PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या नियोजित प्रवासात आता करूर, मदुरई मार्गे न जाता थिरुमयम मार्गे म्हणजे दुसऱ्या पर्यायी मार्गाने जाणार होतो. इथूनपुढे आम्ही चार-चार लेनचा बंदिस्त मेगा हायवे सोडून दोन लेन च्या राज्यमार्गाने जाणार होतो. तेंव्हा रोड कसा असेल माहित नव्हते पण आम्ही आज कावेरी नदीकाठावरून निसर्गाच्या कुशीत प्रवास करणार होतो याचा आनंद जरी असला तरी रोड कसा असेल याची धास्तीही मनात होती.
आम्ही आमची नियोजित योजना अचानक बदललेल्यामुळे पुढील संभाव्य मुक्कामाचे ठिकाणे तिथे रूम / लॉज / हॉटेल ची उपलब्धता याबाबत आधी काहीही रिसर्च न केल्यामुळे आम्हाला आता पुढेचे निर्णय ऐन वेळी घ्यावे लागणार होते.
अगोदरच्या नियोजनानुसार आम्ही सर्व मार्ग गुगल च्या सहाय्याने पाहिला होता. कुठे कसा परिसर आहे? तिथली काय विशेषता आहे? असाधारण परिस्थितीतही कुठे काय आहे या सर्वाचा आम्ही बारकाईने अभ्यास केला होता आणि आत्तापर्यंत च्या प्रवासात आम्हाला त्याचा खूप फायदा झाला होता. मात्र आता आम्ही मार्ग बदलल्यामुळे पुढील मार्ग पूर्णपणे अनोळखी असणार होता.
नेहमीप्रमाणे आम्ही साडेतीनला उठून आमचे सर्व आवरून खालच्या गोडाऊन मधून सायकली बाहेर काढेपर्यंत पाच वाजले होते. आम्ही वेळ न घालवता नामाक्कल शहराच्या दिशेने जाणाऱ्या रोडने पुढे निघालो शहरातून बाहेर पडत असतानाच जाणीव झाली कि रोड छोटा असणार आहे.
थोडे पुढे जाताच रोड एकदम एक दोन लेन चा झाला त्यात ही एका लेन चे काम चालू होते कुठे-कुठे तर रोडवर खडी पडलेली होती तेंव्हा आपण मोठा हायवे सोडून चूक तर केली नाही ना असे वाटायला लागले. इतके दिवस एकदाही रोडवर न आदळलेली सायकल आज सकाळच्या पाच किलोमीटर मध्येच कितीदा तरी आदळली होती. पहाटे रोडवर तुरळक वाहतूक होती त्यामुळे कुणाला विचारणार पुढे रस्ता कसा आहे?
काय करावे या विचारात असताना पुढे दुभाजाक असणारा चांगला रोड आला आणी आम्ही त्या थंडगार पहाटे सुटकेचा निश्वास टाकला.
तुरळक वाहतून दोन्ही बाजूंनी गर्द झाडी मध्ये मध्ये येणारी टुमदार गावं एकटेपणाची जाणीव होऊ देत नव्हते. मी काल रात्री सुयोग सरांना म्हणालो होतो की सर तुम्ही एक गोष्ट नोट केली का? की आपण घरून निघाल्यापासून ते आजपर्यंत पूर्ण कर्नाटक मध्ये एकदाही आपल्या मागे कुत्रे लागले नाहीत. यावर तेही मोकळेपणाने हसले होते. आणी आज कदाचित रस्ता छोटा झाल्याने किंवा आता गावे रोडलगत असल्याने पण आज कुत्रे भुंकत विशेषकरून माझ्या मागे लागत होते यावर सुयोग सर जोरात हसत पुढे जात पवार सरांची इच्छा पूर्ण करा असे मागे लागणाऱ्या कुत्र्यांना म्हणत जोरात पुढे जात होते. बहुतेक वेळा ते पुढे चालत होते व कुत्रे त्यांना पाहून भुंकायचे कि नाही हे ठरवे पर्यंत सुयोग सर तिथून पास झालेले असायचे आणि मी तिथे असायचो आणि ते कुत्रे माझ्या मागे लागायचे.
छोटा परतू चांगल्या दर्जाचा रोड आणि सकाळचे सुखद वातावरण याचा आनंद घेत आम्ही गाव दर गाव मागे टाकत जात होतो. हिरवेगार माळरान आज बरेच साथ देत होते. दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेती माझ्या गावच्या माळरानातून जात आहे असा भास होत होता.
