PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या सायकल प्रवासाची आज शेवटची राईड होती आणि आता आम्ही अलार्म वाजण्याआधी उठू लागलो होतो आजही आम्ही उठून एकमेकांकडे पाहून कसे वाटतेय म्हणून एकमेकांचा अंदाज घेऊ लागलो. आज शेवटचे लाईट, लगेज, कपडे आवरायचे होते. शेवटचे सायकल वर हे सर्व लादायचे होते. आम्ही आत्तापासूनच भावविभोर होऊ लागलो होतो.
आता PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या सायकल प्रवासाचा शेवटचा टप्पा कश्याचाही विचार न करता म्हणजे आत्तापर्यंत आम्ही पायाला पेटके (Cramps) येऊ नये म्हणून विशेश काळजी घेत होतो. परंतू आता आम्ही राहिलेले अंतर वेगाने पार करणार होतो अर्थात “बूड” किती साथ देईल यावर आमचे वेग अवलंबून होता.
सगळे आवरून सायकल तयार करेपर्यंत साडेपाच वाजले होते तेंव्हा आम्ही आता अधिक उशीर न करता शेवटचे एकदा शिवरायाचे नाव घेत पेडल मारले.
थूथुकुडीचे ठिसूळ रोड ठेसाळत पार करत आम्ही आमचा प्रवास सुरु केला होता असेच शहराबाहेर पडून आम्ही स्थानिकांच्या मदतीने समुद्रकिनारी मार्ग विचारून तिकडे कूच केले. आणि आम्ही शक्य होईल तेव्हड्या वेगात अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो सकाळी-सकाळी जेव्हडे अंतर पार होईल तेव्हडे आम्हाला आज लवकर पोचता येणार होते.
कालच्या मानाने आज वेदना कमी जाणवत होत्या पण आता त्याची तमा आम्ही बाळगणार नव्हतो. किनारी मार्ग कधी एकदम छोटा म्हणजे दोन गाड्या कश्याबश्या एकावेळी रोडवर बसतील एवढाच. शहरातून बाहेर पडल्यावर घनदाट झाडी त्यात नारळी आणि पाम च्या बागा आता पुन्हा येऊ लागल्या होता. हवेत लवकर दमटपणा जाणवेल तेव्हा सकाळी सात-आठ पर्यंत किमान ५० किमी तरी अंतर पार झाले पाहिजे या हिशोबाने आम्ही त्या एकेरी रोडवरून सायकल दामटवत होतो.
आता हळू-हळू बाजूच्या काटेरी बाभळीतून अंधार काढता पाय घेत होता. आजचा सूर्योदय आमच्यासाठी खास होता इतके दिवस तो आमच्या घामाच्या धारांचा साक्षी होता. आज एक अंतिम घामाळलेला अध्याय तो लिहणार होता. जणू तो हि यासाठी अधीर होता. थोड्यास वेळात आमच्या डाव्या बाजुच्या गर्द बाभळीच्या काटेरी जाळी भेदत किरणे आम्हाला भेटायला येऊ लागली.
आज ओझरती भेट घेऊन चालणार नव्हते म्हणून आम्ही मनभरून त्या सुर्यसख्याचे स्वागत केले. मग त्यानेही आमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपले प्रतिबिंब समोरच्या पाण्यात दर्शवून जणू तो मनोभावे दोन्ही हातानी आमच्या कष्टास आलिंगन देत होता. जणू तो साक्ष देत होता आमच्या पराकाष्ठेची, तो साक्षी होता त्या प्रत्येक क्षणाचा जेंव्हा आम्ही कोसळून पुन्हा झेप घेत होतो. तो हिशोबनीस होता प्रत्येक फिरवलेल्या पायडलचा.
चांगले उजाडल्यावर अजूनही मागच्या पुराच्या नुकसानीचे पुरावे आजूबाजूला दिसू लागले होते. अजूनही केळीचे बागा अर्ध्या चिखलात उभ्या होत्या. दोन्ही बाजूने केळीच्या बागा नाहीतर वेड्या बाभळीच्या बनातून आम्ही नागमोडी रस्ता निश्चलपणे पार करत होतो.
