आमच्या PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE या संपर्ण प्रवासरुपी माळेचे दोन मुकुटमनी होते एक म्हणजे “रामेश्वरम” व दुसरे म्हणजे “कन्याकुमारी”, आमच्या या दोन मुख्य ठीकाणापैकी एक “रामेश्वरम” या ठिकाणी आम्हाला आज पोचायचे होते. मागील सर्व दिवसांचा थकवा, घेतलेले कष्ट, हसत-हसत सहन केलेल्या वेदना आज फळाला येणार होत्या. आम्ही प्रचंड उत्साही होतो. सकाळी सगळे आवरता-आवरता सहा वाजले होते. परंतु आज पायात एक अनामिक बळ आले होते त्यामुळे आज आपण रामेश्वरमच्या चरणी पोचणार याची शाश्वती संपूर्ण शरीर देत होते.
सहाच्या आसपास थिरुमयमचा निरोप घेतला, तालुकावजा गावातून बाहेर पडताना खड्डे पडलेल्या रास्यावरून आम्ही सुस्त चाललो होतो तेव्हा तेथील कुत्र्यांनी आमच्या मागे लागून आमचा थोडा स्पीड वाढवला.
हळू-हळू अंधार निवळत होता, गर्द येड्या बाभळींच्या मधून जाणारा छोटा रस्ता आम्ही भराभर उरकत होतो. बाजूच्या तळ्यातील हिरव्या पाण्यावर अंधुक अंधार तरळत होता. त्या अंधुक संधीप्रकाशात बाजूच्या बाभळीं त्यांचे काटेरी रुपडे त्या पाण्यात न्याहळत होत्या. सध्या रोड गर्द झाडीतून जात होता अश्या रस्त्यावर असताना जर सूर्योदय झाला तर आपल्याला त्याचे पहिले किरण अनुभवता येणार नाही म्हणून आम्ही नव्या वर्ष्याच्या पहिल्या किरणांना सामोरे जाण्यासाठी योग्य जागी योग्य वेळी पोचण्याची योजना करत होतो. तेंव्हा आज सर्वप्रथम आम्हाला चढाईचा रोड लागला की बरे वाटायचे.
आता हळूहळू डाव्या बाजूचे क्षितीज लालसर होऊ लागले होते. वातावरण नेहमीचेच पण आज त्या लालीला विशेष महत्व होते. नवीन वर्ष्याच्या या पहिल्या सूर्योदयाचे आम्ही काल शब्द दिल्याप्रमाणे एका उंच उच्च दाबाच्या विजेच्या खांबाच्या जाळ्यातून येणाऱ्या पहिल्या किरणांचे स्वागत करत एकमेकांना नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देत थोडे पुढे गेलो. एका उंचवट्यावरून सूर्यदेव अधिक चांगले दर्शन देत होते तेंव्हा तिथे थोडा वेळ थांबून आम्ही रामेश्वरम च्या ओढीने पुढे निघालो.
आता डाव्या बाजूला असलेला सूर्य पाठमोरा झाला होता. छोटा परंतु नवा रोड, सकाळी उलटे वारे ही फार जोराचे नव्हते त्यात सपाट रस्ता आणि नव्या वर्षाचा नवा उत्साह या सगळ्यांची रसमिसळ करत आम्ही गावा मागून गावे मागे टाकत होतो.
साडेसात वाजत आले होते आणि वाटेवर कुठे हॉटेल दिसेना गाव ही हायवेपासून दूर-दूर होते परंतू एके ठिकाणी आम्हाला हायवेलगत गाव दिसले तेव्हा आम्ही हायवेवरून खाली उतरून सर्व्हिस रोड ने जात नाश्त्यासाठी काही मिळते का ते पाहत होतो परंतु सगळीकडे लोक ग्लासभर चहा आणि सोबत मेदूवडा खात होते. मला ते खाऊन बघायचे होते कशी चव लागते ते पण नाश्ता व्यवस्थित करू या हिशोबाने आम्ही हॉटेल शोधून लागलो. परंतू आम्हाला काही चांगले हॉटेल मिळेना शेवटी गावच्या फाट्यावरल्या हॉटेलात मेदूवडा, इडली चुरून खाल्ली आणि पुढे निघालो.
भौगोलिक विवाधता इतकी कि, काही किलोमीटर घनदाट जंगल तर काही किलोमीटर नंतर लगेच दूरपर्यंत पसरलेले माळरान तर कधी अचानक नारळी आणि आता पाम चे ही झाडे दाट दिसू लागली होती. कधी काळीभोर तर कधी लालभडक जमीन वाटेत लागत होती. पुढच्या वळणावर काय असेल याचा अंदाज घेत आम्ही पुढे जात होतो.
