तसाही आजचा दिवस राखीव होता त्यामुळे आम्ही आज निवांत होतो परंतु तरीही आम्हाला आज रामेश्वरम चे दर्शन घेण्यासाठी जायचे असल्याने आणि आदल्या दिवशी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी जर लवकर आम्ही मंदिरात पोहोचलो तर अग्नीकुंड तसेच २२ कुंडांचे स्नान आणि दर्शनही व्यवस्थित होईल या सर्वांचा अंदाज बांधून आम्ही सकाळी लवकर उठायचे ठरवले होते परंतु तरीही उठता-उठता चार वाजले होते मग आम्ही लगबगीने अंघोळी उरकवून पुन्हा अग्नि कुंडाच्या आंघोळीसाठी मंदिराकडे निघालो ते दीड किलोमीटरचे अंतर पार करून समुद्रकिनारी अग्नि कुंडात आंघोळ करेपर्यंत साडेपाच वाजले होते.
आता मंदिराभोवती गर्दी जमू लागली होती अग्नि कुंडातही बऱ्यापैकी गर्दी होती. परतीच्या रस्त्यावरती ही गर्दी वाढत होती आणि मग आता दर्शनासाठी आपल्याला वेळ लागतो की काय असे आम्हाला वाटायला लागले. मग आम्ही अधिक वेळ न दवडता २२ कुंडाच्या आंघोळीसाठी रांगेला लागलो. रांगेत खाली सगळ्यांच्या पायाला चिटकलेली रेती लागून ती वाट रेतिमय झाली होती नागमोडी दर्शनवाटेसारखी वाट चालत-चालत शेवटी आम्ही पहिले कुंड, दुसरे कुंड असे करत-करत बावीसही कुंडांच्या अंघोळी केल्या खरंतर हा अनुभव खूप मजेशीर होता प्रत्येक कुंडापाशी आम्ही जायचो गर्दीत सामाऊन जाऊन तिथले कर्मचारी कुंडातून बादलीत पाणी घेऊन आमच्या वरती फेकायचे आणि आम्ही ते डोक्यावरती घेत पुढच्या कुंडाकडे गर्दीच्या लोंढ्यासोबत जायचं. आम्ही सोबत मोबाईल ठेवले होते आणि ते भिजून देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत होतो परंतु असे व्हायचे की वरतून बादलीतून पाणी फेकले की आम्ही कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी आमचे मोबाईल वाचत नव्हते आणि ते भिजल्या जात होते. मोबाईल जर खराब झाले तर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्ट्याबोळ होईल हे जाणून आम्ही मोबाईल भिजण्यापासून वाचवत त्या २२ कुंडांची आंघोळ केली.
प्रत्येक कुंडाला एक वेगळे महत्त्व होते आणि त्याच्या नावाप्रमाणे त्या कुंडातलं पाणी त्या-त्या ठिकाणाला त्या-त्या देवतांना समर्पित होते. असे म्हटले जाते की, त्या प्रत्येक कुंडाच्या पाण्याची चव ही वेगवेगळी आहे परंतु त्यात थोडासा खारटपणा मिसळल्यामुळे आम्ही एक-दोन कुंडांची चव घेऊन पुढच्या कुंडाची चव घेण्याचा प्रयत्न केला नाही
यथावकाश २२ कुंडांच्या अंघोळी झाल्यानंतर त्या भव्य मंदिरातून आम्ही बाहेर पडून जिथे आम्ही लॉकर घेतले होते त्या ठिकाणी जाऊन कपडे बदलले आणि दर्शनासाठी मार्गस्थ झालो दर्शनासाठी गर्दी बऱ्यापैकी होती परंतु तोबा गर्दी होती असा काही प्रकार नव्हता, आम्हाला चांगल्या दर्शनाची अपेक्षा होती आणि म्हणून तिथल्या स्थानिकांच्या सल्ल्यानुसार आम्ही दोनशे रुपयांचे दर्शन पास काढून आम्ही दर्शन रांगेत लागलो दोनशे या दर्शनरांगेत गर्दी खूपच कमी होती शिवाय आमच्यासोबत जे जोडपे होते त्यांनी अभिषेकासाठी सोबत दूध आणले होते आणि आम्ही त्यांच्यासोबत गेल्यामुळे