चाकांवरचा कुंभ – दिवस पहिला – पुणे ते सिन्नर (१८७ किमी ): Day 1: Pune to Ayodhya Cycle Ride

दिवसाची सुरुवात

आयोध्येकडे निघायच्या एक दिवस अगोदर डॉ. एडके ताई यांनी आम्हाला सांगितले की दादा तुम्हाला निरोप देण्यासाठी येणार आहेत. कोथरूड मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणापासून या वारी ची सुरुवात करायची आहे तसेच आम्हाला निरोप देण्यासाठी काही सायकलस्वार आळंदीपर्यंत येणार आहेत. परंतु दादा आम्हाला निरोप द्यायला येणार म्हणाल्यावर आमच्यावर एका अनामिक दडपणासोबत रोमहर्षता आली होती.

कितीही पूर्वीपासून तयारीला लागलेलो असलो तरीही निघायला एक दिवस राहीला तरी ही आमची तयारी पूर्ण झाली नाही. सकाळी लवकर निघायचे त्यामुळे आदल्या रात्री लवकर झोपू असे ठरले असताना आवरा-आवर करेपर्यंत रात्रीचा एक वाजला तरीही बॅग भरून तयार नव्हती. शेवटी काय-काय राहिले? असा विचार करत पहाटे कधीतरी डोळा लागतो न लागतो तोच चार वाजल्याची घोषणा गजरभाऊंनी केली.

राहिलेल्या गोष्टी शोधता-शोधता होणाऱ्या खडखडीने माझी छोटी जागी झाली. लवकर आंघोळ उरकून मी शेवटची नजर सर्व तयारीवर मारत होतो. माझे सहकारी श्री. सुयोग शहा यांनी त्यांच्या घरी निरोप घेणेसाठी बोलवल्यामुळे तिथून त्यांच्या कुटुंबियांचा निरोप घेऊन मग सर्वजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाऊ असे ठरले.  दादा निरोप द्यायला येणार असल्याने आमच्या प्रवासाची सुरुवात सात वाजेपर्यंत होईल असे गृहीत धरून मी जरा निवांत होऊन माझ्या दुसऱ्या सखीला (दुसऱ्या सायकलला) व्यवस्थित ठिकाणी पार्क करून तिचा निरोप घेतला जणू ती तिला अयोध्येला घेऊन जात नसल्याने खट्टू झाली होती.

साडेपाच वाजता मी माझ्या वडिलांचे व गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन माझ्या कुटुंबाला निरोप दिला व सज्ज केलेल्या माझ्या प्रवास-सहचरणीला हाकारले. सोसायटीच्या आवरातल्या मिनमीणत्या प्रकाशतही माझ्या धर्मपत्नीच्या चेहऱ्यावरली काळजीची लकेर तर माझ्या छोट्या लेकीच्या भाबड्या चेहऱ्यावरील “पप्पा असे होऊन एकटाच कुठे चालला?” असा भाव मला भावनिक गर्तेत घेऊन जात होता.

सोसायटीतून मुख्य रस्त्यावर आल्यावर गणपती बाप्पाचे व रस्त्याचे दर्शन घेऊन त्याला साथ देण्याची गळ घालून श्री रामाचा जयघोष करत मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. रोड बाइकला तिच्यावर ओझे लादून तिला टुर बाइक केल्याने सायकल चालवताना थोडा विचित्र अनुभव येत होता. नेहमीप्रमाणे सायकल चा फ्लो नव्हता तसा अशी बाइक चालवायचा अनुभव मागील प्रवासादरम्यान आल्याने काही काळानंतर याची सवय होईल याची खात्री मला होती. त्यामुळे सुरुवातीला जरा संयमाने मी तिच्याशी जुळवून घेत होतो.

मनात काहीश्या संमिश्र भावणा होत्या, एका मोठ्या सायकल प्रवासाचे अनामिक दडपण, अयोध्येला जाण्याची ओढ, नवीन मैलाच्या दगडाला गवसणीची शिरशिरी तर माझ्या कुटुंबापासून दूर जातोय याची विरहयुक्त हुरहूर, अश्या भावणाकल्लोळाच्या मंद अंधारातून मी स्वतःला सावरत पुढे निघालो होतो.      

A group of cyclists in vibrant jerseys preparing for a long journey, standing beside their bicycles in a parking lot. The scene is illuminated by evening lights, and onlookers can be seen in the background.


