A person standing next to a stone monument featuring a carving of a horse rider with a sword, inscribed with text in Hindi, against a backdrop of a stone wall and misty weather.
आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला जाता येईल नाहीतर वाराणशीला जाणे रद्द करावे लागेल तेंव्हा आम्ही आज लवकर उठलो, फ्रेश झालो याच हॉटेल मध्ये रात्रीच्या शेकोटी भोवती बसून दूध पिलो आणि साडेपाच च्या सुमारास आमचा प्रवास सुरू केला.
सायकल चालवायला सुरुवात केली अन आम्हाला पुढील वातावरणाची चाहूल लागली, थंडी इतकी की ग्लोज मधून बाहेर राहिलेल्या बोटांना सुया टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या तेंव्हा आम्ही आमचे ग्लोज बदलून थंडीचे ग्लोज घातले. धुके इतके गडद होते की आम्ही एकामागे एक चालत असताना मागच्या सायकलच्या प्रकाशात पुढील सायकल स्वाराची प्रतिमा समोरच्या धुक्यावर उमटत होती. मोठ्या वाहनांचा अंदाज ते जवळ येईपर्यंत येत नव्हता सर्वांचे दिवे लाल उजेड फेकत समोरून येत होते अर्थात महामार्ग असल्याने आम्हाला समोरून येणाऱ्या वाहनाची काळजी करायची गरज नव्हती. जस जस वेळ जात होता धुके अजून गडद होत जात होते. असेच वातावरण दिवसभर राहिले तर या विचाराने क्षणभर आम्हाला काळजीत टाकले होते.
काही किलोमीटर पुढे येताच अंगावर थेंब टपकायला लागले. सुरुवातीला मला वाटले की मला भास झाला आहे परंतु थोड्या वेळात हे थेंब दाट होऊ लागले. सुरुवातीच्या पावसासारखे ज्यांनी थोड्याच वेळात रोड ओला ओला केल्याचे दिसू लागला, समोरच्या लाइट वर थेंब पडत होते आणि हे हळू हळू वाढून आता आम्ही सुद्धा पावसात भिजू लागलो पुढे जायचे तर लाइट पाहिजेत आणि जर या पावसात ते खराब झाले तर पुढे प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहीला. आम्ही पावसातच पुढे जात होतो. विचित्र वातावरण होते वरुन पाऊस पडत होता आणि सोबत जोरदार थंडी वाजत होती त्यात धुके. आमच्या वजनदार रोड बाइक ओल्या रोडवरुन एकदम सावधानीपूर्वक चलवाव्या लागत होत्या. मी सुयोग सरांना विचारले की हवामानाचा अंदाज पहा या परिसरात पावसाचा काय अंदाज आहे. हा पाऊस म्हणावा तर इतकी थंडी का? हा प्रश्न मला सतावत होता. शेवटी एके ठिकाणी थांबल्यावर एक दुकानदार बाहेर आला होता त्याला परत त्याच्या दुकानात जाईपर्यंत मी पळत जाऊन त्याला विचारले की हा पाऊस कधीपासून आहे? त्यावर तो म्हणाला की हा पाऊस नसून ही ओस की बरीश आहे. हळू जा काही वेळात थांबेल. मी तेथूनच ओरडलो सर मजा घ्या हा दवाचा पाउस आहे.
हळव्या प्रेमाला उपमेत बांधताना ज्या दावबिंदूचा आधार घेतला जातो ते इतकी धडकी भरवत आहे हे जाणून मी मोकळेपणाने हसलो. कधी थांबेल हा पाऊस म्हणून चिंता करणारा मी आता थोड्याच वेळात हा दवबिंदूंचा सोहळा थांबणार आहे तेंव्हा या अद्भुत, अचंबित क्षणांचा आनंद घेऊ असे म्हणत आम्ही पडणारे थेंब आनंदाने स्वीकारत पुढे चालू लागलो.
