pune to ayodhya cycle ride
गेले तीन दिवस मी सुयोग सरांना तुम्ही घ्या आवरून मी पडतो थोडा वेळ म्हणत पाच – दहा मिनिटे लोळत पडायचो तो आज मात्र मी जरा दचकूनच जागा झालो. अंघोळी अगोदर पायाची चांगली मालीश केली. चांगले स्ट्रेचिंग करून मग आम्ही सायकली सज्ज करू लागलो. एकदम बरे वाटत असले तरी सुरुवातीचे काही किलोमीटर अगदी सहज सायकलिंग करायचे असे ठरवून मी सरांना सांगितले की तुम्ही तुमच्या पद्धतीने चला आपल्यात खूप अंतर पडले तर एकमेकांच्या संपर्कात आपण लाईव्ह लोकशन च्या मध्यमातुन राहू.
मध्य प्रदेश मधील आज दुसराच दिवस पण वातावरण कमालीचे थंड वाटत होते. तेंव्हा फक्त सायकल जर्सी वर भागणार नव्हते, आम्ही थंडीचे कपडे घालून पहाटे पाच वाजता रूम सोडली. रूम सोडण्याची प्रक्रिया करेपर्यंत मी हॉटेल समोर पेटवलेल्या शेकोटीचा शेक घेत थांबलो. तिथे काही जन उत्तर प्रदेश मधील ही लोक काम करत होती त्यांनी आम्हाला “एम. पी. मे दिन – रात कभी भी सायकल चालाओ लेकिन यु.पी. मे रात मे मत चालाओ लुटे जाओगे” असे सांगत उगीच आमची काळजी वाढवायचे काम केले.
पाच वाजताही रोड बऱ्यापैकी वाहत होता. आम्ही पुन्हा काळजीपूर्वक रस्ता पार करून जय महाकाल चा जयघोष करत निघालो. माझे सर्व लक्ष माझ्या पायाकडे लागल्याने पहाटे सायकलिंग ची मजा घेता येत नव्हती. मी सावधानपूर्वक एका लयीत पाय फिरवत दोन्ही पिंढऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घेत होतो. याच परिस्थितीत काही किलोमीटर गेले. मला नेहमीपेक्षा ही फ्रेश वाटू लागले, थंडगार हवा जणू माझ्या काळजीवर फुंकर घालत होती डाव्या बाजूला चंद्र ही जणू साखरझोपतेत पहुडला होता. कितीही थंडी असली तरी पाणी कमी प्यायचे नाही हा नियम मी स्वतःला बाजावून पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही नर्मदे काठी पोचलो. तिच्या शांत जलाशयावर चंद्रबींब हेलकवत होते. जणू अर्धझोपेतील आईच्या कुशीत खेळणारे अवखळ बाळ. दूरपर्यंत काठावरले पेंगाळलेले दिवे पाण्यावर सुस्त झाले होते. काही क्षण नर्मदेमाईशी हितगुज करून तिला गोदावरी व तापी चे कुशल सांगत पुढे निघालो.
आजही इंदौर पर्यंत थोडी चढाई लागेल असे स्थानिक लोकांकडून कळले होते तथापि थोडी-थोडी म्हणता बरीच चढाई आम्ही केली होती तेंव्हा आजही एक दोन घाट आम्हाला चढून जायचे होते. त्यामुळे मी अत्यंत सावधपने शक्य तेव्हडे स्वतःला सहज ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. सुयोग सर आणि माझ्यात काही अंतर पडले होते त्यांनी ते एका ठिकाणी थांबले आहेत असे सांगितले तेंव्हा मी आलोच म्हणून सायकल चालवू लागलो काही अंतर पुढे जाऊन मग सर कुठे थांबले आहेत ते पाहू असा विचार करून मी काही अंतर पुढे गेलो व लोकशन पाहिले असता कळले की मी पुढे आलो आहे तेंव्हा मी सरांना सांगितले की मी पुढे आलो आहे. मी हळू हळू चालतो तुम्ही या.