अंधाराचे जाळे हळू हळू विरळ होत जात होते तसे रोड च्या कडेला बांधलेल्या गाई – बैल अंग झटकून सकाळच्या चाऱ्याची वाट पाहत होते तर कुठे कुठे म्हशी अजुनाही गुंगीत रवंथ करत होत्या. गावे हळू हळू जागे व्हायला लागली होती. दूर हवेत धुराचे लोट सांगत होते कि थोडे पुढे अजून दुसरे गाव आहे. सकाळी सकाळी तोंडात ब्रश घालून हातात डबडे घेऊन जाणारे लोक पाहून मला आमच्या लहानपणाची आठवण ताजी झाली. 😆
आज पुन्हा सूर्यदेव आमच्या डाव्या बाजूने उगवणार होते, तेव्हा आमच्या डाव्या बाजूचे क्षितीज या सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाची नांदी देत होते. नेहमीप्रमाणेच उगवणारा सूर्य पण आज विशेष होता. आम्ही अंतरही बऱ्यापैकी पार केले होते तेंव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणावरून सुर्योदयास सामोरे जाणे आम्हाला योग्य वाटले. आंम्ही एके ठिकाणी थांबून समोरच्या जंगलातून सूर्य वर येणाची वाट पाहू लागलो. रोज सूर्य आमची वाट पहायचा आज आम्ही त्याची वाट पाहत होतो. इतके दिवस त्याने आम्हाला रोज सकाळी उबदार प्रोत्साहन देत होता, तेंव्हा सरत्या वर्षीच्या शेवटच्या सुर्योदयास आम्हाला आमच्या स्मृतीत जपायचे होते.
थोड्या वेळातच काटेरी बाभळीआडून सूर्यदेव भेटीला आले मग यथावकाश त्यांची भेट घेऊन ते क्षण डोळ्यात आणी कॅमेऱ्यात साठवून आम्ही पुढे निघालो.
वातावरण सारखेच असले तरी काही किलोमीटर च्या अंतरातच पिकांचे प्रकार एकदम बदलत होते. सकाळी सकाळी आम्ही ज्वारी, तुरी व इतर पिके पाहिली होती आणी आम्ही कावेरीनदीच्या जवळ येताच अचानक रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत केळी च्या बागाच बागा दिसत होत्या.
सकाळचे कोवळे उन त्या केळीच्या बागेच्या ओल्या जमिनीपर्यंत झिरपत होते. त्यात हिरवेगार केळींचे घड काही क्षण सोनेरी वाटत होते. तर काही झाडांवर नुकतेच उमलेली कोवळी केळी त्यांचा पिवळसर फुलांच्या आड दडून बसलेली.
दोन्ही बाजूंनी केळींच्या घडांनी लादलेल्या बागामधून जाताना जणू सजवलेल्या पूजेच्या पाटावरून आम्ही जातोय असे वाटत होते. इकडे सायकलचा वापर प्रभावीपणे होत असल्याचे जाणवले. कुणी शेतात सायकल ला विळा अडकून शेतात जात होते. तर कुणी सायकलवरून गवताचे भारे वाहत होते. रोडवर वर्दळ वाढली होती. छोटी छोटी खेडी पार करताना तिथले जीवन न्याहळताना मला माझे गाव आठवत होते.
केळीचे बाग जाऊन आता अधून-मधून नारळाचे बाग तर कुठे-कुठे भात ही दिसत होता. पहाटे आम्ही ज्वारी, तूर हे कमी पाण्यावरील पिके पाहिली होती तर साडेसात वाजेपर्यंत आम्ही नारळ,भात हे जास्त पाणी लागणारे पिके पाहत होतो पिकांमधली एव्हडी विविधता पाहून मी आवाक झालो होतो.
भूक लागली होती परंतु येणारे गावे खेडी असल्याने आम्हाला कुठेही हॉटेल मिळाले नाही. एव्हाना आम्ही थोत्तीयाम या तालुका असलेल्या गावी आलो परुंतू आम्हाला शुद्ध शाकाहारी हॉटेल मिळाले नाही शेवटी आम्ही दुध बिस्कीट खाऊन नाश्ता उरकला तसेच जाताना काही केळी सोबत घेतली पुढे वाटेत खाऊ असा विचार करून आम्ही पुढे निघालो.