आम्हाला श्री रामेश्वरम चे अतिशय जवळून आणि निवांत दर्शन होईल या हेतूने आम्ही त्यांच्या सोबतच चालत होतो मंदिर विस्तीर्ण असले तरीही आज गर्दी कमी असल्याने फार दूर पर्यंत रांग नव्हती मंदिराची भव्यता कितीही या नेत्रात साठवली तरीही ती साठवणे शक्य नव्हते. प्रत्येक खांबावरली कलाकुसर न्याहळत आम्ही पुढे जात होतो जसे-जसे आम्ही मुख्य मंदिराच्या जवळ जात होतो तसे-तसे शिवनामाचा जयघोष वाढू लागला. थोड्याच वेळात आम्ही दर्शन रांगेतून रामेश्वरम च्या गाभाऱ्यापाशी आलो काही लोकांची माथा टेकवण्याची तर काहींची त्याला डोळे भरून पाहण्याची आपल्या मनात सामावण्याची धडपड चालू होती. जसे मागे मी म्हणालो सुदैवाने आमच्यासोबत ज्यांना श्री रामेश्वरमला दुधाचा अभिषेक घालायचा होता त्यांच्यासोबत आम्ही असल्याने आम्हाला दर्शन ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन मिनिटे थांबता आले की जिथे भक्तांना फक्त डोके टेकून पुढे पाठवले जाते.
आम्ही मनभरून रामेश्वरमला नमस्कार केला कदाचित त्या विधात्याची इच्छा असावी की आम्ही तिथे इतका वेळ थांबावे कदाचित आत्तापर्यंत आम्ही वाहिलेल्या घामांचा अभिषेक त्याला भावला असावा कदाचित इथपर्यंत येण्यासाठी वाहिलेले कष्ट सोसलेल्या वेदना त्याला पावन वाटल्या असाव्यात आणि म्हणून त्यांनी आम्हाला मनभरून दर्शन दिले असावे असा भाव मनात घेऊन आम्ही सोबतच्या दांपत्याचे आभार मानत पुढे निघालो.
यथावकाश मग प्रसाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा मंदिराची भव्यता आणि न्याहाळू लागलो मंदिराची रचनाच सांगत होती की हे खूपच पुरातन मंदिर आहे. मंदिराचा इतिहास आपल्याला विदित आहेच माझ्या माहितीप्रमाणे जगातला सर्वात मोठा कॉरिडॉर या मंदिराचा आहे. या मंदिराची रचनाही मागे आम्ही श्रीरंगनाथ स्वामी मंदिरात बघितल्याप्रमाणेच होती अर्थात कॅमेरा वापरण्यास बंदी असल्याने आम्हाला फक्त आमच्या डोळ्यात ती भव्यता साठवून बाहेर यावे लागले.
आठ वाजेपर्यंत आमचे दर्शन होऊन आम्ही नाष्ट्यासाठी बाहेर आलो होतो अजून भरपूर वेळ होता तेव्हा आम्ही ठरवले की आज आपण धनुषकोडीला जाऊन परतीचा प्रवास सुरू करूया आणि जेवढे होईल तेवढे अंतर काल ठरल्याप्रमाणे पार करू आणि मग तिथेच मुक्काम करू हा विचार करून आम्ही रूमवर परत आलो. तिथे आम्ही चेकआउट केले परंतु आमच्या सायकली घेऊन त्यांना आम्ही विनंती केली की, आमचे लगेज आम्हाला धनुषकोडीवरून परत येईपर्यंत तुमच्या लगेज रूममध्ये आमचे राहू द्यावे. त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि मग आम्ही सायकल घेऊन थेट धनुषकोडीकडे कुच केले. अंतर कमी वाटत असले तरीही अजून आम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर जायचे होते. हळू-हळू आम्ही रामेश्वर मधून बाहेर पडून मोकळ्या रस्त्याला लागलो होतो दोन्ही बाजूंनी वेड्या बाभळींच्या बनामधून रस्ता पुढे जात होता हळू-हळू दोन्हीही बाजूंनी समुद्र स्पष्टपणे दिसून फक्त एक रस्ता मधून जाईल एवढीच वाट कुठे कुठे जाणवत होती.
थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला डाव्या बाजूला एक रस्ता जाताना दिसला आणि समोर त्या रस्त्याच्या शेवटला एक मंदिर होते. आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला, फक्त रस्ता बाकी दोन्ही बाजूंनी पाणी आणि शेवटी एका बेट वजा जागेवरती एक मंदिर होते परंतु मंदिरामध्ये खूप गर्दी असल्याने आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे टाळले मुखदर्शन घेऊन आम्ही बाजूच्या समुद्रकिनारी जाण्यासाठी निघालो परंतु तिथेही तोबा गर्दी असल्याने आम्हाला सायकली घेऊन तिथे जाणे शक्य नसल्याने आम्ही आता थेट आमचा मोर्चा धनुषकोडी कडे वळवला आणि तिथून आम्ही पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला बीच वरची रेती पसरलेली होती आणि समोरून वाहन आल्यास किंवा जवळून मोठे वाहन केल्यास आम्हाला त्या रेतीवरून सायकल चालवणे अवघड जात होतं तसेच आज सोबत लगेज नसल्याने सायकल चालवणे थोडेसे विचित्र वाटत होते कारण इतक्या दिवस आम्हाला लगेच सोबत घेऊन सायकल चालवायची सवय लागली होती आणि आज आम्ही लगेच शिवाय सायकल चालवत असल्याने आम्हाला कधी कधी त्यावर तोल सांभाळणे जड जात होते. अजून थोडे पुढे गेल्यानंतर वस्ती लागली होती इथे मोठ्या-मोठ्या गाड्या पार्किंगला लागल्या होत्या. लोक गर्दीने आजूबाजूच्या बीचवर जमा झालेले होते. एक वेळ मला असं वाटले की हेच शेवटचे ठिकाण असावे. जिथे आम्हाला पोहोचायचे आहे परंतु नंतर समजले की अजून पुढे सात-आठ किलोमीटर वरती भारताचे शेवटचे टोक, भारताचा शेवटचा भूभाग आहे आणि मग आम्ही तिथल्या दीपस्तंभाला ओलांडून पुढे निघालो.
दोन्ही बाजूंना तिथल्या स्थानिकांच्या होड्या काही नांगर टाकून थांबलेले होत्या, तर काहीवर तिथले दर्यावर्दी सामानाची चढ-उतार करत होते जस-जसे आम्ही पुढे जात होतो समुद्र अजून रस्त्याच्या जवळ येत होता आणि शेवटच्या एक दोन किलोमीटर मध्ये तर फक्त रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी टाकून रस्त्याला संरक्षक भिंती सारखा आधार दिलेल्या भिंतीपर्यंत दोन्ही बाजूंनी पाणी होते आणि ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या टोकाला पोहोचतात तिथे एक स्तंभ आणि त्या स्तंभाभोवती गोलाकार बांधकाम आहे ते भारताचे शेवटचे टोक होय. तिथून पुढे केवळ ३० ते ३५ किलोमीटर वरती श्रीलंकेचा तट आहे याच भूभागाला श्रीरामाचा सेतू म्हणून ओळखले जाते बऱ्याच दूरपर्यंत डांबरी रस्ता आहे परंतु तिथून पुढे छोटे छोटे भूभाग आपल्याला दिसतात परंतु तिथे जाण्यासाठी रोड नाही काही बोटी तिथे थांबलेल्या मात्र दिसल्या.
