PUNE TO AYODHYA CYCLE RIDE
अजून आम्ही २०० किलोमीटरही पार केले नव्हते आणि थंडी ने आपला पगडा घालायला सुरुवात केली होती. पहाटे गरम दुलईतून उठून सर्व समान अवरून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे जरा जिकरीचे वाटू लागले.
आम्ही दोघेही एकमेकांना तुम्ही आवरा … तुम्ही आवरा करत पाच मिनिटे पडतो म्हणून अर्धा तास असाच गेला. दोघांनाही आवरून रुमच्या बाहेर पडायला साडेपाच होऊन गेले होते. दुसऱ्या दिवशीचे पेडल मारणे सुरु करायला जवळपास सहा वाजत आले होते. पहाटेच्या थंडीत समोरचा हायवे संथ झाला होता अधून मधून एखादा मोठा ट्रक काळ्याशार रोडवर प्रकाश सांडत पुढेजात होता. पुढें थंडीचा घोर सामना करावा लागणार आहे याची जाणीव रोडवर लागताच होत होती. समोरचे दोन्ही लाईट पूर्ण क्षमतेने लावून आम्ही त्या हायवे वर आमचे अस्तित्व प्रखरपणे जाणवून पुढे निघालो होतो.
दहाएक किलोमिटर अंतर कापल्यावर आम्ही नकाशावर पाहून-पाहून गोंदेश्वर मंदिराकडची वाट शोधू लागलो. एव्हाना उजेडायला लागले होते. एका ठिकाणी रस्ता सोडायचा तो आम्ही सोडला नाही म्हणून मग आम्हाला थोडे पुढे जाऊन मग मानाने छोट्या रस्त्याने गावकुसाबाहेरून सायकल चालवावी लागली. पण रस्ता एकदम बेस्ट असल्याने मजा येत होती. थोड्या-थोड्या अंतरावरली घरे आता कूठे जागी झाली होती. दावणीच्या वाजणाऱ्या घंट्या दूध-दुभत्यानी नाश्ता सुरु केला आहे याची जाणीव करून देत होत्या. सकाळी मॉर्निंग वॉक साठी निघालेले काही जण वळून वळून आमच्याकडं पाहत पुढें जात होती.
मला हेवा वाटला तो इथल्या कुत्र्यांचा त्यांनी आम्हाला असे काही इग्नोर केले की बस…. ते आम्हाला मान वरून करून पाहत आणि कान झटकून पुन्हा आपली मान ते पायावर टेकवून आम्हाला असे झिडकाऊन टाकत असे की जसे एखाद्या आपल्या नवऱ्याबरोबर सुखी असलेल्या नवतरुणीने आपल्या एक्सला एकदा कटाक्ष टाकून झिडकारून टाकावे आणि पुन्हा त्याच्याकडे ढुंकूनही पाहू नये.
खरे तर ही गोष्ट आमच्यासाठी चांगली होती त्यामुळे पहाटे निर्धास्त पणे सायकल चालवण्याचा आनंद घेता येत होता. थोड्या वेळाने आम्ही गोंदेश्र्वर मंदिर परिसरात पोचलो अगदी प्रशस्त परिसर असलेले हे १२ व्या शतकातील दख्खन शैलीच्या उत्कृष्ट स्थापत्य कलेचा बऱ्यापैकी सुस्थितीतील आविष्कार आहे.
हे मंदिर पंचायतन प्रकारचे मंदिर म्हणजे चार बाजूला चार मंदिरे व मध्यभागी मुख्य मंदिर अशी रचना असलेले मंदिर आहे. या मुख्य गोंडेश्वर महादेव मंदिराच्या चार बाजूने श्री विष्णू, श्री. गणेश, माता पार्वती व सूर्यदेव यांची मंदिरे आहेत. ही पाचही मंदिरे चौकोनी तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. या तटबंदीला पूर्व व दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. आम्ही आमच्या सायकली दक्षिण प्रवेशद्वाराजवळ लावल्या होत्या आणि तिथूनच आत प्रवेश केला.
शतकानुशतके हवामानाचे आघात सोसून आणि मुळात रचनाच काळसर पाषाणात असल्याने जसा – जसा अंधार दूर होत होता तस तसे मंदिराचे कळस अजून कोरीव होत होते.
एका उंच वट्यावर स्थित पाचही मंदिरांचे कळस त्यावरील रामायणातील काही दृश्ये, व विविध देव देवतांच्या कोरीव चित्रांनी सजलेली आहेत. फोटो घेत असताना गाभाऱ्यातून डमरू चा आवज येऊ लागला मग आपसूकच आमचें पाय तिकडे वळले. आरती घेऊन आम्ही गोंदेश्वराचा निरोप घेतला तेंव्हा सकाळची कोवळी किरणे गोंदेश्वराला किर्नोभिषेक घालत होती.