बंगलोर नंतर थेट इथे आम्हाला काही सायकलिस्ट दिसले. परंतू आमचे संभाषण फक्त हाय हेल्लो पुरतेच झाले. जस जसे आम्ही समुद्राच्या जवळ जात होतो माणसाच्या स्वभावात ही महाराष्ट्राचा मधाळपणा जाऊन उदासीनतेचा एक खारटपणा आम्हाला वेळोवेळी जाणवत होता.
आजूबाजूचे वातावरण आता बदलले होते तेव्हा जाणीव झाली की आपण नदीच्याजवळ आलो आहोत. एका बाजूने घनदाट झाडी तर दुसऱ्या बाजूने हिरवीगार शेती. गावचा एकेरी रस्ता पण चांगल्या स्थितीतील होता (कुठे कुठे खराब होता परंतु एकंदर रस्ता सायकल साठी चांगला होता).
सकाळचे आठ वाजले असतील वाहतुक एकदम तुरळक अधून मधून एकादी मोटारसायकल तर कधी एखादा ट्रक अशी सायकल चालवायला आदर्श वातावरण
मी सायकल चा स्पीड कमी केला आणि तयार झालो पुन्हा एकदा या सुंदर निसर्गासी एकरूप होण्यास. समोर नुकतीच काट टाकलेल्या नागिणीच्या तुकतुकीत कांतीच्या फडीवरून सूर्यप्रकाश परावर्तीत तो नागमणी भासावा असा समोर रस्ता पहुडलेला आणि त्यावर परावर्तीत होणारे सूर्यकिरणे भासत होते. डाव्या बाजूने खळखळ वाहणारे पाणी आणि त्यापलीकडे दूरपर्यंत हिरवीगार भाताचे शेत वाऱ्याबरोबर पिंगा घालताना जणू मला साथीला बोलावत होते. बांधावरली नारळीची एक रांग रस्त्याच्या समांतर दूरपर्यंत लगतच्या साचलेल्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळत होती. अर्ध्या संसारात रापलेल्या मालकिणीने दोन मोकळ्या क्षणाला घरात कुणी नाही हे पाहून आरश्यासमोर ठुमकत स्वतःला न्याहाळत असताना अचानक घरधन्याने तिच्या ओल्या केसात परसातले फुल मळावे आणि तिने नव्या नवरीप्रमाणे शहरावे अगदी तसी ती नारळीची ताटी वाऱ्याच्या स्पर्शाने शहारत होती.
शरीर आता हलके व्ह्यायला लागले होते. पेडल फिरवायला अजिबात कष्ट जाणवत नव्हते, सर्वकाही इतके लयबद्ध चालले होते की सायकल ही माझ्याच शरीराचा हिस्सा बनली होती.
जणू सारे वेळ खूप संथ झाला होता आणि मी प्रत्येक गोष्ट टिपू शकत होतो अगदी माझी चाहूल लागताच शेजारून फडफड करून उडणाऱ्या बगळ्यांच्या पंखातून निसटलेले बारीक पीस ते शेजारून जाणाऱ्या मोटारसायकलवर बसलेल्या गृहिणीच्या हातावरील स्वयंपाक करताना भाजलेले व्रण.
कधी-कधी संपूर्ण रस्त्यावर मी एकटाच असायचो दूर-दूर पर्यंत मी आणि माझी सायकल बस या अश्या वातावरणात भीतीचा लवलेश तर सोडाच पण उलट काही वेळ कुणीच येऊ नये असे मला वाटत होते. एखाद्या मद्यपीला त्या झिंगेची सवय व्हावी तसी मला या तंद्रीची सवय झाली होती.
काही वेळ असाच या तरल भाविश्वात वावरत असताना अचानक मोरांची जोडी अर्थवट भरारी घेत रस्ता पार करून शेजारच्या बांधावर विसावली. मी भानावर येत सायकलवरून उतरून लगेच कॅमेरा चालू करून त्यांचाकडे घावत गेलो. परंतु माझ्या या आततायी व्यवहाराने ती जोडी भांबावली आणि बाजूच्या भाताच्या शेतात गुडूप झाली.
दुर्दैवाने मी त्या वेळी कॅमेरा बंद केल्यामुळे हे अद्भुत दृश्य मी फक्त माझ्या नयनपटलावरच कैद करू शकलो.