हळू हळू अंधार कमी होत होता अंधारात पाठीमागून आलेले वाहन त्याच्या प्रकाशाने दूरपर्यंत रोड स्पष्टपने दाखवत होता. जस जसे आम्ही पुढे जात होतो चढाई वाढत जात होती. थोड्या वेळात सूर्य उगवणार होता. हळू हळू दूरपर्यंत शेतं दिसायला लागली होती. थंडी पुढे किती उग्र रूप दाखवेल याची चुणूक दाखवत होती. वाटेवरल्या छोट्या छोट्या वस्त्या आता जाग्या झाल्या होत्या. गायी – म्हशींच्या गळ्यातील घंटयांचे नाद परिसरात घुमत होते. धुक्याची हलकी चादर विरळ होऊन त्यातून सोनेरी किरणे दूरपर्यंत गव्हाच्या शेतातील कोवळ्या लोंब्यांना आलिंगन देत दवाने चिंब सजलेल्या हिरवळीला सोनेरी साज चढवत होती. समोर गर्द झाडीने सजलेला मोठा डोंगर आता घाट चढायचा आहे याची सूचना देत होता. थोड्याच वेळात संपूर्ण परिसर दाट झाडीत सामावून गेला घाटात सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन घाट चढयला सुरुवात केली. रस्ता दुहेरी असला तरी वाहतूक एकाच बाजूने चालू असल्याने पुढे रस्ता पूर्ण वाहनाने भरून काही वाहने डांबरी रस्त्यावरून खाली उतरून चालत होती. एक तर चढाईचा घाट रस्ता त्यात छोटी वाहने आमच्या दोन्ही बाजूने ओव्हर टेक करत होती त्यामुळे सायकलिंग करणे खूपच जिकरीचे होत होते. घाटात अवजड वाहने थांबत होती या गर्दीत त्यांना ओलांडून पुढे जाणे अत्यंत धोकादायक होते. आम्ही या गर्दीतून मीटर-मीटर ने वाट काढत पुढे जात होतो. कधी-कधी सायकल डांबरी रस्त्यावरुन खाली घेऊन कच्च्या रस्त्यावरून चालवावी लागत होती. आता मी माझ्या पायांचे दुखणे विसरून पूर्णपणे हा घाट रस्ता संपण्याची वाट पाहू लागलो.
सूर्य पुढे-पुढे सरकत होता थंडी कमी होऊन घाम येऊ लागल्याने आम्ही स्वेटर काढून पुन्हा जर्सीवर सायकल चालू लागलो आता संपेल मग संपले पण घाट रस्ता काही संपण्याचे नाव घेत नव्हता. एका वळणानंतर थोडी सपाट जमीन लागल्यावर वाटले की संपला घाट. आम्ही थोड्या थोड्या वेळाने पाणी ब्रेक घेत होते त्यानुसार आम्ही इथे थोडावेळ थांबून पुढे निघालो. थोडे अंतर पार होत नाही तोच पुन्हा एक घाट पुन्हा चढाई आम्ही अगदी सावकाशपणे चढाई पार करत होतो. एकामागून एक वळण पार करत होतो पण चढाईचा रस्ता काही केल्याने कमी होत नव्हता आमच्या अपेक्षेपेक्षा ही चढाई खूप होती परंतु आता ती चढणे क्रमप्राप्त होते.
सकाळचे नऊ वाजत आले होते पोटात कावळे ओरडायला लागले होते आता भरपेट नाश्ता करणे गरजेचे होते. एकदा सर्व घाट संपल्याची खात्री करू आणि मग हॉटेल पाहून नाश्ता करू असे ठरवून आम्ही पुढे चालू लागलो. थोड्याच वेळात सपाट रस्ता व दाट हिरवी शेती लागल्यावर आम्ही मॅप पाहून ठरवले की पुढे मानपुर च्या अलीकडे थांबू. काही वेळातच आम्ही तिथे पोचलो जवळच हॉटेल पटेल पॅलेस नावाचे हॉटेल दिसले. तिथे आम्ही भरपेट नाश्ता केला, दूध पिलो याच ठिकाणी आम्हाला दत्ता सूर्यवंशी नामक महाराष्ट्रीयन साकलिस्ट भेटले. त्यांना भेटून आम्ही थेट इंदौरकडे निघालो.
