आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते पण आज आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता इतके दिवस ज्याची योजना आम्ही आखली होती त्यातला पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे महाकुंभ च्या पवित्र पर्वात संगमावर स्नान करणे आणि आम्ही आमच्या योजनेनुसार ते पूर्ण केल्याचा आम्हाला खूपच आनंद होता.
आम्ही चार वाजता उठून पटापट आवरायला सुरुवात केली आणि आमच्या मित्रांना आम्ही ते तयार झाले आहेत का? हे विचारत आणि रोड वर येऊन त्याची वाट पाहू लागलो आम्ही संगमाकडे जाण्यासाठी ई रिक्षा करून जाणर होतो पण आमचे मित्र तयार होईपर्यंत काही वेळ गेल्यावर आम्ही एक ई रिक्षा करून संगमाकडे निघालो. थोड्या वेळात वळणा वळणाचे रस्ते ओलांडत आम्ही जिथपर्यंत वाहने नेण्यास परवानगी होती तिथपर्यंत आम्ही गेलो आणि तिथून पुढे मग आम्ही पायी निघालो.

मित्रांसोबत गप्पा मारत आम्ही गर्दीच्या लोंढ्यात सामील झालो गंगामाईच्या मऊ रेतीतून संगमाकडे निघालो. संपूर्ण रेतीमध्ये लोखंडी प्लेट अंथरुण वाहनांना व माणसांनां रेतीतून पुढे जाणे सुकर जात होते. प्रत्येक काही मीटर नंतर स्वयंसेवक व मदतनीस आपल्या कामात व्यस्त होते. त्यांच्या मदतीने आम्ही संगमाकडे जात होतो. ध्वनिक्षेपकावरून सारख्या सूचना दिल्या जात होत्या. सर्व परिसर दुधी प्रकाशाने न्हावून निघाला होता. आम्ही गर्दीतून एक – एक द्वार पार करत पुढे जात होतो. शेवटी संगम द्वारातून आम्ही आत प्रवेश केला. संगमकिनारी तुडुंब गर्दी असली तरी अगदीच स्नान करण्यासाठी जागा नव्हती असे नव्हते परंतु आम्ही प्रत्यक्ष संगमावर होडीने जाण्याचे ठरवले आणि तिथे जाऊन स्नान करण्याचे ठरवले मग आम्ही होडीवाल्याशी भावाबाबत घासाघीस करत शेवटी आम्ही एक नाव ठरवली आणि प्रत्यक्ष संगमस्थळाकडे निघण्यासाठी आमच्या होडीकडे जाण्याची धडपड करू लागलो तिथे शेकडो होड्या गर्दीने हेलकावे खात प्लास्टिक च्या तात्पुरत्या केलेल्या आधाराकडे भाविकांना घेण्यासाठी त्यांची होड लागली होती. आम्ही हेलकावे खाणाऱ्या त्या तात्पुरत्या तरंगत्या आधारवर एकमेकाच्या आधारे उभे राहून आमच्या होडीची वाट पाहू लागलो पण आमची होडी दूर होती आणि तिच्यापुढे दोन – तीन होड्या होत्या तेंव्हा आम्हाला आमच्या नावाड्याने समोरच्या होड्यात चढून त्या पार करून मग त्याच्या होडीत जाण्याच्या सूचना करत तर कधी आम्हला पुढे ढकलत शेवटी त्याने आम्हला त्याच्या होडीत बसवले व तिथून लगेच मागे फिरून आम्हाला घेऊन संगमाकडे निघाला. प्रत्येकाला लाइफ जाकेट सक्तीचे होते आणि आम्ही सर्वांनी ते परिधान केले होते.