थोडावेळ मी बाजूच्या बांधलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसून मन भरेपर्यंत त्या अद्भुत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत बसलो असता सुयोग सरांचा फोन आला कि कुठे हरवलात या लवकर मी किती वेळ झाला आहे पुढे थांबलो आहे.
सगळ्याच उत्कट अनुभूती शब्दांत बांधता येत नाहीत तर त्या प्रत्यक्ष अनुभवाव्याच लागतात. निसर्गरूपी महासागरात माणूस म्हणून डुबकी माराल तर तुम्हाला ती अनुभूती कधीच येणार नाही त्यासाठी तुम्हाला मासळी बाणूनच या विशाल महासागरात विहार करावा लागेल तर आणि तरच तुम्ही त्याच्या भावविश्वात डोकाउ शकता.
केवळ अंतर कापण्यासाठी म्हणून नाही तर तुमचे शरीर जितके तुमच्या चष्म्याशी एकरूप होते आणि कधी कधी चष्मा घातला आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही तितके तुमचे शरीर जेंव्हा सायकलशी एकरूप होईल तेंव्हा तुम्ही या अद्भूत अनुभूतीचे रसग्रहण करू शकाल. अर्थात हे माझे वयक्तिक विश्लेषण आहे.
हळू-हळू उन वाढत होते पण आम्हाला त्याची जराशी ही जाणीव होत नव्हती कारण हा छोटासा रस्ता चिंच आणि इतर गर्द झाडीतून जात होता त्यामुळे बऱ्याच वेळा रोडवर सावलीच होती.
कावेरी नदीच्या कुशीतून हा शीतल प्रवास कधी संपू नये असाच होता. अधून मधून नदीपात्राचे दर्शन होत होते कावेरीचे विस्तीर्ण पात्र मला माझ्या गावच्या गोदावरीच्या पात्राची आठवण करून देत होते.
आम्ही मध्ये मध्ये थांबून सोबतची केळी व चिक्की खाल्ली. एक मात्र नक्की कि या रोड वर आम्ही फक्त दोघेच सायलस्वार नव्हतो तर अनेक जुन्या पद्धतीच्या सायकली या रोडवरून जात होत्या. वाटेत आम्हाला अनेक मंदिरे लागली काही छोटी तर काही मोठी पण सर्व सारख्याच पद्धतीचे असे वाटायचे कि सारी मेहनत कळस उभारण्यात लावली आहे. सुरुवातीला आम्हाला वाटले की या कळसांवर अश्याच वेगवेगळ्या कलाकृती साकारलेल्या आहेत पण स्थानिकांनी आम्हाला सांगितले की तसे नसून त्या कळसावर एक पूर्ण कथा साकारलेली असते.
मंदिराबाहेर मोठमोठ्या दैत्यांच्या मूर्ती आमचे लक्ष वेधून घेत होत्या. कावेरीच्या तीरावरून अजून काही किलोमीटर पुढे गेलो कि अचानक बऱ्याच गाड्यांची वर्दळ जाणवली आत्तापर्यंत शांत असलेला रस्ता गर्दीने भरला होता मोठमोठ्या प्रवासी गाड्या दिसू लागल्या मी सरांना म्हणालो इथे नक्कीच काहीतरी आहे जरा गुगलवर शोधा बरे आणि अम्हाला समजले कि रस्त्याच्या बाजूलाच श्री गुणसीलम विष्णू मंदिर हे नावाप्रमाणे श्रीविष्णूला समर्पित एक भव्य मंदिर आहे.
मंदिराबद्दल माहिती होताच आमची पाउले तिकडे वळली. दाक्षिणात्य स्थापत्यकलेचे वेगळेपण या मंदिरानेही जपले होते. मंदिरात बरीच गर्दी होती. अधिक माहिती घेता कळले कि येथे शासन अधिकृत मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्र आहे. त्याबाबत लोकांची अशी धारणा आहे कि इथे मानसिकरोगी ४८ दिवसात बरे होतात.
येथील प्रमुख उत्सव म्हणजे ब्रह्मोत्सवम सप्टेंबर – ऑक्टोबर दरम्यान ११ दिवसांच्या या महोत्सव काळात नऊ दिवस रथोत्सव असतो. आम्ही रथाच्या भल्या मोठ्या चाकांपाशी फोटो घेऊन गुणसीलमचा निरोप घेतला एका अर्थाने आमचे तिरुपतीचे दर्शन झाले होते कारण असे मानले जाते की ज्यांना तिरुपतीला जाणे शक्य नाही ते इथे भेट देऊ शकतात.
