी येणारे जंगले आणी सोबतीने येणारे दगडी डोंगर यांच्या सानिध्यातून सायकलिंग करणे एक अद्भुत अनुभूती देत होती. असे आदर्श वातावरण रोज आम्हाला मिळणार नव्हते तेंव्हा आज अधिक उर्जा खर्च करण्याऐवजी आम्ही जेव्हडी उर्जा वाचवता येईल तेव्हडी वाचवू म्हणजे उद्या आपल्याला आज जसे अधून-मधून उलटे वारे लागले होते तसे लागले तर आज वाचवलेली उर्जा कामी येइल.
कधी नारळ पाणी तर कधी दुध पीत आम्ही पुढे जात होतो. दोन दिवस जो शारीरिक व मानसिक थकवा आम्हाला आमच्या ध्येयापासून दूर नेऊ पहात होता. आज मात्र आम्हाला नवी उर्जा मिळाली होती. आता आपण कन्याकुमारीला जाऊनच परत फिरू हा विश्वास पाय आणी मन दोघेही देऊ लागल्याने आम्ही आज राईड चा खऱ्या अर्थाने आनंद घेत होतो.
सालेम शहर जवळ येऊ लागले होते, एके ठिकाणी कन्याकुमारी ५०० किमीचा मैलाचा दगड पाहून आम्ही भाऊक झालो फक्त ५०० किमी अजून हे वेडी आशा आम्ही मनाला देत होतो कारण आम्हाला रामेश्वरमवरून कन्याकुमारी ला जायचे होते तेंव्हा हे अंतर ५०० किमी नसून अजून बरेच होते.
आता पुन्हा घरे संपून इमारती दिसू लागल्या होत्या. हिरवीगार जंगले संपून आता सिमेंटचे जंगल लागले होते. सालेम विमानतळाकडे जाणाऱ्या चौकांत आम्ही रस्ते सुरक्षा अभियानाचे काम केले. एव्हाना दीड वाजला होता आम्ही बऱ्यापैकी अंतर पार केले होते आणि आज लवकरच १६० किमी चा टप्पा पार करणार होतो. सालेम शहराच्या बाहेर आल्यावर भूक लागल्याने आम्ही एका चौकात दुपारचे जेवण घेतले.
जेवण करत असताना आम्ही नामाक्कल या शहरात मुक्काम करून पुढील योजनेत थोडा बदल करून मदुराई कडे न जाता दुसऱ्या समांतर रोडने जायचे ठरवले जेणे करून आम्हाला निसर्गाच्या अजून जवळ जाता येईल पंचवीसएक किलोमीटरचे अंतर ही वाचेल (तसे ते वाचले नाहीच कारण आम्ही या रोड ने जाताना बरेच आजुबाजूला फिरलो).
कावेरी नदी पार करून करुरला जाण्याऐवजी आम्ही कावेरी तीरासामांतर रोड ने जायचे ठरवले. आम्ही आमच्या जर्सीवर कन्नड आणी तामिळ या दोन्ही भाषेत “पुणे ते कन्याकुमारी” असे लिहलेले असल्याने अनेक जन ते वाचून आम्हाला थांबत होते आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते परंतू आम्हाला तमिळ येत नाही हे कळल्यावर ते निराश होत होते. थोडेफार आमच्याशी बोलून ते माघारी फिरत होते.
पाच वाजायच्या आसपास आम्ही नामाक्कल शहरात प्रवेश केला होता आणि आम्हाला सुरुवातीलाच एक लॉज मिळाला. लॉज ची रूम पहात असताना मी सायकल सांभाळत असताना काही छोटी मुले माझ्याजवळ आली आणी माझी चौकशी करू लागले.
मी ही त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या तेव्हा कळले की त्यांना तामिळ व इंग्रजीशिवाय इतर भाषा शिकवल्या जात नाहीत त्यांना इतर भाषेतील साहित्य / चित्रपट / टीव्ही कार्यक्रम त्यांच्यासमोर येऊ दिले जात नाही. इतकेच काय पण त्या मुलांना पुणे च काय पण महाराष्ट्राबद्दल ही ते पाचवी ला असूनही काही माहित नव्हते. या गोष्टी त्यांना शिकवल्या जात नाहीत कि फक्त त्यांनाच माहित नव्हते हे मात्र कळले नाही.
लवकरच आम्हाला लॉज मिळाला आम्ही आमचे सर्व सामान रूम मध्ये ठेऊन अंघोळी उरकून जेवायला हॉटेल शोधू लागलो परंतू आम्हाला काही शुद्ध शाकाहारी हॉटेल काही केल्या मिळेना शेवटी तीन किलोमीटर ची पायपीट करून आम्ही एका गाड्यावर डोसा खाऊन आणी दूध बिस्कीट खाऊन आजचा दिवस संपवला.