A person stands in front of the intricate architectural structures of a temple complex, surrounded by tourists and lush greenery, on a misty day.
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो मध्ये किती वेळ जातो त्यावर पुढे चित्रकूट, अर्तरा, किंवा बांदा मध्ये जायचे तो निर्णय परिस्थितिनुसार घेउ असे ठरवून आम्ही थोडे निवांत झालो होतो.
दिवसेंदिवस सकाळी उठणे आळसवाणे वाटत होते. थकून चूर- चूर झालेले शरीर अंथरुणावर पडले की पुन्हा पहाटे अविरत मेहनत करायला त्याला तयार करणे म्हणजे स्वतः ची स्वतःसोबत लढाई होती. कधी कधी हारत चाललेल्या शरीराला प्रभूराम भेटीची उर्मी देऊन तयार करावे लागे. त्याला एक अनामिक ओढ देऊन तयार करण्याची लढाई रोज लढत मी पुन्हा नव्या प्रवासासाठी मला तयार करत होतो. आज आम्ही जरा उशिराने धाम सोडायचे ठरवले कारण खजुरहोतील मंदिरे कधीपासून खुली होतील याबाबत आम्ही साशंक होतो आणि दहा – पंधरा किलोमीटर चे अंतर आम्ही लवकर उरकवून मंदिरे पाहण्याचा बेत आखला होता.
निवांत म्हणता म्हणता सर्व आवरून निघायला सव्वा सात झाले होते. तरीही इतके दाट धुके होते कि सकाळचे पाच वाजल्याचा भास होत होता. आता उशीर करून चालणार नव्हते तेंव्हा आम्ही लगेच गावाच्या बाहेर पडून मुख्य हायवे कडे निघालो. रात्री उशिरापर्यंत जागलेले गाव अजूनही झोपलेले होते. मंद प्रकाशात कडूनिंबाच्या झाडाखालच्या शेळ्या त्यांच्या अंगावर टाकलेल्या पोतड्यात अजूनही पहुडलेल्या होत्या. मागील दोन तीन दिवसांपेक्षाही आज धुके खूप दाट होते काही फुटानंतर काहीही दिसत नव्हते. रहदारी कमी असली तरी एकेरी अरुंद रस्ता मोठे वाहन आल्यास त्रासदायक ठरत होता. वाहने जवळ येयीपर्यंत दिसत नव्हते.
असेच वातावरण राहिले तर खाजुराहो मधील मंदिरे कशी पाहणार हा प्रश्न उभा राहिला आणि आम्ही वाट वाकडी करून ज्याच्यासाठी आलो होतो तेच साध्य होणार नाही अशी परिस्थिति उद्भवली होती. थोड्याच वेळात आम्ही मुख्य हायवेव पोचलो डावीकडे वळण घेऊन आम्ही खजुराहोच्या दिशेने पुढे निघालो. खूपच दाट धुके असल्याने आणि त्यातही ईकडे चुकीच्या बाजूने येणारी वाहने आमच्या समोर येऊन ठेपत नाहीत तोपर्यंत दिसत नव्हती. ई -रिक्शा तर अजिबात दिसत नव्हत्या. अश्या परिस्थितीत आम्हाला अत्यंत सावधगिरीने सायकल चलवावी लागत होती. आम्ही बेताने सायकल चालवत पुढे जात होतो. समोर काही फुटावर हायवे गायब होत होता. आम्हाला पास करणाऱ्या वाहनांचा मागचा चमकणारा लाल दिवा काही क्षणात दिसेनासा होत असे. थंडी आणि धुक्याने आमच्या सर्वांगावर दवबिंदुंचा एक थर जमा झाला होता. आम्ही एके ठिकाणी थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा धुक्यातून वाट काढत खजुराहो कडे निघालो.