थोड्या वेळापूर्वी नकोशे वाटणारे पावसाचे थेंब जेव्हा दवबिंदू झाले एकदम हवे हवेसे वाटू लागले. मी आपल्या कल्पनाविश्वात रमत पुढे जात होतो. कधी हे थेंब आमच्या आगमनाने गदगद झालेल्या धारतीमातेचे आनंदाश्रू वाटत होते तर कधी जणू आमच्या सायकलच्या चैन आणि चाक याच्या मधुर विरहगीतावर अश्रू ढाळणाऱ्या अप्सरा या धुक्याच्या घोर घुसमटीत नृत्य करत होत्या.
हळू हळू दवाचा पाऊस कमी होऊ लालगा एखादा अर्धा थेंब अंगावर पडून जणू तो आम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होता. थोड्या वेळात रोडवरील पाणी ही कमी झाले. ओला निसरडा रोड आता कोरडा होत होता. अंधार कमी होऊन काही अंतरावरचा परिसर दिसू लागला होता. बाकी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत होते शुभ्र धुक्याचे गारुड. दूरवर नारळाच्या बागेत अर्ध्यापर्यन्त धुके भरलेले होते.
मृगजळाच्या खेळसारखे गर्द धुके आमच्या समोर होते पण आम्ही तिथे जाताच ते तो परिसर मोकळा करून पुढे जात होते. थोडा वेळ हा खेळ खेळत आम्ही पुढे जात होतो. काही वेळाने आम्ही शिवपुरी बायपास जवळ आलो होतो. आता आम्ही संरक्षित अभयराण्यातून जाणार होतो. त्यापूर्वी आम्ही बायपासच्या बाजूला असलेल्या छोट्या हॉटेल मध्ये नाश्ता केला. मध्य प्रदेश मध्ये सकाळी न्याहरीसाठी कचोरी, सामोसे, जिलेबी असे पदार्थ सहज मिळतात त्यामुळे इथे आम्हाला पोहे मिळाले होते तेंव्हा आम्ही आमचा नाश्ता इथेच उरकून घेतला.
धुके थोडे हलके झाले असले तरीही अजूनही सूर्यदर्शन होत नव्हते. भरधाव वेगाने वाहणाऱ्या हायवेला सोडून बायपास रोडने निघालो वाटेत काही किलोमीटर जंगलात दुकान भेटणार नसल्याने आम्ही अधिकचे पाणी भरून घेतले होते. जस जसे आम्ही या वाटेने पुढे जात होतो झाडी घनदाट होत जात होती. हा रस्ता ही दुहेरी होता आणि वाहतूक विरळ असली तरी रस्ता अगदी निर्मनुष्य नव्हता त्यामुळे राईड ची वेगळीच मजा येत होती.
रोड च्या दोन्ही कडांवरून गर्द झाडांची किनार शेवटपर्यंत जात होती. संरक्षित जंगल असले तरी मानवी हस्तक्षेपाच्या अनेक खुणा जागोजागी दिसत होत्या. एखादी अर्धी व्यक्ति पायी समोरून येत होती अन बाजूच्या जंगलात लुप्त होत होती. एका लयबद्ध चालीत सायकल चालत होती. हळू हळू रोड आणि सायकल माझ्याशी एकरूप होऊ लागले होते आणि माझ्यासाठी अचेतन गोष्टी चेतनरूपात माझ्याशी एकरूप होऊ लागल्या होत्या.