आता हळू – हळू माणसांची गर्दी कमी होऊन आम्ही होड्यांच्या गर्दीतून पुढे जात होतो. अगदी समुद्रासारखे अथांग यमुनेचे विशाल पात्र खूपच मनोहारी वाटत होते. दोन्ही तीरावर तुडुंब गर्दीच्या मागे अनेक दिव्यांनी उजाळलेले तट यमुनेच्या पाण्यात प्रतिबिंबित होते होते. देशी – विदेशी पक्षी थव्याने पाण्याच्या समांतर उडत उजळत चाललेल्या क्षितीजाकडे झेपत होते. यमुना एकदम शांत होती जणू गंगेशी भेटीच्या अनामिक ओढीच्या पूर्णत्वाचे अथांग समाधान.

आम्ही फोटो- व्हिडीओ काढत होतो आणि नावाडी आम्हाला वारंवार एका जागेवर गप्प बसायला सांगत होता आम्ही त्याचाशीहि चेष्टा मस्करी करत संगमाकडे जात होतो. तांबडे चांगलेच फुटले होते आणि आम्ही हि संगमाजवळ उभारलेल्या बेटाजवळ येऊन पोचलो होतो. जशी झुंबड होडीत चढण्यासाठी होती तशीच इथे उतरून अंघोळीसाठी हि एकाच झुंबड उडालेली होती. आम्ही पुन्हा वाट काढत कसेबसे अंघोळीच्या ठिकाणी पोचलो. तिथेही प्रतीव्यक्ति काही शुल्क होते ते भरून आम्ही गटागटाने आमचे स्नान करू असे ठरवले. पानी फार थंड असेल तर लवकर बाहेर येऊ असे ठरवले होते तथापी पानी थंड नव्हते त्यामुळे आम्ही मनसोक्त ढुंबू लागलो.

१७०० ते १८०० किमी सायकल चालवून जेंव्हा तुम्ही या महान महाकुंभ पर्वात या त्रिवेणी संगमावर स्नान करता तेव्हा ते फक्त स्नान राहत नाही. ते फक्त शरीर पाण्यात बुडून वर निघत नाही तर तो न्यूनगंड, भय या पाण्यात सोडून नवा उदय असतो आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्वाचा जिथे धैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय यांचा सुरेख संगम असतो.
इथे स्नान केल्याने पाप धुतले जात असेल नसेल मला माहीत नाही परंतु माणसांतील पापी वृत्ती नक्कीच या भक्तिमय वातावरणात आल्याने कमी होत असावी. आमच्या अंघोळी होईपर्यंत सूर्यदेव समोर पाण्यावर तरंगू लागले होते. आज वातावरण एकदम स्वच्छ होते कसलेही धुके नसल्याने कित्येक दिवसांनी आम्ही उगावता सूर्य पाहत होतो.
होडीवाला सारखा आम्हाला आवरा – आवरा करत होता पण आम्ही तो क्षण पुरेपूर अनुभवत होतो फोटो व्हिडिओ सर्व झाल्यावर आम्ही आवरून होडीत पुन्हा येऊन बसलो की लगेच नावाड्याने होडी तिथून हलवली पुन्हा गर्दीतून वाट काढत तो आम्हाला घेऊन निघाला होता. होडीत बसण्याचे व सोडण्याचे ठिकाण वेगवेगळे असल्याने आम्ही आखून दिलेल्या मार्गाने पुढे जात होतो. आता सूर्यबिंब सांगमवावर परावर्तित होऊन दूरवरुन पसरत आमच्या होडीपर्यंत दिसत होते जणू सूर्यदेवही सांगमावर स्नान करत आहेत. पाहुणे पक्षी आमच्या जवळून उडत होते त्यांना दिलेल्या खाऊवार ते तुटून पडत होते.
