चाकांवरचा कुंभ-दिवस सहावा-ब्यावरा ते लुकवासा (१६० किमी): Day 6: Biaora to Lukwasa Ride

ज्जैन पेक्षा ही जास्त थंडी ब्यावरा मध्ये जाणवत होती त्यामुळे आजही आम्हाला उठायला आणि आवरायला जो व्हायचा तो उशीर झालाच. गोदामातून सायकली काढून प्रवासासाठी तयार करेपर्यंत सात वाजत आले होते. सात वाजले तरीही वातावरण पहाटेसारखेच होते. धुके आणि अंधार मिळून अजूनही पहाटेचे पाच वाजल्यासारखे वाटत होते. काल खूपच सहज प्रवास झाल्याने आम्ही आज निघायला उशीर केला होता. बायपास रोड काही मीटर ही पार केला असेल नसेल तोच डाव्या बाजूला हॉटेल दिसत होते काल रात्रीच्या जेवणात पराठे खाल्ले होते पूर्ण जेवण घेतले नव्हते त्यामुळे भूक लागली होतीच तेव्हा इथे सकाळी गरमा गरम दूध पिऊन आम्ही पुढे निघालो. धुक्याने व्यापलेल्या रोडवर आम्ही तोंडावर थंड वारे झेलत पुढे जात होतो. काल दहा – अकरा नंतर सूर्यदर्शन व्यवस्थित होऊ लागले होते. तशी धुक्याची घनता कालपेक्षा जरा कमी होती किंवा आम्ही काल पहिल्यांदा असे धुके अनुभवले होते म्हणून कदाचित ती घनता जास्त वाटत होती आणि आज धुके अपेक्षित असल्याने हेच धुके आज कमी वाटत असावे.

दूरपर्यंत विस्तीर्ण हायवेच्या कडेला असलेले उंच दिवे धुक्याला बाजूला सारून रोडवर जणू आम्हाला डोळे विस्फारून पहात होते. सकाळी सकाळी रोड सुस्त होता तुरळक वाहतूक कधी कधी आम्हाला एकटेपणाची भावना करून देत होती. दिवसभराच्या पहिल्या टप्प्यातच जास्तीत जास्त अंतर कापण्याचा आमचा विचार होता. जस जसा सूर्य वर येत होता तस तशी धुक्याची चादर संपूर्ण परीसारवरून हळू हळू दूर होत जात होती आणि पिवळाशार परिसर उजाळून जात होता जो मला अधिक जवळचा वाटत होता.        

दहा वाजत आले होते आणि आम्ही बिनगंज जवळ पोचलो होतो वाटेत आम्हाला श्री १००८  आदिनाथ दिगंबर मंदिर आढळले. आपसूकच आमच्या सायकली तिकडे वळल्या आम्ही त्या शांत व भक्तिमय वातावरणात दर्शन घेऊन आम्ही काही काळ तिथे घालवला आणि काही मीटरचे अंतर पार करून पुन्हा हायवेवर चढलो. आता सूर्य चांगलाच वर आला होता आणि प्रकाशमय झाल्याने आम्ही तिथे आमचे थंडीचे कपडे कमी केले आणि पुढे
निघालो.   

उज्जैन सोडल्यापासूनच मध्यप्रदेश माझ्या मनात भरला होता, कारण होते तिथली भौगोलिक, सामाजिक, परिस्थिति व गावांची रचना अगदी माझ्या बालपणीच्या गावांसारखीच होती. मातीची घरे, कुडाच्या भिंती, खळ्याला (जनावरे बंधायच्या, त्यांची वैरण ठेवायच्या जागेला खळे म्हणत जे राहण्याच्या घरापासून वेगळे असे. साधारणपणे गावकुसाबाहेर खळवाडी असे त्या परिसरात गावातील सर्वांची खळे असत) अजूनही गोड्या बाभळीच्या काटेरी कुपाटीने वेढलेले. त्या खळ्यात भरपूर पशुधन, घरासमोर सरपणाच्या मोळ्या, आणि जणू शेणाने सारलेल्या अंगणात खेळणारे माझे बालपण.