थोड्या वेळात आम्ही मुख्य हायवे सोडून खजुराहोकडे जाणारा रस्ता धरला. झाडांच्या पानातून दवाचे थेंब खाली पडून खाडाखाली ओलावा तयार झाला होता. आमच्या अंगावरील वरचे स्वेटर ओले झाले होते. तश्या परिस्थितीतहि आम्ही पुढे जात होता कारण थांबण्यात काही अर्थ नव्हता. असे वातावरण किमान दुपारपर्यंत तरी राहतेच असे आम्हला स्थानिकाकडून कळल्याने आम्ही पुढे जाणे पसंत केले.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आम्ही खजुराहो च्या शून्य मैलाच्या दगडाजवळ पोचलो परुंतु आम्हाला चतुर्भुज मंदिरापासून सुरुवात करायची होती आणि तिकडे जाणारा रोड सोडून आम्ही काही किलोमीटर पुढे आलो होतो तेंव्हा आम्ही पुन्हा मागे जाऊन मुख्य रोड पासून मंदिराकडे निघालो. मुख्य मंदिरसमूहापासून हे मंदिर तसे दूर आहे. जतकर गावाजवळ हे छोटेखानी मंदिर एका चौकोनी ओट्यावर उभारलेले आहे. इथे श्री. विष्णूची सर्वात मोठी मूर्ती आहे. थक्क करणारी स्थापत्य कला न्याहळताना या अमुल्य ठेव्याबाबतची उदासीनताही दिसून येत होती. इथे काही वेळ घालवून आम्ही पुढील मंदिरे पाहण्याची योजना आखत असताना आमच्या लक्षात आले कि सायकलने सर्व मंदिरे जाऊन पाहणे फारच वेळखाऊ तसेच प्रत्येक ठिकाणी सायकल लावायला जागा मिळेलच असे नाही. तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला रिक्शा करून मंदिरे पाहण्याची सूचना केली आणि आमच्या सायकली ची देखरेख करण्याची ही हमी त्यांनी घेतली. तेंव्हा आम्ही रिक्शा करून एक – एक मंदिर पाहणीसाठी निघालो. आम्ही दुल्हादेव मंदिरात गेलो जे एक शिवमंदिर आहे. याच मंदिरात एका शिवलिंगासोबत नक्षीकाम केलेले इतर ९९९ शिवलिंग आहेत ज्याला सहस्त्र शिवलिंग सुद्धा म्हणले जाते. इथल्या
जवळ जवळ सर्वच मंदिरावर तत्कालीन समाजजीवन दर्शविणाऱ्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत.
यानंतर आम्ही श्री शांतिनाथ दिगम्बर जैन मंदिर मंदिरात गेलो इथे आधुनिक आणि पुरातन दोन्ही मंदिरे पाहायला मिळतात. इथे श्री शांतिनाथ यांची १२ फुटी मूर्ती आहे. आधुनिक आणि पौरानिकतेचा सुरेख संगम इथे पाहायला मिळतो. या चौरस मंदिर शृंखलेत अनेक पुरातन व नवीन मूर्ती पाहायला मिळतात. एका – एका मंदिरावर शेकडो – हजारो आकृत्या कोरलेल्या आहेत आणि आम्ही भरभर त्या नजरेत भरत एक एक मंदिर अधाश्यासारखे पाहत पुढे जात होतो.
जैन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही भरपेट नाश्ता केला आणि मग मुख्य मंदिरसमूहाकडे गेलो. आम्ही गेटववर तिकीट काढून आत प्रवेश केला. या मंदिर समूहात आम्ही कंदरिया महादेव मंदिर, जाग्दम्बी मंदिर, चित्रगुप्त मंदिर, विश्वनाथ मंदिर, नंदी मंडप, लक्ष्मण मंदिर, वराह मंदिर इत्यादी मंदिरांना भेटी दिल्या. हि सर्व मंदिरे पाहण्यात इतका वेळ गेला कि राहिलेली मंदिरे पाहायचे ठरवले तर आज इथेच मुक्काम करावा लागेल अशी परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही पुन्हा वेळ काढून हि सर्व मंदिरे पाहण्याचा मनसुबा करून परत आम्ही सायकली लावल्या तिकडे जाण्याचा निर्णय घेतला.
खरे तर खुजुराहो म्हणाले कि आपल्या आठवते फक्त मंदिरावरील कोरलेले कामुक कलाकृती आणि ८५ पैकी उरलेल्या २५ मंदिरावरील फक्त तसलेच चित्रे आहेत अशी बदनामी. आम्हीही याच मानसिकतेत सुरुवातीला हि मंदिरे पाहत होतो परंतु हळू हळू आमची मानसिकता बदलू लागली. खरे तर कामुक कलाकृतींचे प्रमाण फक्त ५ ते १० टक्के असताना याबाबत मात्र जास्त चर्चा होताना दिसते.
