PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासात काल आम्ही २० ते ३० किमी अंतर जास्त कापले होते तसेच काल रात्री शहरात फिरल्याने आम्हाला जरा दमल्याची भावना होती. तेंव्हा आज सकाळी जरा उशिरानेच म्हणजे सगळे उरकून, सगळे सामान सायकल वर लादेपर्यंत सव्वापाच झाले होते. आम्ही दावणगेरे शहराचे आभार मानून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करून आजच्या स्वारीवर निघालो.
मजबूरलेले हात पहाटेच्या थंडीतही कामावर लागले होते. आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी होतो त्या ठिकाणी फुलबाजार भरत होता. रस्त्याच्या दुतर्फा ताज्या नाजूक फुलांच्या पाट्या रापलेले हात उतरवत होते. सुंदर फुलांच्या सुगंधी ताटीत उभ्या फुलवाल्याच्या माथ्यावर “एव्हडी फुले विकली जातील ना?” च्या काळजीची लकेर त्या अंधुक प्रकाशातही लख्ख दिसत होती. पुढे जागोजागी दुध,भाजी, वर्तमानपत्रे शहर जागे व्हायच्या आता घरी पोचण्याचा प्रयत्न करत होते.
सहा वाजेपर्यंत आम्ही शहर सोडून मुख्य हायवे वर आलो होतो. एरव्ही उजव्या बाजूने साथ देणारा चंद्र आज अगदी पाठीमागे होता. जणू थकत चालेल्या पावलांना शीतल आधार देण्यासाठी तो बरोबरीणे चालण्याऐवजी मागे झाला आहे.
आता नारळी आणि पोफळी च्या बागा वाढल्या होत्या. दुतर्फा या उंच बागांमुळे उजाडले तरी अंधार वाटत होता. एव्हाना चंद्रही वाटे लावायला आलेल्या यजमानासारखा आता नाहीसा झाला होता. प्रशस्त रोड वरून विरळ वाहतुकीत दुतर्फा गर्द झाडीतून अभंगवाणी ऐकत सायकल चालवायची मजा काही औरच!.
एरव्ही डाव्या बाजूने दर्शन देणारे सूर्यदेव आज चक्क सामोरी येणार होते. जणू आता त्यालाही आत्मविश्वास आला आसावा कि हे आता बाजी मारणारच.
आज एकूण कापायचे अंतर कमी असले तरी आज आम्ही वाटेत येणाऱ्या चित्रदुर्ग येथील प्रसिद्ध चित्रदुर्ग किल्ल्याला भेट देणार होतोत. त्यामुळे मध्ये जास्त वेळ न थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला होता खरा परुंतु समोर गर्द झाडीपलीकडे वणवा भडकावा तसे क्षितीज लांबपर्यंत लाल झाले होते. आजूबाजूची इवलेशी घरे पहाटेच्या साखरझोपेत आईच्या कुशीत शिरावे तसे पोफळीच्या बागेच्या कुशीत अजूनही गाढ झोपेत होती. कितीही अरसिक असाल तरीही काही क्षण का होईना स्तब्ध होईल असे दृश्य समोर होते.
कित्येक वर्षे मृत ज्वालामुखीतून अचानक लालबुंद लाव्हा पर्वताच्या परती उधडून बाहेर पडावा तसा काही क्षणातच अंधाराची परत उधडून लालबुंद गोळा झाडीच्या आडून वर आला जणू लालबुंद लाव्हारस समोरच्या झाडांमधून वाहत क्षणार्धात समोर उभा ठाकेन. सभोवतालचे धुके जणू त्याच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख होती. आणखी काही क्षणात तो लालबुंद गोळा त्या गर्द झाडीच्या वर आला आणि एकदम रोद्र वाटणारे त्याचे रूप अगदी पालटून तो सामोरा सूर्य जणू कपाळभर कुंकू लावणाऱ्या माझ्या आजीच्या कपाळावरील कुंकू वाटू लागला. त्याची लाली अगदी समोरच्या रस्ताभर पसरली होती. जाणू पहिल्यांदा त्याने आमच्यासाठी पायघडी घातली आहे.