दोन्ही तीरावर दूरपर्यंत भगवे ध्वज डौलाने फडकत होते वेगवेगळ्या आखाड्यांचे वेगवेगळे तंबू दूरपर्यंत दिसत होते. आम्ही हळू हळू आखून दिलेल्या मार्गाने किला घाट संगम कडे जात होतो. दूरपर्यंत शांत पाण्यावर डोलणाऱ्या नावा मोठ्या संखेने सांगमाजवळ गोळा झालेल्या होत्या. दुरवरून त्या मधमाश्याच्या पोळ्या सारखे वाटत होत्या. आम्ही थोड्याच वेळात अकबर किल्ल्याच्या बाजूला असलेल्या घाटावर उतरलो. होडीवाल्याला त्याचे पैसे देऊन आम्ही मोकळ्या जागेत आलो. गर्दी खूप होती तरीही तिथली व्यवस्था व जागा यांचे योग्य नियोजन असल्याने सर्व काही सुरळीत होत होते. खरे तर मी गोदाकाठचा असल्याने आणि पैठण मधील घाटांची आणि पाण्याची अवस्था यांचा अनुभव असल्याने मी पाणी खराब असेल आणि अश्या परिस्थिती फक्त पाय धुवून परत यायची माझी योजना इथल्या नियोजन आणि सुव्यवस्थेने पार धुळीस मिळाली असल्याने मी मनसोक्त संगमावर पाण्यात डुंबत होतो.
आम्ही सर्व मित्रांनी या घाटावर सकाळचा नाश्ता मित्रांनी घरून आणलेल्या चविष्ट खाऊ खाऊन उरकावला जसा जसा सूर्यदेव वर येत होता आम्हाला वाराणशी कडे जाण्याची घाई झाली होती. बाकी मित्राचा आज पूर्ण आखाडे पाहण्याचा बेत होता पण आम्हाला आता ओढ लागली होती ती वाराणशीची तेंव्हा आम्ही तिथून पुन्हा रूमकडे जाण्यासाठी ई रिक्षा मिळतील तिकडे जाण्यासाठी सोबतच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही वाट विचारत पुढे निघालो. जिथे वाहनांना परवानगी आहे तिथपर्यंत आम्ही पायी निघालो. तेथील स्वयंसेवक यांना विचारत आम्ही पुढे निघालो. काही किलोमीटर अंतर चालत गेल्यावर आम्ही एक ई रिक्षा केली आणि रूमकडे निघालो. गल्ल्या – गल्ल्या च्या रोडने ई- रिक्षा जात होती आणि आम्ही आजचे पुढचे नियोजन करत होतो. थोड्याच वेळात आम्ही आमच्या रूमवर पोचलो आणि लवकर आवरून पुढे निघण्याची तयारी करू लागलो. आज आम्हला १०० ते १२० किमी चे अंतर पार करायचे होते आणि रस्ता पूर्ण सपाट किंवा उताराचा असल्याने आम्ही सुसाट जाणार होतो. शिवाय आता आमचा उत्साह वाढलेला होता. उद्याची एक राईड आणि आमचे ध्येय समोर होते.
आम्ही घाई-घाईत आवरून आमच्या रूमसमोरच्या बोळीतून मुख्य रस्त्याला लागलो आणि प्रयागराज च्या छोट्या रोडवरून चौक ओलांडत पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही शास्त्री पुलावर पोचलो आणि तिथून कुंभचे खूपच व्यापक आणि सुंदर दृश्य दिसत होते तेव्हा आम्ही तिथून तसेच कसे जाऊ शकत होतो तेंव्हा आम्ही तिथे थोडा वेळ घालवला कॅमेऱ्यात आणि मनात ते मनमोहक संगमदृश्य भरून घेत आम्ही पुढे निघालो. आम्हाला निघायला सव्वा दहा वाजून गेले होते त्यामुळे आम्ही काही काळ गर्दीच्या रोडवरून सीरियस सायकलिंग करत आम्ही काही किलोमीटर भरभर उरकवत चाललो होतो कारण आम्हाला आज वाराणशी मध्ये पोचुन दर्शन घेऊन काही किलोमीटर आज पार झाले तर उद्यासाठी आम्हाला सोईचे जाणार होते नाहीतर आम्हाला एक दिवसांत २२० किलोमीटर ची राईड करावी लागणार होती.