आता झाडी थोडी कमी झाल्याने आणि सूर्यदेव माथ्यावर येऊ लागल्याने उन्हाचा चटका जाणवायला लागला होता. आता आम्ही पाणी आणि नारळपाणी यांचा शोध घेत कावेरी नदी पार करणाऱ्या पुलाजवळ पोचलो होतो.
दूरवरून आम्हाला नदीपलीकडे मोठा मंदिराचा कळस दिसला तेंव्हा आम्ही या मंदिराला भेट देऊ असे ठरवून आम्ही कावेरी पार करणाऱ्या पुलावर चढलो नदीचे पात्र बरेच मोठे असल्याने लांब पूल पार करून आम्ही श्रीरंगमच्या भूमीत पोचलो. तिथे नारळपाणी पिऊन आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीने मंदिराकडे निघालो.
खरे तर या मंदिराबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती केवळ दूरवरून कळस दिसत होता म्हणून आम्ही तिकडे वळलो होतो.
मंदिराच्या परिसरात येताच आम्हाला जाणीव झाली के हे तर खूपच मोठे मंदिर आहे मग माहिती जुळवली तर आम्ही आवाक झालो की आपण हा मार्ग इतके प्राचीन मंदिरे आहेत म्हणून नाही निवडलेला परंतु विधात्याने आम्हाला आज दोन-दोन महान द्राविडी स्थापत्य कलेच्या महत्तम नमुन्याचे साक्षी बनवले आणि हे मंदिर म्हणजे श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिर होय.
मंदिराच्या आधीच प्रशस्त कमानी पार करत मुख्य द्वाराजवळ गेल्यावर मंदिराची भव्यता पाहून आम्ही थक्क झालो. इथेही आम्हाला एक-एक करून दर्शन घ्यावे लागणार होते कारण आम्ही सायकल बाहेर लावल्या होत्या.
सुयोग सरांना दर्शन घेऊन येईपर्यंत मी या मंदिराबद्दल माहिती घेऊ लागलो तेंव्हा कळले की हे मंदिर तर १५५ एकर मध्ये वसलेले आहे ज्यात ८१ देवस्थान, २१ कळस, ३९ मंडप त्यात १००० खांबाचे मंडप ही आहेत यासह तिथे अनेक पाण्याच्या टाक्यां आहेत.
या मंदिराच्या नोंदी/ऐतिहासिक संदर्भ इ. स. पूर्व १०० पर्यंत मिळतात, या मंदिराने अनेक आक्रमणे झेलली आहेत १४व्या, १६व्या तसेच १७व्या शतकात अनेक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे.
मंदिराच्या दोन्ही बाजूंनी ही कावेरी नदी वाहते त्यामुळे या परिसराला बेटासारखा आकार मिळालेला आहे. काही वेळात पूर्ण मंदिर पाहणे शक्य नव्हते तेंव्हा जेव्हडे पाहता येईल तेव्हडे पाहून घेऊ या विचारणे मी मंदिरात प्रवेश केला.
प्रत्येक दिवशी या मंदिरात गर्दी हे असतेच तेंव्हा जेव्हडे पाहता येईल तेव्हडे अगदी पळत-पळत पाहत अद्भुत कलाकुसर न्याहाळत जेव्हड्या मंदिरात जाता येईल तेव्हड्या मंदिरात गेलो. पण पूर्ण मंदिराच्या परिसराच्या अगदी छोटा भाग पाहून आम्हाला तिथून निघावे लागले याचे शल्य आम्हाला आजही आहे.
आम्ही जड पावलांनी तिथून निघालो कारण आम्हाला अजून बरीच मजल मारायची होती आम्हाला आमच्या ध्येयापासून दूर जाऊन चालणार नव्हते म्हणून आम्ही तीरुचापल्ली कडे निघलो.
