चाकांवरचा कुंभ – दिवस तिसरा – धुळे ते महेश्वर (१६२ किमी ): Day 3: Dhule to Maheshwar Cycle Ride

दिवसाची सुरुवात

रल्याप्रमाणे सकाळी प्रवास सुरू करण्यापूर्वी राममंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने आम्ही साडेतीन – पावणेचार पासून आवरायला सुरुवात केली. आमची आंघोळ, दूध – पाणी होईपर्यंत पाटील सरांनी आमच्या सत्कारची तयारी केली श्री पाटील सरांच्या परिवाराने आमचा यथोचित सत्कार केला. काल संध्याकाळ पासून केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. त्यांच्या परिसरातील श्री राम मंदिरात जाऊन आम्ही प्रभू रामाचे आशीर्वाद घेऊन मुख्य रोडवर लागेपर्यंत सहा वाजले होते.

आज सकाळी निघताना चांगले स्ट्रेचिंग न केल्याने जुन्या हायवे वरून आम्ही बाय पास पर्यन्त आरामात जात होतो. आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा होता सलग दोन दिवस १०० पेक्षा जास्त सायकल चालवायचा अनुभव आणि क्षमता आम्ही ओळखून होतो परंतु तिसऱ्या दिवशी ही परीक्षा आम्हाला द्यायची होती. परिस्थितिनुसार शरीर व मानसिकता या दोघांचीही परीक्षा आजपासून सुरू होणार होती.

आज आम्ही थोडे निवांत जाण्याचा निर्णय घेतला होता कारण पुढील एकदोन दिवसांत शरीराला सवय झाल्यावर मग पुढे निर्धास्त सायकल चालवू असे आडाखे बांधून आम्ही धुळे शहर सोडून मुख्य हाइवेला लागून आमचा पुढील प्रवास सुरू केला. काही अंतर पुढे गेलो असेल तोच रोड वरून पवनचक्की चे पाते घेऊन जाणारे लांबलचक मोठमोठाले ट्रक वाटेत लागले त्यांनी सकाळी सकाळीच रास्ता व्यापल्याने काही काळ रस्ता जाम होत होता. पुढे दिवसभर हे ट्रक आम्हाला वाटेल वेळोवेळी भेटत गेले.

काल आम्ही गोदावरी नदी ओलांडली होती आज आम्ही तापी नदी ओलंडणार होतो. तापी नदी जशी जशी जवळ येत होती तसा चांगलाच उतार लागत होता. सकाळी आठ च्या सुमारास आम्ही तापी नदी ओलांडली आणि पुढील वळणावर असेलेल्या हॉटेल आशीर्वाद मध्ये सकळचा नाश्ता उरकून घेतला भरपेट पोहे आणि पराठे खाऊन आम्ही शिरपूर ओलंडण्याअगोदर लागणाऱ्या टोल नाक्यावर आम्ही येणाऱ्या वाहनांना आम्ही सोबत आणलेले पोस्टर्स दाखवत रस्ते सूर्यक्षेसंबंधी जागरूक केले. या टोलनाक्यावरून जाणारे वाहनचालक आम्हाला हात दाखवून आमच्या या मोहिमेस दाद देत होते. रस्ते सुरक्षेचे काम काही काळ या टोल नाक्यावर करून आम्ही दहा वाजून गेल्यानंतर पुढे जायला निघालो.

हळू हळू चढाई वाढत जात होती. आम्ही अपेक्षा केल्यापेक्षा जास्तच चढाई जाणवत होती. आजचा दिवस आमच्यासाठी महत्वपूर्ण होता आजपासून पुढे प्रत्येक दिवस आम्हाला आमच्या शारीरिक व मानसिक कणखरतेची परीक्षा द्यावी लागणार होती.

चढाई व ऊन दोन्ही वाढत जात होते. सकाळपासून रोडवर पवनचक्कीची पाते वाहतूक करणारी भली मोठमोठी वाहने अजूनही आम्हाला आढळत होते. जो उत्साह पहिल्या दिवशी होता आज कुठेतरी तो कमी झाला होता.  भर दुपारी चढ चढणे कंटाळवाणे वाटत होते.

