चाकांवरचा कुंभ-दिवस आठवा-झाशी ते बागेश्वर धाम (१६० किमी): Day 8: Jhansi to Bageshwar Dham Ride

ज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला जास्त अंतर पार करण्याची शक्यता वाटत नव्हती. आम्ही आमच्या नियोजित वेळापत्रकानूसार किमान ३० ते ४० किलोमीटर मागे होतो. त्यामुळे आम्ही वाराणसीला जाण्याचा आमचा बेत जवळ जवळ रद्द करून आज आरामात छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. सकाळी खूप दाट धुके आणि दवाचा पाऊस पडत असल्याने आम्ही आरामात आंघोळ करून सामान सायकलवर चढवले. शरीर कुठेतरी कुरकुर करत होते त्यामुळे आम्ही अधिक तान न घेता सायकलला पेडल मारेपर्यंत साडेसात होऊन गेले होते. इतक्या दिवसाच्या प्रवासानंतर एक मरगळ आली होती आणि त्यात काशीला जाता येणार नाही म्हणूनही एक निराशा होतीच.

आम्ही थांबलेल्या हॉटेल ची गल्ली सोडून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो आणि थोड्या वेळात एका चौकातून वळण घेऊन आम्ही छतरपुर कडे निघालो. रात्रीच आम्ही शहराच्या आम्हाला जायचे त्या बाजूला येऊन थांबलो होतो. त्यामुळे लवकरच आम्ही उपनगरे ओलांडून अचानक दाट झाडी असलेल्या रोडने प्रवास करू लागलो अचानक वस्ती संपून लागलेले जंगल आम्हाला चकित करत होते आत्ता तर बिल्डिंग व गजबजलेला परिसर होता तेंव्हा अचानक हे जंगल कसे काय लागले हे कळेना. आम्ही नकाशा पाहिला तर रस्ता बरोबर होता आम्ही तसेच पुढे जात राहिलो.

थोड्या वेळाने आम्ही पुन्हा बिल्डिंग व गजबजलेल्या परिसरात आलो आणि आम्हाला समजले की आम्ही पुन्हा मध्य प्रदेश मध्ये आलो आहोत आणि इतून पुढे बऱ्याच वेळा आम्ही असे मध्य प्रदेश – उत्तर प्रदेश अशी ये जा करणार होतो. एकेरी रस्ता सोडून आम्ही आता दुहेरी सिमेंटच्या रोडवर चढलो होतो. दाट धुक्याची आता सवय झाली होती. आजही जाड धुक्याचे थर होतेच. परंतु एकदम मोठा रोड सुनसान होता. एखादी अर्धी गाडी अधून – मधून येत जात होती. समोर काही मीटर वर रोड पूर्ण धुक्याच्या आहारी गेलेला. रोड कुठे सपाट तर कुठे उतरचा होता त्यामुळे आम्ही सहजपणे भरभर रस्ता उरकत होतो. आज उशिरा सुरुवात करूनही आम्ही बऱ्यापैकी अंतर कापले होते. जस जसा वेळ जात होता पोटात कावळे ओरडू लागले होते. पण मजेची गोष्ट म्हणजे एव्हडया मोठ्या हायवेवर एकही हॉटेल नव्हते आणि छोटे मोठे हॉटेल दिसले तरी ते बंद होते. आम्ही पुढे पुढे जात होतो वेळ आणि अंतर भर-भर जात होते पण नाश्ता करण्यासाठी काही हॉटेल मिळेना.

असेच बराच वेळ आम्ही हॉटेल शोधत होतो. पण नाश्ता तर सोडाच पण दूध – बिस्किट खाऊ हा विचार करून आम्ही चहाची टपरी तरी मिळते का पाहत होतो. एके ठिकाणी आम्ही दूध – बिस्किट देण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी आम्हाला दूध गरम करून दिले आम्ही दूध – बिस्किट एकत्र करून त्याचा शेक करून पिलो आणि पुढे परत काही मिळेल न मिळेल म्हणून त्यांच्याकडून अधिकचे पाणी घेऊन पुढे निघालो.

मध्यम धुके, उतारचा रोड, आणि आता सवय झालेली बोचरी थंडी. याचा संगम साधत आम्ही वेगाने पुढे जात होतो. हळू – हळू आमचा आळस, मरगळ निघून गेली आणि आम्ही आज अजून थोडे वातावरण निवळले तर आपण बागेश्वर धाम मध्ये पोचू शकतो हा आत्मविश्वास यायला लागला होता. प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणत आम्ही वेगाने पेडल फिरायला सुरुवात केली.