हि मंदिरे तत्कालीन सामाजिक व धार्मिक जीवनाचा आरसा आहेत. त्यावर कोरलेल्या कलाकृती भक्ती, शृंगार, नृत्य, प्रेम, क्रोध, जीवन, मृत्यू, ध्यान, कीर्ती आणि अजून कितीतरी सामाजमनाचे प्रतिबिंब त्यात आहे. या मंदिरकलाकृतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थांचा समन्वय आहे. मंदिरातून बाहेर पडून रिक्षात बसून निघेपर्यंत आमचे खजुराहो बाबत चे मत पूर्ण बदलले होते. इथली सर्व मंदिरे व्यवस्थित पाहता न आल्याचे शल्य आजही आम्हला आहे.
बाकी रहिलेले मंदिरे न पाहताच आम्ही चतुर्भुज मंदिराकडे मोठ्या जड मानाने निघालो कारण जर आम्ही वेळेचे बंधन पाळले नाही तर आमची योजना फसण्याची शक्यता होती. एक वाजत आला होता आणि अजून कुठे जायचे आणि कोणत्या मार्गाने जायचे हेही ठरायचे होते. आम्ही लवकर आमच्या सायकली तयार केल्या. परुंतु कोणत्या मार्गे जायचे हे नक्की होत नव्हते. आम्ही स्थनिक लोक आणि गुगल मॅप च्या आधारे आजचा शिल्लक वेळ आणि अंतर याची सांगड घालून ठरवले की चांदला मार्गे बांदा किंवा अर्तरा ला जाऊ कारण आज चित्रकूटला पोचणे शक्य नव्हते. सर्वांनी आम्हाला सांगितले की रोड चांगला आहे. तुम्ही आरामात जाऊ शकता.
एकेरी खेड्यापाड्यातून, जंगल – वनातून जाणारा रस्ता असल्याने आम्ही सकाळी खाल्लेल्या सोमोसे – कचोरी वरच पुढे निघालो उशीर झाल्याने काही रस्ता तरी उरकणे गरजेचे होते. एव्हाना सूर्यदर्शन झाले होते आणि धुके गायब होऊन चांगले ऊन पडले होते. परंतू दिवस मावळला की पुन्हा धुके त्याचा धाक दाखवणार ही नक्की होते. काही झाले तरी रात्री उत्तर प्रदेश मधून सायकल चालवायची नाही असा निग्रह आम्ही केला होता तश्या सूचना ही आम्हाला वेळोवेळी मिळत होत्या त्यामुळे आम्ही लगेच खजुराहो सोडले.
एव्हाना धुक्याचे सावट निवळून लख्ख सूर्यदर्शन होऊ लागले होते. पण सूर्यदेव मात्र भरभर पश्चिम क्षितिजाकडे सरकत होता. वस्ती हळू-हळू विरळ आणि अजूनच गरीब होऊ लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार गहू – मोहरीची शेतं डौलाने बहरत होती. दूर बायका शेतात गहू खुरपणी करत होत्या. एखादी-अर्धी मोटारसायकल आम्हाला ओलांडताना मागे वळून वळून पहात होती.
आज चित्रकूट ला पोचणे शक्य नव्हते तेंव्हा हाईवेला दिवस मावळेपर्यंत पोचलो तर पुढे ठरवू कूठे जायचे असा आमचा मोघम प्रवास चालू होता. आता हळू-हळू रस्ता अजुन बारीक होत होता. आजू बाजूला झाडी गर्द होत होती. माणसे अजुन विरळ होत जात होती. सूर्य भरभर आमच्या पाठमोरा खाली- खाली सरकत होता.
येणाऱ्या छोट्या छोट्या गावात लोक आमची विचारपूस करत होते. चहा पाणी ऑफर करत होते मात्र आम्हाला हा परिसर लवकर पार करायचा होता. या परिसरात जेवण करण्यासाठी हॉटेल मिळण्याची सुतराम शक्यता नव्हतीच आणि आम्हालाही जेवणासाठी अजिबात वेळ नव्हता.
चार वाजून गेले होते, वाटेत चंदला हे जरा मोठे गाव लागले परंतु तिथे ही लवकर हॉटेल शोधून जेवण करायला अजिबात वेळ नसल्याने आम्ही एका ठिकाणी दोन-दोन सोमोसे खाल्ले आणि जास्तीचे पाणी घेऊन आम्ही आम्हाला पडलेल्या लोकांच्या गरड्यातून बाहेर पडलो.