दुपारी दीड च्या आसपास आम्ही महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर पोचलो. तिथे घाटात बडी बिजासन माता मंदिर आहे. ज्या मंदिराचा अर्धा भाग महाराष्ट्रात असून अर्धा भाग मध्य प्रदेश मध्ये आहे. तिथे थोडावेळ थांबलो तेंव्हा लक्षात आले की सरांच्या सायकल चा स्पोक तुटला आहे. तेंव्हा आम्ही पुढे इंदौर मध्ये बघू स्पोक मिळतो का असा विचार करून आम्ही पवनचक्कीच्या गाड्यांनी घाट जाम होण्याआधी पुढे निघायचा विचार करून पुढे निघालो परंतु थोड्याच वेळात पवनचक्कीच्या गाड्या पुढे निघाल्या आणि त्यांच्यासाठी पूर्ण घाट रस्ता बंद करण्यात आला. आम्ही त्यांच्यातून वाट काढत आम्ही घाट रस्ता पार केला.

दिवस हळू-हळू मावळतीकडे जात होता आणि आजही आपण दिवस मावळायच्या आत ठरलेल्या ठिकाणी पोचणार नाही याची खात्री झाली होती. पाच वाजत आले होते आणि अजूनही महेश्वर ५० ते ६० किमी दूर राहिले होते. स्थानिक लोकांकडून कळले की इंदौर पर्यन्त चढाई असेल तिथून पुढे तुम्हाला सपाट रस्ता मिळेल. पूर्ण ट्रीप मध्ये फारसी चढाई नाही असे समजून आम्ही केलेली रोज १५० ते २०० किमी ची योजना जरा जड जाईल असे वाटू लागले.

आज थकवा आणि तहान जरा जास्त लागत होती. तसेही आज आम्ही ही जाणून होतो की तिसरा तिस-या  ते पाचव्या दिवसापर्यंत आपला कसोटीचा काळ असणार आहे. आम्ही आज तसेची शरीराला जास्त त्रास होऊ नये म्हणून स्पीड कमी ठेवला होता तरीही आज थकलेल्या शरीरानेच आम्ही किलोमीटर मागून किलोमीटर कापत जात होतो. अंधार पडला होता आणि रोजच्या सारखे आजही आम्ही समोरचे प्रखर लाइट सुरू करून पुढे चालू लागलो. अंधार पडल्यामुळे आजचा मुक्काम महेश्वरमध्ये तर करू शकणार नव्हतो परंतु आम्ही महामार्गापासून महेश्वर कडे जाणाऱ्या फाट्यावर राहण्याची सोय आहे तिथे थांबण्याचा विचार करत होतो.

ठिकरी गांव ओलंडत असताना मला उजव्या पायच्या पिंढरी मध्ये गोळा आल्यासारखे झाल्यावर सर्वात  आधी माझ्या पोटात गोळा आला होता. मी सायकलचा स्पीड एकदम कमी केला अजून पंधरा एक किलोमीटर महेश्वर फाटा राहिला आहे तोपर्यंत पायाने साथ द्यावी असा विचार करत असतानाच काही मीटर पुढे जाताच माझ्या पायात पेटका (क्रॅम्प) आला त्यामुळे मला थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुणे ते कन्याकुमारी प्रवाससात मी जी काळजी घेतली होती तीच मी आता घेत होतो तरीही तिसऱ्या तिवशी पेटके येणे मला धोकादायक वाटत होते. कन्याकुमारी प्रवासात सुयोग सरांना पेटके आले होते व नंतर त्यांना पुढचे काही दिवस त्यांना त्याचा त्रास झाला होता. आता मला तसा होईल की काय ही शंका मनात काहूर माजवायला लागली होती.