बराचवेळ मी रस्त्याच्या समांतर असणाऱ्या कुपाटी सोबत हितगुज करत सायकल चालवत होतो.  खरे तर मला झोपाटा (बोरी किंवा बाभळीच्या फांद्या यांनी बनवलेले गेट जे खळ्यात ये जा करणाऱ्या प्रवेशद्वारावर लावलेले असायचे) असलेली कुपाट कॅमेऱ्यात कैद करायची होती परंतु मला रोडवर कुठे मिळेना.

पुढे अचानक एका ठिकाणी कुपाटीतले प्रवेशद्वार दिसले अन मी त्यावरील काटेरी डहाळी वरून अलगद कधी एक वेगळ्या भावविश्वात पोचलो ते कळलेही नाही.

तसे आमचे बालपणच काय पन आमचे कुमारपण देखील या काट्या कुपाट्यांनी समृद्ध केलेले आहे.  लाहानपणीच्या आमच्या गोष्टीतली म्हातारी देखील कुपाटी-कुपाटीनेच जात होती. आमचे बालपण तसे कधी ऊसाच्या काटेरी पाचटाला, कधी उभ्या धसकटाला (पीक कापणीनंतर जमिनीत राहिलेले पिकाचे बुंधे) तर कधी नांगरटीत ढेकळाला आजीने शिवलेल्या गोधडीवर पाय मारत -मारत गेले होते. यातून मला आमच्या अभावाच्या जगण्याची व्यथा नाही तर आम्ही आईच्या कुशी बरोबर धरणीमाई च्या कुशीतही खेळलो आहोत हे विदित करण्याचा आहे. याच बोरी – बाभळींच्या फांद्याला बांधलेल्या आजीच्या जुन्या नाटीच्या झोळीत कधी भजन, कधी गौळणी तर कधी भलरी ऐकत आम्ही झोपा काढलेल्या. चालायला लागलो तोच मुळी घोटाभर फुफाट्यात रुतलेले काटे, कधी चुकवत तर कधी रुतत.

पुढे अनवाणी पायांनी पहिली मैत्री केली तीच मुळी या काटयांशी, खेळाच्या मस्तीत काही काटे रुतत वेदणेची शिकवण देऊन निघून जात. काही मात्र पायात रुतून बसून चांगलाच धडा शिकवून जात. मग त्यांची तक्रार आईकडे करावी लागे. वरुन आईचा मार आणि सुईचे टोकरने यायचे, कधी कधी नाचकांडाणे (पायातील काटे काढायचे साधन) रूतलेला काटा उपसून काढावा लागे. खावा लागणारा मार आणि सुईच्या टोकरन्याच्या भीतीने कित्येक वेळा रुतलेल्या काट्याला आम्ही पायात त्याचा तसाच सांभाळ केला होता.  मग आम्हाला पायातील काटा नाही काढला तर पायात बाभळ उगेल याची भीती घातली जायची.

स्वतः च रुतलेले काटे काढायच्या योग्यतेचे झाल्यावर आम्ही रुतलेल्या काट्याची परीक्षा घ्यायचो त्याला आमच्या भुवयांच्या केसाच्या परीक्षेवर तो चोर आहे की पोलिस ठरवायचो (पायात खुडलेला (रूतलेला) काट पायतून काढल्यावर त्याला हातावर घेऊन भुवईचा एक केस काढून त्या केसला तो काटा चिकटला तर तो पोलिस नाहीतर चोर असे खेळायचो) 