सायकल च्या चेनची घरघर रोडच्या तालात ताल मिसळवून जंगलाच्या काळजात रुतत जाणारे गीत गात जात होती. समोर दोन्ही बाजूंची झाडे आपल्या ओंजळींत धुके भरून त्याची उधळण आमच्यावर करत होती. सोबतची खुरटी झुडपे त्या तालावर बेभान होऊन इतकी नाचत होती कि त्यांच्या घामाचे थेंब दवबिंदू बनून त्यांच्या पानातून टपकत होते. समोर येणारे प्रत्येक झाड जणू आम्हाला आलिंगन द्यायला व्याकूळ झाले होते. गोड्या बाभळी आमच्यावर पिवळ्याशार फुलाची उधळण करू शकत नसल्याने नाराज होत होत्या. अनेक वेड्यावाकड्या लालसर पायवाटा जंगलात नागमोड्या अदा करत नृत्य करत होत्या. मध्ये मध्ये खडबडीत रस्ता त्या तालात आपला ताल मिळवत त्याचे अस्तित्व ही अधोरेखित करत होता. प्रत्येक वळणावर एक पूल आमचे स्वागत करत होता. उजव्या बाजूला सूर्य चंद्रासारखा शीतल पण हतबल होऊन आपला प्रवास जणू लपून छपून करत होता एक वळणावर तो आमच्यापासून लपत होता तर दुसऱ्या वळणावर तो आपले पुसटशे दर्शन देऊन पुन्हा तो गायब होत होता. मध्येच एखादा ट्रक समोरून येऊन आम्हाला वाकुल्या दाखऊन निघून जात होता. कित्येक वेळ हा मंत्रमुग्ध करणारा प्रवास असाच सुरू होता.
काही अंतर असेच कापले गेल्यावर झाडी कमी होऊ लागली दूरवर आधी जी फक्त आणि फक्त झाडी दिसत होती त्याऐवजी आता पुन्हा थोडी थोडी शेती दिसू लागली होती आणि आम्ही थोड्याच वेळात झांसी रोड वर वळणार होतो. त्याआधी आम्ही थोडे थंडीचे कपडे कमी केले आणि पुढे निघालो. परंतु थोड्याच वेळात आम्हाला पुन्हा थंडीच्या कपड्यांचा एक थर पुन्हा घालावा लागला.
दहा वाजत आले होते, आम्ही लवकरच माधव राष्ट्रीय उद्यान शिवपुरी परिसरात पोचलो आता रोडवर छोटी वस्ती, दुकाने दिसू लागले होते. तेंव्हा आम्ही एका ठिकाणी थांबून दूध -केळी घेऊन पुढे निघालो. त्या दुकानाच्या छतावरून अजूनही दवाचे पाणी पावसाच्या पाण्याप्रमाणे पन्हाळातून टपकत होते. सूर्य पुन्हा गायब झाला होता. धुक्याची चादर अजूनही गडद होती.
छोटी मुले आमच्या सायकलभोवती गोळा होऊन ते आमच्या सायकली न्याहाळू लागले. त्यांच्यासोबत मोठी माणसेही हळू हळू जमा होऊ लागले. ते आमच्याशी आमच्या प्रवासाबद्दल माहिती घेऊ लागले. पुढे संपूर्ण प्रवास तुम्हाला अश्याच वातावरणातून करावा लागेल याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली. आम्ही त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो.
आम्ही उज्जैन पासून किमान ३०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार केले होते तरीही इथल्या भौगोलिक परिस्थितित काही फरक पडला नव्हता सुरुवातीपासून ते इथपर्यंत सपाट गव्हाचे व मोहरीचे पिवळेधमक शेतं, पेहराव, पदार्थ काहीच बदल नव्हता.
आता वाटेत आता बाभळी बरोबर बोरी देखील लक्षणीयरित्या दिसू लागल्या होत्या तसे बोर माझे आवडते फळ. लहानपणी मी गोड बोरीच्या शोधत शिवार पालथे घालत होतो. इकडे रोडच्या बाजूला बोरांनी लगडलेल्या बोरी पाहून मी कसा बरे नाही थांबणार? मी वेगवेगळ्या बोरीजवळ थांबून वेगवेगळ्या चवीचे बोरे चाखत पुढे जात असल्याने माझा वेग कमी झाला होता आणि मी काही किलोमीटर मागे राहिलो होतो.