लागली होती. कधी काळीभोर तर कधी लालभडक जमीन वाटेत लागत होती. पुढच्या वळणावर काय असेल याचा अंदाज घेत आम्ही पुढे जात होतो.
वाटेत छोटे-छोटे तलाव त्यात उमलणारे असंख्य कमळफुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रामेश्वरमला पोचायची ओढ एकीकडे तर दुसरीकडे मन वेधून घेणारे सुंदर निसर्गस्थळे ही आम्हाला थांबायला बाध्य करत होते.
जसे-जसे आम्ही रामेश्वरम कडे जात होतो तशी-तशी कोरडी जमीन कमी आणि दलदल वाटावी अशी ओली जमीन जास्त लागू लागली. दूरपर्यंत भाताचे खाचरेच खाचरे आणि त्यात वाऱ्याच्या तालावर डोलणारी हिरवी पिवळी भाताचे रोपे जणू हात हलवत आम्हाला निरोप देत होते.
रोडच्या दोन्ही बाजूने खळखळ वाहणारे पाणी भाताच्या शेतात जात होते. कुठे भात लावणी सुरु होती तर कुठे भाताचे हिरवे गार शेती, तर कुठे भाताची काढणी सुरु होती या सर्वांचे मला खूप नवल वाटले की एकाच परिसरात भात लावणी व काढणी एकाच वेळी सुरु आहे. स्थानिकाकडे चौकशी केल्यावर कळले कि इथे आर.एन.आर. (RNR) वाणाचा भात दोन्ही हंगामात घेतला जाते (एकंदरीत इथे तो वर्षभर पिकवला जातो).
तिकडे बस थांबा रोडच्या लेन सोडून बाजूला बनवलेले आहेत त्या जागेत शेतकरी त्यांच्या भाताच्या साळी वाळवायला टाकतात.
एक एक मैलाचा दगड सांगत होता कि रामेश्वरम जवळ येत आहे. आज दुपारी कुठेही विश्रांती न घेता जिथे मिळेल तिथे नारळपाणी, दूध पीत आम्ही पुढे जात होतो. जोरात आडवे येणारे वारे आणि वाढलेला दमटपणा आता समुद्र जवळ आल्याची चाहूल देत होता.
रोड च्या दोन्ही बाजूंनी पाणी वाढू लागले होते पाम च्या झाडांची संख्या वाढत जात होती. आम्ही आता रामेश्वरम कडे जाणाऱ्या एकमेव मोठ्या रोडकडे वळलो आणी आम्हाला जाणीव झाली आपण त्या निमुळत्या इंग्रजी “व्ही” आकाराच्या प्रदेशात प्रवेश केला आहे.
रस्ता सपाट होता परंतू समुद्रावरून येणारे जोराचे वारे काही केल्या वेग वाढू देईनात. आपण आजच धनुष्कोडी ला जाऊन सूर्यास्ताचे साक्षी होऊ हे आमचे मनसुबे उधळण्याचा हा कुटील डाव वाऱ्याने रचला होता कि तो परमात्मा आमची परीक्षा घेत होता कुणास ठाऊक पण सायकल नाव पुढे जाईना.
तुफान वादळात खोल समुद्रात छोट्या होडीने हेलकावे खावे तशी सायकल जोराच्या वाऱ्याच्या झोताला सामोरी जाताना जागेवरच फडफडत होती. अगदी झोपून सायकल चालवली तरी वाऱ्याच्या कमालीच्या अवरोधाला सामावून सायकल चालवले जिकरीचे होत होते. त्यात त्या वाऱ्यात सायकलवर तोल संभाळणे कठीण जात होते. मित्राने त्याच्यावर रेल्लेल्या मित्राचा आधार अचानक काढून घ्यावा आणि त्या मित्राची तोल सांभाळताना ची भांबेरी उडताना सर्वानी हसावे तसे जोराचा वारा कधी अचानक शांत होऊन तर कधी अचानक वावटळी सारखा सायकल मध्ये फिरून आमची भांबेरी उडवत होता आणि जणू त्यावर बाजूंची पाम चे झाडे खिदळून हासत होती.
प्रसिद्ध ललित लेखक करंदीकरांच्या “आतले आणी बाहरेच्या” या ललित लेखाप्रमाणे जणू हे वारे आम्हाला रामेश्वरमवासी होण्यापासून परावृत्त करत होते आणि आम्ही आतले होण्यासाठी धडपडत होतो.