सुट्टीच्या दिवशी शिवारातील गोड बोरी शोधून तिचे चार बोर मिळवायला तिच्या काट्याचे ओरखडे आम्ही हातावर ओरखडून घ्यायचो. गोड ऊसाच्या टिपरासाठी (तुकड्यासाठी) आम्ही ऊसाच्या पानांच्या सूक्ष्म काटयांना कुरवाळे आहे. हेच काटे आमच्या शेताचे कुंपण होते. घरधनी कधीतरी मोरणी (स्त्रियांच्या नाकातील छोटासा दागिना) करतील या आशेवर बसलेल्या मालकिणीच्या नाकात तोच काटा दागिना होता. वयात आलेल्या कोवळ्या पोरींच्या नाकातील व कानातील लालसर बोरीचे काटे आता लवकरच त्या जागी नथणी, झुंबर आणि डोरले हे  दागिने येणार आहेत याची ग्वाही देणारे होते. पावसाळ्यात खूप पाऊस झाला तर शेरडा – करडांचा (शेळ्या व त्यांची करडे) चारा त्याच बोरी – बाभळींच्या काटेरी फांद्या होत्या. सुकल्यानंतर त्याच आमच्या सपरावरील छत होत्या.

पुढे गावात शाळेची सोय नसल्याने दुसऱ्या गावी राहणे आले. बालभारती सोडून कुमारभारती शिकत असताना स्वतःच्या हाताने धुतलेला गणवेश याच काटेरी कुपाटीवर मी वाळत घालत असे, काटे रुतून कपड्याला भोक पडत असे, पण गणवेश वाऱ्याने उडून जाण्यापासून वाचत होता. जणू हेच काटे पायात रुतत होते परंतु वाकडे पाऊल पडण्यापासून वाचवत होते. याच काटयांनी कुमारवयातच जबाबदारीची जाणीव करून दिली होती.

सुट्टीच्या दिवशी खेळण्याऐवजी याच काटयांच्या बनात मी जनावरे वळत असे, यांच्या साथीतच मी पुस्तकातील आणि जीवनातील ही अनेक धडे गिरवले होते. म्हणून कदाचित मला या काट्या – कुपाट्या अधिक जवळच्या वाटत असतील.

असेच एक दिवस ती मला म्हणाली “ये नाऱ्या माझ्या कानात हा काटा घाल रे.. कानांचे भोकं भुजायला नकोत” मी तिच्या पाळूत हळुवार काटा रुतवत असताना तिच्या तिळांनी सजलेल्या चेहऱ्यावरील वेदणेची लकेर न्याहळत तिला विचारले “त्रास होतोय तर .. हा उद्योग कशाला ?” ती म्हणाली “अरे आता सोन्याचे दागिने घालणार आहे मी ” मी म्हणालो म्हणजे? “म्हणजे .. म्हणजे वाघाचे पंजे .. वेडा आहेस तू .. ”  मी “पण..  शाळा?” ती “तूच बस शिकत ….” वेणीला झटका देत उठून ती पाठमोरी चालू लागली.. बोचरा काटा तिच्या पाळूत आणि नात्याची पुरेशी ओळख नसणाऱ्या कोवळ्या हृदयात खोलवर रुतवत..

काटेरी बाभळीच्या पिवळ्याधमक बहराच्या वर्षावात..ती दूर जात होती..  गोंधळलेल्या पिवळ्याशार गालीच्याला तुडवित.. त्या पिवळ्या बहरात तिच्या वेणीची लाल रिबिन अंधुक होत विरून जात होती. भर वैशाखात रणरणत्या दुपारी वावटळी च्या तालावर ज्वारी काढणीला चुलत्याने गायलेली भलरी “राणीच्या बागेमधी नाचतो मोर..” मला ओरडून सांगत होती .. नाचणाऱ्या मोराने .. राजाची स्वप्ने पाहू नयेत.. जबाबदारीच्या काटेरी कुंपणाच्या अलिकडचा वेडा नाऱ्या तिने पाहिला, पन कुपाटी पलीकडचा वेड घेतलेला नाऱ्या तिला कधी ना दिसला ना कळला.


किती वेळ मी या तंद्रीत होतो मला कळलेही नाही. मी भानावर आलो तो एका गुरख्याच्या हाटकण्याने “इठे का करजो?” मी हसून त्याला म्हणालो “फोटो निकाल रहा था” त्याने तोंडातून गुटका थुंकत मोठ्याने हसला जणू तो मला वेडा समजत होता जो काटयांचे फोटो काढत होता. त्याला मी विचारण्याचा प्रयत्न केला की याला काय म्हणतात पण तो हसत राहीला आणि मी खूप मागे राहू नये म्हणून मी ही लवकर सायकल चे पेडल मारणे सुरू केले.

