थंडी इतकी होती की अंथरुणातून बाहेर पडायचे फारच जिवावर आले होते. तुम्ही पहिले आवरा, तुम्ही पहिले आवरा मध्ये आम्हाला रूम सोडून बाहेर पडायला साडेपाच वाजून गेले होते. सर्व सोपस्कार करून सायकली सज्ज केल्या आणि आम्ही उज्जैन च्या गल्ली – बोळातून निघालो कि लगेच काही मीटरवर गरम – गरम पोहे, दूध पाहून आम्ही तिथेच नाश्ता करायचे ठरवले तसे रात्री आम्ही कमी जेवण घेतल्याने पहाटे – पहाटेच पोटात कावळे ओरडत होते. आम्ही मस्त गरम – गरम पोहे आणि एक एक ग्लास दूध पिऊन मगच मुख्य रोडकडे कूच केले. प्रवास सुरू करायला सव्वा सहा वाजून गेले होते. कडक्याच्या थंडीत जणू पूर्ण उज्जैन नगरी गोठून गेली होती. गल्लीतील मिणमिणते दिवे असे लुकलुकत होते जणू काही त्यांना हुडहुडी भरली होती. दूरवर या गल्लीला छेद देत गेलेल्या दुसऱ्या आडव्या गल्लीत एखादी ई-रिक्षा निघून जात होती. नकाशा आणि रोडवर कुणी मिळालेच तर त्याला विचारत आम्ही वाट काढत होतो.
पुढे रस्ता मोठा होत गेला, रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेली नगरी धुक्याच्या दुलईत जणू स्वर्ग वाटत होती. मोकळ्या रोडवरुण आम्ही भरभर वाट उरकवत होतो. थोड्याच वेळात आम्ही रेल्वेरूळ ओलांडून मक्सी रोडला लागलो. जसजसे शहर विरळ होते गेले रोड डबल लेन वरुण सिंगल लेन चा झाला. खरे तर सायकल चालवताना थंडी कमी जाणवेल असे गृहीत धरून आम्ही चाललो होतो परंतु आमचा अंदाज शहराबाहेर पडताच खोटा ठरू लागला मग आम्ही एके ठिकाणी थांबून थंडीच्या कपड्यांचा अजून एक थर वाढवून पुढे चालू लागलो.
आता शहर, उपनगर मागे पडले होते आणि वाटेत छोटी – छोटी गावे लागत होती. संपूर्ण परिसर गर्द धुक्यात लुप्त झालेला असे धुके मी या अगोदर अनुभवले नव्हते. एकेरी रस्ता पण कमी वर्दळ त्यामुळे सायकल चालवायची एक वेगळीच मजा येत होती. गाव आले की गावातील मंदिरातील सकाळची भक्तिगीते अगोदर ऐकू येत मग धुक्यातून गाव डोकावत आम्हाला न्याहाळत असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची गोड्या बाभळीची झाडे मला माझ्या गावाची आठवण करून देत होते. समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यावरून अंदाज बांधावा लागत होता की कोणते वाहन येत आहे आणि त्यानुसार सायकल चलवावी लागत होती. त्यामुळे मागील वाहनांना आम्ही व्यवस्थित दिसावे म्हणून आम्ही अधिकचे दिवे सायकल च्या मागे लाऊन सावधगिरीने चाललो होतो. जस जसा अंधार कमी होत होता तस तसे धुक्याची घनता जाणवत होती. दूरपर्यंत पसरलेल्या धुक्याने सर्व परिसर गिळंकृत केलाच होता परंतु समोर उगवलेल्या सूर्यालही या धुक्याने आपल्या कवेत घेतले होते. असे वातावरण किती वेळ राहील माहीत नव्हते. मागून आलेली मोटरसायकल काही क्षणात या धुक्यात गायब होत होती. समोर सूर्य चंद्रासारखा शीतल जाणवत होता जणू पुनवेच्या मध्यरात्रीचा चंद्र त्याचे शुभ्र किरणे धुक्यात सामावून जाऊन त्यांना ढगांसारखे रूप देत होते आणि आम्ही त्या शुभ्र ढगांवरून जणू स्वर्गाची सफर करत होतो. हळू हळू रोड पासून थोड्या अंतरावरील परिसर दिसू लागला. जिथपर्यंत परिसर दिसत होता तिथपर्यंत होती फक्त आणि फक्त गव्हाची शेती. मध्यप्रदेशात आल्यापासून आम्ही गहू आणि मोहरी हे दोनच पिके पाहत होतो. माराठवाड्या सारखी सपाट जमीन जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. इथली भौगोलिक परिस्थिति मला माझ्या परिसराची आठवण करून देत असल्याने मला
नवीन प्रदेशात आलो आहोत असे काही वाटत नव्हते उलट मी गावी आलोय आसच भास होत होता.