अजून बरेच अंतर कापायचे आहे तेंव्हां आपल्या मोहाला आवर घालत मंदिर परिसर सोडून मुख्य रस्त्याकडे निघालो. आता आम्हाला चांदवड पर्यंत कधी एकेरी तर कधी दुहेरी रस्त्याने जायचे होते. सर्वजण रस्ता एकदम चांगला आहे असे सांगत असले तरी आमच्या सायकलसाठी कसा असेल याची थोडीशी काळजी आम्हाला वाटत होती. कारण सिमेंटचा रस्ता बाकी वाहनांसाठी चांगला असला तरी आमच्या (रोड बाईक) साठी ती आदर्श नव्हता रोडवरील आडव्या रेषा सायकलला अवरोध तर करत होत्याच शिवाय हलके का होईना पण हादरे बाहुवर झेलत चालावे लागत असल्याने आम्ही सिमेंटचा रोड लागला की नाखूष होत होतो आणि विशेष बाब म्हणजे आमच्या एकुण प्रवासात बरेच महत्वाचे टप्पे अश्याच सिमेंटच्या रोड वरून आम्हाला पार करावे लागले.
वाटेत आस्थेने होणारी आमची चौकशी, कौतुक आणि प्रोत्साहन आम्हाला अजून बळ पुरवत होते. आठ वाजून गेले होते आणि आता कालचा उपवास आणि सकाळची मेहनत इंधन मागत होती. त्यामुळे आम्ही पुढे येईल तेथे नाश्ता उरकायचे ठरवले थोड्या वेळात आम्ही म्हल्साकोरे गावात पोचलो वाटेलगत एक हॉटेल साई स्वीटस् लागले जिथे गरमा गरम मिसळ बनवायचे काम सुरू होते. आम्ही विचारणा करताच त्यांनी अगत्याने आम्हाला मिसळ खाऊ घातली. भुकेचा डोंब उसळलेला मग काय मागील काही महिने या प्रवासासाठी पाळलेले सर्व आहाराची बंधने मी फेकून दिली अन मनसोक्त मिसळवर ताव मारला.
पुढे कोणत्या मार्गाने जायचे याबाबत आम्ही साशंक होतो तेंव्हा याच हॉटेल मालकांनी आम्हाला जवळचा मार्ग सांगितला ज्याने आम्हाला निफाडला न जाता नांदूर मध्यमेश्वर मार्गे आम्ही लासलगावला पोचणार होतो दरम्यान आमचे स्नेही श्री योगेश हांडगे पाटील यांचे पाहूणे व लासलगाव सायकल क्लब चे सायकलपटू श्री. चव्हाण व ईतर सायकलस्वार लासलगाव मध्ये आमची वाट पाहत होते म्हणून आम्ही लवकर निघालो रस्ता एकेरी असला तरी खड्डे विरहित व डांबरी असल्याने हिरव्यागार गव्हाच्या शेतातून आम्हीं सायकली पळवत होतो. काही वळणे घेत आम्ही गोदावरीच्या तीरावर पोचलो. तशी गोदावरी मला खूप जवळची तिच्या अंगाखांद्यावर माझे बालपण गेलेले. तिच्याच डोहात कधी करदोऱ्याला तरी कधी भोपळ्याला बांधून आम्ही गटांगळ्या खाल्लेल्या, तिच्या वाळूत आम्ही मनसोक्त लोळेलेलो, तिच्या वाळूत उगवलेल्या मधुर टरबूज, खरबूज चोरून लव्हाळ्यात लपून खात तर कधी तिच्याच पात्रातील बेशरमाच्या फोकांनी खाल्लेला मार. ती आम्हाला अगदी आजी सारखीच तिच्या अंगाखांद्यावर आम्ही कधी क्रिकेट कधी लपाछपी तर कधी तिच्या पाण्यात शिवणापाणी खेळलो आहोत.
आजही ती तशीच होती शांत, नितळ नसली तरी तरल पाण्यावर थव्यांनी विहांगणारी छोटी पाखरे पुलाच्या समांतर उडत होती. काही क्षण मनात तर काही कॅमेऱ्यात कैद करून आम्ही पुढे निघालो.
विरळ वाहतुकीचा रस्ता, आजूबाजूला आता द्रांक्षांच्या बागा आणि लासलगाव ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे त्या कांद्याची शेती दिसत होती. जसजसे लासलगाव जवळ येत होते. शेतीतले आणि रस्त्यावर सांडलेले ही कांदे वाढत होते. कांद्याची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कधी आम्हाला तर कधी आम्ही त्यांना ओव्हर-टेक करत जात होतो.