आज मी सायकल सफरीचा खऱ्या अर्थाने आनंद घेत होतो. इथे रोड आधुनिक होता बाकी सर्व माझ्या बालपणातील गावासारखेच होते अगदी अंगठा तुटलेल्या चपले पासून ते शेळीच्या गळ्यातील चिरगुटाच्या दोरखंडापर्यन्त सर्व काही तसेच होते. मनः पटलावारील एक एक चित्र जणू खऱ्यात समोर चितारलेले अगदी बारकाईने.

रोडवरून महागड्या गाड्यात जाणाऱ्यांपेक्षा रोडच्या बाजूला आभावाच्या भणंग जगण्यातही सुख शोधणारे जवळचे वाटत होते. शेजारी गहू खुरपणाऱ्या बायकांच्या बांगड्याचा नाद अपर कष्टाचे गीत गात होता. 

ठरवलेले आजचे मुक्कामाचे ठिकाण अजून बरेच दूर होते. दोन वाजेपर्यंत सायकल चालवून मग दुपारचे जेवण घेण्याचे आम्ही ठरवले. थोड्या – थोड्या वेळाने आम्ही पाणी – दूध घेत पुढे जात होतो.

जस – जसे आमच्या प्रवासाचे अंतर वाढत जात होते तस तसे आश्चर्याचे भाव आणि कौतुकाचे शब्द वाढत जात होते. रोडच्या कडेचे शेतं माणसांनी गजबजलेले होते, दूरवर गव्हाच्या, मोहरीच्या शेतात बळिराजाचे हात राबत होते. बाभळीच्या झाडाखाली घोळक्याने दुपारच्या जेवणासाठी बसलेल्या बायका पाहून मला माझ्या लाहानपणीच्या माझ्या शेतातील बाभळीखाली असेच घोळक्याने आईसोबत चे जेवण आठवत होते. मी माझ्या चुलत्या व इतर बायकांच्या फडक्यावरली बाजरीची भाकर पाहून आईला ती मागायचो, आई मोठ्या अनिच्छेने त्या बायकांकडून माझ्यासाठी बाजरीची भाकर आमच्या ज्वारीच्या भाकरीच्या बदल्यात घेई. त्याने माझे पोट भरत होते पण मन नाही.      

खरे तर आजचा पूर्ण दिवस भावनेच्या हिंदोळ्यावर हिंदोळे घेत अंतर कापत होतो. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी एक अविस्मरणीय प्रवासाचा दिवस ठरत होता. बराच काळ सायकलिंग केल्यावर आता पोटात कावळे ओरडायला लागले होते तेंव्हा आम्ही गुना शहराच्या अलीकडे चौहान पंचवटी हॉटेल मध्ये दुपारचे जेवण घ्यायचे ठरवले आणि आमच्या सायकली पार्क करून हॉटेल मध्ये गेलो. जेवण झाले असेल – नसेल तोच तिथे आम्हाला बदक, पोपट व इतर पक्षी पाळल्याचे दिसले आम्ही काही वेळ त्यांच्यासोबत घालवला व तिथे असलेल्या बाजेवर थोडा वेळ लोळत पडलो थोडा वेळ म्हणता म्हणता बराच वेळ गेला. भरपेट जेवणामुळे आम्ही जरा सुस्तावलो होतो परंतु इथे थांबून चालणार नव्हते तेंव्हा आम्ही पुन्हा शिवपुरी च्या दिशेने सायकली वळवल्या.