जसा – जसा सूर्य मावळतीकडे झुकत होता धुक्याची दुलई जाड होत होती. हिरवीगार माणसांनी गजबाजलेली शेतं एकांत होत होती. मध्येच एखादी बैलगाडी रास्ता पार करून लगतच्या कच्च्या रस्त्याचे निघून जात होती. इकडे अंधार खूप लवकर पडतो, सूर्य क्षितिजावर टेकतो न टेकतो तोच अंधार त्याच्या सम्राज्याची ललकारी अख्या शिवारात घुमायला लागली होती. पिवळ्याशार शेतांनी धुक्याची दुलई ओढून अंधाराच्या कुशीत शिरण्याची तयारी केली होती. आपापल्या ठिकाणी पोचन्याचा शर्यतीत सूर्यादेव जिंकले होते आणि आम्हाला पुनः रात्रीच्या प्रवासाची तयारी करावी लागणार होती.
तेव्हा एके ठिकाणी आम्ही थांबून सायकल ला लाइट लावणे अंधारात चमकणारे कपडे तसेच थंडीसाठी अधिकचे कपडे घालून परिस्थितिशी दोन हात करण्याची तयारी करू लागलो..
आजचा दिवस वस्तूंच्या बाबतीत माझ्यासाठी चांगला नव्हता कारण आज मी खजुराहो मध्ये एका मंदिरात कॅमेरा विसरलो होतो तर एक पाडा पार करत असताना माझ्या सायकल वरील एक बॅग वाटेत निसटून पडली होती दोन्ही वेळेस सुयोग सरांनी त्या वस्तु घेऊन मला त्याबाबत अवगत केले होते. त्यामुळे आम्ही कॅमेरे आत ठेवून दिले, सर्व लगेज व्यवस्थित पुन्हा बांधले. सर्व तयारी करून आम्ही संधि प्रकाशात पुढे जाऊ लागलो.
दिवसभर दमलेला रस्ता जणू आता सुस्त झाला होता. त्यानेही स्वतःला अंधार आणि धुक्यात लपेतून घेतले होते. आम्ही हळू हळू सायकल चे एक एक लाइट सुरू करून आम्ही अजून दमलेलो नाहीत याची जाणीव रस्त्याला करून देत होतो.
जसा जसा अंधार वाढत गेला सायकल चे लाइट पूर्ण क्षमतेने उजाळले होते त्यांच्या प्रकाशझोतात अंधारच्या काळजात धुक्याचा ठाव घेत आम्ही आमचे अस्तित्व प्रखरपणे अहोरेखित करत होतो.
अधून मधून एखादे रेतीचे ढंपर जवळून जात होते आणि त्याच्या जाण्याने धुके आणि धुळीची होणारी तीव्र घालमेल आम्ही टिपू शकत होतोत.
गोदाकाठचा असल्याने मला चांगले माहीत होते की वाळू – रेती ची वाहतूक होत असल्याने रस्त्याची पुढे काय परिस्थिति असेल ते शिवाय आता नदी जवळ येत असल्याची चाहूल लागली होती.
मंद हवेच्या झोकयावर डोळणाऱ्य समोरच्या बाभळीनमधून अंधार आणि धुके चाळून निघत होते.
अंधाराच्या छताडावर चाक देऊन.. आपल्या तीक्ष प्रकाश झोताने धुक्यावर स्वर आमच्या सायकली एका अनामिक वेडात दौडत होत्या. जणू रोडवर नाही तर मऊशार ढगांच्या गालीच्यावर स्वर्गनगरीत सफर करत होत्या. कानात “वेडात मराठे वीर दौडले..” चालू होते. आम्ही समांतर एक लइत पायडल फिरवत एक अचंबित, रोमहर्षक प्रवासाच्या अनुभूतीत रोमांचून पुढे आणि फक्त पुढे जात होतो. जणू थोड्या वेळ पूर्वी अंधाराणे जाहीर केलेल्या साम्राज्यवार आम्ही हक्क सांगत होतो.
झाडी अजून जास्त गर्द होत होती. रस्ता अंगात आल्यासारखे हेलकावे खात होता. आमच्या सायकली कधी खोल गर्त अंधारच्या डोहात सुर मारून पुनः काठावर उसळून येत जणू उफाळलेल्या सागरावर गालबताणे हेलकावे खावे.