दोन वाजेपर्यंत आम्ही ५० पेक्षा जास्त अंतर पार केले होते आणि आता भूक लागली असल्याने आम्ही बरौत आणि छिनी च्या दरम्यान असलेल्या रक्षक रेस्टॉरंट अँड हॉटेल मध्ये दुपारचे जेंवण घेतले आमच्या अपेक्षेप्रमाणे अंतर पार केल्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ आराम केला आणि मग पुढे निघालो. आज रोडच्या बाजूला गावा मागून गावे लागत होती सर्ववेळ रोडच्या बाजुळे घरे दुकाने लागत होते त्यामुळे मागील काही दिवसांपासून आम्ही जे शेतांच्या सोबतीने जात होतो ते आज मात्र सतत गजबजेलल्या परिसरातून जात असल्याने आजच्या राईडला एक वेगळेपण नक्कीच होते.
वाटेत कधी दूध पित तर कधी काही खात आम्ही पुढे जात होतो. रस्ता पूर्ण सपाट आणि उतरचा असल्याने आम्ही अधिक शक्ति खर्च न करता अगदी सहज २१ – २२ किमी प्रतीतास वेगाने जात होतो.
आज दिवसा धुके अजिबात नव्हते आणि ऊनही फार जाणवत नव्हते सायकल चालवण्यासाठी एकदम आदर्श वातावरण आणि रोड असल्याने आम्ही पाच वाजण्याच्या सुमारास वाराणशी जवळ पोचलो होतो. तिथे आम्ही पुढील योजना आखली की आपण अश्या ठिकाणी थांबू की जिथून पुढे आपल्याला अयोध्येला जाणे सोपे होईल. थोड्याच वेळात आम्ही मुख्य रोड सोडून शहरात आत गेलो आणि अलीकडेच रूम शोधू लागलो म्हणजे आम्हाला उद्या लवकर बाहेर पडता येईल. परंतु आम्हाला रूम काही मिळेना आणि आम्हाला अजून शहरात जावे लागले बराच वेळ फिरूनही आम्हाला रूम मिळेना शेवटी बराच वेळ फिरून एके ठिकाणी आम्हाला रूम मिळाली. लवकर पोचुनही आम्हाला रूम शोधण्यासाठी बराच वेळ गेल्याने आमचे वेळेचे नियोजन फसले जात होते. सायकलवरून सामान उतरवून आंघोळी उरकून तयार होईपर्यंत बराच वेळ गेला होता. आम्हाला दर्शनासाठी निघेल आठ वाजले होते इथेही ई-रिक्षा मिळायला आम्हाला वेळ लागला नंतर समजले की थोडे पुढे गेल्यावर आम्हाला रिक्षा मिळेल. आम्ही पुढे गेल्यावर आम्ही एक रिक्षा करून काशी विश्वनाथ दर्शनासाठी निघालो रिक्षावाल्याने आम्हला वाराणशीला गल्ल्यांचे शहर का म्हणतात याचे दर्शन घडवत अरुंद गल्ल्यातून रिक्षा पळवत आम्हाला जिथपर्यंत वाहनांना परवानगी आहे तिथे सोडले तिथून पुढे आम्ही गर्दीच्या लोंढ्यात पुढे जाऊन मंदिराजवळ पोचलो परंतु दर्शनासाठी खूप मोठी रांग होती शिवाय दर्शनवेळ हि संपत आली होती. आम्ही प्रोटोकॉल ऑफिस शोधू लागलो तेंव्हा तेथील महोदयांनी आम्हाला सांगितले कि आता वेळ संपली आहे तुम्ही उद्या पहाटे या तुम्हाला प्रोटोकॉल मध्ये दर्शन करता येईल. आत्ता पटकन रांगेत लागा नाहीतर ११ वाजायच्या आत पुन्हा दर्शन होणार नाही. तेंव्हा आम्हला क्षणभर वाटले कि इतके दूर येऊनही आम्ही दर्शनाला मुकणार आहोत. आम्ही त्यांना सांगितले कि उद्या पहाटे आम्हाला आयोध्येला निघायचे आहे आणी उद्या आम्हाला २२० किमी पेक्षा जास्त अंतर सायकलने पार करायचे आहे. हे ऐकताच त्यांनी आश्चर्याने विचारले “क्या आप लोग सायकल से यहाँतक आए हो” आम्ही हो म्हणाल्यावर त्यांनी आमची अधिक चौकशी केली आमचा पूर्ण प्रवास समजून घेतल्यावर ते अचानक म्हणाले “अगर आप लोगों को बाबा दर्शन नहीं देंगे ये कैसे हो सकता है। चलो मेरे साथ “ पुढे त्या महंतांनी आमची पूर्ण मदत केली ते आम्हाला घेऊन सर्व सुरक्षा अडथळ्यातून पार करून आम्हाला पुढे घेऊन जात होते तेव्हा तेथील सुरक्षेतील तसेच व्यवस्थापन मधील लोक त्यांना नमस्कार करून त्यांच्याशी बोलत होते त्यावरून आम्हाला अंदाज येत होते की हे या मंदिरातील एक महंत आहेत. ते आम्हाला घेऊन थेट गाभाऱ्यापर्यंत गेले आम्हाला अगदी शांतपणे दर्शन घ्या म्हणून सांगितले आम्ही धन्य झाल्याच्या भावनेतून काशी विश्वेस्वराला आमची यात्रा सफल करण्याबाबत साकडे घातले आणि पुन्हा त्या महंताकडे पोचलो पुढे त्यांनी आम्हाला मंदिर परिसर दाखवत तिथल्या सर्व साधू संत, महंत यांना ते आम्ही पुणे ते अयोध्या सायकलयात्रा करत आहोत हे सांगून त्यांचे हि आशीर्वाद आम्हाला प्राप्त करून दिले. यथावकाश त्यांनी आम्हाला पुन्हा मंदिरपरिसरात आणून सोडले आम्ही त्यांचे मनापासून आभार मानले त्यांनीहि आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. आम्ही तर धन्य धन्य झालो होतो. मागच्या काही वेळात आमच्यासोबत जे घडले होते त्याने आम्ही
भावूक झालो होतो. आम्ही त्यांचे आभार मानून दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.
गेले काही दिवस आम्ही वाराणशीला येण्यासाठी केलेली धडपड, नियोजन याचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते त्यामुळे आम्ही जाम खुश होतो वाटेत आम्ही वेळोवेळी खात आल्याने आम्हाला जोराची भूक नव्हती आणि उद्या पहाटे लवकर निघायचे असल्याने आज आम्ही रात्री पोटभर जेवण घेणार नव्हतो त्यामुळे आम्ही इथले प्रसिद्ध पदार्थ खाऊन रूमवर जायचे ठरवले, मग आम्ही एक एक गल्ली ओलांडत तिथले प्रसिद्ध लीट्टी चोखा, चाट, कचोरी मलई मिठाई खाऊन शेवटी खाईके पान बनारस वाले म्हणत बनारसी पान खाऊन थोडे थोडे म्हणता भरपूर खाऊन परत रूमवर पोचण्यासाठी रिक्षा शोधू लागलो थोडा वेळ प्रयत्न केल्यावर आम्हाला एक रिक्षा मिळाली आणि आम्ही थोड्या वेळात रूमवर पोचलो. सर्व विजेवर चालणारे साधने चार्जिंगसाठी लाऊन आम्ही झोपी गेलो.
आज आम्ही खूप समाधानी होतो कारण काही दिवसांपूर्वी वेळापत्रकानुसार काही किलोमीटर मागे पडल्याने आम्ही वाराणसी वगळले होते पण पुन्हा आम्ही संधी मिळताच जास्तीचे अंतर पार करून आणि चित्रकूट वगळून वाराणशी ला आलो आणि इथेची कुठलीही आशा नसताना जणू विश्वनाथांनी स्वयंम महंतयांच्या रुपात येऊन आम्हाला दर्शन घडवले.