अगोदर आम्ही डॉ. अबेडकर नगर वरुन जायचे ठरवले होते परंतु रस्ता एकेरी आणि एकदम छोटा असल्याने आम्ही वळसा घालून जाणाऱ्या मार्गानेच आणि इंदौर शहरातून जाण्याचा निर्णय घेतला. इंदौर च्या गल्ली बोळयातून सायकल चालवायची संधी पुन्हा कधी मिळेल की नाही पण आज आपण ते करू शकू हा विचार करून आम्ही सरळ गर्दीच्या रोडवर आमच्या सायकली वळवल्या. रोड वरील गर्दी वाढत होती शेती संपून दुतर्फा दुकाने आपण उपनगरात दाखल झालो आहोत याची जाणीव करून देत होते. एके ठिकाणी आम्ही काळे मीठ विकणाऱ्या टेम्पोवाल्याकडून मीठ घेण्यासाठी थांबलो तिथून निघून काही मीटर जात नाही तोच सुयोग सरांनी मला आवाज दिला की परत या. मी सायकल वळवून परत आलो तेव्हा कळले की सरांची सायकल पंक्चर झाली आहे. एका झाडाखाली आम्ही सायकल वरील सर्व समान खाली उतरवून सोबत आणलेले अधिकचे ट्यूब वापरुन सायकल तयार केली आणि पुढे निघालो. जस जसे आम्ही पुढे जाऊ लागलो अगदी पुण्याच्या रस्त्यावरून सायकल चलवतोय असा भास होऊ लागला. तुडुंब गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. गर्दी असल्यामुळे आम्हाला अगदी हळू जावे लागत होते. त्या गर्दीतही लोक आमची विचारपूस करत होते. आम्हाला शुभेच्छा देत होते. स्थानिक चॅनल वाले, सोशल मेडियावर सक्रिय असणारे आमचे विडियो काढत होते तर काही आमच्याशी बातचीत करून ते रेकॉर्ड करत होते.
थोड्याच वेळात आम्ही इंदौर च्या राजवड्यासामोर येऊन थांबलो. आम्ही या राजवाड्याचे फोटो काढत असताना लोकानी आम्हाला गराडा घातला काही जन मराठीत तर काही हिंदीत आमची विचारपूस करू लागले आमच्यासोबत सेल्फी काढू लागले आमच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. भव्य राजवाडा राजपूत व मराठा शैलीचे एक शानदार प्रतीक आहे. पहिले तीन दगडी मजले राजपूत शैलीने तर वरील चार लाकडी मजले मराठा शैलीत निर्माण केले आहेत. वेळोवेळी हा राजवाडा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे हे याच्या इतिहासवरून कळते.
तिथे आम्ही जास्त वेळ थांबू शकत नव्हतो नाहीतर उज्जैनला पोचायला उशीर होईल आणि मग दर्शन घेऊन आराम करायला ही वेळ मिळायला हवा या हेतूने आम्ही पुढे निघालो. शहर ओलांडून आम्ही उज्जैन रोडला लागलो भूक लागली होती आणि उज्जैनला जाऊन जेवायचे म्हणल्यावर फार उशीर होईल म्हणून आम्ही उज्जैनरोड वर हॉटेल शोधू लागलो. थोड्या वेळात आम्हाला “अशोक वाटिका” नावाचे हॉटेल मिळाले तिथे आम्ही जेवण घेतले आणि आता चार वाजून गेल्यामुळे आम्ही लगबगीने उज्जैन कडे निघालो. सूर्य पुन्हा एकदा पश्चिमेकडे झुकला होता जेवण केल्यापासून थंडी जाणवायला सुरू झाली होती थोडे पुढे जाऊन स्वेटर घालू असा विचार करून आम्ही सपाट रोडवरून आम्ही सुसाट उज्जैन च्या दिशेने निघालो होतो. शहर आणि गर्दी कमी होऊ लागली होती. पूर्वेला सावल्या लांब – लांब होत चालल्या होत्या. रोड चांगला आणि सपाट होता दोन्ही बाजूला क्षितिजापर्यंत हिरवीगर्द गहू आणि मोहरीची पिके पसरेलेली होती. जस जशी थंडी वाढत होती तस तसे धुके ही वाढत जाऊ लागले होते. आता कुठे सायकलिंग मजेशीर झाले होते. वीसएक किलोमीटर अशीच आनंददायी सायकल राईड चालू राहिली.