एके ठिकाणी रस्ता अचानक डाव्या बाजूला वळता झाला नीरमनुष्य रस्त्यावर अचानक छोट्या टपऱ्या, छोटी – छोटी घरे, तात्पुरते बिड्या – काड्या विकणारे बसलेले होते. त्याच्या नजरा आम्हाला रोखू लागल्या. जसे जसे पुढे जाऊ वर्दळ वाढू लागली प्रत्येक जन आम्हाला रोखून पाहू लागला. काही जन काहीतरी पुटपुटत होते पण तमा कुणाला होती एक चढ चढून आम्ही माथ्यावर आलो आणि समोर पाहतो तो काय? विस्तीर्ण नदी पात्र पूर्ण मोठमोठ्या ढंपरने व्यापून गेलेले. गुडुप अंधारातही त्याचे लाल दिवे संपूर्ण परिसराला लाली आणत होते जणू एखाद्या विक्राळ श्वापदाणे लालबुंद डोळ्याने आपल्या सावजाकडे रोखून पहावे.
इथे इतकी वाहने आहेत मग रोड वर आम्हाला एखांदे दुसरेच ढंपर का आढळले हा प्रश्न मला पडला पण वेळ अशी नव्हती की अश्या प्रशांची उत्तरे शोधावी.
कुणी आम्हाला अडवत नव्हते मात्र दिवसा जे कुतूहल आणि कौतुक लोकांच्या डोळ्यातून व्यक्त होत होते त्याची जागा आता कुठेतरी संशय आणि अनपेक्षितता यांनी घेतली होते. कच्च्या रस्त्याच्या बाजुने ओळीने लावलेल्या ढंपरमधून लोक डोकाऊन आम्हाला पाहत होते. जणू त्यांच्या मनात, कोण आहेत हे? ईकडे कश्याला आले असावेत? रात्री सायकल वर का चालले? असे हजारो प्रश्न उभे असावेत. आम्ही मात्र आमच्या चालीत धुळीने माखलेला कधी कोरडा तर कधी अगदी चिखल असलेला रस्ता मोठ्या शिताफीने कापत पुढे जात होतो.
थोड्या वेळात आम्ही केण नदीवरील पुलावर पोचलो. रात्रीच्या अंधारात दडदडनाऱ्या लांबलचक पूलावरून आम्ही पलीकडच्या तीरावर लवकरात लवकर पोचण्याची शर्थ करू लागलो. पूल ओलांडला कीच घनदाट काटेरी झाडीतून जाणा-या रस्त्यावर सायकल पंक्चर होऊ नये म्हणून काळजी आणि प्रार्थना दोन्ही करत आम्ही पुढे चालू लागलो.
काही वेळ आमच्या मागे एक वाहन होते परंतु त्याने आम्हाला ओवरटेक केले नाही. उजेड जवळ येत होता पुनः दूर जात होता. मी सरांना हाटकले कुणी आपल्याला फॉलो करतेय का. बराच वेळ झाला आपल्या मागील वाहन आपल्याला ओलांडून पुढे जात नाही. असे काही नसावे असे म्हणत आम्ही कच्चा रस्ता लवकरात लवकर संपून डांबरी रोडला लागण्याची वाट पाहू लागलो.
थोड्या वेळातच समोर एक विजेचा खंबा व त्याच्या प्रकाशात एक तपरिवजा दुकान दिसले तिथे आपण पानी ब्रेक घेऊ असे ठरवून आम्ही सायकली पिटाळल्या. तिथे पोचुन आम्ही आमच्या सामानाचा व सायकल चा मागोवा घेतला सर्व काही ठीक आहे याची खात्री केली. पांढऱ्या चिखलाने भरलेल्या बॅगा साफ करू लागलो.
तेव्हडयात एक पिक-अप आमच्याजवळ येऊन थांबले त्यातून पांच ते सहा जन उतरले त्यांनी आम्हाला चांगले निरखून पाहून विचारले “क्या आप पुणे से सायकल पर आयो हो ?” आम्ही “हा” त्यातल्या एकाने विचारले “यहा क्यो आये हो?” आम्ही “मतलब हम आगे जा प्रयगराज जा रहे है” दूसरा एक जन “यह रास्ता आपको किसणे बतया?” आम्ही “खजुराहो के लोंग ओर गूगल से हमणे देखा”
एकजन तोंडातला घुटका थुंकत म्हणाला “रास्ते मे कुछ परेशानी?” “बिलकुल नही “ आम्ही
त्यातला एक जण आमच्या कॅमेरा चेस्ट माउंट कडे पाहत “लगता है आपके पास कैमरे है? तो आपने नदी के आसपास के इलाके का कुछ शूटिंग किया?