कित्येक दुचाकीस्वार आम्हाला प्रोत्साहन देत होते. लासलगाव मधील मंडळींना अधीक वाट पाहायला लागू नये म्हणून आम्ही सायकलींचा वेग वाढवला जरी आम्हीं ठरवले होते की प्रावसाच्या दरम्यान कधीही एका टप्प्यावर पूर्ण ताकतीने सायकल चालवायची नाही. पुन्हा पुन्हा त्यांचा फोन येत असल्याने आमच्यावर लवकर पोचण्याच्या अतिरिक्त दबाव येत होता. त्यामुळे आम्ही अतिरिक्त ताकत लाऊन काही किमी सायकली पळविल्या तरीही आकरा वाजयच्या सुमारास आम्ही लासलगाव मध्ये प्रवेश केला थोडे अंतर जात नाही तोच एका जनाने आम्हाला आवाज देऊन थांबण्याची विनंती केली. विचारपूस केल्यावर कळले की ते लासलगाव सायकल क्लब चे अध्यक्ष आहेत. मग आम्ही त्यांच्यासोबत थोडे पुढे जाऊन श्री चव्हाण व इतर सायकलस्वार सदस्य यांना भेटलो दूध-पाणी (चहा – कॉफी सुयोग सर यांनी कायमची तर मी ही राईड फायनल झाल्यापासून ते प्रभु श्रीराम दर्शन होईपर्यंत आहाराचा भाग म्हणून सोडली होती) घेतले येथे सर्वांनी आमच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमाचे कौतुक करून या कार्यात सहभाग ही नोंदवला.
काही वेळ गप्पा – हितगूज करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चांदवड कडे निघालो कारण बारा वाजून गेले होते आणि चांदवड मध्ये आमचे स्नेही श्री योगेश हांडगे पाटील यांचे घरचे आमची वाट पाहत होते.
गप्पा गोष्टी बारा कधी वाजून गेले ते कळलेही नाही आता लवकरात लवकर चांदवड गाठणे क्रमप्राप्त होते. आम्हीं अतिरिक्त ताण घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण अजुन खूप प्रवास राहिला होता आणि अतिरिक्त ताण पडल्याने स्नायू दुखावले तर पुढचा प्रवास खडतर होईल आणि तसे ही अदृश्य स्वरुपातला चढ चांदवड पर्यंत होताच तो डोळ्यांना जरी जाणवत नसला तरी पायांना जाणवत होता. मित्राचे वडील जेवणासाठी वाट पाहत असल्याने आम्हाला राहिलेले पांढरा वीस किलोमिटर ही खूप जास्त वाटू लागले. आमच्यासाठी त्यांना ताटकळत ठेवणे आम्हाला योग्य वाटेना शेवटी पुन्हा जोर लावून आम्ही चांदवड मध्ये पोचलो. आग्रा हायवेला वळलो वळणावर सरांचे वडील आम्हाला घ्यायला आलेले .
त्यांच्या घरी मग आम्ही फ्रेश झालो. गप्पा गोष्टी करत रुजकर जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर त्यांनी आमचा सत्कार करून आमच्या पुढच्या प्रवासाला आशीर्वाद दिले.
चांदवड ते मालेगाव पर्यन्त चांगला उतार असल्याचे आम्हाला त्यांनी सांगीतले, त्यांचा निरोप घेईपर्यंत अडीच वाजून गेले होते आणि अजुन जवळपास नव्वद पेक्षा जास्त किलोमिटरचा प्रवास बाकी होता. श्री. हांडगे सरांचा निरोप घेऊन आम्ही लगबगीत मालेगाव कडे कूच केले. समोर उंच डोंगर अजुन काही किलोमिटर तरी चढाई आहे हे सांगत होता. पुढे कूठे तो लांब उतार येतोय याची वाट पाहत चढण चढत होतो आणि मग एकामागून एक उतार आम्हाला वेग प्रदान करू लागले.
