कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे जाऊन चित्रकुट वरून प्रयागराजला जाण्याऐवजी आम्ही आता थेट राजापूर मार्गे प्रयागराजला आज जाण्याचे ठरवले होते. रस्ता कुठे एकेरी तर कुठे दुहेरी आहे परंतु रोड चांगला आहे. आम्ही १७० किमी अंतर आज पार करणार होतो आणि लवकर पोचायचे असेल तर लवकर सुरुवात करावी लागेल शिवाय धुके जर आजच्या सारखे असले तर पुन्हा जास्त वेळ जाईल तेंव्हा थोडे लवकर सुरुवात करू म्हणून आम्ही आज लवकर उठलो. भरभर आवरून रूमच्या बाहेर पडलो. पाच साडेपाच वाजता बाहेर पडून आम्ही त्या हॉटेल च्या आवारात लावलेल्या सायकली काढल्या पूर्ण सायकली दवात चिंब भिजल्या होत्या. सायकल कोरडी करून समान बांधेपर्यंत काही वेळ गेला. तरी आज आम्ही इतर दिवसांपेक्षा लवकर आवरले होते. आज एक वेगळाच उत्साह आमच्यात भरला होता. परंतु आम्ही तेव्हा निराश झालो जेव्हा त्या हॉटेलचे मेन गेट बंद होते आणि आवाज देऊनही कुणीही दरवाजा उघडेना. शेवटी आम्ही रात्रीच्या जेवणाच्या बिलावरून मोबाईल क्रमांक काढला आणि थेट मालकाला फोन केला. काही वेळ प्रयत्न करूनही मालक काही फोने उचलेना. पुन्हा – पुन्हा फोन केल्यावर मालकाने फोन उचलला आणि मी बघतो म्हणून ठेऊन दिला. पुन्हा मोठमोठ्याने आवाज दिल्यावर एकजण आला आणि म्हणाला कि मी इथेच होतो. मला आवाज द्यायचा तुम्ही. आम्ही त्याला आम्हाला दरवाजा उघडून जाऊ दे तू कुठे होता काय झाले यात आम्हाला वेळ घालवायचा नाही. आमचा बहुमुल्य अर्धा – पाऊन तास वाया गेला तरी कुरकुर न करता फ्रेश मूड न घालवता आम्ही बाहेर पडून बायपास रोड कडे निघालो. धुके…. एकदम दाट धुके आजही होते पण आता हे धुके आम्ही त्रासदायक मानत नव्हतो आम्ही त्याला आपलेसे करून घेतले होते. धुक्याच्या दुलईवर स्वार होऊन आम्ही स्वर्गसफारी वर निघालो होतो. आज आमच्या मोहिमेचा पहिला पाडाव प्रयागराज मध्ये आम्ही पोचणार होतो. त्यामुळे आम्ही अतिशय उत्साही होतो. आतापर्यंत आमच्या मोहिमेत अनेक नैसर्गिक, मानसिक आणि शारीरिक अडचणी आल्या आम्ही त्यावर निग्रहाने मात करत आज या ठिकाणी पोचलो होतो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान होताच. ज्या गोष्टी काल रात्री काही काल विरोधी वाटत होत्या त्याच आता जणू त्या केवळ आमच्यासाठीच आहेत असे वाटत होते. एकदम शांत रोड धुक्यातून काही फुटावर आमच्यासाठी रोड मोकळा केला जात होता. धुक्याने लगडलेल्या दवबिंदूच्या सड्यांनी आमच्यासाठी जणू पायघड्या घातल्या होत्या. शेजारच्या शेतात मोर मुक्तपणे विहारत होती. वाटेत गाव नसले तरी थोड्या – थोड्या अंतराने घरे लागत होती. कधी कधी तर खूप दूरवर एखादेच घर रोडच्या बाजूला असायचे हे कसे राहत असतील याचे आम्हाला नवल वाटे. कधी कधी तर घरासमोर कोंबड्या आणि मोर एकत्र खेळताना पाहून आम्ही त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड करू लागलो. वातावरण एकदम थंड असले तरी आज प्रयागराजला पोचणार या कल्पनेने एक वेगळी उर्जा आम्हाला भेटत होती. काही काल असाच जात होता. लोक आम्हला जय श्री राम म्हणत आमचा उत्साह वाढवत होते.

अश्याच एका ठिकाणी आम्हाला एक जन मोटारसायकल वर भेटला त्यांनी आमची विचारपूस केली आणि पुढे निघून गेला थोडे पुढे जाताच त्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी आम्हला अक्षरशः अडवले आणि आम्हाला थांबवले. त्या सर्वांनी आमची विचारपूस केली आमच्या मोहिमेचे तोंडभरून कौतूक केले आणि जेव्हा त्यांना कळले कि आम्ही चहा आणि कॉफी घेत नाहीत तेंव्हा त्यांनी आमच्यासाठी दुध मिळवण्यासाठी साऱ्या गावात चौकशी केली सर्व मित्रांना फोन करून धार काढली का एक घडा दूध घेऊन यायची विनंती ते सर्वाना करत होते पण अजून कुणाकडेही दूध उपलब्ध होत नव्हते हे पाहून आम्ही त्यांना सांगितले की तुमचे प्रेमाचे शब्द हेच आमच्यासाठी दूध आहे तुम्ही नाराज होऊ नका. त्यांना वारंवार विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला तिथून जाऊ दिले. त्यांच्या आमच्याप्रती या सच्च्या भावना आमच्यासाठी एक कप दुधापेक्षा कितीतरी अधिक होत्या.