इतके दिवस सोबत राहून आता रस्ता ही आमचा चांगला मित्र झाला होता, गेले काही दिवस आम्ही एकमेकांचे सुख दु:खे समजून घेत आलो होतो. त्याची विविध रूपे अनुभवत आलो होतो. कधी तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपणारा तर कधी भर दुपारी रागाने गरम होऊन परीक्षा घेणारा. कधी अवखळ नागमोडी झुलवणारा तर कधी सरळसोट ताठर म्हाताऱ्या सारखा तिरसट. कधी त्याने चढावर आमचा घाम काढला तर कधी उतारावर हळूवार फुंकारले सुद्धा. कुठे तो ओलसर हृदयाच्या आजीसारखा तर कधी कोरड्या नातेवाइकासारखा खडकाळ खोचक परीक्षा घेणारा. कुठे नवश्रीमंताने श्रीमंती दाखवावी तसा आकडू पण दिमाखदार तर कुठे फाटक्या बापाने लेकराला जगाचा धडा सांगावा तसा उसावलेला पण जमिनीशी नाते जपणारा. कधी तो हजार दु:खे काळजात लपवून लेकराला त्याच्या ध्येयाकडे झेपावणारी माय तर कधी संसाराचा गाडा ओढताना अपार कष्टाने दुभांगलेल्या बापासारखा दुभंगलेला. त्याने आयुष्याच्या चढाईवर हिम्मत न हारण्याचा तर सुखाच्या उतारावर हुरळून न जाता पुढच्या चढाई पार करण्याची तयारी करण्याची शिकवण तर दु:खाच्या खडबडीत रस्त्यावर खचून न जाता धीराने पार केल्यावर पुढे गुळगुळीत सपाट सुखाचे क्षण येणार आहेतच याची ग्वाही देत होता. आणि सर्वात मोठी शिकवण त्याने आम्हाला दिली ती म्हणजे “ध्येयाकडे जाणाऱ्या वाटेवर निर्धाराने चाल केली तर तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय गाठू शकता”.
आमच्या PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या सायकल प्रवास यात्रेचे आज सर्व कसे शेवटचे होते, शेवटची राईड, शेवटचा सूर्योदय, शेवटचा नाश्ता, शेवटचे काही किलोमीटर, आणि बरेच काही निदान या यात्रेपुरते तरी शेवटचे होते.
आठ च्या सुमारास आम्हाला तामिरबरणी नदीच्या (Thamirabarani) काठाला एक चांगले हॉटेल नजरेस पडले तिथे आम्ही सकाळचा नाश्ता घेतला. याच वाटेने बरेच भक्तजन पायी वारी करत चालले होतो माहिती घेतल्यावर कळले की इथून जवळच तिरुचेंदूर Thiruchendur नावाचे गाव आहे. तिथे तिरुचेंदूर मुरुगन मंदिर आहे आणि हे सर्व भक्तजन तिथेच चालले आहेत तेंव्हा आम्ही हि आलो आहोत तर दर्शन करून जाऊ म्हणून मग आम्ही आमचा मोर्चा तिरुचेंदूर कडे वळवला.
तिरुचेंदूर मधील मंदिर कमानीतून आत वळलो आणि जाणवले कि इथेही बरीच गर्दी असणार आहे. हे निर्माणाधीन मंदिर हि आम्ही इतर मंदिरांना भेटी दिल्या होत्या त्याप्रमाणे एका विस्तीर्ण चौकोनी परिसरात पसरले होते हे मंदिर अगदी समुद्रालगत आहे. सायकल लावायचा प्रश्न आणि भलीमोठी दर्शनरांग पाहून आम्ही तिथे गेटवर विनंती करून सायकलसह मंदिर परिसरात प्रवेश केला. सायकलसह मंदिराला प्रदक्षिणा घालून मुखदर्शन घेऊन पुढे जाऊ असा विचार करून आम्ही सायकलसहा गर्दीतून वाट काढत पुढे जात होतो. लोक आमच्याकडे चित्र विचित्र नजरेने पाहत होते. कुणी अंगठा दाखवून तर कुणी हात हालवून आम्हाला ते आमची नोंद घेत आहेत याची जाणीव करून देत होते. काहिंना कौतुक तर काहिंना नवल वाटत होते. मंदिराच्या परिसरात मोर या गर्दीतही स्वच्छंदपणे विहारत होते. समोर अथांग समुद्राराच्या लाटा मंदिराच्या भिंतीला आदळत जणू सुरेल भजन गात होत्या.