चार वाजायच्या सुमारास आम्ही पांबन पूलाजवळ पोचलो परंतू आता धनुषकोडी कडे जाणे शक्य नाही यांची जाणीव आम्हाला झाल्याने आता अधिक श्रम घेण्यात अर्थ नाही हे ओळखून आम्ही एके ठिकाणी दूध बिस्किटे खाऊन थोडा आराम केला.
सर्व सामन्यावर वर्चस्व गाजवत दिमाखात सामना जिंकायची वेळ अन अचानक एकापाठोपाठ चार, पांच विकेट पाडव्या आणि मग सोप्या विजयासाठी संघर्ष करावा लागण्यासारखी आमची गत झाली होती आणि या संघर्षामुळे या विजयाची गोडी ही अधिक वाटावी तसे आम्ही मग दिमाखात पुढे निघालो.
थोड्याच वेळात दोन्ही बांजूनी समुद्र कवेत घेऊन स्थिरतेने पाय रोऊन उभा असलेला पांबन पूल आमच्या स्वागतास जणू सज्ज होता. डाव्या बाजूला समुद्राचे पाणी शेजारच्या रेल्वेपुलाच्या खांबांसोबत एक लयबद्ध तालात नृत्याविष्कार सादर करताना त्याला लाटांचा आणि समोर बांगडणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचे स्वागतगीत जणू साथ करत होते.
उजव्या बाजूला नारळ आणि पाम च्या गर्द झाडीतून डोकावणारा चर्च चा सुळका आणि दीपस्तंभाचे टोक जणू कुतुहलाने कोण आले आहेत ते पाहत आहेत. बाजूला दूरपर्यंत हेलकावे खाणाऱ्या छोट्या छोट्या होड्या जणू मुंग्यांच्या वारुळात पानी शिरावे आणि मग मुंग्याची एकाच धांदल उडत त्यानी हेलकावे खात किनाऱ्याला येण्याची धडपड करावी तश्या या होड्या भासत होत्या.
पुलाच्या मध्यावर गेल्यावर समोर रामेश्वरमचा संपूर्ण बेटवजा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. धनुषकोडी कडे जाणारा पाण्याने वेधलेलेला निमुळता भूभाग आणि एकंदर सारा परिसर जणू हनुमंतराय शेपटी पसरून बसल्यासारखा भासत होता.
जसे जसे आम्ही पुलावरून पुढे जात होतो तस तसे मागे ढगांच्या आडून सूर्य पश्चिमेला अथांग समुद्रात सुर मारण्यासाठी जणू आतुर होता.
आम्ही रामेश्वरम मध्ये प्रवेश करून रेती पसरलेल्या वाटेवरून पुढे जात होतो आणि मागे आता सूर्य अस्ताला गेला होता. हळू-हळू त्या बेटावर आता अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते आम्ही जेव्हडे मंदिराच्या जवळ जाऊन राहता येईल तेव्हडे उद्यासाठी चांगले असे समजून आम्ही राहण्यासाठी ठिकाण शोधू लागलो परंतू आम्हाला कुणी रात्री गरम पानी उपलब्ध करून देईना तर कुणी आम्हाला सायकल रूम मध्ये घेऊ देइना शेवटी विनंती करून एके ठिकाणी आम्हाला आवश्यक दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्ही वेळ गरम पाणी आणि सायकल टेरेस वर लावायला परवानगी मिळाली. आम्ही सायकल उचलून तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर ठेवल्या, आणि पुढे यथावकाश सर्व आवरून जेवणासाठी बाहेर पडलो.
तसा उद्याचा दिवस आम्ही रामेश्वरमसाठी राखीव ठेवला होता. परंतू उद्या लवकर दर्शन झाले आणि धनुषकोडीवरून लवकर आलो तर काही किलोमीटर कन्याकुमारीकडे जाऊन मध्ये थांबू असा विचार करून आम्ही उद्या पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी जायचे ठरवले आणि समाधानाने झोपी गेलो.
POSTER OF HOLI 2024 इस होली पर आपके जीवन में रंग और खुशियाँ भरी हों।…
PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध (पुणे - रामेश्वरम…
कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE - RETURN JOURNEY अनुक्रमणिका [INDEX]…
[थूथुकुडी ते कन्याकुमारी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १४० किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामनाथपुरम ते थूथुकुडी (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १२५ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी अनुक्रमणिका [INDEX] १ . माझा आत्मशोध…
This website uses cookies.