असेच मंत्रमुग्ध होऊन आम्ही त्या लालसर पायघडीवरून पुढे चालू लागलो. कालच्या पेक्षा परिसर आता खूपच वेगळा वाटत होता चौफेर गर्द झाडी आणि सुपारीच्या बागा यांनी परिसर वेढुन टाकला होता.
आता नाश्ता थेट चित्रदुर्ग येथे करू असा निर्धार करून आम्ही आमच्या सायकली दामटवल्या. आता गर्द झाडीचा परिसर संपून आम्ही जरा उघड्या रोड वर आलो. आता पोफळीच्या बागा ऐवजी पुन्हा कपाशी मका यांचे शेतं दिसू लागले. शक्यतो इतल्या कमी अंतरात पिकांच्या प्रकारात इतका कमालीचा फरक पाहून मला नवल वाटले.
सकाळी आदर्श वातावरणात अंतर कापले तर पुढील नियोजन सोपे जाते म्हणून सायकलिंग वर जास्त लक्ष केंद्रित केले.
चित्रदुर्ग आता जवळ आले होते. रोडवर गर्दी हि वाढली होती. दहा वाजेपर्यंत आम्ही ६० ते ६५ किमी चे अंतर पार केले होते. पोटात कावळे ओरडत होते तेंव्हा लवकर शहरात पोचून आधी नाश्ता करू आणि मग पुढचे पुढे ठरवू असा विचार करून शहराजवळील स्वच्छ तळ्यांचा सत्कार स्वीकारून शहरात प्रवेश केला. एका चौकात थांबुन पहिला नाश्ता उरकून घेतला. पोटोबा शांत झाल्यावर मग आम्ही ठरवले की चित्रदुर्ग किल्ला पाहून पुढे जाऊ तसेही आज तसेही काही फार अंतर कापायचे नव्हते.
गुगलबाबाच्या कृपेने भाषेची अडचण असतानाही सर्व काही सुरळीत पार पडत होते. आम्ही आकरा, सव्वा आकरापर्यंत किल्ल्याच्या आवारात पोचलो परंतु तिथे सायकल लावयला जागा नव्हती तेव्हा एक-एक करून किल्ला पाहायला जायचे ठरले त्यामुळे वेळ जास्त जाणार होता परंतू आसपासच्या गावांमधून खूप शाळांच्या सहली तिथे आल्या होत्या व मुले कुतूहलाने आमच्या सायकलींना पाहताना गियर बदलत होते त्यामुळे अश्याच सायकली बाहेर सोडणे धोक्याचे होते.
पहिल्यांदा सुयोग सरांनी किल्ल्यात प्रवेश केला त्यांना परत येईपर्यंत मी सायकलपाशी थांबणार होतो. तसा किल्ला बाहेरून छोटा वाटत होता तेंव्हा फार वेळ लागणार नाही हा आमचा कयास होता. मिळालेल्या वेळात मी तिथे आलेल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. काही विद्यार्थी चांगले हिंदी बोलत होते त्यांना तिथे अभ्यासक्रमातच काय पण दैनंदिन जीवनातही हिंदीचा संबध येणार नाही याची काळजी घेतली जात असावी कारण ज्या काही एक दोन विद्यार्थ्यांना हिंदी येत होती ती त्यांनी लहानपणी हिंदी कार्टून व आता क्रिकेट सामन्यांचे समालोचन हिंदीत ऐकून त्यांनी हिंदी आत्मसात केली होती. हा त्यांचा आपल्या मातृभाषेप्रती अत्यंतिक लगाव होता कि हिंदीप्रती द्वेष कि आपले वेगळेपण टिकवण्याचा अट्टाहास कि इतर भाषेच्या अतिक्रमाणामुळे मातृभाषेच्या र्हासाची भीती की अजून काय कुणास ठाऊक?.