थोड्याच वेळात मी सुयोग सरांच्या घरी पोचलो, तिथे सरांचे कुटुंबीय व आमचे मित्रमंडळ यांनी आम्हाला औपचारिक निरोप देऊन आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे निघालो. आम्ही दोघेही आजच्या दिवसाचे नियोजन करत जात होतो. खरे तर आम्ही पहाटे पाच वाजता राईड सुरू करू या हिशोबाणे आजचे अंतर जवळपास १९० किमी ठरवले होते परंतु दादांचे आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू करणे आमच्यासाठी  महतभाग्याचे असल्याने आम्ही पुढचे पुढे बघू म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर कोथरूड, पुणे येथे पोचलो.

पुण्यातून निरोप

A group of cyclists in helmets and jerseys poses for a photo with several individuals in formal attire in front of a statue of Chhatrapati Shivaji Maharaj.


आम्ही पोहोचायच्या अगोदरच तिथे  आमचे सायकल मित्र जमा झाले होते, त्यांनी आमचे जोशपूर्ण स्वागत केले. सर्वानी आम्हाला पुणे ते अयोध्या वारी साठी शुभेच्छा दिल्या, तिथे बरेच ग्रुप फोटो झाले. नवीन मित्रांची ओळख झाली. सर्वांना आमच्या प्रवासाचा लेखाजोखा आम्ही दिला जेष्ठ सायकलस्वारांनी आम्हाला मार्गदर्शनपर काही टिप्स दिल्या.  तिथे आम्हाला निरोप देण्यासाठी आमच्या सायकल मित्रांबरोबरच आमचे आप्तेष्ट, कुटुंबिय व इतर मित्रही मोठ्या संख्येने जमा झाले होते. सर्वांनी आम्हाला गराडा घालून शुभेच्छा देण्याची एकाच झुंबड उडाली होती त्यामुळे एक क्षण आम्हाला आमच्याच माणसात सेलिब्रिटी झाल्याचा भास होत होता.

एव्हाना सात वाजून गेले होते, थोड्याच वेळात माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांचा ताफा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आम्हाला निरोप देण्यासाठी आला. दादांनी आमची चौकशी केली, सर्व तयारी झाल्याबाबत खात्री केली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून त्यांनी जनतेला आमची आणि आमच्या पुणे ते आयोध्या या सायकल वारीची ओळख करून दिली त्यांनी आपल्या भाषणामध्ये आमच्या पुणे ते अयोध्या या सायकल वारीचा उद्देश, त्यामागची आमची सामाजिक जाणीव आणि त्या सामाजिक जाणिवेतून आमचा रस्ते सुरक्षा (रोड सेफ्टी) कार्यक्रमाचा उद्देश आणि महत्त्वा पटवून दिले. केवळ सायकलने अंतर कापणे आणि प्रदेश पालथे घालणे हे महत्वाचे नसून, हे करत असताना आपले समाजभान आम्ही जपत आहोत याचे त्यांनी कौतुक करून रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांना शिक्षित आणि प्रशिक्षित करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले व आम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातूनही महाराष्ट्रासारख्या  मोठ्या राज्याच्या अतिशय महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक असणाऱ्या दादांनी आमच्या एकदम छोट्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर दखल घेऊन आम्हाला मानसिक व आर्थिक भक्कम पाठींबा दिला तसेच बरेच सायकलस्वार आम्हाला आळंदी पर्यंत सोबत देण्यासाठी येणार असल्याने आम्ही हर्षउल्हासित होऊन मोठ्या आवेगाने अयोध्येकडे प्रस्थान करणार यात शंका उरली नव्हती.

A group of cyclists poses for a photo at the start of their journey, holding a banner that indicates their ride from Pune to Ayodhya. The background features a temple and street signs, with bicycles parked in front.

 आयुष्यभर लक्षात राहील असा निरोप सोहळा पाहून मी हरकून गेलो. सर्वांच्या कौतुकाच्या नजरा आमच्यावर खिळलेल्या. सर्वांची आमच्याशी हात मिळवून निरोप द्यायची धडपड बघून एक क्षण उर अभिमानाने भरून आला तर दुसऱ्याच क्षणी जबाबदारीची जाणीव होऊन जरा दडपण जाणवू लागले. मध्येच शरीराने साथ दिली नाही तर? मी हा पळकूटा विचार लगेच फेकून दिला आणि माझे अंतिम ध्येय त्या सावळ्या सुकुमार श्री रामाच्या नजरेत नजर मिळवून त्याच्या १४ वर्षाच्या वणवासाचे प्रतीक म्हणून माझ्या १४ दिवसाच्या कष्टाचा अभिषेक त्याच्या पायी घालायचा आहे. याची खडसावून स्वतःला जाणीव करून दिली.