काही काळ आळसात सायकल चालवून आम्ही पुन्हा लय पकडली आणि पुन्हा किलोमीटर मागून किलोमीटर पार करत जात होतो. गुना ओलांडून पुढे जात असताना मला बऱ्याच वेळेपासून एक प्रश्न पडला होता तो म्हणजे या परिसरात गहू व मोहरीबरोबर अजून एक बहरात असलेले पीक दिसत होते परंतु हे पीक धने आहे की अजून काही हे मला समजत नव्हते तेंव्हा मी एकतर रोडच्या एकदम बाजूला असेलेल्या या पिकाची जमीन येण्याची किंवा कुणी तरी ज्याच्याशी मी बोलू शकतो अश्या माणसाची वाट पाहत होतो. थोड्याच वेळात पाणी ब्रेक च्या दरम्यान मी हा विषय तिथे आमची चौकशी करणाऱ्या लोकांसोबत बोलताना काढला आणि तेंव्हा समजले की हा संपूर्ण परिसर धने उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथे धने पावडर तयार करणारे अनेक कारखाने असून इथून धने पावडर निर्यात देखील केली जाते.

अजून एक दिवस क्षितिजाकडे मावळायला निघाला होता आणि आम्ही त्याच्या विरुद्ध दिशेला आमच्या मुक्कामच्या ठिकाणी पोचयला. जस जसा अंधार पडायला लागला तस तसे आम्ही कुठे थांबायचे याचा विचार करू लागलो. प्रथम आम्ही शिवपुरी बायपास च्या अलीकडे कुठेतरी थांबू असा विचार केला होता परंतु आम्हाला अंधाराने अलीकडेच गाठल्याने आता कोलारास पर्यंत पोचणे शक्य नव्हते किंवा पोचायला खूप उशीर होणार हे निश्चित झाले होते. तेंव्हा जितके दूर जाता येईल तितके दूर जाऊ आणि अलीकडेच कुठेतरी मुक्काम करू असे ठरले.

परंतु जसा जसा अंधार वाढत गेला तस तसे धुके गडद होत गेले. सर्व लाइट लावले तरीही आता या रोडवरुन मोठमोठले ट्रक भरधाव वेगात जात होते. तेंव्हा अश्या परिस्थितीत जास्त वेळ हायवेवर सायकल चालवणे धोक्याचे होते. सात वाजताच धुके एकदम गडद झाले होते. गाव किंवा उड्डाणपुल आल्यावरच त्यावरील दिव्यांच्या उजेडात सायकल चालवणे सुरक्षित वाटत होते अन्यथा दाट धुक्यामुळे सायकल चालवणे जिकरीचे होऊ लागले होते. थंडी, अंधार, धुके आणि सुसाट मोठी वाहने यातून आम्ही कसेबसे पुढे जात होतो. बादरवास मध्ये आम्हाला राहण्यासाठी बायपास ला योग्य सोय होत नव्हती तेंव्हा पुढे लुकवासच्या आसपास एके ठिकाणी रूम मिळेल असे समजले तेंव्हा आम्ही त्या एकमात्र हॉटेल च्या जिवावर आम्ही पुढे निघालो. रात्र, अंधार आणि थंडी वाढत होती आणि आम्ही विसाव्यासाठी निवारा शोधत पुढे – पुढे जात होतो. वाटेत एकदोन ठिकाणी आम्ही विचरणा केली पण इथे तर नाहीच पण पुढे ही तुम्हाला निवारा मिळेल याची खात्री ते लोक देत नव्हते. आम्ही जोखीम घेऊन जास्त वेळ सायकल चालवू इच्छित नव्हतो. साडेआठ च्या सुमारास कुल्हाडी गावाच्या अलीकडे आम्हाला हॉटेल गणेश नावाचे हॉटेल दिसले तिथे आम्ही चौकशी केली असता आम्हाला रूम मिळेल असे समजले तेव्हा कशी ही असली तरी ही रूम घेऊ आणि आजची रात्र कशीतरी काढू असे ठरवून आम्ही आमच्या सायकली रस्ता पार करून त्या हॉटेल च्या मोकळ्या जागी लावल्या. आमच्याकडे पर्याय नसल्याने आम्ही तिथेच राहण्याचे ठरवले. लगेच आम्ही सायकली बाजूला लाऊन आधी जेवण करून मग सायकलीवरील सामान उतरवून आराम करायला जाऊ असे ठरवले.

