PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासात काल ठरल्याप्रमाणे आज आम्ही लवकर म्हणजे पहाटे सव्वा तीन वाजता उठलो सगळे आवरून खाली आलो आणी आमचे बिऱ्हाड सायकल वर लादणार तोच माझ्या लक्षात आले कि माझ्या सायकल चे पुढील चाक बसले आहे. झाले जो वेळ आम्ही लवकर निघण्यासाठी राखून ठेवला होता तो आता पंक्चर काढण्यात जाणार होता तरीही आम्ही फक्त ट्यूब बदली केले आणि तिथून लवकर प्रवासाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतु आमची लवकर निघण्याची योजना आता फसली होती.
खरे तर पुढचा प्रवास खडतर होणार आहे याची जाणीव आम्हाला कालच झाली होती तथापि आम्ही चित्रदुर्ग किल्ला पाहायला पायपीट केल्याने आम्हाला खूप थकल्यासारखे जाणवत असावे आसा कयास करून आम्ही पुढे काही रस्ता चढाईचा नसेल आणि आता प्रवास सुसाहाय्य होईल अशी आशा करून आज लांब पल्ला गाठायचा असा उमेदीचा ठराव केला होता.
पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही आजच्या दिवसाचा प्रवास सुरु केला. वातावरण नेहमीप्रमाणेच मंद थंडीत उबदार सायकलिंग हवे-हवेसे वाटणारे पण ते फक्त मनाला पाय आता तक्रार करू लागले होते जणू त्यांनाही रोज-रोज च्या इडली डोस्या प्रमाणे या पायपिटीची उब आली होती.
आज चंद्र बराच वेळ सोबती होता जणू तो ही या तक्रारदार पायांची समजूत घालत होता. ही वेळ तक्रार करण्याची नाही प्रवासाचा आनंद घेण्याची आणी देण्याची वेळ आहे जणू तो थकलेल्या शरीराला त्याच्या शीतल प्रकाशाने समजावत होता.
कधी-कधी गर्द झाडी तर कधी विस्तीर्ण माळरान त्या अंधुक प्रकाशातही त्याची विस्तीर्णता त्याच्या मिणमिणत्या जुन्या दिव्यांनी दर्शवीत होता.
आज सूर्योदय झाला तरीही चंद्रमा अजूनही आमच्या पाटीमागे चालत होता जणू कष्टी सासुरवासिन लेकीला गाडी निघाली तरीही आईने थोडा वेळ मागे मागे यावे.
इतके दिवस सतत चढाईचा रस्ता होता निदान आज तरी आपल्याला सपाट रस्ता मिळेल हि आमची भाबडी आशा आत्तापर्यत तरी फोल ठरली होती. रस्ता सामोर चढत जाणाराच होता. काही वेळ मन रमवत आम्ही रस्ता पार करत गेलो. परंतु सकाळी साडेआठ च्या सुमारास सुयोग सरांच्या पायात पेटके (क्रॅम्प) यायला सुरुवात झाली. आता काही वेळ थांबण्यावाचून पर्याय नव्हता. आम्ही संपर्ण प्रवासात पायांना पेटके (क्रॅम्प) येऊ नये म्हणून खूप काळजी घेतली होती. शरीरातील पाणी व मिठाचे प्रमाण कमी न होऊ देता पायांना योग्य स्ट्रेचिंग देऊन आत्तापर्यंत चा प्रवास केला होता परंतु आज त्यानी आम्हला खिंडीत गाठावे तसे गाठले होते.
बंगलोरला पोचण्याचे ध्येय आम्ही केव्हाच सोडून दिले होते आज जेव्हडे कापले जाईल तेव्हडे अंतर आमच्यासाठी ठीक होते बाकी राहिलेले अंतर पुढील काही दिवसांत कव्हर करू अशी योजना आखून आम्ही हळू-हळू पुढे निघत तर कधी पाणी आणि स्ट्रेचिंग साठी थांबून त्यांच्या पायांना जेव्हडे पूर्वपदावर आणता येईल तेव्हडे प्रयत्न करून सायकलिंग करत होतो.
“पुढच्याच ठेच मागचा शहाणा” या म्हणीप्रमाणे मी आता अधिक सावध झालो होतो. सक्तीने पाणी ब्रेक घेणे, शक्य तेव्हड्या हलक्या गियर वर सायकल चालवणे तसेच उन्हाचे एखाद्या ठिकाणी आराम करण्याचे ठरवून आम्ही प्रवास चालूच ठेवला.
शिरा शहराच्या पुढे आम्हाला हॉटेल “कामत” दिसले तेव्हा आम्ही तिथेच नाश्ता व थोडा वेळ आराम करण्याचे ठरवून हायवेवरून खाली उतरलो.
४० ते ४५ किमी अंतर पार केले होते सकाळचे साडे सात वाजले असतील पण आजचा दिवस आमची परीक्षा घेतोय असे दिसत होते. आमची एकंदर परिस्थिती पाहता अजून १०० कि.मी. अंतर आज दिवसभरात इथून पुढे होईल याबाबत आम्ही विचार करणे सोडून दिले होते. पुढच्या १० कि.मी. चाच फक्त विचार करत होतो.