असेच प्रेम आम्हाला पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये वेळोवेळी मिळत गेले ज्याची आम्ही अजिबात अपेक्षा केली नव्हती. हळू हळू रोजच्यासारखे धुके निवळत जात होते आणि आम्ही पुढे – पुढे जात होतो. पुन्हा हिरवीगार धरती शुभ्र वस्त्रे सोडून हिरवागार शालू परिधान करत होती.

वेळ जात होता आमच्यात आणि प्रयागराज मधील अंतर कमी होत होते. आता आम्हाला भूक लागली होती पान वाटेत कुठेही आम्हाला हॉटेल किंवा टपरी ही दिसेना जिथे आम्ही काहीतरी खाऊ शकू. छोटी – छोटी गावे, वस्त्या लागत होत्या परंतु नाश्ता करण्यासाठी कोणतीही सोय दिसेना आम्हाला शेवटी आम्ही एके ठिकाणी एक स्वीट होम वाल्याला विनंती करून दूध गरम करून घेतले आणि सोबत बिस्किट खाऊन नाश्ता उरकला आणि तिथून सोबत काही बिस्किट, फरसाण सोबत घेतले. कारण पुढे कधी हॉटेल मिळेल सांगता येत नव्हते. लोक जरी आम्हाला सांगत होते कि पुढे राजापूर मध्ये ढाबा मिळेल तरी आमचा यावर विश्वास नव्हता.
आम्ही चालता चालताच सुका मेवा तर कधी सोबत घेलेले सटरफटर खात पुढे जात होतो. कधी रोड छोटा तर कधी एकदम छोटा होत होता. कुठे कुठे पुलाचे काम चालू होते तर कुठे कुठे रोडचे काम चालू असल्याने आम्हाला कधी कधी सायकली उचलून तर कधी खाली उतरून आम्ही आमचे अंतर कमी करत होतो.

रोडवर कधी कधी एकदम मोठाले ट्रक येऊन रोड अडवत होते एरव्ही रोडवर फक्त मोटारसायकल व ई रिक्षा दिसत होत्या आम्ही त्या ई रिक्षा सोबत कधी समांतर तर कधी स्पर्धा करत पुढे जात होतो. रोजच्या सारखा पुन्हा एकदा सूर्य चमकत होता धुके पूर्ण निवळले होते. दोन्ही बाजूंना हिरवी – पिवळी शेतं डौलाने आमचे स्वागत करत होते. वाटेत मोठे शहर असे कोणतेही नव्हते छोटी छोटी गावे लागत आमचे कौतुक करून आम्हाला निरोप देत होते. सकाळपासून आम्ही कधी दुध- बिस्कीट तर कधी सुका मेवा खात आत्तापर्यंतचा प्रवास करत आलो होतो. आता दिवस पश्चिमेकडे सरकू लागला होता आणि आम्हाला जोराच्या भुका लागल्या होत्या. राजापूर मध्ये आल्यावर इथेच काहीतरी खाऊन घेऊ पुढे काही मिळण्याची शक्यता खूप कमी असल्याने आम्ही इथेच तुळशीधाम ढाब्यावर आम्ही मिळेल ते जेवण घेतले आणि आम्ही पुढे निघालो आजून बराच प्रवास बाकी होता लवकर प्रयागराजमध्ये पोचून
रूम मिळवायची होती. महाकुंभमुळे तिथे लवकर रूम मिळेल कि नाही याबाबत आम्ही साशंक होतो.

जेवणानंतर थोड्याच वेळात आम्ही यमुना पार केली आता यमुना सोडून आम्ही गंगेकिना-याकडे निघालो होतो. धुळीने माखलेल्या रोडवरून आम्ही एक एक शेत मागे टाकत पुढे निघालो होतो. पुन्हा एकदा सूर्यदेव अस्ताला आणि आम्ही मुक्कामी पोचण्याची धडपड करू लागलो. थोड्याच वेळात आम्ही भारवारी गावात पोचलो दुपारी काही खास जेवण झाले नव्हते तेंव्हा रेल्वे रूळ ओलांडण्याआधी आम्ही चाट, पाणीपुरी आणि गुलाबजामुन खाऊन एका गल्लीतून प्रयागराज च्या दिशेने पुढे निघालो. लवकरच आम्ही भरवारी बायपासला पोचलो होतो. तिथे आम्ही प्रयागराजला जाणारा रस्ता नक्की करून पुन्हा एका अंधाराचा सामना करण्यासठी सज्ज झालो होतो. आज गेल्या दोन तीन दिवसापेक्षा धुक्याचे प्रमाण एकदम कमी होते. नेहमीसारखा सूर्य धुक्याच्या हातात हे साम्राज्य सोपून अस्त होताना दिसत नव्हता त्यामुळे अंधाराचे साम्राज्य हळू हळू पसरत होते. आम्ही जेव्हडे अंतर पूर्ण अंधार पडण्याच्या अगोदर कापता येईल तेव्हडे आम्ही वेगात कापत होतो.