बऱ्याच जणांनी चौकशी केली, कौतुक केले, माझ्यासोबत सेल्फी हि काढल्या सुयोग सर परत येईपर्यंत चा वेळ कसा गेला ते कळलेही नाही.
आता माझी बारी होती, सुयोग सरांकडे सायकली सोडून मी किल्ल्यात प्रवेश केला. प्रथमदर्शी छोटा वाटलेला किल्ला नागमोडी बंदिस्त वाट चालून गेल्यावर एका मागे एक लागणारे दरवाजे पार केल्यावर कळले कि हा किल्ला तर खूप मोठा आहे आणि इतक्या कमी वेळात किल्ला पूर्ण पाहणे शक्य नाही तेंव्हा जेव्हढा नजरेस भरेल तेव्हढा पाहून घेऊ अशी मनाशी गाठ बांधून मी अधाश्यासारखा एक एक गोष्टी डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. कित्येक दिवस उपाशी माणसाला अचानक समोर पंचपक्वान्न यावे अन त्याचा अभूतपूर्व गोंधळ उडून सर्व पदार्थ खाण्याच्या नादात त्याने एक एक पदार्थ अर्धवट खात सुटावे तसा मी भरभर परिसर व्यवस्थित न पाहता पुढे पळत होतो.
कित्येक वेळा तिथल्या पायऱ्या चढताना मला सिंहगडाची आठवण झाली. सुयोग सरांनी सांगितल्याप्रमाणे एक दरवाजा पास करून जाताच तिथला प्रसिद्ध मंकी मॅन श्री ज्योथी राज यांची भेट झाली आधीच त्यांना सुयोग सरांनी आम्ही पुण्याहून सायकल ने आलेलो आहोत याची कल्पना त्यांना दिली होती त्यांनी मला पाहताच “अरे और कितने लोग आये है पुणेसे?” असा प्रश्न विचारून चौकशी केली, त्यांच्यासोबत सेल्फी काढून त्यांचा निरोप घेतला.
या किल्ल्यावर जागोजागी खूप मोठमोठाल्या शिळा होत्या, काही ठिकाणी तर या गोल शिळा एकमेकिंना खेटून उभा असल्याने तिथे गुहा तयार झालेल्या आहेत. तिथल्या पायऱ्या चढताना मला सिंहगडाची आठवण झाली. एकूण हा संपर्ण किल्लाच मोठमोठ्या शिळांवर उभारलेला आहे. दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा आणि पुरातन जलसंधारणाचा उत्तम नमुना म्हणजे या किल्ला होय.
उंचवट्यावरून हा किल्ला पाहिल्यास येथे खूप मोठ मोठ्या ग्रॅनाइटच्या शिळांनी वेढलेला आहे. जणू काही अजस्त्र हिडींबेने हा डोंगर उखडून अस्ताव्यस्त केला आहे. संपूर्ण किल्ला हा अश्या शिळांनी व्यापलेला आहे.
येथे द्रविडीयन स्थापत्यशैलीत अत्यंत गुंतागुंतीची कोरीव कामे केलेली सुमारे १८ विवध मंदिरे,राजवाडे व तब्बल २००० टेहाळनी बुरुज आहेत. उन्हाळ्यात वातावरण थंड ठेवण्यासाठी मातीच्या भिंतीचे महालाचे अवशेष तिथे आहेत. इतकेच काय ठार या किल्ल्यावर टाकसाळ हि होती असे म्हणले जाते.
उंच दीपस्तंभ व मोठाल्या कमानी आज हि तिथे उभ्या आहेत. डोंगरातून वाहणाऱ्या दोन नद्यांचे पाणी एकत्रित करून किल्य्यावर पाण्याची कधीच कमी होऊ नये महणून केलेले व्यवस्थापन पाहण्यासारखे आहे.
तिथे अनेक गुप्तवाटा ही आहेत त्यातल्या एका गुप्त वाट आजही ओनाके ओबव्वा यांच्या असीम शौर्याची गाथा आजही सांगत आहेत.
वेळेच्या अभावाने किल्ला संपूर्ण पाहता आला नाही. आम्हाला अजूनही बराच पल्ला गाठायचा होता. तेव्हा नाखुशीनेच मी माघारी फिरलो.
भर दुपारी शहरातून बाहेर पडून पुढे वाटचाल करणे क्रमप्राप्त होते. उशीर झाला असला तरीही आजचे अंतर वेळेत कापू हा विश्वास आम्हाला होता. भर उन्हात आम्ही शहर सोडून मुख्य हायवे वर चढलो. आता स्थानिक लोक आम्हाला थांबवून आमची चौकशी करू लागले होते. त्यातील काही जणांनी आम्हाला सांगितले की थोड्या अंतरावर हनुमान मंदिर आहे तुम्ही तिथे नक्की भेट द्या.
थोडे अंतर जात नाही तोच हायवे च्या डाव्या बाजुला आम्हाला निर्माणाधीन मंदिर नजरेस पडले. आम्ही मंदिरात जाऊन सोबत घेतलेली केळी खाऊ असा विचार केला परंतु आम्ही मंदिरात जाताच मंदिरातील समस्त भक्तांनी आम्हाला गराडा घातला आणि आमच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यांना आमचे खूप कौतुक होते. सायकल पासून ते आम्ही काय काय काळजी घेतो, प्रवास कसा केला या सगळ्यांची त्यांनी चौकशी केली. इथे काही आपल्याला निवांत बसून केळी खाता येणार नाही याची जाणीव होताच आम्ही हनुमंत रायाचे दर्शन घेतले आणि त्या समस्तजणांचा निरोप घेतला.
पुन्हा हायवेला लागून आम्ही काही अंतर कापले आणि एका ठिकाणी चांगली जागा पाहून सोबतच्या केळीवर ताव मारला.
हळू हळू अंतर कमी होत होते तस तसे उन ही कमी होत होते. भला मोठ्ठा हायवे आणि त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं त्यात राबणारी काळवंडलेली हातं पाहून मी केव्हाच त्याच्यात मिसळलो होतो.
हिरीयूर शहर जे कि चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे आता जवळ आले होते पाच वाजत आले होते आणि आजही आम्ही दुपारी फक्त केळी खाल्ली होती त्यामुळे आता लवकर रूम फायनल करून जेवण करण्याचे ठरल्याने आम्ही गुगलबाबाच्या मदतीने हॉटेल / लॉज शोधू लागलो.
आता आमचे शरीर तक्रार करू लागले होते. संध्याकाळी कधी आराम करण्यासाठी अंथरुणावर पडतो असे होऊ लागले होतो.
आज इथे आराम करून उद्या सकाळी लवकर निघू आणि पुढचा मुक्काम बंगलोरला करू असा मनसुबा करून आम्ही लवकरात लवकर मिले त्या ठिकाणी मुक्काम करण्यासाठी ठिकाण शोधू लागलो.
शहराच्या बाहेर पडल्यावर आम्हाला Anil Comforts (अनिल कॉम्फोर्टस) नावाचे चांगले हॉटेल / लॉज मिळाले मस्त आंघोळ उरकून आम्ही बाजूच्या श्री रेणुकाम्बा धाब्यावर मनसोक्त जेवण घेतले त्यानी आम्हाला ताज्या छान पोळ्या चविष्ट भाजीसोबत दिल्याने आम्ही काही दिवसानंतर भरपेट खाऊन गेल्या काही दिवसांपासून चांदोबा सकाळ संध्याकाळ सोबत करत होता त्याच्याशी गप्पा मारत थोडी शतपावली केली आणी रूमवर येऊन अंथरुणावर पाठ टेकवताच निद्रेच्या आधीन झालो.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या प्रवासाचा आणखी एक दिवस पार पडला होता
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[थूथुकुडी ते कन्याकुमारी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४० किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.