एक दीड तास सलग सायकलींग करून मग आम्ही एके ठिकाणी साडे तीन च्या सुमारास एका शॉर्ट ब्रेक मध्ये दूध पिऊन थोडा वेळ थांबून पुन्हा घाईने पुढील प्रवासाला निघालो तसे आज दिवसभर आरामात सायकलींग फार थोडा वेळ करता आले शिवाय आम्हाला धुळे मुक्कामी आमचे दुसरे स्नेही श्री प्रवीण पाटील सर यांचे घरी थांबायचे असल्याने वेळेत त्यांच्याकडे पोचणेही क्रमप्राप्त होते. काही वेळ आम्ही विचार केला होता की आपण धुळे बायपासला थांबू आणि सकाळी बायपास ने पुढे निघून जाऊ. परंतु श्री पाटील सर यांचे बऱ्याच वेळा आग्रहपूर्वक निमंत्रण आणि त्यांच्या घरचे बालगोपाल यांना आमचे विशेष आकर्षण असल्याचे कळल्यावर आम्ही त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि शरीरावर आणि पायांवर अधिक भार देत शक्य तेंव्हा वेग वाढवत पुढे जात होतो.
मालेगाव लवकरात लवकर ओलांडून पुढे जायचा आमचा विचार होता म्हणजे एक मैलाचा दगड पार होईल आणि मग आम्हाला फक्त धुळे लक्ष्य करता येईल. मालेगाव बायपास सुरू झाल्यावर आम्ही एके ठिकाणी पुन्हा एक शॉर्ट ब्रेक घेतला आणि मालेगाव बायपासने पुढे निघालो. बायपास संपून ब्रिज वरून मुख्य रस्त्याला लगेपर्यंत सूर्य क्षितिजाकडे सरकत चालला होता. कालच्याप्रमाणे आजही जेव्हडे होईल तेव्हडे सूर्यप्रकाश असेपर्यंत अंतर पार करण्याची शर्थ आम्ही करू लागलो. अजूनही किमान पन्नास किलोमिटर अंतर पार करायचे होते त्यात रस्त्यावर गर्दी वाढली होती. त्यातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. अंधार पडेपर्यंत आम्ही काही अंतर पार केले असले तरीही अजून आम्हाला अंधारात वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर पार करायचे होते. एके ठिकाणी आम्ही पाणी ब्रेक घेऊन रात्रीचे रिफ्लेक्टर व लाइट लाऊन घेतले व मग पुन्हा अंधाराशी झुंजत आम्ही धुळ्याकडे कूच करत होतो.
श्री. पाटील सर यांचे घर दहा किमी राहिल्यावर आम्ही त्यांना अर्ध्या तासात पोचतो म्हणून निरोप दिला. परंतु धुळ्यात बायपास सोडून जुन्या रस्त्याने जाताना रोडवर तोबा गर्दी होती आम्हाला अगदी पुण्यातील तुळशीबागेची आठवण झाली. गर्दीला चुचकारत आम्ही पुढे – पुढे जात होतो. गूगल बाबाच्या मदतीने आम्ही श्री. पाटील सरांच्या घराकडे निघालो. गर्दीतील काही लोक आम्हाला आडवत चौकशी करत काही जन फक्त दुरून हात जोडत तर काही न बोलता फक्त निर्विकार रोखून पाहत होते. थोड्याच वेळात गूगल मॅप नुसार आम्ही त्यांच्या घरपाशी पोचलो परंतु घराकडे जाण्याचा रस्ता सापडेना शेवटी श्री. पाटील सर यांना आमचे लोकेशन शेअर करून त्यांना आमच्या स्थानाबाबत कळविल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.
बाहेर अंगणात काढलेली श्री रामाची रांगोळी पाहून आम्हाला त्यांच्या आमच्या वारीप्रतीच्या भावना कळायला वेळ लागला नाही. प्रवेश करताच त्यांनी खूपच आस्थेने आमचे औक्षण करून स्वागत केले. आमच्यासाठी काय करू अन काय नको अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांनी आम्हाला कुठे ठेऊ अन कुठे नाही असे करताना आम्हाला कुठेही अवघडल्यासारखे होऊ दिले नाही. त्यांच्या या अतिशय सहज आणि आम्ही कुटुंबाचाच एक भाग असल्याप्रमाणे वागणुकीमुळे आमच्या मनावरील एक अनामिक दडपण कुठल्या कुठे पळून गेले. लवकर फ्रेश होऊन आम्ही आज घरचे एकदम रुजकर जेवण घेतले.
आम्ही सकाळी लवकर जाणार असल्याचे कळल्यावर त्यांनी त्यांच्या येथील श्री राम मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊन पुढे जावे अशी इच्छा व्यक्त केली तसेच पहाटे मंदिर उघडावयाची सोय ही करून ठेवली आमच्या दिवसाची यापेक्षा भाग्यशाली सुरुवात ती काय होणार होती?
सकाळी लवकर उठायचे आहे याचा विचार करून आम्ही आमची साधने चार्जिंगला लाऊन झोपी गेलो. आजच्या दिवशी आम्ही जवळपास १९० किमी अंतर पार केले होते.
काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…
This website uses cookies.