एव्हाना दुपारचे दीड वाजत आले होते सकाळी आम्ही दुध बिस्किटे खाऊन नाश्ता भागवला होता त्यामुळे जोराची भूक लागल्याने आम्ही तीरुचापल्ली येथील एका चौकात दुपारचे जेवण घेतले आणि पुढील प्रवास सुरु केला. आता पुन्हा मोठा बंदिस्त हायवे लागला हा रोड सायकलसाठी आदर्श असल्याने आम्ही लवकरच पुदुक्कोट्टई येथे पोचू आणि तिथे आजचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
हळू हळू सूर्य पश्चिमेला झुकत चालला होता, रस्ता चढाईचा नसला तरी समोरून वाहनारे वारे आम्हाला अडवत होते.
सरत्या वर्षाचा हिशोब घेऊन सकाळी सूर्योदयाच्या भेटीला गेलेलो आम्ही नवीन वर्षाची नांदी घेऊन येण्याचे आश्वाषण देणाऱ्या सूर्यास्ताला ही निरोप देण्यासाठी थांबलो. नारळीच्या आड लोप पावणारा सूर्य ही जणू आज भावूक झाला होता. आम्ही ही उद्या नवीन वर्ष्याच्या पहिल्या किरणांना भेटण्याचे आश्वसन देऊन सूर्यदेवाचा निरोप घेतला.
पुदुक्कोट्टई शहराजवळ येईपर्यंत सहा वाजत आले होते व सुयोग सरांना अजून काही किलोमीटर जाऊन मग मुक्काम करावा असे वाटत होते परंतु मला छोटा रोड, लवकर झालेला अंधार आणि अनोळखी परिसर या गोष्टी विचारात घेता पुदुक्कोट्टई या मोठ्या शहरात मुक्काम करावा असे वाटत होते. या नाही हो च्या राड्यात आम्ही बायपास ने पुदुक्कोट्टई शहराच्या बाहेर आलो होतो आणि आता राहण्याचे सोय मागे आठ दहा किलोमीटर तर पुढे १४ ते १८ किमी वर होती तेंव्हा नाखुशीने मी पुढे जाण्याच्या निर्णयाला सहमती दिली.
आता आमचा प्रवास अंधारात सुरु झाला होता अजून पंधरा ते वीस किमी वर लॉज नाही मिळाला तर काय करायचे हा विचार मनात थोडी चिंता भरत होता. वेळ, प्रसंग सांगून येत नाहीत या विचाराने आम्ही लवकरात लवकर हा प्रवास संपवायचा विचार करून सायकली वेगात दामटवल्या.
थोडी विचारपूस केल्यावर कळले की तिरुमयम या तालुक्याच्या ठिकाणी आम्हला लॉज मिळेल. तिरुमयम पासून अलीकडे काही किलोमीटर आधी शनमुगनाथन अभियांत्रिकी महाविद्यालय लागते त्याच्या समोर एक मेस आम्हाला दिसली. पुढे जेवण मिळेल न मिळेल म्हणून आम्ही तिथेच आमचे रात्रीचे जेवण उरकले.
मुख्य रस्त्यावरून तिरुमयम कडे जाणाऱ्या फाट्यावर आम्ही चौकशी साठी थांबलो त्या फाट्यावर आम्हाला एका इसमाने सांगितले की शहरात तुम्हाला लॉज मिळेल आणि त्यानी आम्हाला चांगल्या लॉज चा पत्ता ही दिला.
शहरात प्रवेश करताच एक छोटेखानी किल्ला आम्हाला दिसला. अंधार असल्याने गावातील गढी सारखा प्रकार असेल म्हणून आम्ही सरळ लॉज कडे निघालो मुख्य चौकात पुन्हा आम्हाला मघाची व्यक्ती भेटली व त्यांनी आम्हला लॉज दाखवला.
लॉज मालकाने ही आम्हाला पूर्ण सहकार्य करत सायकल वरती रूमवर न्यायला तसेच स्वस्तात एसी रूम दिली. यथावकाश अंघोळी उरकून आम्ही झोपण्याआधी सहज मघाशी जी वास्तू पाहिली त्याबात सर्च केले तेव्हा कळले की हा सोळाव्या शतकातील जवळपास ४० एकर मधील एका टेकडीवरील किल्ला आहे.
दहा वाजत आल्यामुळे आता तिथे भेट देणे शक्य नाही तसेच उद्या कोणत्याही परीस्थित रामेश्वरम ला पोचायचे हा आमचा मुख्य हेतू असल्याने काही वेळातच हातातून फोन गळून पडून आम्ही झोपेच्या अधीन झालो.
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[थूथुकुडी ते कन्याकुमारी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४० किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.