प्रकाश वाढत होता रोडवरील बाभळी दवाचे थेंब रोडवर टपकावत होत्या. काही झुडपावर विणलेल्या जाळ्यावर दव पडून त्याच्या थेंबांनी सुंदर वीण विणली गेली होती. आम्ही फोटो काढत त्या परिसराची, वातावरणाची मजा घेत पुढे जात होतो. पुन्हा एकदा आम्ही रेल्वे रूळ ओलांडून मक्सी गावाकडे निघालो. धुक्याची चादर कमी झाली होती दूरपर्यंत परिसर आता मोकळा झाला होता. हिरवागार परिसर डोळ्यांना सुखाऊन जात होता. पुढे रस्ता बंद असल्याने आम्हाला तिथल्या लोकांनी आम्हाला दूसरा रस्ता सुचवला आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो. दहा वाजत आले होते आणि आता सूर्य चांगलाच चमकत होता, चांगले ऊन पडल्यामुळे थंडी कमी झाल्याने आम्ही एके ठिकाणी थंडीचे कपडे कमी केले सायकल साठी ऑइल घेतले आणि पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर आम्ही एके ठिकाणी गरम-गरम कचोरी आणि जिलबी खाल्ली आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही आग्रा महामार्गावर चढलो, विस्तीर्ण महामार्ग परंतु तुलनेने कमी वाहतूक असल्याने तो अधिकच विशाल वाटत होता. मग काय सपाट मोकळ्या महामार्गावरून आम्ही सुसाट निघालो.
महामार्ग आधुनिक आणि विशाल होत होता परंतु बाजूचा परिसर गरीब आणि वर्षानुवर्षे मागे जात होता. उन्हाळ्यात मराठवाड्याच्या बरड परिसरातून जातोय असे अजिबात नव्हते परंतू परिसर हिरवागार असला तरी गावे अजून वीस ते पंचवीस वर्षे मागे वाटत होती अगदी माझ्या बालपणी होती तशी. वाटेत लागणारी छोटी गावे कुतुहलाने आमच्याकडे पहात होती. पाणी पिण्यासाठी थांबल्यावर लोक आस्थेने आमची विचारपूस करत होते. अश्याच एका वळणावर एक स्कूटी आमच्यापुढे येऊन थांबली आणि त्यांनी आम्हाला थांबण्याचा इशारा केला त्यावरील श्री. मुकेश शर्मा हे काही काळ पुण्यात वास्तव्याला असल्याने त्यांनी आमच्या पाठीवरील “पुणे ते आयोध्या” नाव वाचून आम्हाला थांबवलेले होते. ते अगदी भारावून आमच्याशी बोलत होते. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होता. आमची सर्व माहिती घेऊन ते पुढे गेले. आम्ही थोडे अंतर कापले असेल तोच त्यांनी एका हॉटेल जवळून पुन्हा आम्हाला आवाज दिला आणि थांबण्याची विनंती केली. त्यांनी आम्हाला जेवणाचा आग्रह केला परंतु आम्ही तिथे दूध पिऊन त्यांचा निरोप घेतला. पुढे संपूर्ण प्रवासात रोज त्यांनी आम्हाला फोन / मेसेज करून आमची खुशाली विचारली.