हॉटेल गणेश मध्ये आम्ही जेवणासाठी बसलो असता त्यांनां आम्ही इथले काही स्थानिक पदार्थ असेल तर सांगा अशी विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला “दाल टिक्कड़” सुचवले  भूक लागली होतीच तेव्हा आम्ही या  राजस्थानी / मध्य प्रदेशी दाल टिक्कड़ ची ऑर्डर दिली. चव आम्हाला चांगली वाटली मग काय आम्हीत दाल टिक्कड़ भरपेट खाल्ले.

जेवणानंतर तर थंडी जरा जास्तच वाटू लागली होती.  थोडा वेळ आम्ही तिथे पेटवेल्या शेकोटीसमोर बसून ऊब घेऊ असा विचार करून आम्ही तिथेच शेक घेत बसलो. थोड्या वेळात तिथे महाराष्ट्रातील एक कुटुंब चहा पाण्यासाठी थांबले त्यांनी आमची चौकशी केली, पुढील सर्व प्रवासाची माहिती घेतली आणि त्यांनी आम्हाला पुढील थंडीबाबत आणि धुक्याच्या परिस्थितिबाबत सावध केले.

आमचा कार्यक्रम भरगच्च असल्याने आम्हाला निवांत वेळ असा नव्हताच तेंव्हा जास्त वेळ इथे शेकोटीभोवती थांबणे शक्य नव्हते तेंव्हा आम्ही सायकली व्यवस्थित लावल्या आमचे सामान रुममध्ये लाऊन. लाईट आणि इतर साधने चार्जीगला लाऊन आम्ही उद्याचे नियोजन करू लागलो. 

त्या कुबट व अरुंद रूममध्ये थकेल्या शरीराला कधी डोळा लागला ते कळलेही नाही. आज आम्ही १६० कीमी अंतर कापले असले तरी आम्ही आमच्या नियोजित ठिकाणापासून बरेच अलीकडे होतो आणि उद्या आता झांसी चा किल्ला पाहून पुढे जाता येईल की नाही याची शंका होती.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

A person standing next to a stone monument featuring a carving of a horse rider with a sword, inscribed with text in Hindi, against a backdrop of a stone wall and misty weather.

चाकांवरचा कुंभ-दिवस सातवा-लुकवासा ते झाशी (१४२ किमी): Day 7: Lukwasa to Jhansi Ride

आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला […]

PUNE TO AYODHYA CYCLE RIEDE

चाकांवरचा कुंभ – दिवस तिसरा – धुळे ते महेश्वर (१६२ किमी ): Day 3: Dhule to Maheshwar Cycle Ride

दिवसाची सुरुवात ठरल्याप्रमाणे सकाळी प्रवास सुरू करण्यापूर्वी राममंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने आम्ही साडेतीन – पावणेचार पासून आवरायला सुरुवात केली. आमची आंघोळ, दूध – पाणी होईपर्यंत पाटील सरांनी आमच्या सत्कारची तयारी केली श्री पाटील सरांच्या परिवाराने आमचा यथोचित सत्कार केला. काल संध्याकाळ पासून केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. त्यांच्या परिसरातील श्री राम मंदिरात जाऊन आम्ही […]

PUNE TO AYODHYA CYCLE RIDE

चाकांवरचा कुंभ – दिवस दुसरा – सिन्नर ते धुळे (१९० किमी): Day 2: Sinnar to Dhule Cycle Ride

दिवसाची सुरुवात अजून आम्ही २०० किलोमीटरही पार केले नव्हते आणि थंडी ने आपला पगडा घालायला सुरुवात केली होती. पहाटे गरम दुलईतून उठून सर्व समान अवरून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे जरा जिकरीचे वाटू लागले. आम्ही दोघेही एकमेकांना तुम्ही आवरा … तुम्ही आवरा करत पाच मिनिटे पडतो म्हणून अर्धा तास असाच गेला. दोघांनाही आवरून रुमच्या बाहेर पडायला […]