झांशी शहर जवळ येऊ लागले होते आज आम्ही दुपारी जेवणासाठी कुठे थांबलो नव्हतो. आम्हाला लवकरात लवकर झांशी मध्ये जाऊन किल्ल्यावर जायचे होते. हा इतका दूरचा मार्ग आम्ही त्यासाठीतर निवडला होता. आम्ही बलुआ खडकाच्या टेकड्यांना कापून बनवलेल्या लालबुंद चमकदार खडकांच्या रोडवरून पुढे जात होतो. थोड्या वेळात आम्ही अमोला पुलावर येऊन पोचलो हा पूल मध्य प्रदेशमधील सर्वात लांब पूल असल्याचे समजले हा पूल सिंध नदीवरील मंदिखेरा धरणाच्या जलाशयावर उभारलेला आहे.
या पूलावरून सायकल चालवण्याचा एक अद्भुत अनुभव आम्ही घेत होतो. हलक्या धुक्यात दूरवर पुलाचे दुसरे टोक पूर्ण बुडालेले दोन्ही बाजूंनी विस्तीर्ण जलाशय अगदी नजर जाईल तिथपर्यंत फक्त निळेशार पाणी धुक्यात लुप्त होताना दिसत होते. समोर दूरवर धुक्यात हरवलेला पूलावरील रस्ता जणू धरती आणि स्वर्ग यांना जोडणारा पूल वाटत आणि एक एक पेडल मारत ही स्वर्ग शिडी चढत आहोत. कित्येक वेळ आम्ही हा पूल पार करत होतो. शेवटी एकदाच हा पूल संपला आणि मग आम्ही पुन्हा खुरट्या झाडांच्या जंगलातून झाशी शहराकडे मजल – दर मजल करत जात होतो.
हळू – हळू आम्ही शहराजवळ येऊन ठेपलो. बायपास ने थोडे पुढे जावून मग आम्ही शहरात प्रवेश करणार होतो. आम्ही योजनेनुसार पुढे जात होतो मात्र नकळत आम्ही आमच्या नियोजित फाट्यापासून काही किलोमीटर पुढे आलो होतो. मॅप चेक करेपर्यंत आम्ही काही किलोमीटर पुढे आल्याने अजून पुढे जाऊन मग शहरात प्रवेश करण्यापेक्षा आम्ही मागे जाऊन आमच्या नियोजित जागेवरून शहरात प्रवेश करायचे ठरवले आणि आम्ही परत फिरलो. काही वेळ सायकलिंग करून आम्ही एका चौकातून डाव्या बाजूला वळण घेऊन शहराकडे निघालो. गल्ल्या मागून गल्ल्या ओलंडत आम्ही पुढे जात होतो. कुठे गूगलबाबाला तर कुठे स्थानिक लोकांना विचारत आम्ही पुढे – पुढे जात होते. बराचवेळ गल्ली बोळाचा रस्ता पार करत शेवटी आम्ही एका हमरस्त्याला लागलो थोडे पुढे जाऊन अंदाज घेतला की किल्ला आता जवळ आला आहे. आम्ही एके ठिकाणी साऊथ इंडियन हॉटेल पाहून डोसा खायचे ठरवले आणि सायकली बाजूला घेतल्या आणि डोसा खाल्ला परंतु चव पाहता आता आम्ही ठरवले होते की उत्तरेत दक्षिणेचे पदार्थ खाण्याची चेष्टा करणार नाही अशी खूणगाठ बांधून पुढे निघालो. चौका मागून चौक ओलंडत आम्ही किल्ल्याकडे जात होतो.