आम्ही “नहीं हमारे एक्शन कैमरे रात में अच्छे से काम नहीं करते और हमने खजुराहो में ज्यादा शूट किया तो नहीं किया”
तो म्हणाला “आपको डर नही लगा?” आम्ही “ नही तो .. “ “डर कीस बात का?” मी कुतुहलाने विचारले तो “ आपको पता है क्या यह इलका ८० के दशक से डाकू ओर लुटेरो का रहा है, यहाँ एक दिन मे कई एनकाउंटर हुए है। हालांकि अब परिस्थिति बहुत सुधार गई है फिर भी आज भी लोग उनके आड़ में लूटमार करते है।”
आम्ही एकमेकांकडे पाहिले भीतीची एक शिरशिरी सर्वांगात चमकून गेली. कडाक्याच्या थंडीत गरम व्हायला लागले की काय असे वाटू लागले परंतु मनात चालेल्या घालमेलीचा लवलेश ही चेहऱ्यावर उमटू न देता मी म्हणालो. “ हमें ऐसा कूछ महसुस नहीं हुआ। सभी लोग अच्छे थे जो भी हमे मिले”
मग त्यांनी आम्हाला तुम्हाला भीती वाटत असेल तर सायकली गाडीत टाका तुम्हाला हाइवे ला सोडतो मग तुम्ही हायवे ने कधीही बांद्याला गेलात तरी काही भीती नाही.
आम्ही आम्हाला कसलही भीती वाटत नाही आणि आम्ही जाऊ शकतो म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला पाणी ऑफर केले व एक शॉर्टकट रस्ता सांगितला.
पण आता परिस्थिती बदलली होती. जी माणसे आधार वाटत होती त्यांच्याकडेच संशयाने मी पाहायला लागलो होतो.
आता इथून लवकर निघू या विचाराने आम्ही त्यांचा निरोप घेतला व बांद्याच्या दिशेने निघालो.
मघाशी दुलईत झोपलेली शेतं आता अक्राळ विक्राळ भासायला लागली होती. काळाकुट्ट अंधार जणू आम्हाला गिळंकृत करायला पाहत होता. येणारा प्रकशझोत आधार वाटण्याऐवजी कुणी लुटारू तर नसेन या शंकेने त्याच्याकडे पाहत होतो.
सायकल च्या लाईटच्या प्रकशात उसळणारे धुक्याचे ढग जणू आमच्यासाठी चक्रव्यूव्ह रचत होते आणि आमच्या सायकली त्यात खोल रुतत होत्या.
लागणारी छोटी छोटी घरे मला लपून बसलेल्या डाकुंचे ठिकाणे वाटू लागले.
अज्ञानात सुख असते या ओळींचा अर्थ आता चांगलाच उमगत होता.
टायरखालून उडणारा खडा बाजूच्या झडाबरोबरच मनाला ही हादरे देत होता. आपसूकच पेडल जोरात फिरवले जात होते. सायकली वेगात पुढे धावत होत्या.
सायकली खडबडीत रस्त्यावरून आदळत आपटत जात होत्या. एरव्ही खराब रस्त्यावरून त्यांना उचलून घेणारे आम्ही आता कसलाही विचार न करता बांद्याकडे त्यांना पिटाळत होतो.
जवळुन जाणारा मोटारसायकल वाला वळून वळून का पाहत होता… तो डाकू तर नसेल … पुढे जाऊन तो आपल्याला अडवणार तर नाही..
अशा नाना शंका कुशंका मनाला अस्थिर करत होत्या.
मिणमिणत्या प्रकाशात पुसटसा रस्ता पुढे नाहीसा होत होता त्या रस्त्यावरले आम्ही म्हणजे जणू झपाटलेल्या जंगलात चकव्यात फसलेले सौरावैरा भरकटणारे वाटसरू होतो.
गुडूप अंधारात खड्डयात जाणारे सायकलचे चाक काही क्षण आता हा कुट्ट अंधार सायकलला माझ्यासकट या अंधाऱ्या खोल गर्तेत ओढून घेईल की काय असे होत होते.