अंधार जरी पडला असला तरीही आता रोड दिव्यांनी उजळलेला होता त्यामुळे आम्हाला सायकल चालवायला अडचण येत नव्हती. कुंभमेळ्याच्या पाउलखुणा आता दिसायला लागल्या होता. दिवसभर मोकळ्या रस्त्यावरून आम्ही आलेलो आता रोडवर गर्दी होती. त्यामुळे सायकल चालवायला मजा येत होती आम्ही आनदांत सपाटरोडवरून सुसाट प्रयागराजकडे निघालो होतो.
दुकानांची गर्दी वाढत होती रोडवर रोषणाई वाढत होती आणि आमचा उत्साहदेखील. प्रयागराज जवळ आल्यावर आम्ही एके ठिकाणी थांबून सुका मेवा आणि शेंगदाणे खाल्ले थोडा आराम केला आणि आमच्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी पुढे निघालो. वेळोवेळी आम्ही नकाशा पाहून आमचे अंतर पाहत होतो आमचा विचार संगमाजवळ जाऊन थांबण्याचा होता जेणेकरून आम्हाला सकाळी लवकर संगमावर जाऊन अंघोळ करता येईल आणि आम्ही तिथून आवरून वाराणशी कडे निघू.
रोषणाई आणि सजावट पाहून आम्हाला वाटले कि आपण प्रयागराज मध्ये पोचलो आहोत पण नकाशा पाहून कळले कि अजून आम्ही मुख्य शहरापासून दूर आहोत आणि काल परवा इथे पाच ते सहा तासाचा जाम लागला होता. तसे वाहने सध्या हि रस्ता तुडुंब भरला होता आणि आम्हाला अजून काही किलोमीटर जायचे होते. मंद धुक्यात पूर्ण रोड दुधात न्हाल्यासारखा वाटत होता. आम्ही पुढे जात होतो गर्दी वाढत होती. आम्ही इतके दिवस ज्याच्यासाठी पेडल फिरवत होतो. धुके, उन, थंडी यांचा सामना करून पवित्र प्रयाग मध्ये पाय ठेवण्याचे एक समाधान आमच्या पायांना होते.
काही काळ आम्ही सजलेली प्रयागराज नगरीन्याहाळत पुढे जात होतो. काही काळ आम्ही मग्न होऊन शहरात आत जात होतो. आता आम्ही राहण्यासाठी हॉटेल शोधू लागलो परंतु आम्हाला रूम काही मिळेना तेंव्हा आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो जिथे आम्हाला रूम मिळण्याची शक्यता जास्त होती तेंव्हा आम्ही रेल्वे स्टेशन कडे निघालो एके ठिकाणी आम्हाला रूम मिळाली परंतू रूम मालक आम्हाला अजिबात सहकार्य करत नव्हता बाथरूम मध्ये लाईट नव्हता तर तो आम्हाला म्हणाला की लाइट आणून देतो तुम्ही बसवा त्यावर सुयोग सर त्यावर भडकले आणि आम्ही तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा नवीन रूम शोधू लागलो. काही वेळाने आम्ही एक रिक्शावाल्याला विचरले असता त्याने आम्हाला एके ठिकाणी रूम देण्याचे आश्वासन देऊन तो आम्हाला घेऊन लॉजमालकाकडे घेऊन आला तिथे आम्हाला चांगली रूम मिळली. तिथे आम्ही फ्रेश झालो आणि आमचे मित्र आज प्रयागराज मध्ये आले होते तेंव्हा आम्ही त्यांना भेटण्यासाठी बाहेर गेलो. त्यांना भेटलो आणि तिथेच समोर एका हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण म्हणून डोसा आणि आमच्या मित्रांनी सोबत आणलेला खाऊ खाल्ला. त्यांनी ही आमच्या जवळच रूम घेतली होती तेंव्हा पहाटेची संगमावर जाण्याची योजना आखून आम्ही रूमवर परतलो.
आज आम्ही जाम खुश होतो आम्ही आजपर्यंत आमच्या योजनेप्रमाणे अंतर कापले होते आणि आता उद्या आम्ही वाराणशीला जाऊ शकणार होतो परंतू परवा मात्र आम्हाला एक दिवसात २२० किमी चे अंतर कापायचे होतो. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती परवा चे उद्या रात्री विचार करू असे ठरवून आम्ही सकाळी ४ वाजता उठण्यासाठी झोपी गेलो.