हळू – हळू वातावरण निवळत गेले, थंडी कमी झाली आणि सूर्यदेव त्वेषाने चमकू लागले. त्याने आमचा हुरूप अजून वाढला आणि आम्ही पाणी ब्रेक घेत आमच्या सायकली पुढे दामटवत होतो. आता चांगले ऊन पडल्यामुळे आम्ही अंगावरील कपड्यांचे काही थर कमी करून मजेत उताराच्या रोड वरून सायकल चालवण्याचा आनंद घेत होते. असा सायकलला अनुरूप रस्ता म्हणल्यावर आमचे मित्र सुयोग भाऊ  जोरात सायकल दामटत होते. मी मात्र जेव्हडे मनात साठवता येइल तेव्हडे आजूबाजूची गावे, शेती,आणि  एकूणच सारा परिसर डोळ्यात साठवत जरा निवांत जात होतो.

मी माझ्याच धुंदीत चालत असताना अचानक एक जुनी खिळखिळी झालेली मोटरसायकल माझ्या समांतर चालू लागली. मोटरसायकल च्या आवाजवरूनच तिची आणि त्यावरील कुटुंबाची दशा कळत होती. त्या गाडीवर एक कुटुंब प्रवास करत होते. चाळीशीच्या जवळ आलेला परंतु सतत कष्ट उपसल्याने अगदी रापलेल्या चेहऱ्याचा तरुण त्याच्या पाठीमागे त्याचा छोटा मुलगा व मागे त्याची धर्मपत्नी असे कष्टकरी कुटुंब चालले होते. त्या तरुणाने चालता चालता माझी चौकशी केली, कुठं कुठं प्रवास केला? त्रास होतो का? मग तो म्हणाला “आप तो बहुत कष्ट की भक्ति कर रहे हो यार!” “हम तो आपसे नजदीक होके भी  अयोध्या जा नहीं पाते” मी म्हणालो “ऐसा कुछ नहीं बहोत लोग है जो पैदल भी जाते है” मग तो म्हणाला “जाते होंगे, लेकिन मेरे लिए तो आप ही राम हो!” आणि त्याने मला हात जोडले यावर मी त्याला असे करू नका मी ही तुमच्यासारखा एक साधारण भक्त आहे आणि आम्ही नेहमी सायकल चालवत असतो म्हणून रामाच्या भेटीला सायकल वर चाललो बस एवढेच. तो हसला थोडा वेळ तसंच समांतर चालत ते कुटुंब माझ्यासोबत चालले. मी सायकलचा थोडा वेग वाढवला आणि थोडा पुढे गेलो. पुनः थोड्या वेळाने ते कुटुंब माझ्या समांतर आले आणि त्याने खिश्यातून काही नोटा काढल्या आणि पुढे करत मला त्या घेण्याची विनंती करू लागला.

मी त्याला नम्रपणे नकार दिला परंतु तो आणि त्याची धर्मपत्नी दोघेही घ्या आम्ही देऊ इच्छितो कृपया घ्याच अशी विनवणी करू लागले. मी बराच वेळ नकार दिला त्यांना सांगितले की मला पैसे नकोत आणि मी श्री रामाकडे तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेल तरीही ते लोक काही ऐकत नव्हते, तेंव्हा मी त्यातली एक वीस रुपयाची नोट घेतली आणि बाकी पैसे परत ठेऊन द्यायला सांगितले. त्यावर त्यांनी माझे ऐकले व ते हात जोडून पुढे निघून गेले.

क्षणभर मला उमगले नाही की गेल्या काही क्षणात काय घडले? सुरुवातीला माझ्या समांतर ते चालत असताना माझ्या मनात चुकचुकलेली शंका व अविश्वासाचा रावण त्याने त्याच्या विशाल “देण्याच्या” (मग ते किती याला काही अर्थ उरत नाही) कृतीने मारून मला साक्षात श्री रामाच्या साच्यात बसवून तो स्मितहास्य करून निघून गेला.

चुरगळलेली ती वीस रुपयाची नोट तिला मिळवण्यासाठी त्याच्या मेहनतीची साक्ष देत होती. आपल्या अभावाच्या भणंग संसारातूनही अतिशय आनंदी भावनेने देण्यासाठी जो हात पुढे आला होता तो खऱ्या अर्थाने त्या प्रभू रामाची भक्ति होती. नव्हे तो साक्षात त्या प्रभू रामाने मला दिलेला प्रसादच होता. जणू साक्षात प्रभू राम आले आणि काही क्षणात मला जीवनाचा एक धडा गिरवून स्मित हास्य करून निघून गेले.