आजूबाजूला दूरपर्यन्त पसरलेली झाडे जणू सैतानाची फौज वाटू लागली जे वेगवेगळे आकार धारण करून आम्हाला घाबरु पाहत होती.
लहानपणीच्या सगळ्या भुतांच्या काहाण्यातले सर्व भुते जणू एकच वेळी समोर नाचत होती. कडाक्याच्या थंडीत गालावरून घाम ओघळायला लागला.
कीती वेळ झाला तरी बांदा शहर काही येईना. चकवा झाल्याप्रमाणे आपण एकाच जागेवर तर येत नाही ना याची काही क्षण शंका येऊ लागली. बांदा जिल्हयाचे ठिकाण मग काही किलोमिटर आधी दुकाने, दोन्ही बाजूने लाईट असलेले रस्ते यायला पाहिजेत ना.. पण तसे काही दिसत नव्हते. काही वेळ असाच एकमेकांना काही न बोलता गेला..
पाणी पिण्याची ईच्छा झाली होती पण थांबायची ईच्छा होईना. असेच काही काळ आम्ही पुढे गेलो आणि मग एक मानाने मोठे गाव लागले. जिथे लक्ख प्रकाश होता. गाव सामसूम होण्याच्या तयारीत असले तरी काही मुले कडेला खेळत होती. आम्ही तिथे थांबून मॅप वरून अंतर पाहिले. पाणी पीलो.. तेव्हड्यात मुलांनी आम्हाला गराडा घातला. बुंदेली – हिंदीत ते आम्हाला सायकल बाबत विचारत होती.
पण आम्ही आता शारीरिक आणि मानसिकरित्या ही थकलेलो होतो. लवकरात लवकर राहिलेले अंतर कापून भूक आणि आराम या दोघांची सोय करायची होती. थोड्याच वेळात दाट वस्ती, उजळ आणि मोठा रस्ता, दुकाने वर्दळ वाढत गेली आणि आता आपण बांदा शहराजवळ येत आहोत याची प्रचिती येत होती.
दोघांनीही सुटकेचा निःश्वास टाकत आत्तापर्यंत च्या आजच्या प्रवासावर भाष्य करत हास्य विनोद करत पुढे जाऊ लागलो. जसे – जसे आम्ही पुढे जात होतो प्रकाश वाढत होता इमारती उंच होत जात होत्या. आमची खोल शहरात जायची इच्छा नव्हती कारण आम्ही सकाळीच पुन्हा मुख्य रोडला लागून एकतर चित्रकूट किंवा समांतर रोड ने प्रयागराज ला जाण्याची योजना असल्याने आम्ही अलीकडेच रूम शोधायला सुरवात केली कारण आता उशीर झाला होता आणि थोड्या वेळानंतर आम्हला जेवण आणि रूम हि मिळायला खूप अवधड जाईल. शोधाशोध सुरु असताना एके ठिकाणी आम्ही विनंती केल्यावर आम्हला उड्या लग्नसमारंभासाठी आरक्षित असलेल्या रूमपैकी एक रूम दिली आम्ही आता पर्याय नाही हे पाहून ती रूम फायनल केली आतल्या प्रांगणात एका झाडाखाली सायकली लाऊन आम्ही रुममध्ये आमचे सामान ठेवले. बऱ्याच वेळ विनंती केल्यावर आम्हाला गरमपाणी आणून देण्यात आले. आम्ही तयार होईपर्यंत आकरा वाजून गेले होते. हॉटेल बंद होण्याआधी आम्ही जेवायला त्यांच्याच हॉटेल मध्ये गेलो. आज दिवसभर आम्ही जेवण घेतले नव्हते फक्त कचोरी आणि सोमोसे यावर आम्ही आजचा दिवस काढला होता. आणि एका रोमांचकारी, थरारक प्रवासानंतर भरपेट जेवण तर हवे होतेच.
आम्ही भरपेट जेवण घेतले आणि कुडकुडणाऱ्या थंडीत अधिकची दुलई घेऊन झोपी गेलो. झोपी जाण्यासाठी कोणत्याही अंगाईची अजिबात गरज नव्हती.
आता आम्ही नवी योजना आखली होती आणि आता आम्ही उद्या थेट प्रयागराज गाठणार होतो.
काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…
आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू…
This website uses cookies.