मी मागे नाही हे पाहून सुयोग सर ही थांबले मी थोडा वेळ आराम करून पाणी पिऊन पुन्हा सायकल चालवायचा धोका मी पत्करायला तयार नव्हतो तेव्हा आम्ही तिथेच आसपास थांबण्यासाठी हॉटेल मिळते का ते पाहू लागलो. परंतु आम्हाला पुढे पाच एक किलोमीटर वर आम्हाला राहण्यासाठी हॉटेल मिळू शकत होते तेंव्हा तिथपर्यंत जाणे क्रमप्राप्त होते. मी थोडे थांबून हळू हळू पायाला त्रास न होऊ देता पुढे चार – पाच किलोमीटर गेलो व तिथे आम्हाला बाबा रामदेव राजस्थानी हॉटेल मध्ये रूम मिळाली आम्ही फूल ट्राफिक असणारा हायवे सावधपने ओलांडून पलीकडील हॉटेल मध्ये गेलो.

सध्या तरी मला एकदम बरे वाटत होते, परंतु उद्या काय होईल याची चिंता मला सतावत होती. त्यामुळे मी यातून बाहेर पाडण्यासाठी स्ट्रेचिंग, पायाला मालीश, भरपूर पाणी, पोटॅशियम युक्त आहार जसे की केळी, टोमॅटो, पालक हे मिळते का ते पाहू लागलो. फ्रेश होऊन आम्ही त्यांच्याच हॉटेल मध्ये जेवणासाठी गेलो. माझ्या परिस्थितीला अनुरूप जे मिळेल ते जेवण घेऊन आम्ही रूमवर परतलो.

आजही आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणापासून दहा अकरा किमी मागे थांबलो होतो. उद्याचे उद्या पाहू असा विचार करून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु उद्या जर पायाने साथ नाही दिली तर काय होईल या चिंतेने मन ग्रासून गेल्याने नीट झोप येत नव्हती. नाना विचारांनी मनात काहूर माजवले होते. इथूनच प्रवास रद्द करून परत जावे लागेल का? डॉक्टरकडे जायची वेळ येईल का? अशी वेळ आली तर मग डॉक्टर काय सुचवेल? त्यांनी जर पुढील प्रवासाला परवानगी दिली नाही तर? उद्या पहिल्या पाच- सहा किलोमीटर दरम्यानच जर परत पायात गोळे आले तर? या विचारांनी पोटात कसेतरी होऊन थरथरायला लागले होते. शेवटी झोप नाही झाली तर पाय नक्की त्रास देईल हे मनाला बजाऊन उद्याची चिंता महाकाल बाबा वर सोडून झोपी गेलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

A person standing next to a stone monument featuring a carving of a horse rider with a sword, inscribed with text in Hindi, against a backdrop of a stone wall and misty weather.

चाकांवरचा कुंभ-दिवस सातवा-लुकवासा ते झाशी (१४२ किमी): Day 7: Lukwasa to Jhansi Ride

आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला […]

pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ-दिवस तेरावा-श्री राम दर्शन आणि परतीचा प्रवास: Day 13: Shri Ram Darshan & Return Journey

काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र वाराणशीवरून रेल्वेने आले होते आणि आमच्या शेजारच्या रुममध्ये ते थांबले होते. सकाळी उठलो आणि पाहतो तो काय लाईट गायब. गरम – गार काय पाणीच नव्हते. आम्ही हॉटेल वाल्याला विचारले तर कळले कि काहीतरी मोठा बिघाड झाला आहे आणि लाईट कधी […]

PUNE TO AYODHYA CYCLE RIDE

चाकांवरचा कुंभ – दिवस दुसरा – सिन्नर ते धुळे (१९० किमी): Day 2: Sinnar to Dhule Cycle Ride

दिवसाची सुरुवात अजून आम्ही २०० किलोमीटरही पार केले नव्हते आणि थंडी ने आपला पगडा घालायला सुरुवात केली होती. पहाटे गरम दुलईतून उठून सर्व समान अवरून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे जरा जिकरीचे वाटू लागले. आम्ही दोघेही एकमेकांना तुम्ही आवरा … तुम्ही आवरा करत पाच मिनिटे पडतो म्हणून अर्धा तास असाच गेला. दोघांनाही आवरून रुमच्या बाहेर पडायला […]