याच भारताच्या शेवटच्या टोकाला दोन समुद्र हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर यांचा स्पष्ट मिलाप आपल्याला तिथे पाहायला मिळतो दोन्ही पाण्या मधला फरक ही तिथे जाणवत होता खूप गर्दी होती तरीही आम्ही तिथे काही वेळ घालवून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली
आजच्या दिवसात ठराविक अंतर कापण्याचे आमच्यावर बंधन नव्हते कारण आजचा दिवस रामेश्वरम साठी रिझर्व असल्याने आमच्यावर ठराविक अंतर कापण्याचे कुठलेही दडपण नव्हते, तरीही राहिलेल्या तीनशे किलोमीटर मधले काही अंतर कमी करावे या हेतूने आम्ही तिथून परत फिरलो तरीही आम्ही घाई न करता धनुषकोडीच्या बीचवर काही वेळ घालवला तिथे आम्ही धमाल केली लुंगी घालून लुंगी डांस ही केला आणि मग पोटात कावळे ओरडायला लागल्यावर परतीचा प्रवास सुरू केला.
कधी वाऱ्याची साथ, तर कधी वाऱ्याचा विरोध यावर मात करत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला अर्थात येताना धनुषकोडी कधी येणार कधी येणार? म्हणून जो प्रवास दूरचा वाटत होता आता तो प्रवास जवळचा वाटू लागला होता. आज दिवसभर ढगांचा खेळ सुरु होता परतीचा प्रवास सुरु केल्यापासून समुद्राच्या पाण्यातून ढगांनी अचानक उसळी घेऊन आमच्या उजव्या बाजूला गर्दी करू लागले होते. ते काळे ढग आता हळू-हळू आमच्या माथ्यावर येऊ लागले आणि ते ढग पावसाच्या रूपाने खाली उतरत आहे हे जाणून आम्ही आमच्या सायकली पळवल्या परंतू तरीही काही गार थेंबानी आम्हाला अभिषेक घातलाच. आम्ही अंगावर ते गार थेंब झेलत त्या गरम वातावरणात थोडे थंड होऊन पुढे निघालो.
थोड्याच वेळात आम्ही रामेश्वरम मध्ये पुन्हा परतलो आता इथेच दुपारचे जेवण घेऊ आणि मग परतीचा प्रवास करू असा विचार करून आम्ही दुपारचे जेवण तिथेच घेतले आणि मग आम्ही राहिलो त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही आमचे सामान सायकल वर लादले आणि आमचा खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास सुरू झाला.
प्रवासातला महत्त्वाचा एक टप्पा पार पडला याचे मनाला खूप समाधान होते. आता राहिलेले अंतर आपण सहज पार करू, इथपर्यंत येताना आम्ही अगणित कष्ट उपसले होते. कितीतरी वेदना सहन करत सायकल पुढे हाकत राहिलो होतो. आमचे स्वत:चे शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळन्यासोबत सायकलची काळजी घेण्याची तारेवरची कसरत आम्ही केली होती आणी या सर्व समतोल नियोजानाचा परिपाक म्हणून आम्ही इथपर्यंत सुखरूप पोचलो होतो आणि आता पुढील टप्प्यातील प्रवास आज जेवढा होईल तेवढा कमी करून आम्ही पुढे मुक्काम करणार होतो. दुपारचे साडेतीन वाजून गेले होते आणि पुढील काही तास सायकलिंग करून मग पुढे येणाऱ्या रामनाथपुरम या शहरात मुक्काम करण्याची योजना आम्ही आखली आणि त्या दृष्टीने परतीचा प्रवास सुरू केला.