चुरगळलेल्या नोटे प्रमाणे त्याचे जीवन जरी चुरगळले / कष्टप्रद असले तरी त्याने आपले मूल्य किंचित ही कमी होऊ दिले नाही. मी काय प्रभू रामाकडे त्याच्यासाठी काही मागू की जो स्वतःहाच त्या प्रभू रामाचे रूप होता.

ती नोट मी जपून ठेवली खरे तर ती नोट मला कायम माझ्यासोबत ठेवायची होती प्रसाद म्हणुन पण प्रभु रामाच्या दर्शनाला गेलो आणि दर्शन घेताना जणू त्याने मला डोळे मीचकावून त्या नोटेची मागणी केली. जणू तो माझी देण्याच्या वृत्तीचा धडा गिरवला की नाही याची परीक्षा घेत होता.

देण्याची महान वृत्ती आम्हाला या परिसरात वेळोवेळी येत होती. लोक मनापासून आम्हाला सहकार्य करत होते. पूर्ण परिसर सीमावर्ती भाग होता. दोन पदरी सीमेंटचा रोड पण बाजूला एकदम गरीब खेडे. कुठेही मोठे हॉटेल वाटेत दिसत नव्हते. प्रत्येक उड्डाणपूलाखाली एक गरीब गाव आम्ही मागे टाकत जात होतो. एरव्ही उड्डाण पूल चढायला कंटाळा यायचा पण आज आम्ही सहज पूल चढत होतो आणि वेगात उतरत होतो.

उड्डाणपूल चढलो की भोवतालचा विस्तीर्ण हिरवागार परिसर नजरेत भरत होता. मला राहून राहून प्रश्न पडत होता की जर नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेतं आहेत मग ही गावे इतकी गरीब का वाटतात? यावर मला एखाद्या गावकऱ्याशी बोलायची इच्छा होती पण कधी संधी मिळाली नाही.

दिवस आधाश्या सारखा पश्चिमेकडे धावत होता आणि आम्ही खजुराहो रोड ने छतरपुर कडे. सूर्य समोरून उजव्या खांद्यावरून खाली सरकू लागला होता. सकाळपासून आम्ही दूध आणि बिस्किट खाऊन पुढे पळत होतो. आता व्यवस्थित जेवण गरजेचे होते. तेंव्हा आम्ही हॉटेल शोधायला लागलो कारण हॉटेल कधी कुठे मिळेल की नाही याची श्वासवती नव्हती.

थोड्याच वेळात आम्ही धसन नदीवर येऊन पोचलो, विस्तीर्ण पात्र जे की पठारावरील नद्यांचे वैशिष्ट्य, दूरपर्यंत निळेशार पाणी तर उजव्या बाजूला उंच धसन धरणाचे दरवाजे दिसत होते. आम्ही इथे एक ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. मध्येच एखादा अर्धा ढाबा दिसायचा पण जेवणासाठी थांबण्यासारखी परिस्थिति कुठे दिसेना. पण आमचा शोध सुरू होता.

एके ठिकाणी जरा गर्दी दिसली धाब्याचे नाव होते “अपणा भाईचारा ढाबा” बाजूला पाण्याने भरेलेला हौद होता. ट्रक ड्रायवर तिथे आंघोळ करत होते. बाजूला जेवणाची सोय होती आम्ही. भर दुपारच्या कोवळ्या उन्हात बाहेर बसून मनसोक्त जेवण केले. जोराची भूक लागल्यामुळे की खरेच जेवण रुजकर होते माहीत नव्हते पण प्रत्येक घासचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला. जोराची भूक लागल्यावर जेवणाची काही वेगळीच मजा असते आणि तीच आम्ही घेत होतो. अगदी भर दुपारी सूर्य माथ्यावर पण ऊन अगदी कोवळे वाटत होते जणू अत्यंत क्रोध आलेला
असतानाही आईला आपल्या लेकरला कष्ट देता येऊ नये.

जेवणानंतर पुन्हा आम्ही उतारच्या रोडचा भरपूर फायदा घेत सुसाट पुढे जात होतो. आम्ही छतरपुर जवळ आलो होतो. काही काळ आम्ही जोरदार सायकलिंग करून मग रोडवर फोटो आणि रील शूट केली आणि पाणी ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो एके ठिकाणी आम्हाला बोरांने लगडलेली बोर दिसली मग काय आम्ही सायकली रोडच्या बाजूला लाऊन लहान मुलासारखे उड्या मारत बोरीखाली बोरे खायला पळालो. काही वेळ आम्ही तिथे घालवला आणि मग रोडवर येऊन पुन्हा पेडल सुरू केले.