सावेर बायपास चौकात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा पहिला आणि क्षणात आम्ही तिथे नतमस्तक झालो. थोडा वेळ आम्ही तिथे घालवला पाणी पिलो सोबतही घेतले आणि पुढे निघालो.
भौगोलिक परिस्थिती अगदी माराठवाड्यासारखी होती त्यामुळे आपण राज्य बदलून आलोय याची अजिबात जाणीव होत नव्हती. सायकल पुढे धावत होती तसे दूरवर धुक्यात हरवत चाललेली गव्हाची शेतं मागे पडत होती. हळू हळू लालसर किरणे जमिनीसमांतर होत होती.
जस-जसा सूर्यदेव दूर रानच्या आड जात होता तसा तसा अंधार आणि हवेतील गारवा ही वाढत होता. थोड्याच वेळात पुनः घरांची गर्दी वाढू लागली, रोडच्या दोन्ही बाजूला आता शेती ऐवजी इमारती दिसू लागल्या. अंधार वाढत होता तसे शहर जवळ आल्याच्या खुणा ही वाढत होत्या. नाजुक धुक्याच्या ढगांना आपल्या प्रखर प्रकाशाने पोखरत मोठ्या वाहनांसोबत आमच्या सायकली ही महाकाल बाबा च्या नगरीत प्रवेश करीत होत्या.
रस्ता दोन्ही बाजूनी दिव्यांनी उजळला होता. शुशोभीत रस्ते पुढे पुढे अजून उजाळत होते. आम्ही आता उज्जैन शहरात आलो आहोत याची जाणीव व्हायला वेळ लागला नाही. आम्ही जस जसे शहरात आत जात होतो पूर्ण शहर दिव्यांनी उजाळले होते जणू काही दिवाळी आली आहे.
शुशोभीत चौकामागून चौक आम्ही ओलंडत जात होतो. संपूर्ण उज्जैननगरी लखलखत्या दिव्यांनी उजळून निघालेली होती. जणू आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. मंदिराचा रस्ता मॅप वर पाहत आम्ही पुढे जात होतो. थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ आलो आहोत याची खात्री झाली. एक गल्लीतून आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो खरे परंतु आम्हाला इथे प्रवेश नाही म्हणून दुसऱ्या दरवाज्याकडे जायला सांगितले तेंव्हा मंदिराच्या जवळच हॉटेल किंवा लॉज पाहू, फ्रेश होऊ आणि मग दर्शनासाठी जाऊ असे ठरवून आम्ही रूम च्या शोधात निघालो. तिथे हॉटेल,लॉज ची अजिबात कमतरता नाही अगदी काही वेळातच आम्ही एक रूम फायनल केली आमच्या सायकली त्यांच्या स्टोररूम मध्ये लावल्या आणि फ्रेश व्हायला वरच्या मजल्यावर गेलो.
मला तर अगदी हुडहुडी भरली होती त्यामुळे गरम पाण्याने कितीही वेळ आंघोळ करत राहावे अशी परिस्थिति होती. सर मला बाहेरून आवरा – आवरा करत होते आणि मी गरम पाण्याची बादली मागून बादली अंगावर घेत होतो. आता तुम्ही नाही आवरले तर मी पुढे निघून जातो अशी धमकी आल्यावर मी गरम पाण्यातून बाहेर आलो आणि मग लवकरात लवकर आवरून आम्ही मंदिराकडे निघालो.