रस्त्याने मन रमवत जाताना आम्ही रोडच्या कडेला असलेल्या बोरीचे बोरं हि खात ही काही वेळ घालवला.
थोड्या थोड्या अंतराने सुयोग सरांना पायात पेटके येऊ लागल्याने आम्हाला काही वेळ आहे तिथेच काही वेळ थांबावे लागे. एके ठिकाणी आम्ही मग खायला फरसाण / सुकी भेळ व इतर सटर फटर खाण्याचे पदार्थ घेतले व थोडे पुढे जाऊन एका गर्द सुपारीच्या बागेत जाऊन थोडा आराम थोडा फराळ केला आणि मनाचा हिय्या करून पुढे निगलो.
अजून ११ ही वाजले नव्हते तरी उन चांगलेच चटकत होते. काही अंतर स्वतःला स्फुरण देत सरांनी अजून काही किलोमीटर अंतर कमी केले साडेबारा च्या आसपास रणरणत्या उन्हात त्रास वाढल्यावर आम्ही बाजूच्या तुमकूरु शहरात जाऊन वेदनाशामक स्प्रे घेण्याचे ठरवले गुगलबाबा काही अंतरावर मेडिकल स्टोर दिसत होते म्हणून आम्ही मुख्य हायवे सोडून तुमकूरु शहराच्या दिशेने निघालो.
रस्त्याच्या कडेला बाजार भरलेला होता आसपासच्या गावातील लोक चारचाकी वाहनाने त्यांचा माल घेऊन रांगेत उभे होते तर काही आपला माल उतरवत होते. शहरात प्रवेश करताच सुयोग सरांची सायकल पंक्चर झाली. इतके दिवस बिनाकुरकुर साथ दिलेल्या आमच्या सायकलींनी आज मात्र आढेवेढे घ्यायला सुरुवात केली होती सकाळी माझी तर भर दुपारी सरांची सायकल पंक्चर झाली.
एका बंद दुकानासमोर आम्ही सायकल चे ट्यूब बदलले. लोक घोळक्यांनी उभे राहून यांचे काय चाललेय ते पाहत आमच्याशी तोडक्या मोडक्या हिंदीत बोलत होते.
एव्हाना दोन वाजत आले होते ९० किमी पर्यत आजचे अंतर पार केले होते पण आम्हाला जणू आम्ही दीडशे चा टप्पा पार केला आहे इतकी उर्जा खर्च झाल्याची भावना होत होती.
शक्य होईल तिथे आम्ही नारळ पाणी पीत आमची उर्जा कमी होणार नाही याची काळजी घेत होतो. पुढे एका मेडिकल मधून आम्ही वेदनाशामक स्प्रे घेतला.
तीन वाजून गेले होते आणि आमच्या योजनेचे ही तीनतेरा झाले होते, तेंव्हा आता जेवण करून पुढे मुक्कामाची सोय होते का पाहू असे ठरवून आम्ही शहराच्या बाहेर पडलो की चौकातल्या Hoysala Food Court नामक हॉटेल मध्ये जेवण घेतले आणी पुढे निघालो.
पायाला अजून जास्त त्रास दिला तर परिस्थिती अजून बिघडू शकते व मग पुढील प्रवास शक्य होणार नाही हा विचार करून आम्ही आज पायाला पूर्ण विश्रांती देऊन राहेलेले अंतर पुढील काही दिवसात कव्हर करू असा विचार करून आम्ही तुमकूरु शहर सोडून पुढे कुठे लॉज / हॉटेल मिळते का ते पाहत निघालो.
शहरापासून वीसएक किलोमीटर वर डोब्बास्पेट (ढोलकीवरील थाप) या गावात आम्हाला एक लॉज मिळाला रूम जेमतेम होती शिवाय गरम पाणी हि नव्हते परंतु आज गर्मी खूप जाणवत असल्याने आम्ही गार पाण्याने अंधोळ उरकली. शिवाय साडेपाच वाजताच रूम मिळाल्याने आम्ही उरलेल्या वेळात आमच्या सायकल चे गियरही डीग्रेस केले (धुतले) परंतु बरेच फिरूनही आम्हाला ऑइल भेटले नाही. तेंव्हा उद्या सकाळी एखाद्या पेट्रोल पंपावर घेऊ असे ठरवले.
रात्री डोसा खाऊन उद्याचे उद्या पाहू म्हणून अंथरुणावर पडलोकीच निद्रेच्या अधीन झालो.
सलग काही सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या संघाने एखाद्या सामन्यात अतिशय सुमार खेळ करावा तसे आमचे आज झाले पुरसा वेळ असतानाही आम्ही आज आमच्या योजनेच्या किमान ५० किमी मागे पडलो होतो.
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[थूथुकुडी ते कन्याकुमारी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४० किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.