पुन्हा एक प्रवासाचा सूर्य अस्ताला चालला होता आणि आम्ही छतरपुर बायपास वरुन पुढे निघालो होतो. लवकरच दिवस मावळणार असला तरी आता आम्हाला रात्री सायकल चालवायची सवय झाली होती. आम्ही शहराच्या बाहेर एके ठिकाणी दूध पिलो. रात्रीच्या प्रवासाचे कपडे, लाइट सज्ज करून पुढे निघालो. जसा जसा अंधार वाढत होता. धुके पुन्हा वाढत जात होते.

थोड्याच वेळात आम्ही बागेश्वर धाम रोडने धामकडे महामार्ग सोडून निघालो. अंधारात एकेरी रस्ता कापत आम्ही धाम कडे कूच करत होतो. धुके आणि अंधार कापत आम्ही बागेश्वर धाम गावात पोचलो रस्ता विचारत विचारत आम्ही शेवटी धाम मध्ये पोचलो. रूम कुठे पाहायची याबाबत आमची मराठीतून चर्चा ऐकून एक जन आमची विचारपूर करू लागला तो नागपूरचा असल्याने त्याने आम्हाला रूम उपलब्ध करून दिली आम्ही लवकर फ्रेश झालो आणि दरबार पाहण्यासाठी गेलो परंतु तिथे गेल्यावर आम्हाला कळले की काही कारणास्तव दरबार रद्द झाला आहे. तेंव्हा आम्ही तिथून दर्शन घेऊन धाम मध्ये फिरलो. एका खेडेगावचा खूपच कायापालट झाला आहे. मोठ्या अर्थकारणाने तिथल्या लोकांचे नशीब फळफळले आहे. एके ठिकाणी सात्विक जेवण केले पूर्ण धाम मध्ये जेवणात कांदा लसूण वापरत नाहीत हे पाहून आमचे मीत्र सुयोगराव खूप खुश झाले होते.

आम्ही जेवण करून रूमवर येऊन उद्याचे नियोजन करून झोपी गेलो. आम्ही आज जाम खुश होतो कारण आज आम्ही आमच्या नियोजनानुसार अंतर पार करून आलो होतो. उद्या सकाळी दहा – बारा किलोमीटर चे अंतर पार करून खजुराहोला जाण्याचा आमचा विचार होता. त्यामुळे आम्ही आता उद्या निवांत खजुराहोला जाऊन मग पुढे आर्तराला किंवा चित्रकूट जाण्याचा निर्णय घेऊ असे ठरवून आम्ही झोपी गेलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

PUNE TO AYODHYA CYCLE RIEDE

चाकांवरचा कुंभ – दिवस तिसरा – धुळे ते महेश्वर (१६२ किमी ): Day 3: Dhule to Maheshwar Cycle Ride

दिवसाची सुरुवात ठरल्याप्रमाणे सकाळी प्रवास सुरू करण्यापूर्वी राममंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने आम्ही साडेतीन – पावणेचार पासून आवरायला सुरुवात केली. आमची आंघोळ, दूध – पाणी होईपर्यंत पाटील सरांनी आमच्या सत्कारची तयारी केली श्री पाटील सरांच्या परिवाराने आमचा यथोचित सत्कार केला. काल संध्याकाळ पासून केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. त्यांच्या परिसरातील श्री राम मंदिरात जाऊन आम्ही […]

A person stands in front of the intricate architectural structures of a temple complex, surrounded by tourists and lush greenery, on a misty day.

चाकांवरचा कुंभ-दिवस नववा-बागेश्वर धाम ते बांदा (१३१ किमी): Day 9: Bageshwar Dham to Banda Ride

काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो मध्ये किती वेळ जातो त्यावर पुढे चित्रकूट, अर्तरा, किंवा बांदा मध्ये जायचे तो निर्णय परिस्थितिनुसार घेउ असे ठरवून आम्ही थोडे निवांत झालो होतो. दिवसेंदिवस सकाळी उठणे आळसवाणे वाटत होते. थकून चूर- चूर झालेले शरीर अंथरुणावर पडले की पुन्हा पहाटे अविरत […]

cycle travel documentary Ayodhya

चाकांवरचा कुंभ – पूर्वतयारी: Pune to Ayodhya Cycle Ride

प्रवासाची पूर्वतयारी कशी केली? तसे पहिले तर आम्हाला पुणे ते कन्याकुमारी या लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासाचा अनुभव असल्याने पुणे ते अयोध्या सायकल वारीसाठी काय काय तयारी करायला पाहिजे याची चांगली जान आम्हाला होती. खरे तर पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवासानेच पुणे ते अयोध्या सायकल प्रवासाची बीजे पेरली होती. त्यामुळे जून पासूनच आम्ही हळूहळू पुणे ते […]