आजचा मुक्काम मंदिराजावळ असल्याने रूममधून बाहेर पडलो की काही मीटरवर मंदिराचे गेट होते. आम्ही चौकशी केली तेव्हा कळले की आम्हाला प्रोटोकॉल ऑफिस मध्ये विशेष दर्शन पास साठी जावे लागेल. तेव्हा आम्ही विचारत-विचारत मंदिर परिसरात एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जात होतो. थोड्या वेळात आम्ही प्रोटोकॉल ऑफिस मध्ये पोचलो आमच्याजवळचे मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे पत्र होते ते आम्ही तिथे सादर केले. थोड्या वेळाने आम्ही पासची फी भरून विशेष पास मिळवले. जवळपास सर्वच मोठ्या देवस्थान व्यवस्थापन विशेष दर्शन पास त्यांच्या प्रोटोकॉल ऑफिस मधून विशेष दर्जा प्राप्त व्यक्ति, त्यांचे शिफारस पत्र असणारे किंवा त्यांच्या इतर नियमात बसणारे भाविक यांना विशेष दर्शन पास दिले जातात.
तपासणी नाक्यावर आम्ही सायकलवर आयोध्येला चाललो आहोत हे समजल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आधी आतल्या बाजूस संपूर्ण मंदिर परिसर फिरून घ्या मग दर्शनबारीत लागून दर्शन घ्या तुमच्या रांगेत जास्त गर्दी नसते.
आम्ही भव्य विविधरंग प्रकाशात उजळून निघालेला मंदिर परिसर मनात भरून घेत होतो. महाकवी कालीदासांनी वर्णन केल्याप्रमाणेच ही संपूर्ण उज्जैन नगरी स्वर्गाचा तुकडाच जणू ! पुन्हा कधी इथे रमायला मिळेल माहीत नाही तेंव्हा हाच क्षण आहे तो चक्षूपटलावर कायमचा कोरायचा मी प्रयत्न करत होतो.
या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या पुनर्निर्मानात आणि या भव्यतेत मराठ्यांचे योगदान आहे ही भावना आम्हाला रोमांचित करत होती. आम्ही बाजूची इतर मंदिरे व परिसर पाहून झाल्यावर आम्ही विशेष रांगेत लागून काही पायऱ्या उतरून आम्ही गाभाऱ्यात पोचलो. भक्तिमय वातावरणात महाकालेश्वराच्या जायघोषात संपूर्ण गाभारा दुमदुमत होता. अगदी काही फुटांवरुन महाकालेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही धन्य धन्य झालो. काही क्षण आम्ही त्या भक्तिमय वातावरणात घालवून आम्ही आलो होतो त्याच रस्त्याने मंदिराबाहेर पडलो. या प्रफुल्लित, भक्तिमय वातावरणात आमचा प्रवासाचा संपूर्ण थकवा कधीच पळाला होता. बराच वेळ आम्ही मंदिर परिसरात घालवून आम्ही पुन्हा तपासणी नाका पार करून बाहेर पडलो व मंदिर परिसरातून हळू-हळू बाहेर पडलो.
आम्ही आज दुपारी उशिरा जेवण घेतल्याने आम्हाला भूक नव्हती तेंव्हा मंदिरपरिसरातून बाहेर पडल्यावर आम्ही डाळखिचडी खाऊन थोडा वेळ एक दुकानासमोर शेकोटीसमोर ऊब घेत थांबलो नंतर थेट रूमवर जाऊन. पायांची भरपूर मालीश करून झोपी गेलो.
आज खऱ्या अर्थाने महाकाल बाबा मला प्रसन्न झाले असे वाटत होते करण काल रात्रीची माझी परिस्थितीचा विचार केला तर मला माझे हसू येऊ लागले. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. माभ्यासाठी तर आजचा प्रवास खूपच शानदार होता. पुढील दूरचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर पायाची आणि एकूणच शरीराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे याची जाणीव मला झाली होती आणि आता पुढे स्ट्रेचिंग, हायड्रेशन, मालिश आणि योग्य आहार यात कुठलीही टाळाटाळ न करण्याचा धडा मी घेतला. उज्जैन च्या या पवित्र नगरीत मी पुढील पूर्ण प्रवासाची उर्जा घेऊन समाधानाने झोपी गेलो.
काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…
This website uses cookies.