पुढे असे अनेक प्रसंग आमच्यासोबत पुढे घडत गेले. सीमेंटच्या रस्त्यावरून आम्ही आमच्या आजच्या मुक्कामच्या ठिकाणाकडे एका लईत जात होतो. एका उतारावर एके ठिकाणी सुयोग सर थांबले होते मी तिथे पोचताच आम्ही महामार्गावर एक कालवड जखमी अवस्थेत मधोमध पडलेली पाहिली. मोठ मोठी वाहने तिच्या जवळून जात होती आम्ही मदतीसाठी काही वाहनांना थांबण्याची विनंती केली परंतु त्या उतारावर कुणीही थांबण्यास तयार नव्हते. आम्ही अंदाज घेऊन त्या जखमी कालवडीला दोघांनी मिळून रोडच्या कडेला घेतले आमच्या सोबतचे पाणी तिला पाजले. कालवडीच्या गळ्यात दोर होता म्हणजे ती मोकाट तर नव्हती आस पास अनेक जनावरे चरत होती त्यामुळे तिचा गुराखी तिला नक्कीच घेऊन जाईल याबाबत खात्री होती तेव्हा आम्ही तिचा निरोप घेऊन पुढे निघालो.
उत्तर प्रदेशात लक्षणीय पशुधन पाळले जात आहे. खूप गाई – गुरे महामार्गाच्या दोन्ही बाजूने चरताना आम्हाला दिवसभर दिसत होते. त्यामुळे त्यांचे अपघात ही इकडे जास्त होतात या बाबत प्रवासाच्या अगोदर आम्ही आमच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमासंदर्भात माहिती घेत असताना समजली होती. आम्ही याबाबत वाटेत भेटणाऱ्या गुराख्यांशी बोललो परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मग आम्ही अंतर उरकण्यावर भर दिला. रस्ता सपाट असल्याने आम्ही सहज सायकलिंग करत पुढे जात होतो. परंतु अधिक सहज होणे म्हणजे पुन्हा ब्यावरा या आमच्या मुक्कामच्या ठिकाणी पोचण्यासाठी रात्र होणे होते. आज मी खूप फ्रेश होतो अगदी माझ्या लाहानपणीच्या गावातून सफर केल्यासारखे नजर जाईल तिथपर्यंत हिरवेगार शेतं बांधावरील बाभळी जणू मला माझ्या बालपणीच्या गोष्टी सांगत होत्या.

आम्ही पुढे जात होतो सकाळी गायब असलेला सूर्य आता आमच्या उजव्या खांद्यावरून पाठीमागे सरकू लागला होता. काही अंतर गेल्यावर एके ठिकाणी मध्यप्रदेश महामार्ग पोलिसांनी तात्पुरता तपासणी नाका उभारला होता. त्यांनी आम्हाला थांबण्याच्या इशारा केला. आम्ही थांबल्यावर त्यांनी आमची विचारपूस केली आमच्या मोहिमेचे कौतुक केले. जेव्हा त्यांना कळले की आम्ही “रस्ते सुरक्षा” अभियान या यात्रेदरम्यान राबवत आहोत हे समजल्यावर त्यांनी आम्हाला तुम्ही तर आमचे काम करत जात आहात त्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन वाटेत कुठेही काही अडचण आल्यास त्यांना संपर्क करण्याची सूचना केली. त्यांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि आमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
इकडच्या छोट्या – छोट्या नद्यांचे देखील पात्र खूप मोठे आहे. आम्ही चार वाजण्याच्या सुमारास काली सिंध नदी ओलांडून ब्यावरा कडे निघालो. वाटेत आम्ही छोटे – छोटे पाणी ब्रेक घेत पुढे जात होतो. सूर्य क्षितिजाकडे झुकू लागला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार असला तरी आता ब्यावरा शहर ही जवळ आले होते.
गेले तीन चार दिवस झाले आम्ही कधीच दिवस मावळायच्या अगोदर मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो नव्हतो. आज तर धुक्याच्या कहर पहायला मिळाला आणि अजुन पुढे हे जास्त होत जाणार आहे असे कळले होते. दिवसभर वातावरण तसे थंडच होते. अंधार पडून गेला होता समोर धुक्यातून चांदोबाने आपले दर्शन दिले होते. थकलेल्या शरीराला आणि सायकललाही विश्रांतीची नितांत गरज होती. बायपास येताच आम्ही शहर ओलांडून मग हॉटेल पाहू तेव्हढेच अंतर कमी होईल असा विचार करून पुढे जायचे ठरले पण मग कळले की आसपास सत्संग असल्याने सर्व हॉटेल्स बुक आहेत. तुम्हाला एखादे छोटे हॉटेल लॉज पहावे लागेल. यावर आम्ही शहर ओलांडुन मग राहण्याची सोय पाहण्यापेक्षा लगेच हॉटेल, लॉज आहे का ते पाहू लागलो.