मंदिरप्रदिक्षणा झाल्यावर आम्ही दुसऱ्या वाटेने तिरुचेंदूर ओलांडून कन्याकुमारी कडे निघालो. आजच कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरून सूर्याला मोहीम फत्ते झाल्याची नोंद देऊनच त्याला निरोप द्यायचा हा पन करूनच आम्ही पुढे चाल करत होतो.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या सायकल प्रवासात इतके दिवस धीराने सायकलिंग केले होते पन आज मात्र राहिले साहिले सारे बळ लाऊन आम्ही वेगात दौडले वीर प्रमाणे दौडत होतो. बाजूने बाभळीचे बन जणू “कोण हे वीर दौडत आहेत?” या अविर्भावात डोकावून पाहत होत्या. जणू आमच्या घोडदौडीने वादळ उठले होते आणि त्या वादळावर स्वार होऊन आम्ही आमच्या दुर्दम्य इच्छाशक्ती च्या जोरावर येणाऱ्या आडथळ्यांची धूळधान उडवत जात होतो. त्या वेगावर जणू बाजूच्या परिसरातील पवनचक्क्यानी ही त्यांचा स्पीड वाढवला होता.
ठराविक अंतराने सक्तीने पाणी पिणे आणि इतर नियम आज आम्ही धाब्यावर बसवले होते आणि थोडासा उतार येताच आम्ही सुसाट सुटत असून. किलोमीटर मागून किलोमीटर चे अंतर कमी होत जात होते येणारा प्रत्येक मैलाचा दगड जणू आमच्यासाठी पायघडी होता. खाण्यापिण्याचा विचार करायला आज शरीरालाही वेळ नव्हता जणू आमचा रोमरोम फक्त ध्येयाप्रती समर्पित होता.
वाटेत जे मिळेल ते पोटात ढकलत आम्ही वाहून गेलेला, खड्डे पडलेला, खडी अंथरलेला, तर कधी उलट्या वाऱ्याने अडवलेला रस्ता निकराने पार करत होतो. किलोमीटर दाखवणारे दगड जस जसे ६० वरून ५० …. ४० … ३० … असे कमी कमी होत होते तस तसे आणि शहारत होतो.
पावणेतीन च्या सुमारास आम्ही कन्याकुमारी कडे जाणाऱ्या कन्याकुमारी – तीरुचेन्दूर हायवेवर प्रवेश केला आणि आता शेवटचे १० किलोमीटर म्हणजे आमच्यासाठी शर्यत जिंकणाऱ्या सायकलपटूने शेवटचे काही मीटर दोन्ही हात फैलावत विजयोत्सव साजरा करण्यासारखे होते.
हळू हळू उत्साहाचे वादळ शांत होऊन एक अनामिक रोमांच उभा राहताना माझा रोमरोम क्षणाक्षणाचा भावनात्मक हिशोब मांडू लागले.
सुरुवातीला मजेशीर वाटणारा हा सायकल प्रवास नंतर आमच्या शारीरिक आणि मानसिक कणखरतेची परीक्षा घेणारा ठरला होता कित्येक रात्री थकलेल्या पावलांना पुन्हा ध्येयाची उभारी देऊन पुढच्या प्रवासाला सज्ज करताना भावनांचे आणि शरीराचे द्वंद्वयुद्ध कित्येक वेळा कडेलोटा पर्यंत पोचले होते. त्यांच्यात सामंजस्याचा तह घडवून आणून कन्याकुमारीचा गड सर करणे ही तितकी सोपी गोष्ट किमान माझ्यासाठी तरी नव्हतीच.
कितीतरी वेळा वेदनेच्या आकांताने शरीराने उभारलेले बंड ध्येयपूर्ती च्या कराराने शांत करताना किती तडजोडी कराव्या लागल्या. कित्येक वेळा मनाने फितुरी करून कश्यासाठी करायचे हे? काय मिळणार हे करून? आता बास… अश्या वावड्या उठवल्यावर मनाला शमवण्यासाठी विचारांना किती भक्कम त्याग करावा लागला होता याचा हिशोब मांडताना आज मन गहिवरले होते.
आपण करू शकतो च्या ठिणगीने पेटलेला हा वणवा कन्याकुमारी येईपर्यंत त्याच्या सर्वोच्च तापमानबिंदू पर्यंत पोचला होता. शेवटी कन्याकुमारी १ किलोमीटर चा मैलाचा दगड आला आणि मी भावनावश झालो. घामांच्या धारांच्या अभिषेकात काही थेंब आनंदाश्रूचेही मिळून जणू हि आहुती पूर्ण झाली होती. शेवटचे काही मीटर विजयोत्सव साजरा करण्याचे होते. ध्येयपूर्ती ने प्रचंड आत्मविश्वास घेऊन आम्ही समोरच्या तिन्ही सागरांना धडकणार होतो.