थोड्याच वेळात दादांनी आम्हाला झेंडा दाखवून आमच्या पुणे ते आयोध्या वारीची अधिकृतरित्या सुरुवात केली. सर्वांनी आम्हाला श्री रामाच्या नामाची गर्जना करत आम्हाला निरोप दिला. जी मंडळी आळंदी पर्यंत सोबत येणार होती त्यांच्यासोबत आम्ही पुण्यनगरीच्या गर्दीमय रस्त्यावरून वाट काढत आळंदीकडे निघालो होतो.आळंदीरोडला लागेपर्यंत आठ वाजत आले होते. आम्ही पुढील प्रवासाची योजना आखत आळंदी जवळ करत होतो. आळंदी जवळ आल्यावर भोसरी वरून एक बाबा रोज सायकलवरून आळंदी वारी करत असतात त्यांची आणि आमची भेट झाली. गेले कित्येक वर्षे ते रोज न चुकता आळंदी वारी करत आहेत. त्यांनी आमच्या वारीचे कौतुक केले तसेच आम्हाला आशीर्वाद दिले. आमच्या वारीच्या सुरुवातीलाच अश्या अवलियाची भेट होणे जणू शुभसंकेत होता तो आमच्या वारीचा.

आळंदीतून पुढे प्रस्थान

थोड्या वेळात आम्ही आळंदी मंदिर परिसरात पोचलो, सर्वानी पुन्हा एकदा आम्हाला पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या. नऊ वाजून गेले होते आधीच उशीर झाल्याने आम्हाला पुढे निघायची घाई झालेली होती. डॉ. येडके मॅडम, श्री. तांबोळी सर व इतर सहकारी सायकलस्वार यांचा निरोप घेऊन आम्ही आळंदीतून पुढे निघालो, उशीर झाल्याने आम्ही आमच्या सायकली नाशिक रोडच्या दिशेने पिटाळल्या छोटासा घाट उतरून आम्ही आता उशीर झालाच आहे तर थोडी पोटपूजा करून घेऊ असे म्हणून चांगली जागा शोधू लागलो परंतु न्याहरी करण्यासारखी जागा काही आम्हाला मिळेना शेवटी मुख्य रस्त्याला लागल्यावर रोड च्या बाजूला एक जागा शोधून सोबत आणलेले भिजलेले शेंगदाणे व बदाम तसेच सरांनी आणलेले लाडू खाऊन पुढे निघायचा निर्णय घेतला.

१२ वाजत आले होते आणि आम्ही आताशी कुठे राजगुरूनगर पर्यंत पोचलो होतो आमच्या योजनेनुसार खूप मागे होतो आणि आज दिवस मावळेपर्यंत सिन्नर पर्यंत पोचू की नाही या बाबत पहिल्याच दिवशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आम्ही नियोजन करताना राखीव दिवस ठेवला नव्हता त्यामुळे रोजचे ठरलेले अंतर रोज कापणे आम्हाला अनिवार्य होते.

सायकल चालवत असलेल्या दोन व्यक्तींचे सेल्फी, ट्रैकिंग कॅमेरासह, गडद हिरव्या वनस्पतींच्या पार्श्वभूमीसह.

पुढचा तास दीड तास आम्ही थोडा स्पीड वाढवून तीस पस्तीस किलोमीटर अंतर कमी केले. वाटेत नीरा विक्रेता दिसल्यावर मी सुयोग सरांना म्हणालो चला नीरा घेऊ यावर त्यांनी मला आश्चर्याने विचारले तुम्ही नीरा घेता? मी हसून म्हणालो नीरा आहे ताडी, माडी, दारू नाही. यावर आम्ही नीरा पिलो त्यांनी पहिल्यांदा नीरा पिली होती त्यांना काही आवडली नाही तसेही पुन्हा पुण्यात येईपर्यंत सहजासहजी नीरा मिळणार पन नव्हती.

पहिला दिवस जोशपूर्ण सायकलिंग करण्यात जात होता. तरीही आम्ही शक्ति पहिल्याच दिवशी खर्च होऊ नये याची काळजी ही घेत होतो. मला उपवास असल्याने दुपारचे जेवण घेतले नाही त्याऐवजी आम्ही एके ठिकाणी थोडे-थोडे खाऊन पुढे निघत असू.