थोडं पुढे जातो न जातो तोच एकाला विचारले की रूम मिळेल काय? त्यांनी होकार भरला आणि आम्ही जास्त चौकशी न करता आम्हाला फक्त आत्ता गरम पाणी हवे आहे असे सांगितले त्याने आम्हाला तुम्हाला हवे तेव्हढे गरम पाणी मिळेल याची ग्वाही दिली आम्ही लगेच त्या लॉज मधिल रूम बुक करून टाकली.
सायकल वरील समान उतरवून सायकली तळ घरात लाऊन आम्ही आमचे सामान रूम मध्ये घेऊन गेलो पुढे यथावकाश मनसोक्त कडक पाण्याने अंघोळ करून बाहेर आलो. नविन बांधकाम होते, लॉज नुकताच सुरू केलेला असावा. अगदी रोडच्या कडेलाच राहायची सोय झाल्याने उद्या सकाळी लगेच वाटेला लगता येणार होते. त्यांच्याकडे जेवायची सोय नव्हती परंतु एक दोन घरे सोडली की हॉटेल होते. आम्हाला फार काही भूक नव्हती. तेंव्हा असेच आम्ही एका हॉटेल मध्ये जाऊन पराठे खाऊन आलो.
अंघोळ केल्यापासून मला खूप थंडी वाजत होती. आम्ही मुक्कामी असलेल्या लॉजला अगदी लगत एक कच्चे अगदी झोपडीवजा घर होते त्यात राहणारे वृध्द जोडपे बाहेर शेकोटी पेटवून बसले होते. मला काय तेव्हढेच पाहिजे होते मी लगेच दोघात तिसरा होऊन गेलो. सुरुवातीला जुजबी विचारपूस झाली आणि मग चांगला गप्पांचा फड रंगला. कन्याकुमारी प्रवासात स्थानिक लोकांशी मनमुराद संवाद साधता आला नव्हता आणि जेंव्हा संवाद साधायला गेलो तेंव्हा भाषेचा अडसर येत होता या प्रवासात मात्र तसे नव्हते बतोमे बात निकली और बहुत दूर तक चली गई।
दोघेही साठी ओलांडलेले असावेत, ते बाबा खुर्चीवर बसलेले तर ती आजीबाई खाली बसून शेकोटीची ऊब घेत घेत होती. झाडाच्या बुंध्याच्या वलयांनी त्याचे वय सांगावे तसे दोघांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या दीर्घ अनुभवाच्या व असे अनेक हिवाळे (हो हिवाळेच म्हणावे लागेल असा भयंकर हिवाळा होता तिथला) पहिले आहेत हे सांगत होत्या. गोऱ्यागोमट्या आजीबाईचां चेहरा शेकोटीच्या हाळेवर अजूनच लकलकता दिसत होता. डोळ्यात जाणा-या धुराला हाताने दूर सारत त्यांनी मला विचारले “कितना पैसा लिया?” मी म्हणालो “800 सौ रुपए” त्यावर त्या म्हणाल्या “तो सही लिया” यावर मी आनंदून मनाशीच म्हणालो की “अरे वा आपल्या ठीकठाक भावात रूम मिळाली आहे तर”.
माझी नजर मी त्यांच्या घरभर दूरपर्यंत फेरली, अगदीं लॉज ची भिंत वापरून एक जुनाट पत्र्याची/ कुडाची अशी एक लांब निमुळती खोली होती समोर गवताचे गाठोडे ठेवलेले होते बाजूला काही खुंटयांना दोर (चऱ्हाट) दोर होते, बाजूला शेळ्यांच्या लेंड्या होत्या म्हणजे चार दोन शेळ्या असाव्यात, दरवाज्याच्या नावाखाली आडव्या तिडव्या पत्र्याच्या पट्ट्या कुंपणाच्या तारेने तर कुठे दोरीने बांधून बळेच उभा केलेला अडथळा होता. मी आत पाहत असतानाच उद्गारलो “आप और यह लॉजवाला आप दोनों अच्छे पड़ोसी हो शायद दोनों इतने नजदीक रह रहे हो की दोनों एक ही दीवार इस्तमाल कर रहे हो” यावर ते बाबा मोठ्याने मोकळे हसून म्हणाले “यह लाज भी हमरा ही है, जिससे तुमने बात की वह हमारा बेटा हैं” आजीबाई ने ही मोकळे हसून याला दुजेरा दिला.
मघाशी ८०० दिले म्हणल्यावर त्या नेमके कुणाच्या बाजूने “तो सही लिया” म्हणाल्या होत्या या बाबत मला आता शंका यायला लागली होती. मग दोघांनीही आमची व आमच्या सायकल यात्रेची पूर्ण माहिती घेतली. आणि मग त्या आजीबाई मला म्हणाल्या “बेटा तुम सायकल से यात्रा कर रहे हो लेकिन, तुम्हारे घरवाले हर दिन हर पल आपके चिंता मे रहते होंगे” मी ही मग त्यांना माताजी म्हणून संबोधू लागलो, मी त्यांना सांगितले की आम्ही दोघेही आप आपल्या घरी वेळोवेळी आम्ही कुठे आहोत याची कल्पना देत असतो व ठराविक काळाने घरी फोन करत आमची खुशाली कळवत असतो.
मला खासकरून जाणून घ्यायचे होते ते शेतीबद्दल, गवताच्या गाठोड्याकडे पाहत मी म्हणालो “आपको खेती है शायद” दोघांनीही एक सुरात सांगतिले की त्यांना ४० बिघा जमीन आहे. पुढे मी ती त्याच्याकडून एकरात करून घेतली तेंव्हा समजले की त्यांना २५ एकरांच्या आसपास जमीन आहे. पूर्वी पानी नव्हते परंतु अलीकडे पाण्याची सोय झाल्याने गहू व मोहरी, धने यासारखी पिके ते आता घेऊ लागले आहेत. व आता ते शेती करून घेतात.
मग बऱ्याच वेळ गप्पा रंगल्या, आजीबाई स्वतःबद्दल भरभरून बोलू लागल्या ईश्वर ने सब अच्छा किया. दोन मुली, दोन मुले, नातवंडांनी भरलेली घरे आहेत. दोन्ही मुली त्यांच्या संसरात एकदम सुखी आहेत त्याचे – त्यांचे गाडी, बंगले आहेत. दोन्ही मुले ही स्थिर स्थावर झाले आहेत दोघांकडे गाड्या, आणि ब्यावरा शहरात घरे आहेत. एकाने इथे लॉज चा व्यवसाय सुरू केला आहे. सांगताना मी त्या मताजीचे निरीक्षण करत होतो. खूप कष्टाने शेतकऱ्याने शेती करावी आणि शेवटी एकदम बहरलेल्या शेतीबद्दल इतरांना किती सांगू अन किती नाही असे व्हावे तसे त्यांचे झाले होते. प्रत्येक गोष्ट सांगताना त्यांचा अभिमान उचंबळून येत होता. बाजूच्या खुर्चीवरून ते बाबा ही स्मितहास्य करत आपल्या सहचरणीला साथ देत होते.
मग त्यांनी एकाएकी मला विचारले की मला किती मुलेबाळे आहेत मी त्यांना सांगितले की मला दोन मुली आहेत. त्यांनी आश्चर्याने मला विचारले “बेटा नहीं तुम्हें ?” मी म्हणालो “नही , तो क्या हुवा मताजी?” त्यावर त्या म्हणाल्या “ऐसे कैसे बेटा तो होना चाहिए” मला त्यांच्या या विचारांचे नवल वाटले नाही माझ्या गावच्या भौगोलिक व इतर बाबतीत कमालीची समानता असलेल्या मध्य प्रदेशातील या भागात वैचारिक समानता आढल्यास आश्चर्य ते कसले? मी म्हणालो “अब लड़का लड़की ऐसा कुछ नहीं रहा दोनों एक जैसे ही हैं ” त्यावर त्या म्हणाल्या “एक जैसे कैसे हुए ? बेटा बेटा हैं ओर बेटी बेटी” यावर मी म्हणालो “आप पुराणे खायलो के लोगो को ऐसा लगता हैं वास्तव मे ऐसा कुछ नहीं, हम हम है और संतान संतान बस” पन त्या काही ऐकायला तयार नव्हत्या आणि त्या कसे होणार याचे अश्या प्रश्नार्थक आशयाने मला पाहू लागल्या.