आमची भावविभोरता शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य होते. जणू आमच्या भावना विदित करण्यास लाखों कसलेलल्या कवींना एकही शब्द न मिळावा. करोडो निषणांत गायकांना एकही सुर न लागावा. समोरच्या तिन्ही महासागरांनी त्यां भावनांना सामावून घेण्यास असमर्थता दर्शावी. आकाशाच्या उरतही धडकी भरवत आम्ही ठरलेल्या वेळेच्या कितीतरी आधीच कन्याकुमारीत होतो. जणू सारी कन्याकुमारी स्तब्ध झाली होती. वऱ्हाडी मंडळींनी ठरलेल्या वेळेच्या आधीच विवाहस्थळी पोहचावे आणि मग त्यांची भेट घेण्यासाठीच्या सामानाची अचानक जुळवाजुळव करताना वधूपित्याची धांदल उडवी आणि त्याने नुसते इकडून तिकडे भांबावलेल्या स्थितीत पळावे अगदी तशी परिस्थिती कन्याकूमारीची झाली होती आणि त्या वधूपित्यासारखा वारा नुसताच वेंधळवाना घोंगावत होता. आमच्या प्रचंड मेहनत आणि कणखर मानसिकतेपुढे समोरचा विशाल समुद्रही जणू आमच्या पायी नतमस्तक झाला होता त्याला खोल मनात उठलेल्या भावनेच्या वणव्यात सामावून समाधानाच्या फुंकरेने तो वणवा कसाबसा शांत करून आम्ही कन्याकुमारीत प्रवेश केला. पहिल्यांदा सासुरवाडीत आलेल्या जावायाप्रमाणे बाजूचा लाईट हाउस आणि इतर इमारती जणू आम्हाला न्याहाळत होत्या.
सकाळी सूर्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हला सूर्याला निरोप द्यायला जायचे होते आणि वेळ हि भरपूर होता तेंव्हा आम्ही आधी राहण्यासाठी जवळच एक लॉज बुक केला शेवटचे लगेज सायकलवरून उतरवताना जणू सायकलही गहिवरली होती. अश्या अनेक मोहिमा आपल्याला पार पाडायच्या आहेत अशी तिची समजूत घालत मी सामान उतरून ते रूममध्ये ठेवले आणि आम्ही लगेच समुद्रकिनारी पोचलो होतो. घाईत फेरी घेऊन स्वामींच्या भेटीला जाण्यापेक्षा उद्या दिवसभर आपल्याकडे वेळ आहे तेव्हा आज स्वप्नपूर्तीसाजरी करून उद्या निवांत स्वामींची भेट घेऊ असे ठरवून आम्ही सनसेट पॉईंट कडे वळलो.
खूप हलके हलके वाटत होते आता ना उद्याच्या अंतराची तमा, ना पायांची ना सायकल ची काळजी. एक अनामिक दडपण जे सतत आम्ही वाहत होतो ते कुठेतरी हलके झाले होते तर जे सुंदर क्षण या प्रवासादरम्यान अनुभवायला मिळाले जो रस्ता आता सखा झाला होता आणि एकंदर त्या दिनचर्येची एक सवय झाली होती ती आता मोडणार होती त्याची कुठेतरी एक अनामिक हुरहूर होतीच.
आज सूर्य ही बराचवेळ क्षितिजावर रेंगाळत होता. रोजच्यापेक्षा आज तो जरासा मोठा जाणवत होता जणू त्याचीही छाती अभिमानाने भरून आली होती. क्षितिजावरून समुद्रात उतरताना जणू तो आमची ओळख त्या समुद्राला करून देत होता आणि समुद्रही त्याच्या लाटांनी जणू आमचे अभिनंदन करत होता.
तिथे आम्हाला महाराष्ट्रातील हि काही लोक भेटले सर्वांनी आमचे कौतुक, अभिनंदन केले सर्वांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि पुढील प्रवासाला आम्हाला शुभेच्छा दिल्या.
कुठलाही मुलाहिजा न ठेवता आम्ही येथेच्च रात्रीचे जेवण घेतले. त्या रात्री अंथरुणावर पाठ टेकवून मागील मंतरलेल्या बारा दिवसांचा मागोवा घेत कितीतरी वेळ समाधानाच्या झोपे ऐवजी आठवणींच्या झुल्यावर हिंदोळे घेत मी तसाच पडून होतो.
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE चा खऱ्या अर्थाने आज सुखद सांगता झाली होती.
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[थिरुमयम ते रामेश्वरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १६५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.