आता समुद्रावरून येणारे वारे आम्हाला परत जाताना मदत करतील अशी आशा होती तेव्हा लगबिगीने आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. येताना जो रस्ता खूप दूर वाटत होता तो आता पटापट उरकत होता. जो पांबन पूल ओलांडून आम्ही रामेश्वरम मध्ये प्रवेश केला होता आणि ज्याने मोठ्या मानाने आमचे जोरात स्वागत केले होते त्याच अविर्भावात जणू तो आम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत होता.
ब्रिज ओलांडताना दूरपर्यंत पसरलेल्या सागराचा निरोप घेऊन आम्ही कन्याकुमारीच्या ओढीने परतीच्या दिशेला निघालो आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला वाऱ्याने साथ दिली आणि आम्ही ज्या चाळीस किलोमीटरच्या प्रवासासाठी काल झगडत होतो तोच प्रवास आज सुखकारक होत होता पाठीमागच्या वाऱ्यामुळे आम्ही वेगाने पुढे जात होतो.
काल ज्याने आम्हाला “आतले” होण्यासाठी जोराचा विरोध केला होता तोच आज आम्ही आता आम्ही आतले झाल्याने आमच्यासाठी जणू जागा बनवत होता.
एव्हाना दिवस मावळायला आला होता, सूर्य पाम च्या मोठ्या मोठ्या झाडामागे गेल्याने लवकर सूर्यास्त झाल्यासारखे वाटत होते.
रामनाथपुरम शिवाय थांबायला हॉटेल/लॉज मिळणार नसल्याने आम्हाला अंधार पडल्यावर ही आज सायकल चालवणे भाग होते. सव्वा सहा ते साडेसहाला अंधार वाढत असला तरी क्षितिज अजून लालसर होते तेंव्हा आम्ही एके ठिकाणी दूध पिऊन थोडा आराम केला. नाही म्हणले तरी आज दिवसभर बरीच पायपीट झाली होती. एक ध्येय गाठल्याने आम्ही पुढील अंतर सहज घेत होतो एकंदर आतापर्यंत आम्ही जे कडक नियम सायकल आणि शरीराबाबत पाळत होतो ते कुठेतरी आम्ही सैल केले होते याचा अर्थ आम्ही आमच्या अंतिम ध्येयापासून परावृत्त झालो होतो असे नाही पण आमच्यात होईल.. जाऊ .. पोचू .. असा मोघामपणा आला होता हे मात्र नक्की आणि याचा फटका आम्हाला पुढील प्रवासात बसणार होता.
दूध आणि थोडे फराळ करून झाल्यावर आम्ही सायकलचे लाईट सुरू केले रात्री च्या अंधारात आम्ही इतर वाहनांना स्पष्ट दिसू यासाठी सर्व साधने परिधान करून झाल्यावर आम्ही रामनाथपुरम कडे कूच केले.
रस्ता छोटा असल्याने आम्ही एकामागे एक असे करत एकदम सावधपाने रामनाथपुरम पर्यन्त प्रवास केला शहरात प्रवेश करण्याआधी आम्ही हॉटेल / लॉज सर्च केला परंतू कुणीही आम्हाला गरम पानी देण्यास तयार नव्हते.
शेवटी शहरात मध्यभागी जाऊन आम्हाला गरम पानी नाही पण सायकल लावायला चांगली जागा मिळाल्याने आम्ही अगदी जाळ्या लागलेल्या रूम मध्ये राहिलो.
तसेही वातावरण गरम असल्याने थंड पाण्याने आंघोळ करणे फार अवघड गेले नाही. यथावकाश अंघोळी उरकून आम्ही शेजारच्या हॉटेल मध्ये पनीर भातावर संध्याकाळचे जेवण संपवून आराम करण्यासाठी आलो.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE प्रवासातील आजचा दिवस आम्हाला बरेच काही शिकवून गेला
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[थूथुकुडी ते कन्याकुमारी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४० किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[थिरुमयम ते रामेश्वरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १६५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.