मी दीर्घ सुस्कारा सोडत म्हणालो “देखिए माताजी, हमने सारा जीवन अपने संतान के लिए लगाया, उन्हे संपन्न बनाया, उन्होंने महल बनाया, बड़ी गाड़ी ली, बड़ी अभिमान की बात हैं लेकिन उनके महल और गाड़ी का हिस्सा हम न हुए तो उसका क्या फायदा? आपके पास तो माँ का हृदय हैं आप झोपड़ी से बेटे का महल देख सकती हो लेकिन बाप का क्या? उसने आपने जीवन के साथ साथ अपना स्वाभिमान भी छोड़ना है क्या ? हाँ मैं थोड़ा स्वार्थी हो रहा हूँ, लेकिन उस गाड़ी का मुझे क्या फायदा? जिस गाड़ी मे मैं अपने पोते-पोती को गोद मे लेकर न बैठ सकू? उस महल का क्या फायदा जहां मेरे पोते – पोती मेरे साथ ना खेलते हो? और बुढ़ापे की लाठी का क्या वह तो निभानेवाली हो तो कोई भी संतान हो निभाती हैं ना निभाने वाले का क्या?
थोडा वेळ वातावरण स्तब्ध झाले, वाऱ्याच्या झुळुकेने टिपाडाच्या पत्र्यावर शिलगलेल्या निखाऱ्यावरली राख उडून लालबुंद निखारा डोळ्यात उतरावा तसे त्या माताजींचे मिचमीचे डोळे लाल झाले. कुणीतरी ताज्या जखमेवारील खपली खचकन सोलावी आणि त्याचे प्रतीक म्हणून की काय ते बाबा गंभीरपणे शून्यात पाहत त्याच्या पायाने ज्या पत्र्यावर शेकोटी पेटवलेली होती तो पत्रा उचकावत होते.
मनातील वादळ शांत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना त्याची हळूहळू हार होत चालली होती. डबडबलेल्या डोळ्यातून पानी सुरुकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरून एका रेषेत न घरंगळता सुरुकुत्यात आडवे पसरत खोल रुतत खाली येत होते. जणू भेगाळलेल्या जमिनीवरून वळवाच्या पावसाचा ओघळ. त्यांनी पुनः हाताने धूर बाजूला सारवत व स्वतःला सावरत शब्द पुटपुटल्या “भगवान की दया से मेरे बेटे ओर बेटियाँ बहोत अच्छे हैं ” “आप दोनों का पुण्य हैं, आप खुशनशीब हैं” असे म्हणत मी आवरते घेतले.
“सुबह जल्दी निकलना हैं । मैं चलता हूँ” म्हणून मी त्यांचा निरोप घेतला हळू हळू त्यांच्या वाळू व खडी टाकलेल्या खंडबडित अंगणातून त्यांच्या मुलाच्या गुळगुळीत नव्याने बांधलेल्या पायऱ्या चढत रूम मध्ये गेलो.
एव्हाना मला अपराधीपनाची भावणा निर्माण झाली होती. आपण उगीच तसे बोललो त्यांच्या दुःखावरील खपली काढली. इतका वेळ छान गप्पा मारल्या शेवटी त्याचे ऐकून काही प्रतिक्रिया द्यायला नको होती म्हणून मी स्वतःला दोष देऊ लागलो. नाही नाही हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू काय म्हणाला ते त्यांना समजले नाही कारण तू समजतो तशी त्यांची परिस्थिति नाही. त्यांच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे तुला तसे वाटले आहे. तसे काही नाही मनाची समजूत घालता -घालता थकलेले शरीर कधी झोपी गेले ते कळलेही नाही.