साडेचार च्या आसपास आम्ही किल्ल्यावर पोचलो परंतु किल्ल्यात सायकलला प्रवेश नसल्याने आम्ही आमच्या सायकली पार्किंग मध्ये लाऊन प्रवेशद्वारावर आमचे व कॅमेऱ्याचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यात प्रवेश केल्या – केल्याच उजव्या बाजूला कडक बिजली प्रसिद्ध तोफ आजही आत्ता आग ओकायला तयार अश्या आविर्भावात आहे. १५ एकर परिसरात पसरलेला हा किल्ला शहराच्या मध्यभागी आजही त्याचे वेगळेपण जपून आहे. किल्ल्याला १० दरवाजे आहेत. इंदौर च्या राजवाडयाप्रमाने झाशी च्या इतिहासात ही मराठ्यांचे योगदान आहे त्यामुळे हा किल्ला न्याहळताना एक वेगळाच आपलेपणा जाणवत राहतो.
२० ते २५ फुटांच्या ग्रेनाइट च्या मोठल्या भिंती अजूनही सुस्थितीत आहेत. असीम शौर्य, पराकोटीच्या राष्ट्रभक्तीचे प्रतीक ही वास्तू न्याहाळताना किती वेळ गेला याचे भान आम्हाला राहिले नाही. श्री गणेश व महादेवाचे मंदिर व उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमूना असलेले बारादरी चे अवशेष त्याच्या भव्यतेची साक्ष देत होते. आम्ही जास्त वेळ किल्ला पाहण्यासाठी घेतल्याने आम्हाला वस्तूसंग्रहालय पाहता नाही आल्याचे शल्य आम्हाला होतेच. मग आम्ही पुन्हा आमच्या सायकली लावल्या होत्या त्या पार्किंग ठिकाणी आलो. तिथे गाईड चे काम करणारे एक वृद्ध व्यक्ति होते ज्यांनी आम्हाला विर रसपूर्ण या किल्ल्याचा आणि राणी लक्ष्मीबाई यांचा गौरवपूर्ण इतिहास वर्णन केला.
आज आम्ही शिवपुरी बायपासला नाश्ता केला होता आणि झाशी मध्ये डोसा खाल्ला होता त्यामुळे आता आम्हाला जोरदार भूक लागली होती आणि आजचा अनुभव पाहता आम्हाला या कडाक्याच्या थंडीपासून आणि दवाच्या पावसात भिजन्यापासून वाचण्यासाठी कपडे घ्यायचे होते. किल्ल्याच्या मागच्या बाजूला बाजार आहे असे समजल्यावर आम्ही तिकडे गेलो बाजारातून गरम कपडे खरेदी केले आणि मग तिथले प्रसिद्ध हॉटेल ओम सुरेश हॉटेल मध्ये जेवणासाठी गेलो. एकदम साधारण हॉटेल पण चविसाठी प्रसिद्ध या हॉटेल मध्ये आम्ही तिथली स्पेशल डाळ भरपेट खाऊन तृप्त झालो. तिथली दाळ प्रसिद्ध आहे. खजुराहो कडे जाणाऱ्या रोडने जेव्हडे पुढे जाता येईल तेव्हडे पुढे जाऊन मग हॉटेल पाहू असे ठरवले पण आमचा अंदाज साफ चुकला ऑनलाइन आणि ऑफलाइन ही आम्हाला रूम मिळेना शेवटी स्थानिक लोकांना विचारून एक हॉटेल मिळाले तिथे आम्हाला रूम आणि गरम पाणी तसेच सायकल लावायला जागा मिळाल्याने आम्ही शेवटी सुटकेचा निश्वास टाकला.
आंघोळ उरकून अंथरुणाला टेकताच झोपेच्या कवेत केव्हा सामावलो मलाही कळले नाही. आज आम्ही १४० कीमी चा प्रवास केला परंतू अशीच परिस्थिति राहिली तर उद्या आम्ही खजुराहो किंवा बागेश्वर धाम पोचणार नाही असे आम्हाला वाटू लागले होते.
काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…
This website uses cookies.