पहिले तीन दिवस चढाई आहे ही गृहीत धरूनच आम्ही नियोजन केले होते. परंतु मोकळी रोड बाइक पिटाळणे आणि तिच्यावर वीस-बावीस किलो सामान लादून चालवण्यात खूप फरक आहे याचा विचार करून ही येणारी चढाई जरा जास्त वाटत होती.

पंधरा – वीस किलोमीटर चे टप्पे करत व प्रत्येक टप्प्यावर पाणी  व दुपारी सोबत घेतलेला खाऊ खात आम्ही मजल दर मजल करत जात होतो. दिवस मावळायला आला होता आणि अजूनही जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर चा प्रवास बाकी होता. पहिल्याच दिवशी आम्हाला अंधारात सायकल चालवावी लागणार होती.  

दिवसभर चढण – उतरणीच्या खेळात संगमनेर च्या अलीकडे एक मोठा उतार लागला परंतु रस्ता सायकल साठी आदर्श नसल्याने आम्ही ब्रेक लावत लावत तो दीर्घ उतार उतरलो आणि थोड्या वेळात संगमनेरला पोचलो. संगमनेर ओलांडेपर्यंत गुडुप अंधार पसरला होता. अजून आम्हाला किमान ३० ते ३५ किमी अंतर पार करायचे होते.

सोबत घेतेलल्या नवीन लाइटचा प्रकाश प्रखर होता लाइट मस्त प्रकाशझोत टाकत अंधाराच्या मनात धडकी भरवतसायकल ने वेग पकडला होता. हवेत गारवा चांगलाच जाणवत असल्याने सायकल दामटवायला मज्जा येत होती. पंचवीसएक किलोमीटर अंतर कापल्यावर लाइटवर दव जाणवायला लागले. सकाळी आम्हाला सिन्नर मधील गोंदेश्वराचे दर्शन घ्यायचे होते तेव्हा थोडे अलीकडे थांबू पहाटे राहिलले अंतर पार करू उजेडात मंदिर पाहून आणि मग पुढे निघू असे नियोजन करून दहा किलोमीटर च्या आसपास अलीकडे आम्ही लॉज शोधू लागलो लवकरच आम्हाला सत्कार हॉटेल मध्ये राहण्यासाठी आसरा तसेच मला उपवासाचे फराळ व सरांना रुजकर जेवण मिळाले.

फ्रेश होऊन आम्ही व सायकली एकाच रूममध्ये झोपी गेलो. अश्या रीतीने आमच्या पहिल्या दिवशीचा प्रवास आम्ही सफल संपूर्ण केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

A cyclist stands next to a brightly lit 'प्रयागराज' sign at night, with bicycles parked nearby.

चाकांवरचा कुंभ-दिवस दहावा-बांदा ते प्रयागराज (१७० किमी): Day 10: Banda to Prayagraj Ride

कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे जाऊन चित्रकुट वरून प्रयागराजला जाण्याऐवजी आम्ही आता थेट राजापूर मार्गे प्रयागराजला आज जाण्याचे ठरवले होते. रस्ता कुठे एकेरी तर कुठे दुहेरी आहे परंतु रोड चांगला आहे.  आम्ही १७० किमी अंतर आज पार करणार होतो आणि लवकर पोचायचे असेल तर लवकर […]

pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ – दिवस पाचवा – उज्जैन ते ब्यावरा (१५३ किमी): Day 5: Ujjain to Biaora Cycle Ride

थंडी इतकी होती की अंथरुणातून बाहेर पडायचे फारच जिवावर आले होते. तुम्ही पहिले आवरा,  तुम्ही पहिले आवरा मध्ये आम्हाला रूम सोडून बाहेर पडायला साडेपाच वाजून गेले होते. सर्व सोपस्कार करून सायकली सज्ज केल्या आणि आम्ही उज्जैन च्या गल्ली – बोळातून निघालो कि लगेच काही मीटरवर गरम – गरम पोहे, दूध पाहून आम्ही तिथेच नाश्ता करायचे […]

A person standing next to a stone monument featuring a carving of a horse rider with a sword, inscribed with text in Hindi, against a backdrop of a stone wall and misty weather.

चाकांवरचा कुंभ-दिवस सातवा-लुकवासा ते झाशी (१४२ किमी): Day 7: Lukwasa to Jhansi Ride

आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला […]